Next
फेसबुकची मोहनिद्रा
BOI
Sunday, February 03, 2019 | 12:26 PM
15 0 0
Share this article:‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअॅप’ इत्यादी ‘बुलेट ट्रेन्स’ भरधाव वेगाने पुढे जात आहेत. त्यांना शेवटचे स्टेशन नाही किंवा परतीचा प्रवास नाही. आपण त्यांच्यासह प्रवासात टिकून राहिले पाहिजे, किंवा वाटेतल्या एखाद्या स्टेशनवर उतरले पाहिजे. ‘किमया’ सदरात रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत ‘फेसबुकच्या मोहनिद्रे’बद्दल..
...............
मुलांचे नुकसान होऊ नये आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी घरात टीव्ही न घेणारे ‘अल्पसंख्य’ महाभाग जगात आहेत. तीच गोष्ट मोबाइलची. अन्यथा, लाखो घरांमध्ये दोन दूरदर्शन संच आणि तीन-चार मोबाइल असणे, ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. संगणक व मोबाइलचे पान ‘गुगल’शिवाय हलत नाही. तळहातावरील आवळा जितका सहजपणे बघावा, त्याप्रमाणे साऱ्या विश्वाबद्दलची माहिती आणि ज्ञानभांडार ‘सर्च’द्वारे’ आपल्या पायाशी लोळण घेत आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांच्या द्वारे, साडेसातशे कोटी लोकसंख्या असलेले जग आता एकच कुटुंब बनले आहे. ‘फेसबुक एव कुटुंबकम्!’ भले, घरातल्या घरात लोक एकमेकांशी बोलणार नाहीत; पण साऱ्या जगाशी संपर्क साधतात आणि दर पाच मिनिटांनी प्रतिसाद बघतात. लहान मुले जशी जमिनीत बी पेरल्यावर, ते किती उगवले हे बघण्यासाठी सारखे खणून बघतात, तसेच अगदी! पराकोटीला गेलेल्या ‘माध्यमां’च्या व्यसनातून सुटकेचे काही मार्ग आहेत का? की सगळे दोर कापले गेले आहेत? या ठिकाणी ‘फेसबुक’ची व्याप्ती आणि लोकप्रियतेचा विचार आपण करणार आहोत.

‘फेसबुक’बद्दल सर्वसाधारण माहिती आपल्याला असते. त्याची थोडी उजळणी करू. या ‘सोशल नेटवर्किंग सव्हिसेस’ची स्थापना मार्क झुकरबर्गने आपल्या अन्य चार सहकाऱ्यांबरोबर, चार फेब्रुवारी २००४ रोजी केंब्रिज (मॅसॅच्युसेट्स) येथे केली. जगातील १४० भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. मेन्लो पार्क, कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे त्यांचे मुख्यालय आहे. फेसबुकला बंदी असलेले देश सोडता जगभर त्याचा प्रचंड वापर होत आहे. नोंदणीकृत सदस्य संख्या २४० कोटींच्या घरात आहे. त्यांचा प्रत्यक्ष वापर आहे. याचा अर्थ जागतिक लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक फेसबुकला जोडलेले आहेत. झुकरबर्ग हाच या ‘राज्या’चा अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. सर्वांना फेसबुक विनाशुल्क उपलब्ध आहे. ‘पासवर्ड’ टाकता की आपले खाते उघडते. त्यासाठी इंटरनेट असणे आवश्यक आहे. ‘मेसेंजर’ आणि ‘वॉच’ हे त्यांचेच विभाग आहेत. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि ऑक्युलस या फेसबुकच्याच उपकंपन्या आहेत. मेसेंजरद्वारा ‘अॅलेक्सा’शी संपर्क साधता येतो. त्याचे तांत्रिक काम अजून चालू आहे. ३० जून २०१८ रोजी फेसबुकच्या सेवकांची संख्या ३० हजार २७५ होती. २०१७ची एकूण उलाढाल ४०६५ कोटी आणि निव्वळ नफा १५९३ कोटी डॉलर्स होता. एकूण शेअर्स भांडवल ७४३५ कोटी डॉलर्स. हे सगळे अचाट आणि अफाट आहे. त्यांची मुख्य वेबसाइट www.facebook.com ही आहे. गुगल, अॅमेझॉन आणि अॅपल यांच्या जोडीला फेसबुक ही जगातील चौथी मोठी कंपनी आहे. फेसबुक उघडल्यावर पडद्यावर दिसणाऱ्या जाहिराती, हे त्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. शेअर बाजारात फेब्रुवारी २०१२मध्ये कंपनी प्रथम उतरली. त्यानुसार तिची एकूण मालमत्ता (किंमत) १० हजार ४०० कोटी डॉलर्स होती. 

जिथे इंटरनेट उपलब्ध असेल तिथून ‘डेस्कटॉप’ संगणक, लॅपटॉप, टॅब आणि स्मार्ट फोनद्वारे फेसबुक उघडता येते. आपले नाव नोंदल्यावर तिथे वैयक्तिक माहिती फोटोसह टाकू शकतो. अन्य सदस्यांना ‘मित्र’ म्हणून जोडता येते. नवी माहिती, फोटो, संदेश, व्हिडिओ, लिंक्स यांची तिथून देवाणघेवाण होते. शिवाय आपल्या आवडत्या क्षेत्रांतील मित्रांचे स्वतंत्र ‘ग्रुप्स’ स्थापन करू शकतो. नको असलेल्या लोकांना वगळू शकतो आणि आक्षेपार्ह मजकुराची तक्रार करू शकतो. कंपनी त्याची दखल घेते आणि त्याचा बंदोबस्त करते. खोट्या बातम्या, बदनामीकारक आणि हिंसक वृत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फेसबुकला ‘जागरूक व जागृत’ राहावे लागते. लोकांच्या खासगी, वैयक्तिक माहितीचा अनधिकृत वापर आणि इतरांना तिचा पुरवठा या गोष्टी अलीकडे विवादास्पद ठरल्या आहेत.

व्यवसायवृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात फेसबुकचा वापर होतो. दर वर्षी सदस्यांच्या संख्येत १० टक्के वाढ होत आली आहे. रोज सुमारे ११५ कोटी लोक आपल्या मोबाइलवरून फेसबुक वापरतात. रोज एक कोटी वेबसाइट्सना ‘लाइक’ आणि ‘शेअर’ केले जाते. युरोपमधील ३१ कोटी लोक फेसबुकवर आहेत. एकूण सदस्यांपैकी सुमारे ३० टक्के लोक २५ ते ३५ या वयोगटातील आहेत. दर सेकंदाला पाच नव्या व्यक्तींचा फेसबुकवर प्रवेश होतो. एकूण पुरुष सदस्यांपैकी ६६ टक्के आणि महिला सदस्यांपैकी ७६ टक्के याप्रमाणे रोज नियमित वापर होत असतो. कामाच्या दिवशी दुपारी एक ते तीन या वेळेत सर्वाधिक उपयोग केला जातो. एकूण सदस्यांपैकी सुमारे आठ कोटी खोटी ‘खाती’ आहेत. रोज ३० कोटी नवे फोटो फेसबुकवर टाकले जातात. फेसबुक अकाउंट एकदा उघडले, की किमान २० मिनिटे ते बघितले जाते. दर मिनिटाला पाच लाख नोंदी/टिपणे दाखल होतात. १८ ते २४ वयोगटातील तरुण उठल्या उठल्या फेसबुकमध्ये ‘घुसतात.’ व्यावसायिक जाहिरातींची पाने दोन कोटींच्या घरात असतात. हे सारे काही आश्चर्यकारक आहे.

मी स्वत: १० वर्षांहून अधिक काळ ‘फेसबुक’ला जोडलेलो आहे. पहिल्या दोन वर्षांतच तिथल्या ‘मित्र-मैत्रिणीं’ची संख्या पाच हजार झाली. त्यापेक्षा जास्त मित्र करता येत नाहीत; परंतु आपण किंवा आपल्याला ‘फॉलो’ करता येते. म्हणजे आपला किंवा त्यांचा मजकूर आणि फोटो एकमेकांना बघता येतात. फक्त ओळखीच्या लोकांनाच मित्र बनण्यासाठी विनंती करता येते. ‘फेसबुक’च्या व्यवस्थापनाद्वारे ‘स्वयंचलित’ लक्ष असते. सुरुवातीला माझे मित्र जसजसे वाढत गेले. तेव्हा ‘you are going too fast’ असा संदेश यायचा. झालेल्या मित्रांपैकी काहींना आपण वगळू शकतो. त्याशिवाय नवे मित्र करता येत नाहीत. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप ही माध्यमे अत्यंत प्रभावी आणि वेगवान आहेत. आत्ता आपण लिहिलेला मजकूर आणि तिथे टाकलेले फोटो क्षणार्धात जगभरच्या मित्रांना पोहोचतात. ताबडतोब त्यावर प्रतिसादही येतो. म्हणूनच पत्रलेखन जवळजवळ थांबलेले आहे. कमीत कमी शब्दांत संदेश देणे शक्य असल्याने एक नवीन भाषाच तयार होत आहे. टायपिंग येत नसले, तरी दोन बोटांनी काम साधते. त्याचा कंटाळा आला, मजकूर जास्त असेल तर बोलणे ध्वनिमुद्रित करून ‘ऑडिओ’ पाठवता येतो. समारंभाचे चित्रीकरण, चित्रपट-नाटकांची ‘ट्रेलर्स’ टाकता येतात. त्यामुळे अशी माध्यमे अत्यंत लोकप्रिय ठरली नाहीत तरच नवल!

फेसबुक हे व्यसन आहे का? म्हटले तर आहे, नव्हे आहेच! आपण त्याचा कसा उपयोग करतो, किती वेळ त्यात अडकतो, यावर ते अवलंबून आहे. एक-दोन दिवसांपूर्वीच अशी माहिती पुढे आली आहे, की परदेशात, दिवसभरात काही जण दोन हजार वेळा आपला मोबाइल उघडतात. व्हॉट्सअॅपवर ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘गुड नाइट’ तसेच ‘फॉरवर्ड’चा अतिरेक होताना दिसतो. कितीही वेळा सूचना दिल्या, तरी ते चालूच राहते. समाजमाध्यमाची उपयुक्ततासुद्धा नक्कीच आहे. त्यामुळे त्यावरची आपली खाती बंद करणे, हा निश्चितच योग्य उपाय नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने त्यातून मार्ग काढतच असतो. मित्र आणि नातलगांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी किंवा फोनवरून संपर्क यांचे प्रमाण अत्यंत घटलेले आहे; आणि ही गंभीर, चिंतेची गोष्ट आहे. लग्न वा अन्य समारंभ आणि कोणाचा मृत्यू झाल्यास ‘वैकुंठ’ (स्मशानभूमी) किंवा समाचाराला जाणे, हेच भेटण्याचे दिवस ठरल्यासारखे झाले आहेत.

माझ्या फेसबुकवरच्या मित्रांमध्ये सर्व क्षेत्रातले लोक आहेत. त्यांना प्रत्यक्ष न भेटता त्यांचे काय कार्यक्रम चालू आहेत, ते कळते. माझे त्यांना कळतात. नवीन चित्रपट पाहिल्यावर मी त्याबद्दलचा अभिप्राय (स्टार्स) देतो. तो पाहून फेसबुकवरील शे-दोनशे मित्रमंडळी तो बघायचा नाही ते ठरवतात. वाहिन्यांवरच्या भिकार मालिकांवर परखड टीका करणारे आमचे गट आहेत. समारंभाचे ताजेताजे फोटो बघायला मिळतात. लहान मुलांचे फोटो तिथे टाकू नयेत, असे आमच्या मुला-मुलींचे म्हणणे असते. गावाला गेल्यास फेसबुकवर त्याची माहिती देऊ नये. तुम्ही घरी जास्त काळ नसाल, तर ‘होम अलोन’मधल्या चोरांसारखे तुमच्यावर लक्ष ठेवणारे असतात. आपली खरेदी, आपल्या आवडीनिवडी याच्याबद्दल लिहिले, तर त्या-त्या वस्तूंच्या, सेवेच्या जाहिराती आपल्या ‘पाना’वर अचानक दिसू लागतात. याचा अर्थ ‘बिग ब्रदर’सारखी आपल्यावर ‘वरून’ देखरेख असते. आपण कुठल्याही भागात गेलो, तर ‘तुमचे अमुक अमुक मित्र जवळपास आहेत.’ असा संदेश येतो. असे आपले जीवन ‘सार्वजनिक’ झाले आहे. गुप्तता राखणे आता जवळपास अशक्य आहे. आपले मोबाइल क्रमांक देशभरच नव्हे, तर जगात कुठेही उपलब्ध होऊ शकतात. पूर्वी ‘वरसंशोधन’ करताना मुलाची (किंवा मुलीची) माहिती नातलगांकडून किंवा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडून घेतली जात असे. आता अशी माहिती मिळणे अगदी सोपे झाले आहे. ‘रवींद्र गुर्जर’ असे नाव ‘गुगल’वर टाकले की, जिथे जिथे माझ्याबद्दल माहिती जमा असेल तिथून काही क्षणांत ती समोर येते. या सगळ्याचा साधक-बाधक विचार करून सावधपणे ‘फेसबुक’सारख्या माध्यमांमध्ये आपला वावर असावा.

आपल्या वाढदिवसाला शेकडो लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला, हार-तुरे, फोटो-व्हिडिओ आले की साहजिकच आनंद होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा शुभेच्छापत्र पाठवतात. ही सगळी ‘माध्यमांची कमाल आहे. त्यामुळे हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअॅप’ इत्यादी ‘बुलेट ट्रेन्स’ भरधाव वेगाने पुढे जात आहेत. त्यांना शेवटचे स्टेशन नाही किंवा परतीचा प्रवास नाही. आपण त्यांच्यासह प्रवासात टिकून राहिले पाहिजे, किंवा वाटेतल्या एखाद्या स्टेशनवर उतरले पाहिजे.

दुसरे काही उपाय असतील तर अवश्य सांगा. 
 
रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search