Next
‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती!
BOI
Friday, September 06, 2019 | 06:45 AM
15 1 1
Share this article:ज्यांनी लहानपणापासूनच घरचा गणेशोत्सव अनुभवलाय, ते नतर जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी बाप्पाच्या आठवणी आयुष्यभर त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कायम राहतात. त्यामुळे ते जिथे कुठे असतील, तिथे गणेशोत्सव साजरा करतात. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे अमेरिकेत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नोकरी सांभाळून, स्वतः गणेशमूर्ती तयार करणारी वरदा राहुल पेठे. या अनोख्या गणेशोत्सवाबद्दल सांगत आहेत ज्येष्ठ संगीत कलावंत मधुवंती पेठे...
.........
गणपतीबाप्पा वाजत गाजत आले, सुसज्ज मखरात स्थानापन्न झाले. पूजा-अर्चा, नैवेद्य, आरत्या, अथर्वशीर्षाची आवर्तनं.... नुसती धामधूम. आनंदाची लयलूट... हे बाप्पा दर वर्षी आपल्या घरी येऊन राहतात, म्हणून बालगोपाळांसह सर्वांनाच जवळचे वाटतात. ज्यांना लहानपणापासूनच असे संस्कार लाभले, ते जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी बाप्पाच्या या आठवणी आयुष्यभर त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कायम राहतात. त्याचंच एक उदाहरण म्हणजे वरदा पोतदार... हरिश्चंद्र आणि मीना पोतदार यांची सर्वांत धाकटी कन्या. लाडाचं शेंडेफळ... वडिलांकडून श्रद्धेचं तर आईकडून चित्रकलेचं बाळकडू मिळालेलं. लहानपणापासून एकत्र कुटुंबात वाढलेली. सर्व सणवार यथासांग साजरे करणारी. गणपतीवर विशेष भक्ती; पण एका वेगळ्या प्रकारची. गणपतीला देव न मानता, त्याच्याशी मित्रत्वाचं नातं जोडणारी. त्याच्याशी संवाद साधणारी. 

फेब्रुवारी २००९मध्ये वरदा आमची पेठ्यांची सून झाली आणि राहुलबरोबर अमेरिकेला गेली. जसजसा गणेशोत्सव जवळ येऊ लागला, तशी माहेरच्या गणपतीच्या आठवणींनी व्याकूळ होऊ लागली. त्या वर्षी लगेच गणपतीसाठी मुंबईला येणं शक्य नव्हतं. तेव्हा तिच्या मनानं घेतलं, आपण इथेच अमेरिकेतल्या घरी गणपती बसवायचा. 

एवढाच विचार करून ती थांबली नाही, तर गणपतीची मूर्ती स्वत: घडवण्याचं तिनं ठरवलं. त्यापूर्वी तिने कधी मूर्ती केली नव्हती, पण प्रयत्नांती जमेल असा विश्वास वाटला. शाडूची माती तिकडे मिळत होती. रंग, सजावटीचं साहित्यही उपलब्ध होतं. सोबत नेलेला माहेरच्या गणपतीचा फोटो समोर ठेवला आणि तिने मूर्ती घडवायला सुरवात केली. पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे मूर्ती पूर्ण व्हायला आठ दिवस लागले. राहुलने सजावटीची जबाबदारी घेतली आणि गणेश चतुर्थीला मूर्तीची स्थापना केली. उकडीच्या मोदकांचा नैवेद्यही स्वत: केला. सायंकाळी आरतीला मित्रमंडळी जमली. दोघांच्या मनाला अत्यंत समाधान लाभलं. 

तेव्हापासून गेली दहा वर्षं ती मूर्ती घडवते आहे. कुठलाही साचा न वापरता ती पूर्णपणे हातानेच मूर्तीला आकार देते. त्यामुळे तिच्या दर वर्षीच्या मूर्तीमध्ये वेगळेपण दिसून येतं. आता सरावाने त्यातील बारकावेही (detailing) छान जमायला लागले आहेत.

काही दिवस आधीपासून अंत:प्रेरणेनं तिच्या मनात मूर्ती साकारू लागते. ते चित्र स्पष्ट झालं, की रात्री स्नान करून शुचिर्भूत होऊन मूर्ती घडवायला बसते. आता तर चार-पाच दिवसांत (खरं तर रात्रींत म्हणायला पाहिजे. कारण दिवसभर ऑफिस असतं.) मूर्ती तयार होते. पहिल्या रात्री सात-आठ तासांत कच्ची मूर्ती तयार होते. दुसऱ्या दिवशी ती अधिक रेखीव केली जाते. नंतर मूर्ती वाळल्यावर, पुन्हा रात्री सात-आठ तास बसून मूर्ती रंगवणं होतं. त्यानंतर पुन्हा रंग वाळण्यासाठी वेळ द्यावा लागतो. सर्वांत कठीण काम म्हणजे मूर्तीचा चेहरा रंगवणं. विशेष करून डोळे रंगवणं खूपच काळजीपूर्वक करावं लागतं. 

‘मूर्तीकडे पाहिल्यावर सर्वांत आधी लक्ष जातं ते चेहऱ्याकडे आणि डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या भावाकडे. मूर्तीचे डोळे बोलतात, असं म्हटलं जातं. भाव व्यक्त करणारे ते बोलके डोळे जमण्यासाठी, आपल्यालाही तितक्याच तन्मयतेनं मनापासून ते काम करावं लागतं. मूर्तीशी तदात्म्य साधावं लागतं. (कनेक्ट व्हावं लागतं) तरच तो भाव मूर्तीच्या डोळ्यात दिसतो,’ असं ती म्हणते. 

तिकडे अमेरिकेत सगळे सणवार वीकेंडला साजरे केले जातात; पण गणपतीचं तसं नसतं ना. त्यातून आपल्यासारखी गणेश चतुर्थीला सुट्टी नसल्यानं रजा घेऊन ही दोघं यथासांग पूजाअर्चा करतात. पुढचे पाच दिवस एकेकानं घरून ऑफिसचं काम करून पूजाअर्चा करतात. मित्रमंडळी मात्र रोज आठ वाजता आरतीला हमखास जमतात. रोज ती वेगवेगळा प्रसाद बनवते. एके दिवशी अथर्वशीर्षाची आवर्तनंही होतात. सगळं काही अगदी यथासांग. 

विसर्जनाच्या दिवशी घरच्या बॅकयार्डमध्ये पाण्यानं भरलेला मोठा टब गुलाबपाकळ्यांनी सजवला जातो. नाशिक ढोलच्या गजरात, वाजत गाजत विसर्जन होतं. दोन दिवसांनी ते पाणी अंगणातल्या सर्व झाडांना घातलं जातं. 

आपल्या मायभूमीपासून दूर असताना, घरी असा गणेशोत्सव साजरा करणं हे खासच. आणि गणेशमूर्ती स्वत: साकार करून तिची पूजा करणं, हे तर अगदीच खास... कौतुकास्पद... वरदाच्या जिद्दीला, कलेला आणि श्रद्धेला सलाम... !!!

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 1 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Megha nibandhe About 2 Days ago
Lekh sunder vardache kautuk
0
0
Milind S. Pitale. About 10 Days ago
वरदा खुपच स्तुत्य उपक्रम.. गणपती बाप्पाशी एकरूप होऊन गणपतीची मुर्ति घडविणे हा अनुभव काय असतो ते मला माहीत आहे.. जगाचे भान विसरून त्याला अणुरेणूत साठवून मुर्ति घडवायची सर्वांना शक्य नाही..वरदा तुला सलाम..
0
0
Shobha Vaidya About 12 Days ago
Khup chaan vicharane sagla karte aahes, keep it up
0
0
Sudhakar Kulkarni About 13 Days ago
वरदाची गणेशभक्ती मी स्वत: पाहीली आहे , गणेशाचा वरदहस्त तिच्यावर सदैव राहील तिच्या नावातच वरदा आहे विशेष म्हणजे राहूलही या सगळ्यात तीला मनापासून साथ देतो. या दोघांच्या आम्हाला गेली ७-८ वर्षे सहवास मिळतो व आम्हालाही तो हवा हवासा वाटतो.
0
0
Vihanga Potdar About 13 Days ago
वरदा तुझं कौतुक करावे तितके कमी. तुझी जिद्द,चिकाटी, तल्लीनता सर्वच अप्रतिम ! गणपती बाप्पा तुम्हा सर्वांना सदैव ‌ सुखी ठेवो ही प्रार्थना !
0
0
Rajesh Bhagwat About 14 Days ago
काकी मस्त वर्णन केलय US मधील गणपती उत्सवाचे आणि वरधाच्या गणपती बनविण्याच्या कलेचे... गणपती बाप्पा मोरया ...
1
0

Select Language
Share Link
 
Search