Next
‘समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणुका लढणार’
प्रेस रिलीज
Saturday, May 12, 2018 | 04:29 PM
15 0 0
Share this article:मुंबई : ‘काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी चर्चा झाली असून, महाराष्ट्रात एकत्र निवडणुका लढवायचा निर्णय झाल्याने जागा वाटपामध्ये अडचण येणार नाही. मुंबईमध्ये एकत्र लढणार आहोत. त्यामुळे जास्त जागा मिळतील,’ अशी अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलताना दिली.

ते म्हणाले की, ‘आज वेगळया कामासाठी एकत्र येण्याचे ठरवले होते; परंतु मुंबई अध्यक्ष निवड करताना जिल्ह्या-जिल्ह्याचे मत ऐकून घ्यावे, असे मत समोर आले. त्यामुळे त्या निर्णयानुसार निवड होणार आहे. आज छगन भुजबळ असते, तर मला आनंद झाला असता; मात्र ते बाहेर आले त्याचे समाधान नक्कीच आहे. ते बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांना भेटले. कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्याबाबतीत अंतिम निर्णय होईल त्यावेळी माझ्यासह राज्यातील जनतेला खरा आनंद होईल. पहिल्या टप्प्यात यश आले आहे. दुसऱ्या टप्प्यातही यश मिळेल.’

‘मुंबईमध्ये निवडणुका जवळ आल्याने संघटनेला व्यवस्थित चेहरा द्यायचा आहे. यश-अपयश येतच असते; परंतु विचार आणि बांधिलकी कायम ठेवायची असते. ती बांधिलकी तुम्ही ठेवली आहे,’ असे सांगतानाच ‘जुन्या लोकांना बरोबर घेवून नवीन चेहऱ्यांना संधी दयायला हवी. अधिक उत्साहाने काम करणारे व लोकांनी पसंद केलेले सर्व घटकातील लोक पुढे आणण्याची गरज असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

‘मुंबई ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जायची. एक कामगारांची सामुहिक शक्ती पाहायला मिळत होती. गिरणगाव हे आज गिरणगाव राहिलेले नाही. वेगळ्या विचारांचा कामगार आज आला आहे. त्यामध्ये व्हाइट कॉलर कामगारांचा समावेश आहे. विशेष करून त्यामध्ये शासकीय कामगार, अनेक संस्थामध्ये काम करणारा कामगार आहे. यांची संख्या व शक्ती वाढलीय. त्यांच्याशी संपर्क वाढवण्याचे आवाहन करतानाच सामुहिक संघटन उभे करण्याची गरज आहे. मध्यमवर्ग हा मते तयार करतो. त्यांच्याशी संपर्क कसा वाढेल याची काळजी घ्यायला हवी,’ असे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार यांनी सांगितले.

पवार पुढे म्हणाले की, ‘सर्वांना एकत्र घेवून मुंबई शहरातील शक्ती जोमाने आणि समन्वयाचे वातावरण मुंबईत कसे राहिल यासाठी प्रयत्न करावा. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड करण्याबाबत मुंबई पक्ष कार्यालयात मुंबई पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली; मात्र या बैठकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसेपाटील यांच्यासमोर शुक्रवारी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून मुंबई अध्यक्ष निवड केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे मुंबई अध्यक्ष निवड सर्वांचे म्हणणे ऐकून घेवून केली जाणार आहे.’

या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी या मुंबई नगरीचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले असल्याचे स्पष्ट केले. ‘पवारसाहेबांचे विचार या शहरात रूजवण्याचे काम कार्यकर्ते करत आहेत. राज्यात आपण बुथपातळीवर कार्यक्रम राबवणार आहोत तोच कार्यक्रम मुंबईतही राबवला जाईल. वॉर्ड अध्यक्षांनी रोज एक चक्कर वॉर्डात मारावी ज्याच्यामुळे सामान्य माणसाच्या समस्या, त्यांचे प्रश्न कळतील. जिल्हाध्यक्षांनी महिन्यातून एकदा, तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घ्यावी’ असे पाटील यांनी सांगितले.

या वेळी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामाची माहिती दिली आणि पक्ष कसा जोमाने वाढविला जाईल याबाबत मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन माजी आमदार अशोक धात्रक यांनी केले. या वेळी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शरद पवार यांचे मुंबई काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला. शिवाय पक्षाच्या इतर निवडीतील पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

या सभेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार, प्रदेशाध्यक्ष पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक निर्णय अधिकारी वळसेपाटील, पक्षाचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, खासदार माजीद मेमन, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, खजिनदार आमदार हेमंत टकले, माजी खासदार संजय दिना पाटील, आमदार किरण पावसकर, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबईचे माजी अध्यक्ष नरेंद्र वर्मा, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, महेश तपासे, सिध्दीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search