Next
ऋतुजा आणि राधिकाला करायचे आहे देशाचे प्रतिनिधित्व
BOI
Friday, December 07, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

ऋतूजा गुणवंत‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदराच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात विविध खेळांतील नव्या-जुन्या सुमारे ५० खेळाडूंची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. खेळाडूंचे वैयक्तिक आयुष्य, त्यांची कामगिरी, त्यांच्या अडचणी, त्यातून त्यांनी मिळवलेले यश या सगळ्या गोष्टींचा आढावा यातून घेण्यात आला. या सदराचा आज समारोप करत आहोत. समारोपाच्या या लेखात माहिती घेऊ या फुटबॉलपटू ऋतुजा गुणवंत आणि टेनिसपटू राधिका महाजन’या क्रीडारत्नांबद्दल...
...................................
ऋतुजा गुणवंत ही नावाप्रमाणेच खरोखर गुणवंत फुटबॉलपटू आहे. तिच्या आजवरच्या कारकीर्दीवर नजर टाकल्यास, भविष्यात ती जरूर देशाचे प्रतिनिधित्व करेल याची खात्री पटते. वयाच्या चौथ्या वर्षापासून पुण्यातील ‘विद्यानिकेतन टाटा मोटर्स’ शाळेतून तिने फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्या वेळी शैलेंद्र पोतनीस हे तिचे प्रशिक्षक होते. त्याच वयोगटात ऋतुजाची कामगिरी पाहून, ती निश्चितच एक दिवस देशाचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. ऋतुजाचे मार्गक्रमण त्याच दिशेने सुरू आहे. 

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची ती नोंदणीकृत खेळाडू असून जिल्हा परिषद, शालेय, महाविद्यालयीन, विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय आणि वरिष्ठ राष्ट्रीय इतक्या गटांमध्ये ती आपली गुणवत्ता सिद्ध करत आहे. ‘संगम क्लब’कडून ती पुण्यातील स्थानिक स्पर्धेत खेळते, तर ‘सेतू फुटबॉल क्लब’कडून ती वरिष्ठ स्पर्धा खेळते. मागची दोन्हीही वर्षे तिला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला आहे.

गत वर्षी भारतीय संघाच्या सराव शिबीरात तिची निवड झाली होती, मात्र भारतीय संघात खेळण्याचे तिचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. ‘इंडियन वूमन्स् लीग स्पर्धा’ ती सातत्याने खेळत असल्यामुळे यंदाही तिला भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवडले जाईल याची खात्री वाटते. यंदाच्या मोसमात तिने विविध स्पर्धांमध्ये मिळून सात ते आठ पुरस्कार मिळवले आहेत. वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत एक मिड फिल्डर म्हणून ती आपला दबदबा राखून आहे. 

ऋतूजा गुणवंतभारतात आता कुठे फुटबॉलला बरे दिवस आले आहेत. आता खेळाडूंना आर्थिक पाठबळही मिळते. चौथ्या वर्षी खेळायला सुरुवात केल्यानंतर तिने आठवी, नववी आणि दहावी या तीनही वर्षी जिल्हा परिषदेच्या स्पर्धेत आपली चुणूक दाखवली. खूप लहान वयातच २०१६-२०१७-२०१८ या तीनही वर्षी तिने महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला गटाचे प्रतिनिधित्व केले. यंदा गोव्यामध्ये झालेल्या फुटबॉल स्पर्धेत तिच्या संघाने विजेतेपद मिळवले. या विजेतेपदात तिचा महत्त्वाचा वाटा होता. महाविद्यालयीन स्पर्धा खेळत असतानाच तिने पश्चिम विभागीय, आंतर विद्यापीठ, अखिल भारतीय, आंतर विद्यापीठ या स्पर्धांमध्येदेखील ‘एफएसआय’ या आपल्या क्लबकडून सहभागी होताना आपल्या कामगिरीच्या जोरावर क्लबला विजेतेपद मिळवून दिले.  

ऋतुजा पुणे वॉरियर्स अकादमीची खेळाडू आणि प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिका उत्तम प्रकारे बजावत आहे. राहूल कड, हेमंत झेंडे आणि कल्पना दास या प्रशिक्षकांकडून ऋतुजाला मोठ्या स्तरावरील स्पर्धांसाठी बहुमोल मार्गदर्शन मिळते. सध्या ती मुंबईत इंडियन वूमन्स् लीग स्पर्धेत खेळत असून यातूनच भारतीय संघासाठी सराव शिबिराकरता खेळाडू निवडले जातात. या शिबिरातून होणाऱ्या पात्रता आणि मुख्य फेरीच्या सामन्यातील कामगिरी पाहून खेळाडूंची भारतीय संघासाठी निवड केली जाते. त्यामुळे यंदा मिळवलेले पुरस्कार तिला भारतीय संघाची कवाडे खुली करून देतील.

एकीकडे फुटबॉलमधील कारकीर्द आणि दुसरीकडे महाविद्यालयीन शिक्षण या दोन्हींतही ती अग्रेसर आहे. नुकतीच तिने वाणिज्य शाखेची पदवी मिळवली आहे. आता भारतीय महिला संघाच्या सराव शिबिराची तिला प्रतीक्षा आहे. खरे तर इंडियन वूमन्स लीगमधील प्रत्येक सामन्यात ती सरस कामगिरीसाठी प्रयत्नशील असते. तिची हीच मेहनत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवेल यात शंका नाही. 

राधिका महाजनऋतुजासारख्या उमद्या फुटबॉलपटूबरोबरच पुण्याची राधिका महाजन हीदेखील एक होतकरू आणि मेहनती टेनिसपटू आहे. 

राधिका महाजनने नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय सुपर सीरिज स्पर्धेत विजेतेपद मिळवले. पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या या अखिल भारतीय सुपर सीरिज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या राधिकाने विजेतेपद पटकाविताना दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. राधिका ही विश्वकर्मा विद्यालयात नववीत शिकत असून ती भारतीय डेव्हिस करंडक संघाचे माजी प्रशिक्षक नंदन बाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फर्ग्युसन कॉलेज येथे सराव करते. 
तिचे या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे. राधिकाच्या या कामगिरीबद्दल नवनाथ शेट्ये या टेनिसप्रेमी प्रायोजकाने तिला एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती देऊ केली आहे. भूमिका त्रिपाठी या मानांकित खेळाडूला पराभूत करून राधिकाने कारकीर्दीच्या सुरुवातीलाच आश्चर्यकारक आणि धक्कादायक निकाल नोंदवला होता. चौदा वर्षांखालील गटात तिने मिळवलेले हे पहिलेच विजेतेपद होते. 

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. 'क्रीडारत्ने' सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link