Next
‘शिनेमा’तलं वेडिंग...
BOI
Thursday, April 11, 2019 | 11:37 AM
15 0 0
Share this article:‘वेडिंगचा शिनेमा’
हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होतो आहे. गायक आणि संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी या वेळी नव्या भूमिकेतून समोर आले आहेत. ‘वेडिंगचा शिनेमा’ची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्यात. मुक्ता बर्वे,  भाऊ कदम, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमघर, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ, ऋचा इनामदार, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे अशी ‘स्टारकास्ट’ या चित्रपटात आहे. त्याचे हे परीक्षण...  
........
आजकाल आपल्या नातेवाईकांच्या घरात लग्नं न होता ‘वेडिंग’ होत असतात. त्या ‘वेडिंग’चे नवे नवे सोपस्कार पूर्ण करण्यात एक वेगळीच मौज असते. मुलांनी आपली लग्नं आपल्या पसंतीने ठरवलेली असतात आणि मोठे त्यांच्या लग्नाला आणि त्यांच्या लग्नाळू हट्टांना दाद देत असतात. त्याचीच मजा घेऊन तुमच्या-आमच्या, शेजारपाजारच्या, इथल्या तिथल्या घरांमधून घडू शकेल असं कथानक असलेला वेडिंगचा शिनेमा १२ एप्रिलला भेटीला येत आहे.

वेडिंग म्हटलं, की वऱ्हाडी हवेतच. तसे या चित्तरपटात खास वऱ्हाडी आहेत. म्हणजे त्यांची फौजच आहे म्हणा ना. मुलाकडचं हवेशीर, शेतीवाडीच्या घरातलं मनमोकळं वऱ्हाड आणि मुंबईच्या फ्लॅटमधले मुलीकडचे आई-बाबा. मुलगा सासवड गावचा - मुलगी मुंबईची. मुलीला मस्त छान प्री-वेडिंग शूट करायचं आहे. तेही साधं नाही, तर एकदम स्पेशल आणि मोठ्ठं. स्पेशल शूट करायला स्पेशल माणूस हवं ना. म्हणून येते स्पेशल मुक्ता बर्वे. खरं तर तिला चांगला आशय असणारा दर्जेदार चित्रपट करायचा आहे; पण त्यामुळे तिला पैशांसाठी हे प्री-वेडिंग शूट करण्याची गरज पडते. मग तिचा आणि आपलाही सासवड-मुंबई असा प्रवास चालू होतो. तिच्या बरोबर ‘डिओपी’ पाहिजेच. म्हणजे काय... ते मला नाही, भाऊ कदमांनाच विचारा. कारण त्यांनाच ते माहीत आहे. लग्नात नृत्य बसवायला नृत्य दिग्दर्शक लागतो... मग तोही येतो. इव्हेंट मॅनेजर तर हवाच हवा.आता लग्नाला बाशिंग बांधून उभी असलेली नायिका, म्हणजे गोड खळी पडणारी रिचा बरं का, एकदम एक्सायटेड आहे. गंभीर चित्रपट करू पाहणारी मुक्ता ही प्री-शूट डायरेक्टर तशी गंभीर. दोघी एकत्र येतात आणि एकमेकींचे रंग एकमेकींना देतात. त्याच वेळी मुक्ताचं मस्त जुळतं ते नायकाची म्हणजे प्रकाशची आई अलका कुबल यांच्याशी. गावाकडे शेत, व्यवसाय यांकडे लक्ष घालत घराचा खटला खंबीरपणे पेलणारी आई म्हणून अलका कुबल मनात घर करतात. ‘माहेरच्या साडी’तून बाहेर येऊन त्या आता वरमाईची मानाची साडी नेसल्यात आणि त्यात अगदी शोभून दिसतायत. घरातल्या सगळ्यांची मनापासून काळजी घेताना घर जपणारी आणि त्यात खूश असलेली आई, चांगल्या चित्रपटाचं काम करून करिअर करू पाहणारी आजच्या काळाची स्त्री आणि लग्नाच्या योग्य वयात प्रेमात पडून आकंठ बुडालेली यौवना अशा तीन पिढ्यांच्या तिघी स्त्रिया या सिनेमातून भेटतात. तिघींची म्हटली तर वेगळी आणि म्हटली तर एकत्र अशी ही गोष्ट. 

या शिनेमात त्या आनंदी घरातले बाबा म्हणजे खुद्द शिवाजी साटम आहेत. आपला गावाकडचा वयाचा बाज राखत, पण मुलांच्या नवीन आनंदात त्यांना सामील व्हायचं आहे. त्यासाठी अगदी लग्नात नाच करायचीही मानसिक तयारी त्यांनी केलीय. त्यांना आपल्या बायकोचं किती कवतिक आहे. ‘ही फार छान बोलते हां. हिचं करा शूटिंग’ – ते सांगतात. त्याच वेळी त्यांचा मोठा मुलगा म्हणज संकर्षण कऱ्हाडे आपलं शूटिंग व्हावं म्हणून गुप्त तयारी करतो आणि धाकट्या भावाची काळजीपण घेतो. असं नवऱ्या मुलाचं म्हणजे शिवराज वायचळ याचं घर. तोसुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून रिचा सांगेल ते करायला तय्यार. त्याला लागेल ती आणि न लागेल तीही सगळी मदत करणारा मित्र – प्रवीण तरडे. त्याच्याइतकं सोशल काम कोण करणार? असा सगळा एकूण गोतावळा; पण इतकं सगळं गोड गोड असेल तर शिनेमा तो काय? या मधाळ,  लग्नाळू ‘वुड बी’ नवरा-बायकोत मिठाचा खडा पडतोच. आणि त्यांची एकमेकांना समजून घ्यायची खरी तळमळ चालू होते. थोडी धुसफूस होते, थोडी चीडचीड.

त्यात रिचाला आपली प्रथितयश डॉक्टर असणारी आणि त्यामुळे सतत कामात व्याप्त असलेली आई आणि मुलीसाठी वेळ देणारे बाबा यांच्या नात्याचे पदर दिसायला लागतात. मुंबईच्या फ्लॅटमधे राहताना फ्लॅट होत चाललेले सपक नातेबंध समजायला लागतात. तिघांची घुसमट होत असते. त्यात आईला मुलगी लग्न होऊन सासव सारख्या ठिकाणी जमवून घेऊ शकेल का ही शंका. आपण मुलीला वेळ देऊ शकलो नाही, अशी प्रत्येक करिअर करणाऱ्या आईला येते तशी अपराधी भावना. ‘वेडिंग’साठीचं शूट करताना ती भावना डोळ्यांतल्या पाण्यासकट वर येतेच; पण सुदैवानं वाहून गेलेल्या अश्रूंसोबत नातं परत सांधलं जातं. कितीतरी वर्षांनी बाबा आईला पुन्हा कविता वाचून दाखवतात. या दोन्ही सीनमध्ये सुनील बर्वे आणि अश्विनी काळसेकर आपल्या मनात घर करून जातात.

आणि मग काय लग्नाचा बार उडतो की. त्यात मधे सुंदर गाणी येतात. ह्या गाण्यांवर ढिंच्याक् नाचता येणार नाही; पण गुणगुणावी अशी छान गाणी ऐकण्याचा आनंद नक्की मिळतो. पक्याला प्रेमाची कबुली द्यायला लावणारं गाणं कथेच्या सुरुवातीलाच येतं आणि धमाल सुरू होते. ‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं...कुणी जेवल्यावाचून नाही जायचं हं....’ हे गोड गाणं डॉ. सलील कुलकर्णी यांचा मुलगा शुभंकर याने मस्तच गायलंय. उगाचच हे गाणं मनाला स्पर्श करून जातं.

अरे हो, मुख्य सांगायचंच राहिलं. या शिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत चक्क डॉ. सलील कुलकर्णी. हो हो. तेच ते - गायक आणि संगीतकार सलील या वेळी नव्या भूमिकेत आपल्या समोर आले आहेत. त्यांच्या खास शैलीतले खुसखुशीत संवाद लग्नघरात फुटत राहतात. आपल्या पदार्पणातच त्यांनी जोरदार तान घेतली आहे हे नक्की. कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सगळ्या आघाड्या पेलण्यात ते यशस्वी झालेत. मुख्य म्हणजे त्यांच्या मनातली एक गोष्ट आपल्याला सांगण्यात आणि ती बघण्यासाठी खिळवून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये अनेक कसदार अभिनेते आहेत. त्यामध्ये आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वे, कॉमेडीचा बादशहा भाऊ कदम आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याबरोबर संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमघर, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ह्या कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. प्राजक्ता हनमघरने नणंदेचा खास ठसका दाखवत आपल्या छोट्याशा भूमिकेत तडका लावला आहे. प्रवीण तरडेंचा जांभळा गॉगल आणि बोलण्याची ढब कशी विसरता येणार? बायकोला सतत फोन करणारा आणि बायकोवर प्रेम करणारा कॅमेरामन भाऊ कदम. या सगळ्यांनीच त्यांच्या नेहमीच्या कामापेक्षा वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आणखी मजा येते. या चित्रपटाने रिचा ही गोड अभिनेत्री मराठीत आली आहे.  

आपल्या सगळ्या कुटुंबासकट अगदी मुलं, नातवंडं, पुतणे, नाती, भाचे-भाच्या, मित्र-मैत्रिणी यांच्याबरोबर पाहता येईल असा हा शिनेमा. स्वतःच्या लग्नाची आठवण करून देणारा. लग्नाच्या आंबट-गोड आठवणींना उजाळा देणारा हा शिनेमा. यात नकोशी वाटणारी हाणामारी नाही. गाड्या उडत नाहीत. आगी लागत नाहीत. एवढंच काय, व्हिलनही असण्याची या कथेला गरज नाही. तुमच्याआमच्या रोजच्या आयुष्यात कुठे असतो व्हिलन? आपलं आयुष्य आपल्या माणसांच्या आठवणी आणि करामती यांनीच तर रंगतदार होतं. तेच रंग पुन्हा अनुभवण्यासाठी असं लग्न म्हणजे ‘वेडिंग’ सिनेमाघरात जाऊन पाहायला हवं. मुक्ताला तिचा मित्र भेटतो का? तिचा मित्र नेमका आहे तरी कोण? नवरा-नवरीतले रुसवेफुगवे संपतात का नाही? प्री-शूट पूर्ण होतं का नाही... या आणि असल्या प्रश्नांची उत्तरं तिथेच तर मिळतील.

- सुनीला गोंधळेकर, पुणे
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
कविता टिकेकर About 103 Days ago
सुनीलाने पिक्चर बद्दल खूप छान लिहीलं आहे, त्यामुळे उत्सुकता खूप वाढली आहे. पिक्चर नक्की बघणार....👍👍
0
0

Select Language
Share Link
 
Search