Next
चतुरस्र लेखणी, सिद्धहस्त राजकारणी
BOI
Wednesday, August 08, 2018 | 01:23 PM
15 0 0
Share this article:

कलैग्नार अर्थात कला मर्मज्ञ अशी ओळख असलेले तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री डॉ. एम. करुणानिधी यांचे सात ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले. त्यांनी आपल्या लेखणीने सिनेसृष्टीला आणि आपल्या कर्तृत्वाने तमिळनाडूच्या राजकारणाला खूप मोठे योगदान केले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तिरंगा फडकवण्याचा मान त्यांच्यामुळेच मिळाला. मातृभाषा तेलुगू असूनही आपल्या राज्याच्या तमिळ भाषेसाठी त्यांनी प्रखर लढा दिला. राजकारणात आल्यापासून ते स्वतः एकही निवडणूक हरले नाहीत. अशा चतुरस्र लेखणी असलेल्या सिद्धहस्त राजकीय नेत्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा हा लेख...
............
तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळगम (द्रमुक) पक्षाचे अध्यक्ष डॉ. मुथ्थुवेल करुणानिधी यांच्या निधनाने तमिळ राजकारणातील एक रंगतदार अध्याय समाप्त झाला आहे. तमिळच कशाला, भारतीय राजकारणालाही त्यांनी एक विशिष्ट रंग दिला होता. तमिळनाडूत तुम्ही गेलात, तर काळ्या आणि लाल रंगाचे झेंडे सर्वत्र दिसतील. यातील काळा हा रंग द्राविडी अस्मितेचे, तर लाल हा रंग क्रांतीचे प्रतीक मानण्यात येतो. करुणानिधी यांच्या ‘द्रमुक’ने क्रांती केली का नाही, हे सांगता येणार नाही; मात्र द्राविडी अस्मितेचे प्रतीक म्हणून ते कायम राहतील.

त्यांनी तमिळनाडूच्या राजकारणाला वेगळे वळण दिले. अतिशय लोकप्रिय नेते असलेल्या करुणानिधी यांचे विविध क्षेत्रांत लक्षणीय योगदान राहिले आहे. चतुरस्र लेखक आणि प्रभावी वक्ते असलेल्या करुणानिधींनी राजकारणातही आपले सिद्धहस्त कर्तृत्व दाखविले. पाच वेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या करुणानिधींचे तमिळ जनतेशी विशेष नाते होते. तमिळनाडूचा राजकीय इतिहास त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.  

तशी करुणानिधी यांची मातृभाषा तेलुगू. परंतु तमिळ भाषेसाठी प्रखर लढा उभारणारे म्हणून त्यांची ख्याती आहे. तमिळनाडूच्या अन्य दोन प्रसिद्ध मुख्यमंत्र्यांप्रमाणे (एमजीआर आणि जयललिता)  प्रत्यक्ष पडद्यावर आलेले नसले, तरी चित्रपट कलावंत म्हणूनच ते पुढे आले. कलैग्नार (कला मर्मज्ञ) या नावाने परिचित असलेल्या करुणानिधींकडे काव्यप्रतिभा आणि तमिळ भाषेवरील हुकुमत ही दोन अमोघ अस्त्रे होती. अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिण्यासाठी त्यांनी या अस्त्रांचा वापर केला. 

करुणानिधी यांनी तमिळ चित्रोद्योगात पटकथा लेखक म्हणून पाय ठेवला. त्या वेळी त्यांचे वय विशीच्या आसपास होते. राजकुमारी या चित्रपटाच्या पटकथेला त्यांच्या लेखणीचा स्पर्श लाभला होता. याच चित्रपटाचा नायक मरुथुर रामचंद्रन या नावाचा एक नट होता. त्यापूर्वी काही चित्रपटांतून छोट्या-मोठ्या भूमिका केलेल्या या नटाचा नायक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाने गल्लाबारीवर कल्ला केला आणि या जोडीने मागे वळून पाहिलेच नाही - कोणाकडेच नाही!
द्रविड आंदोलन आणि नास्तिक विचारांच्या प्रसारासाठी ऐतिहासिक आणि सामाजिक कथा लिहिण्याबद्दल करुणानिधी प्रसिद्ध होते. यातील ‘पराशक्ति’ हा चित्रपट विशेष महत्त्वाचा. यातील काही दृश्यांमुळे हिंदूंनी त्याला विरोध केला होता आणि काही काळ या चित्रपटावर बंदीही आणण्यात आली होती. १९५२ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. योगायोग असा, की या चित्रपटाद्वारे तमिळ चित्रसृष्टीतील आणखी एका भावी दिग्गजाने प्रवेश केला होता. तो दिग्गज होता शिवाजी गणेशन. अशा प्रकारे मक्कळ तिलगम (जनतेचा नायक) एमजीआर आणि नडिगर तिलगम (नटश्रेष्ठ) शिवाजी गणेशन या दोघांच्याही चित्रसृष्टीतील यशाची पायाभरणी कलैग्नारची होती!

परंतु चित्रपट ही करुणानिधींची ओळख नव्हे. चित्रपटांत येण्यापूर्वी कित्येक वर्षे करुणानिधी हे राजकीय आंदोलनांत सक्रिय होते. वयाच्या १४व्या वर्षीच (१९३८) त्यांनी हिंदीविरोधी आंदोलनात भाग घेतला होता. त्यानंतर एक वृत्तपत्र आणि ‘मनवर मंड्रम’ नावाची युवकांची संघटना त्यांनी काढली होती. द्रविड चळवळीची ही पहिली विद्यार्थी संघटना होती. त्यांची लेखणीवरील हुकुमत पाहून द्रविडर कळगम पक्षाने त्यांना चित्रसृष्टीत आणले आणि त्यांनी यशाच्या नव्या कथा रचल्या. 
सी. एन. अण्णादुरै यांनी मोठ्या दूरदृष्टीने आपल्या पक्षाचा प्रसार करण्यासाठी चित्रपटांचे माध्यम वापरले. त्यासाठी करुणानिधी, शिवाजी गणेशन आणि एमजीआर यांच्यासारख्या कसलेल्या आणि तरुण कलावंतांचा वापर करण्यात आला. ही सगळी मंडळी आधी राजकारणात, म्हणजेच द्रविड चळवळीत, सक्रिय होती. त्यानंतर ती चित्रपटांत आली ती पक्षाच्या प्रसारासाठी. आपल्याकडे दादा कोंडके यांनी अनेक वर्षे शिवसेनेचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले किंवा निळू फुले यांच्यासारख्यांनी सेवा दलात काम केले, त्याच जातकुळीचे हे काम होते.

प्रखर तमिळनिष्ठा आणि ज्वलंत हिंदीविरोध ही त्यांच्या कारकिर्दीची वैशिष्ट्ये. त्यांचे मूळ नाव दक्षिणामूर्ती. हिंदीविरोधी आंदोलनाच्या काळात त्यांनी ते बदलून मुथ्थुवेल असे करून घेतले. इतकेच नव्हे, तर घरातील सर्व सदस्यांची नावे संस्कृतला समानार्थी शब्दांची ठेवली. उदा. कनिमोळी (मधुरवाणी), मारन (मदन), अळगिरी (सुंदर) इत्यादी. १९५३मध्ये ‘द्रमुक’ने पहिले मोठे आंदोलन हाती घेतले ते दालमियापुरम (तिरुचिरापल्ली जिल्हा) या गावाचे नाव बदलण्यासाठी. या नावामुळे रामकृष्ण दालमिया या उत्तर भारतीय व्यक्तीकडून दाक्षिणात्यांच्या शोषणाचे उदात्तीकरण होत असल्याचा आरोप करून ‘द्रमुक’ने नामांतराचा आग्रह धरला. मुथ्थुवेल करुणानिधी या २९ वर्षीय तरुणाच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दालमियापुरम रेल्वे स्थानकावरील हिंदी नाव पुसून टाकले आणि गावाचे नाव कल्लकुडी असे केले.जवळपास ७५ पटकथा लिहिल्यानंतर मिळालेल्या लोकप्रियतेच्या आधारे १९५७ साली करुणानिधींनी तमिळनाडू विधानसभेत प्रवेश केला आणि वर म्हटल्याप्रमाणे ‘एमजीआर’ यांच्या साह्याने पक्षाचा प्रचारही केला. 

सन १९६७ साली अण्णादुरै मुख्यमंत्री झाल्यानंतर केवळ दोन वर्षांत त्यांचा मृत्यू झाला. त्यांनीच आपला वारसदार नेमलेल्या एम. करुणानिधी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. करुणानिधींनी सुरुवातीपासूनच पक्षात स्वतःचे एक स्थान निर्माण केले होते. त्यांच्या चातुर्याचा निदर्शक म्हणून एक किस्सा सांगितला जातो. १९५०च्या दशकात एका पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर अण्णादुरै यांनी ‘द्रमुक’च्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांचे कौतुक केले. त्या वेळी तरुण करुणानिधींना बोलावून त्यांनी एक अंगठी देऊन त्यांचा खास सत्कार केला. पोटनिवडणुकीत अंगमेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांना साहजिकच ही बाब खटकली. त्यांनी अण्णादुरैंकडे ही तक्रार मांडली. त्यावर अण्णादुरैंनी त्या कार्यकर्त्यांना सांगितले, की ती अंगठी मुळात करुणानिधींनीच दिलेली होती. कार्यक्रमात ती अण्णादुरैंनी ती सर्वांसमक्ष द्यावी, यासाठी करुणानिधींनी ती आदल्या दिवशी अण्णांना दिली होती. ‘तुम्हीही पैसे द्या, तुम्हालाही दागिने देऊ,’ असे अण्णांनी या कार्यक्रमात सुनावले. १९६९ साली ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी द्रमुक पक्षावर नियंत्रण मिळविले. त्यानंतर चार वेळा ते मुख्यमंत्री बनले.   

अशा पद्धतीने पक्षात स्वतःचे स्थान वाढविल्यामुळे करुणानिधींकडे साहजिकच अण्णांच्या मृत्यूनंतर पक्ष व सत्तेची धुरा आली. त्यानंतर दोन वर्षांनी बांगलादेश युद्धातील विजयाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी यांनी मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा केली. चाणाक्ष करुणानिधींनी ही संधी साधली आणि काँग्रेसशी घरोबा केला. त्या निवडणुकीत काँग्रेस आणि द्रमुक दोघांच्याही पदरात चांगल्या जागा आल्या. त्यातून दोन गोष्टी साध्य झाल्या. पक्षाला यश मिळवून देणारे नेते म्हणून करुणानिधींनी स्वतःची हुकुमत ‘द्रमुक’वर स्थापन केली. शिवाय लोकसभेसाठी राष्ट्रीय पक्षांना आणि विधानसभेसाठी स्थानिक पक्षांना झुकते माप देण्याच्या सूत्रावर युती करण्याचा मार्ग रूढ झाला. तुम्ही राज्यात लक्ष घालायचे नाही आणि आम्ही केंद्रात लुडबुड करणार नाही, असा द्राविडी पक्षांनी जणू करारच केला. काँग्रेस आणि भाजपसारख्या देशव्यापी पक्षांनी द्रमुक व अण्णा द्रमुक या पक्षांशी सोयीनुसार केलेल्या सोयरिकीची ही पूर्वपीठिका होय.

इंदिरा गांधींच्या सहकार्यामुळे उत्साहित झालेल्या आणि ‘द्रमुक’वर मांड बसलेल्या करुणानिधींनी एम. के. मुथ्थू या मुलाला वारसदार म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू केले. पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या नेत्यांना हे खुपले नसते तर नवलच. एमजीआर यांनी या असंतोषाला वाचा फोडण्यास सुरुवात केली. १९७२ साली पक्षाच्या अधिवेशनात एमजीआर यांनी खर्चाचा हिशेब मागितला. त्याची साहजिकच प्रतिक्रिया आली आणि एमजीआर यांची ‘द्रमुक’मधून हकालपट्टी झाली अन् सख्खे मित्र पक्के वैरी झाले. वैराचा तो वारसा जयललितांनी पुढे नेला. अन् जयललितांच्या पश्चात करुणानिधींना दफनासाठी हवी ती जागा न देऊन त्यांचे अनुयायीही तो वारसा पुढे नेत आहेत. अर्थात करुणानिधी व त्यांच्या अनुयायांनी जे पेरले तेच आज त्यांना मिळत आहे. 

विवेकवादी आणि नास्तिकवादी म्हणून करुणानिधींना काही जण डोक्यावर घेऊन नाचत असले, तरी ते काही खरे नव्हे. त्यांचा नास्तिकवाद हा हिंदूंच्या प्रथा-परंपरांचा उपमर्द करण्यापुरताच मर्यादित होत्या. एरव्ही हिरव्या रंगाची शाल शुभ मानणे, ज्योतिषाला विचारून कामे करणे इत्यादी अनेक प्रकार ते करत असत. ते रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी की नाही, यावरून त्यांच्या पक्षातील आस्तिक व नास्तिक कार्यकर्त्यांमध्ये जुंपली होती. 
आज तमिळनाडूच्या राजकारणात असलेले एम. के. स्टॅलिन, वैको यांच्यासारखे नेते त्यांचा वारसा पुढे नेत आहेत; मात्र करुणानिधींच्या काळातील आणि आजच्या तमिळनाडूतील परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. याची जाणीव त्यांनाही होती. त्यामुळे बदलत्या काळाशी त्यांनी जुळवून घेतले होते; मात्र तमिळ भाषा आणि द्राविडी अस्मिता यांच्याशी तडजोड त्यांनी कधीही केली नाही. त्यासाठी ते आयुष्यभर संघर्ष करत राहिले. त्या संघर्षाला सात ऑगस्ट रोजी पूर्णविराम मिळाला आहे...!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, दक्षिण भारत आणि भाषा हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search