Next
किसका रस्ता देखे...
BOI
Sunday, August 12, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले किशोरकुमार यांचा जन्मदिन चार ऑगस्ट रोजी होऊन गेला. त्यांनी गायलेल्या अनेक ‘सुनहऱ्या’ गीतांपैकी ‘सुनहरे गीत’ सदरात आज आपण आस्वाद घेऊ या ‘किसका रस्ता देखे...’ या गीताचा...
..........
चार ऑगस्ट १९२९ ही ‘सबकुछ’ किशोरकुमारची जन्मतारीख. ‘सबकुछ’ असे त्याला का म्हणतात, असे नवीन पिढीतील एखादा चित्रपटप्रेमी विचारू शकतो. त्यांच्या माहितीसाठी सांगतो, की  किशोरकुमार केवळ पार्श्वगायक नव्हता, तर तो उत्कृष्ट अभिनेता होता, संगीतकार होता आणि चित्रपट निर्माताही होता. त्यामुळेच इतके सांगण्यापेक्षा ‘सबकुछ’ हा एकच शब्द पुरेसा ठरतो.. 

किशोरकुमार चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्याचा मोठा भाऊ अशोककुमार चित्रपटसृष्टीत घट्ट पाय रोवून उभा होता. अशा वेळी तो चित्रपटसृष्टीत आला, तेव्हा अशोककुमार खेरीज देव-दिलीप-राज या त्रिमूर्तीचे साम्राज्यही येथे होते. अर्थात गायला मिळाले तर गायचे आणि अभिनय करायला मिळाला तर अभिनय करायचा अशा तयारीने किशोरकुमार चित्रपटसृष्टीत आला होता.

त्यामुळेच त्याने त्या काळात खेमचंद्र प्रकाश या संगीतकाराकडे ‘जगमग जगमग करता निकला’ हे गीत ‘जिद्दी’ (१९४८) या चित्रपटासाठी गायले आणि छम छमा छम, फरेब, नया अंदाज अशा चित्रपटांत कामेही केली होती. अनिल विश्वास (फरेब), सलील चौधरी (नौकरी), सज्जाद हुसेन (रुखसाना), हुस्नलाल भगतराम (काफिला), मदनमोहन (मेमसाहीब) अशा नामवंत संगीतकारांची गीते किशोरकुमारने गायली होती. मीनाकुमारी, मधुबाला, वैजयंतीमाला, उषा किरण, नूतन, निम्मी अशा नायिकांचा नायक म्हणूनही तो पडद्यावर दिसला होता. अभिनयाची उत्तम जाण त्याला होती. झुमरू, शरारत, नौकरी, दूर गगन की छाँव में इत्यादी चित्रपटांतील प्रसंग किशोरकुमार किती उत्कृष्ट अभिनेता होता, हे दर्शवतात. मध्यंतरी ‘बंबई का चोर’ या चित्रपटातील त्याचे एक दुर्मीळ गीत बघण्यात आले. ‘अपना भी कोई यार होता, जो हमें प्यार करता...’ अशी त्या गीताची शब्दरचना होती. त्या गीताच्या वेळी किशोरकुमारचा फक्त आवाज दर्द साकार करत नव्हता, तर ते गीत तो स्वत: पडद्यावर साकार करीत होता. तेव्हा त्याच्यामधील उत्कृष्ट अभिनेत्याचे दर्शन घडत होते.

असे त्याचे गायन व अभिनय क्षेत्रातील कर्तृत्व असूनही त्याला फार प्रचंड लोकप्रियता मिळाली नव्हती. परंतु शक्ती सामंतांचा ‘आराधना’ आला काय आणि किशोरला लोकांनी डोक्यावर घेतले काय? साराच अजब प्रकार. ‘आराधना’नंतर त्याला प्रचंड मागणी येऊ लागली आणि तो फक्त गात सुटला. त्या गाण्यांत काही सुंदर गाणी होती आणि काही...?

‘डॉन’ चित्रपटातील ‘खई के पान बनारसवाला’ हे गाण रेकॉर्ड व्हायचे होते. त्याची चाल व शब्द बघितल्यावर संगीतकार कल्याणजी-आनंदजींजवळ किशोरने आपली नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा कल्याणजी त्याला म्हणाले होते, ‘अरे, आता अशाच गाण्यांचा जमाना आहे. तुला असेच गावे लागेल.’ हे ऐकल्यावर किशोर गप्प बसला; पण आपली नाराजी त्याने गाण्यातून व्यक्त केली नाही. ते गाणे तो समरसून गायला आणि १९८७पर्यंत गातच राहिला.

सर्व प्रकारची गाणी गात गात प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच अचानक त्याने या जगाचा निरोप घेतला. तो दिवस साधून नियतीने गांगुली बंधूंशी एक विचित्र खेळ खेळला. गांगुली घराण्यातील अशोक, किशोर व अनुप असे तिघेही चित्रपटसृष्टीत आले होते. वडील भाऊ अशोककुमारचा जन्म १३ ऑक्टोबरचा. त्या दिवशी सर्व गांगुली परिवार एकत्र जमून दादामुनींचा म्हणजे अशोककुमार यांचा वाढदिवस साजरा करीत असे; पण १९८७च्या १३ ऑक्टोबरला हा आनंद सोहळा झालाच नाही. उलट तो दिवस गांगुली परिवाराला ‘शोकदिन’ म्हणून स्मरणात राहणारा ठरला. कारण त्या दिवशी किशोरकुमार या जगातून गेला. 

हा हरहुन्नरी कलावंत आपली असंख्य गाणी व चित्रपट मागे ठेवून गेला. त्याच्या गीतांतील ‘सुनहरे गीत’ म्हणून एकच गीत निवडणे कठीण आहे; तरीही त्याच्या जन्मदिनाच्या महिन्यात ‘वाट पाहणे’ या संदर्भातील गीत पाहू या. नाही, आता किशोर परत येणार नाही आणि आपण त्याची वाट पाहू नये, म्हणून तर तो विचारत आहे -

किसका रस्ता देखे ऐ दिल ऐ सौदाई 
मीलों है खामोशी, बरसों है तनहाई 
भूली दुनिया कभी की, तुझे भी मुझे भी 
फिर क्यों आँख भर आई

अरे माझ्या वेड्या मना, पागल प्रेमी मना (सौदाई) कोणाची वाट बघत आहेस तू? तुझी काही वर्षे एकाकीपणात गेली आहेत (आणि पुढची वर्षेही एकटेपणाच तुझ्या वाट्याला येणार आहे.) तुझ्या जीवनाच्या मार्गावर दूरवर शांतता आणि स्तब्धताच (खामोशी) आहे. हे जग केव्हाच तुला व मला विसरून गेले आहे. आणि असे असतानाही या माझ्या डोळ्यांत अश्रू का येतात? कोणासाठी येतात?

साहीर यांच्या काव्याच्या या सुरुवातीच्या ओळी! दु:खी मनाचा संवाद आणि त्यातून स्वत:चे स्वत:ला समजावणे. पुढे आपली व्यथा मांडताना ते मन म्हणते -

कोई भी आयेगा ना बाहों में 
तेरे लिए मेरे लिए कोई नहीं रोनेवाला 
झूठ भी नाता नहीं चाहो में 
तू ही क्यों डूबा रहे आहों में 
कोई किसी संग मरे ऐसा नहीं होनेवाला 
कोई नहीं हो यूँ ही जहाँ में बांटे पीर पराई

(हे दुर्दैवी मना) तुझ्या जीवनाच्या मार्गावर तुझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती अगर तिची सावलीही भेटली नाही. प्रेमभराने तुझ्या बाहुपाशात कोणी विसावण्यासाठी येणार नाही. तुझ्या-माझ्यासाठी रडणारेही कोणी नाही. (इतकेच नव्हे तर) एखाद्या खोट्या नात्याच्या बहाण्यातही तुला कोणी आपले म्हटले नाही (आणि तरीही) तू दु:खाने सुस्कारे का टाकतो आहेस त्यांच्यासाठी? कोणी कुणासाठी अगर कुणाबरोबर मरण पत्करते, असे घडत नाही. दुसऱ्याचे दु:ख, वेदना (पीर) या जगात कोणी वाटून घेत नाही.

अशा तऱ्हेने या कडव्यात आपली दु:खद कहाणी व्यक्त करून आता अशा मनःस्थितीत कसे जगायचे, हे विचार मांडताना साहीर लिहितात -

तुझे क्या बीती हुई रातों से 
मुझे क्या खोई हुई बातों से 
सेज नही, चिता सही जो भी मिले सोना होगा 
गई जो डोरी छूटी हाथों से 
लेना क्या टूटे हुए साथों से 
खुशी जहाँ मांगी तूने वही तुझे रोना होगा 
ना कोई तेरा ना कोई मेरा 
फिर किसकी याद आई

(हे मना) उलटून गेलेल्या त्या रात्री आठवून तुला काय मिळणार आहे? (उगीचच त्या आशादायी रात्रींच्या आठवणी कशाला जागवतोस?) माझ्या ज्या गोष्टी हरवल्या आहेत, त्या आठवून मला तरी काही मिळेल काय? (आता आपल्या प्रारब्धात) सुंदर बिछाना मिळो अगर (लाकडे रचलेली) चिता मिळो, जे काय मिळेल त्यावर आपल्याला झोपले पाहिजे. आपल्या हातातून सुटून गेलेले धागे, दोरे गेले ते गेलेच ना? (ते धागे काय परत जुळून येणार आहेत?) ज्यांची साथ सुटून गेली आहे, तुटून गेली आहे (त्यांच्या व त्यांच्या साथीमधील त्या सुखद दिवसांशी आपल्याला आता) काय देणे-घेणे आहे? (ते विसरून जाणेच योग्य.) (अरे वेड्या मना) जेथे तू सौख्य मागितलेस, आनंद मागितलास तेथेच तुला आता दु:खामुळे अश्रू ढाळावे लागणार आहेत. (आता या जगात) ना तुझे कोणी आणि ना माझे कोणी. तरीही कोणाची आठवण आली बरे? कोणाच्या आठवणी माझे कोणी नसूनही मला त्रस्त करत आहेत?

‘जोशिला’ चित्रपटातील हे गीत संगीतकार आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केले होते. पडद्यावर ते देव आनंद यांनी साकार केले होते. आठ-आठ ओळींचे कडवे असलेले हे गीत तसे संगीतात गुंफणे अवघडच आहे; पण ‘आरडीं’नी कौशल्याने ते काम उत्तमपणे पार पाडले आहे. तसेच हे गीत गायकाची कसोटी बघणारे आहे; पण किशोरकुमार यांनी त्याला पूर्णपणे न्याय दिला आहे. 

किशोरने यॉडलिंग करत मस्त मजेशीर गाणीही गायली होती आणि दर्दभरी गीतेही उत्कृष्टपणे गायली होती. तोच प्रकार चित्रपटनिर्मितीबाबत होता, अभिनयाबाबत होता. चलती का नाम गाडी, हाफ टिकट, भागमभाग इत्यादी चित्रपट निखळ मनोरंजनाचे व दूर गगन की छाँव में, दूर का राही हे चित्रपट गंभीर विषयावरचे. दोन्हींतही किशोरकुमार आपल्या अष्टपैलुत्वाचे दर्शन देणारा आणि अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांतून ‘सुनहरी गीते’ देणाऱ्या त्यांच्या त्या कलेला अभिवादन...

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search