Next
अनाम रिश्ते...
BOI
Saturday, November 25 | 06:45 PM
15 0 0
Share this story

अॅस्ट्रिडसह विनिता आपटेनुकत्याच झालेल्या जागतिक हवामानबदल परिषदेत सहभागी होण्यासाठी पुण्यातल्या तेर पॉलिसी सेंटर या पर्यावरणविषयक स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विनिता आपटे जर्मनीत बॉन शहरात गेल्या होत्या. त्या काळात तिथे वास्तव्यासाठी त्यांनी ‘प्रायव्हेट होस्ट’ हा पर्याय निवडला. परदेशात जाऊन हॉटेलऐवजी एखाद्या अनोळख्या कुटुंबाच्या घरी त्यांची पाहुणी बनून राहण्याचा हा अनुभव त्यांच्यासाठी खूप काही देणारा ठरला... तो अनोखा अनुभव त्यांच्याच शब्दांत....
.............
फ्रँकफर्टहून निघाले आणि झिबर्गला पोहोचले, तेव्हा ती स्टेशनच्या एका कोपऱ्यात उभी होती. मला बघितल्यावर अत्यंत हसऱ्या चेहऱ्याने तिने मला मिठी मारली आणि गुणगुणत्या स्वरात म्हणाली ‘तुझं बॉनमध्ये स्वागत आहे.’ ‘अॅस्ट्रिड’... माझी बॉनमधली यजमानीण अगदी थंडीच्या सकाळी मला घ्यायला तिच्या घरापासून कित्येक मैल लांब आली होती. झिबर्गपर्यंत जलद रेल्वेने येण्याचंही तिनेच सुचवलं होतं. आता माझी बॅग घेऊन ती तिच्या गाडीच्या दिशेने निघालीसुद्धा. मला बॉन हवामानबदल परिषदेत वेळेवर पोहोचता यावं, यासाठी तिची धडपड चालली होती. 

फेलिक्सबरोबरही मैत्र जुळले...
दर वर्षी हवामानबदल परिषदेला मी जातच असते. परंतु या वर्षी माझ्या संस्थेत काम करणाऱ्या तरुण मुलांना अशी संधी मिळावी म्हणून मी त्या सर्वांना घेऊन जायचं ठरवलं होतं. मुख्य अडसर होता तो तिथल्या प्रवेशाचा. कारण आमच्या संस्थेतल्या फक्त एकाच व्यक्तीला तिथे प्रवेश मिळणार होता. काही खटपटी करून प्रथम सर्वांसाठी प्रवेश मिळवला. आर्थिक प्रश्न तर होतेच; पण तेही सोडवले. आता यक्षप्रश्न होता तो म्हणजे बॉनमध्ये राहण्याचा. खूप आधीपासूनच बॉनमधली सगळी हॉटेल्स फुल असल्याची सुवार्ता सगळ्याच वेबसाइट्स देत होत्या. तितक्यात ‘यूएनएफसीसीसी’च्या वेबसाइटवर ‘खासगी यजमान’ (प्रायव्हेट होस्ट) असा एक पर्याय दिसला. मी माझी सहकारी दीना हिला तो पर्याय दाखवला आणि ती कामाला लागली. काही दिवसांतच तिने त्या सहा जणांसाठी (तीन-तीनच्या दोन तुकड्यांत ते येणार होते) आणि माझ्यासाठी खासगी घरांमध्ये राहण्याची सोय होत असल्याचं कळवलं. माझी यजमान होती ‘अॅस्ट्रिड.’ मी इथून निघण्यापूर्वी तिला व्हॉट्सअपवर काही संदेश पाठवले होते. त्यानंतर तिने काही सूचनाही दिल्या होत्या. त्याप्रमाणे मी झिबर्गला उतरले आणि तिच्या स्वाधीन झाले. प्रत्येक वेळी कोणत्याही आंतरराष्ट्रीय परिषदेला गेलं, की तिथले पत्ते शोधणं हा नेहमीचाच शिरस्ता. परंतु या वेळी अशी कोणतीही यातायात करावी लागणार नाही, याचा मला भलताच आनंद वाटत होता. 

अनाम रिश्ता...झिबर्ग ते बॉन या २५ मिनिटांच्या प्रवासात अॅस्ट्रिड माहिती देत होती. बॉन फारच चिमुकलं असल्यामुळे हवामानबदल परिषद घेताना अनेक शक्यता विचारात घेतल्या गेल्या होत्या. त्यामध्ये विविध देशांतून येणाऱ्या प्रतिनिधींची सोय करणं, हे आव्हानात्मक काम होतं आणि त्यासाठी सरकारने वर्तमानपत्रातून नागरिकांना आवाहन केलं होतं, की आपल्याकडे इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या पाहुण्यांसाठी पुरेशी हॉटेल्स नाहीत. त्यामुळे ज्यांची इच्छा असेल त्यांनी स्वतःच्या घरी पाहुण्यांची सोय करून यजमानपद स्वीकारावं. या आवाहनाला प्रतिसाद देऊन जवळपास एक हजारपेक्षा जास्त नागरिकांनी स्वतःच्या घरात पाहुण्यांना ठेवायची तयारी दर्शविली. अर्थातच आम्ही सगळ्यांनी तोच पर्याय निवडला. एका सर्वस्वी अनोळखी देशात जायचं, तेही पाहुणचार घ्यायला.... कोणीच कोणाला माहिती नाही; पण त्या लोकांनी केवळ विश्वासावर आलेल्यांना स्वतःच्या घरात सामावून घेणं, या कल्पनेनंच मी जर्मन लोकांना १०० टक्के मार्क्स देऊन टाकलं आणि अॅस्ट्रिडच्या घरी पाऊल टाकलं. दारातच फेलिक्स या तिच्या श्वानाने स्वागत केले. अत्यंत कुतूहलाने माझ्याकडे बघत गुरगुरून तो अॅस्ट्रिडकडे पाहत होता. तिने त्याला प्रेमाने सांगितले, की ती आपली पाहुणी आहे आणि दहा दिवस इकडे राहणार आहे. जा तिची खोली तिला दाखव. फेलिक्स लगेच जिन्याने वर जाऊन माझ्या खोलीत बसला. 

ती म्हणाली, ‘फेलिक्सला तू आवडलीस बरं का! आता मला काळजी नाही. मी किल्ली तुझ्याकडे देऊन जाऊ शकते.’ मला तिचं हे सांगणं नंतर क्षणोक्षणी पटत राहिलं, इतकी माझी व फेलिक्सची आणि तिच्याशीही मैत्री झाली. तिने जेव्हा यजमानपद स्वीकारायचं ठरवलं होतं, त्याच वेळी सांगितलं होतं, की तिला समवयस्क बाईला निवडायचं आहे. मी आणि ती अगदी सारख्याच वयाच्या, पण ती माझ्याहून दोन महिन्यांनी मोठी आहे त्यामुळे तिने लगेचच एक दटावणी केली, ‘विनिता, हे बघ मी तुझ्याहून दोन महिन्यांनी मोठी आहे. त्यामुळे तू मी म्हणेन ते ऐकायचं. तर आता बाकी सगळं आवरण्यापूर्वी छान काहीतरी गरम गरम खाऊन घेऊ.’ असं म्हणून अति प्रेमाने तिने कॉफी, टोस्ट, बीन्स असा सगळा सरंजाम मांडला. 

अॅस्ट्रिडच्या घरी गणपतीही...
एकीकडे माझ्यावर सूचनांचा भडिमार सुरू होता. ‘हा बघ नकाशा काढून ठेवला आहे. त्यावर खुणा केल्या आहेत. इथून जवळच ट्राम स्टेशन आहे. तिथून ६१ नंबरने जा. सिटी सेंटरला उतर. तिथून ६६ नंबरसाठी जिन्याने खाली जावं लागेल. ती ट्राम थेट बॉन किंवा बुला झोनमध्ये जाईल...’ इत्यादी इत्यादी. त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी ही माझी दोन महिन्यांनी मोठी असलेली ताई आठ वाजले, की माझी वाट बघायला लागायची. दिवसभराच्या घडामोडींवर चर्चा, आपली संस्कृती, राजकारण, कुटुंब व्यवस्था याविषयी तिला खूप कुतूहल होतं. ती एक-दोन वेळा भारतात येऊनही गेली होती. फेडरल मिनिस्ट्रीमध्ये डिप्लोमॅट म्हणून काम करणारी अॅस्ट्रिड म्हणजे उत्साहाचा धबधबाच होता. सकाळी ती लवकर ऑफिसला जायची आणि तिचा नवराही फार पहाटे निघायचा. त्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून मी खोलीतच वाचन किंवा काहीतरी काम करत बसायचे व ते बाहेर पडले, की फेलिक्स यायचाच दारावर. मग आम्ही दोघं भारतीय नाश्ता करायचो. त्याला व तिलाही मी पोहे, उपमा, इतकंच काय, मेतकूट भात, खिचडी, खीर खायला घालून एकदम मराठी करून टाकलं. तिच्या घरी तर अनेक ठिकाणी तिचं भारतप्रेम दिसून येत होतं. घरातल्या कपाटावर गणपती बघून मी आश्चर्यचकित होऊन नमस्कार करेपर्यंत तिने गणपतीची छोटी मूर्तीच माझ्या हातात दिली. म्हणाली, ‘तुझ्या पलंगाशेजारी ठेव.’ 

क्रिस्टियान व स्टेफी या जोडप्यासह...मी निघायच्या दोन दिवस आधी तिला बर्लिनला जायला लागणार होतं. तरीही तिचा मी तिथेच राहावं असा आग्रह होता; पण मला ते प्रशस्त वाटेना म्हणून मी माझ्या ऑफिसमधली माणसं जिकडे उतरली होती, त्या कुटुंबात जायचं ठरवलं. तिकडे शेवटचे दोन दिवस कोणीच राहणार नव्हतं. म्हणून त्यांच्या परवानगीने मी क्रिस्टियान व स्टेफी या तरुण जोडप्याकडे राहायला गेले. अतिशय उत्साही क्रिस्टियान मी पोहोचल्या-पोहोचल्या पोहे व उपमा करणार म्हणून वाट बघत बसला होता. त्यालाही भारतीय पदार्थ, भारत, तिथली संस्कृती याविषयी खूप आस्था आहे. स्टेफी तर तिची ‘डीएचएल’मधली नोकरी सांभाळून योगाचं प्रशिक्षण देते. 

चैत्राली ही माझी पत्रकार मैत्रीणही आमच्याबरोबर अली होती व तीही अशाच एका आजीकडे राहिली होती. मोनिका नावाची ७२ वर्षांची आजी जीवनातला आनंद किती प्रकारे घेऊ शकते, हे बघूनच आम्ही दोघीही अचंबित झालो. एकूणच बॉनच्या हवामानबदलाच्या त्याच त्या छापाच्या परिषदेपेक्षा मला या यजमानांच्या बरोबर  झालेल्या आमच्या वैयक्तिक परिषदा खूप भावल्या. अॅस्ट्रिडसारखी डिप्लोमॅट बाई मी तिची हरवलेली धाकटी बहीण असल्यासारखी मला जपत होती. मला नाटकं बघायला आवडतात, म्हणून पहिल्या रांगेतलं तिकीट काढून ऑपेराला घेऊन जाणारी अॅस्ट्रिड... रविवारी तिची सुट्टी असली तरी आराम करायचा सोडून आणि मला पावसात जायला लागू नये; पण कोलोन बघता यावं म्हणून गाडीतून घेऊन जाणारी अॅस्ट्रिड... बर्लिनला कामासाठी जाताना मला दुसऱ्या घरी अलगद सोडणारी अॅस्ट्रिड... ‘फेलिक्सला तू व तुला फेलीक्स आवडला नसता तर मला तुझं राहणं खूपच अवघड गेलं असतं,’ असं म्हणणारी अॅस्ट्रिड.... प्रेमाने हक्क गाजवणारी, परंतु मला पूर्ण मोकळीक देऊन ‘हे घर तुझंच आहे, तुला पाहिजे ते करून घे,’ असं सांगणारी अॅस्ट्रिड.... माझ्या मनात कायमचं घर करून बसली आहे. काही वर्षांपूर्वी लिहिलेली एक कविता या निमित्ताने पुन्हा एकदा आठवली - 

कभी कुछ रिश्ते ऐसी मोड पे शुरू होते है, 
की जिनकी कोई औपचारिकता नहीं
समय एक दुसरे के अनुभूती को अभिव्यक्ती का रूप देता है
रिश्ता वह न कोई मांग करता है, नहीं बंधन समझता है 
फिर भी उन की अनुपस्थिती चिंतित करती है
मन ही मन उनकी स्वस्थता का खयाल करती है
क्या कहूँ इस स्थिती को 
दोस्ती, आत्मीय संबंध, प्यार
या रहने दू इसे इस प्रकार ही अनाम!

ई-मेल : डॉ. विनिता आपटे - aptevh@gmail.com

(बॉन येथील हवामानबदल परिषदेचा आढावा घेणारा डॉ. विनिता आपटे यांचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dhanashri K About 332 Days ago
nice article
0
0
पराग काटे About
खूप छान माहिती दिली आहे मॅडम आणि काम पण छान करताय तुम्ही
0
0
Walimbe Chandrakant Damodar About
Great. I would like to join your this type of social work. Give me call on 9890507240 as soon you come to India.
0
0
Anjali kirtane About
Very well written Vinita . Congratulations. I had experienced the same kind of love in France. Whence we will meet, I will give you my book Cherry blossom.
0
0
Umesh About
Nice madam sunder lekh
0
0
Dhanashree Lele About
Khup sundar lekh.. Jikde pahave tukde majla mazi bhavande distat .. hya oli ch sarkhya athvat hotya. ... german loka hi kiti aatithyasheel astat he janvla.
0
0
Hemant Pendse About
अतिशय सुंदरच आठवणी आहेत या.विनिता जी सुंदररित्या मांडल्या आहेत तुम्ही
0
0

Select Language
Share Link