Next
‘फणी’ चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज
BOI
Friday, May 03, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this article:

फोटो : PIB

नवी दिल्ली/भुवनेश्वर :
फणी हे चक्रीवादळ अपेक्षेनुसार आज (तीन मे २०१९) सकाळी आठ वाजता ओडिशातील पुरी किनाऱ्यावर धडकले आहे. ताशी १७५ ते १८५ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून, त्यांचा वेग २०० ते २५० किलोमीटरपर्यंतही जाण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांमुळे समुद्रात दीड मीटर उंचीच्या लाटाही तयार होण्याचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत या चक्रीवादळाने दोन जणांचे बळी गेल्याचे वृत्त आहे. आधीपासून हवामान खात्याकडून वर्तविल्या जाणाऱ्या अंदाजांच्या अनुषंगाने या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारी मदत यंत्रणा आधीपासूनच सज्ज असून, जीवितहानी कमीत कमी व्हावी यासाठी ती प्रयत्नशील आहे. १० लाख जणांना आधीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली असून, ते शनिवारपर्यंत (चार मे) बांग्लादेशात प्रवेश करील, असे  भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के. जे. रमेश यांनी म्हटले आहे. (या वादळाचे नाव बांग्लादेशाने दिलेले असून, त्याचा उच्चार फनी किंवा फोनी असाही केला जातो. त्या शब्दाचा अर्थ नाग किंवा नागाचा फणा असा आहे.)

अशी आहे तयारी...
- केंद्र सरकारकडून एक हजार कोटी रुपयांचा मदतनिधी गुरुवारीच (दोन मे) संबंधित राज्य सरकारांकडे देण्यात आला आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. 

- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ), भारतीय तटरक्षक दल, लष्कर, नौदल, हवाई दल अशा सगळ्या यंत्रणा प्रशासनाच्या मदतीला आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

- तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री उच्चस्तरीय बैठक घेतली.

- समुद्रसपाटीपासून फार उंच नसलेल्या प्रदेशातील सुमारे आठ लाख जणांना गुरुवारी रात्रीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

- ओडिशातील १० हजार गावे आणि ५२ शहरे चक्रीवादळाच्या मार्गात असल्याचा अंदाज. 

- रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे.

- सर्व शैक्षणिक संस्था, व्यावसायिक आस्थापना, कार्यालयेही बंद.

- सरकारने ४८५२ तात्पुरते निवारे उभारले आहेत. त्यात लोकांना शिजविलेले अन्न पुरविले जात आहे. 

- गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या सुमारे सहाशेहून अधिक महिलांना सुलभ प्रसूती केंद्रात हलविण्यात आले आहे.

- आपत्कालीन परिस्थितीत त्वरेने प्रतिसाद देण्यासाठी आरोग्य विभागाने ३०२ चमू तयार ठेवले आहेत. 

- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एनडीआरएफ) २८, तर ओडिशा आपत्ती कृती दलाच्या २० तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाचे ५२५ जवानही अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी सज्ज आहेत. 

- सह्याद्री, रणवीर आणि कदमत्त ही नौदलाची तीन जहाजे आरोग्यपथके, तसेच अन्य आवश्यक साहित्यासह तयार ठेवण्यात आली आहेत. 

- परिसराचे तातडीने हवाई सर्वेक्षण करण्यासाठी, मदतीसाठी, हवेतून मदत साहित्य पुरवण्यासाठी जशी गरज लागेल त्यानुसार वापरता येण्याकरिता विमाने आणि हेलिकॉप्टर्स सुसज्ज आहेत.

- चक्रीवादळानंतर अनेक ठिकाणी पूर येण्याची शक्यता असून, मदत आणि बचाव कार्यासाठी तीनशेहून अधिक नौका तयार ठेवण्यात आल्या आहेत. 

- निवडणूक आयोगाने ओडिशातील ११ जिल्ह्यांतून आदर्श आचारसंहिता शिथिल केली आहे. मदतकार्यात तांत्रिक अडथळे न येण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

- गजपती आणि जगतसिंगपूर या जिल्ह्यांतील चार विधानसभा मतदारसंघांतील मतदान झालेली ईव्हीएम सुरक्षित स्थळी हलविण्यासही निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. 

- १९९९नंतर ओडिशाला एवढ्या मोठ्या चक्रीवादळाचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ. 

- ओडिशातील १९९९च्या सुपर सायक्लोनमध्ये १० हजार जणांचा बळी गेला होता, तर ताशी २७० ते ३०० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. 

- आंध्र प्रदेशात २५ हजार जणांनी सुरक्षित स्थळी आसरा घेतला आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search