Next
अहिंसा आणि शाकाहाराच्या पुरस्कर्त्या - डॉली व्यास
मनू शाह, ह्युस्टन
BOI
Tuesday, July 23, 2019 | 03:19 PM
15 0 0
Share this article:

डॉली व्यास-आहुजाअमेरिकेतील ह्यूस्टन येथील डॉली व्यास-आहुजा या व्हेगनिझम अर्थात संपूर्णतः शाकाहारवादाच्या खंद्या पुरस्कर्त्या आहेत. पर्यावरण वाचवण्यासाठी आणि प्राण्यांवरील हिंसेला प्रतिबंध करण्यासाठी व्हेगनिझम आवश्यक आहे, असे त्या म्हणतात. या विषयावर अमेरिका आणि भारतात जनजागृतीसाठी ‘दी लँड ऑफ अहिंसा’ हा माहितीपट त्या तयार करत आहेत.
........
१६ एप्रिल २०१४ची संध्याकाळ डॉली व्यास-आहुजा कधीच विसरू शकणार नाहीत. त्या दिवशी त्या आपल्या कुत्र्याला फिरवून घरी परतल्या होत्या आणि इंटरनेटवर एखादी चांगली पाककृती शोधत होत्या. त्याच वेळी त्यांनी गॅरी युरोफ्स्की यांचे ‘माणसे स्वतःची भूक भागविण्यासाठी प्राण्यांना किती क्रूरपणे ठार करतात,’ या विषयावरील भाषण ऐकले. तोपर्यंत डॉली यांनी ऐकलेल्या सर्वांत उत्तम भाषणांपैकी ते एक होते. या भाषणाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला, की एका रात्रीत त्यांनी व्हेगन (संपूर्णतः शाकाहारी) होण्याचा निर्णय घेतला. 

व्हेगनिझमची ही त्यांची सुरुवात होती. प्राण्यांच्या रक्षणार्थ त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली. मंदिरे, जागतिक परिषदा, रेडिओ आदी व्यासपीठांवरील आपल्या भाषणाद्वारे त्यांनी पशुपालन आणि दुग्धोत्पादन यातील क्रूरतेविषयी जागरूकता निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली. प्राणिहत्या आणि प्राण्यांचे हक्क, वैयक्तिक आरोग्य, पर्यावरण यावर होणारा त्याचा परिणाम याबाबत त्या अभ्यासपूर्ण माहिती देत. 

डॉली यांचे आजोबा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होते. स्वातंत्र्यसमरात महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश होता. ज्या निष्ठेने त्यांनी ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध लढा दिला, त्याच तळमळीने डॉली आज प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढत आहेत. अहिंसेवर विश्वास असणाऱ्या गुजराती, गांधीवादी घरात त्यांचा जन्म झाला असला, तरी पाच वर्षांपूर्वी त्यांनी या कामाला सुरुवात करेपर्यंत अहिंसेचा खरा अर्थ त्यांना उमजलेला नव्हता, असे त्या सांगतात. आज त्यांच्या मोहिमेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

ह्युस्टन येथील जैन समाजाच्या अध्यक्षा उर्वशी जैन आणि व्हेगन जीवनशैली जगणाऱ्या मिठा जैन यांनी त्यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केले. डॉली यांचे भाषण ऐकून अनेक लोकांनी व्हेगन जीवनशैली आत्मसात करण्याची तयारी दर्शविली. जैन मंदिरातर्फे रविवारी शाळेतील मुलांना दिले जाणारे दूधवाटप थांबवण्यात आले. त्याऐवजी फोर्टिया या वनस्पतीपासून बनवण्यात येणारे दूध त्यांना देण्यात येऊ लागले. मंदिरातील दिव्यांमधील तुपाची जागा खोबरेल तेलाने घेतली. उर्वशी जैन यांनीदेखील व्हेगन जीवनशैली आत्मसात केली.  

डॉली सध्या ‘दी लँड ऑफ अहिंसा’ हा माहितीपट तयार करत आहे. भारतात व्हेगन जीवनशैली रुजावी यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी हा माहितीपट निर्माण करण्यात येत आहे. भारत ही अहिंसेची भूमी आहे. सजीवांच्या हिंसेला येथे कायमच विरोध झाला आहे. दूध, दुग्धजन्य उत्पादने, मध, रेशीम, चामडे आणि मांस यांचा वापर बंद करून, दैनंदिन जीवनातील अहिंसेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माहितीपटातून करण्यात येणार आहे. 

डॉली यांची व्हेगन होण्याकडे झालेली वाटचाल, भारतातील व्हेगन चळवळ, कार्यकर्ते, वनस्पतीवर काम करणारे डॉक्टर्स, व्हेगन खाद्यपदार्थांचा व्यवसाय आदी माहितीचा या माहितीपटात समावेश आहे. डॉली म्हणातात, ‘एक अब्ज लोकांनी व्हेगन जीवनशैली आत्मसात केली तर त्याचा संपूर्ण जगावर होणारा परिणाम विलक्षण असेल.’ हा माहितीपट बॉलिवूडमधील पारितोषिक विजेते दिग्दर्शक आर्यमन रामसे दिग्दर्शित करत आहेत. 

एका शाकाहारी, गुजराती कुटुंबात जन्म झालेल्या डॉली यांनी मांसाची पहिली चव शाळेत चाखली होती. १३ वर्षांच्या असताना त्या राजकोटला त्यांच्या आजोबांकडे गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी लहानग्या डॉलीला अहिंसा या शब्दाचा अर्थ विचारला होता आणि ‘मांसाहार करतेस का’ असा प्रश्नही विचारला होता. आजोबा ते प्रश्न का विचारत होते, हे डॉली यांना आता उमगले आहे. अहिंसा या शब्दाचा खरा अर्थ शिकवण्याचा ते प्रयत्न करत होते आणि हिंसेपेक्षा शांततेची निवड करण्याविषयी सुचवत होते.

गांधीजी एकदा म्हणाले होते, ‘कोणत्याही देशाची मूल्ये तेथे प्राण्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीवर ठरतात.’ गांधीजी आणि आपले आजोबा यांच्याप्रमाणेच डॉली यांचे स्वप्न आहे, की अहिंसेचे खरे महत्त्व समजलेला देश म्हणून भारताची नवी ओळख निर्माण होईल. (आपल्या खाण्याच्या) सवयीपेक्षा न्यायाची निवड करायला हवी आणि नवा दैवी ठसा उमटवायला हवा.

‘डॉलीज युनिव्हर्स ऑफ अहिंसा’ या नावाने त्यांचे स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल असून, आपल्या माहितीपटासाठी लोकांकडून निधी गोळा करण्याकरिता (क्राउंडफंडिंग) त्यांनी ‘गो फंड मी’वर पेज तयार केले आहे. ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

(‘दी लँड ऑफ अहिंसा’ या माहितीपटाचा ट्रेलर सोबत देत आहोत.)


(To read this article in English, please click here.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Akshaypatil About 17 Days ago
Khup sundhar mahiti,
0
0

Select Language
Share Link
 
Search