Next
गलीबॉय : एक स्वप्न जेव्हा सत्यात उतरतं..
BOI
Tuesday, March 05, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


‘रॅप’ या प्रकाराला ‘साउंड ऑफ दी स्ट्रीट्स’ असं म्हटलं जातं. एक प्रकारचा विद्रोह या स्वरूपाच्या गाण्यांमध्ये असतो. एका विशिष्ट तालावर, एकामागून एक येणारे शब्द असतात. रोजच्या जगण्यातल्या समस्या अधोरेखित करणारं आणि रस्त्यावरची भाषा असणारं असं हे ‘रॅप’ असतं. ‘गली बॉय’चं ‘रॅप’ हे ‘साउंड ऑफ दी स्ट्रीट्स’ प्रकारात मोडणारं आहे. यात बंड आहे, विद्रोह आहे, आग आहे, भूक आहे. हे गाणं समोरच्याला आव्हान देतं... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘गलीबॉय’ या बॉलीवूडपटाबद्दल...
.......................................
आपण सगळे ज्या जगात राहत असतो, त्याच्या आजूबाजूलाच इतर काही जगं असतात. कुठे न कुठे आपल्या जगाशी जोडली गेलेली. अगदी पुसटसा का होईना, पण संपर्क ठेवून असलेली. या इतर जगांना आपल्या जगाची आणि आपल्याला या इतर जगांच्या अस्तित्वाची कल्पनाच नसते बहुतेकदा. क्वचित कधीतरी या सीमारेषा धूसर होतात आणि इतर जगातल्या या माणसांची नि आपली ओळख होते, अचानक. मग तेव्हा आपल्या लक्षात येतं, की आपली पार्श्वभूमी, आपली स्वप्नं, आपल्या आकांक्षा या निरनिराळ्या असल्या, तरीही या सगळ्यांना जोडणारा एक समान धागा आहे.. आशेचा.. जगण्याचा. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडण्याचा. 

याच समान धाग्याला जोडून येणारी भावनाही अगदी सारखी असते. या भावनेला जोडून होणारा प्रवासही अगदी सारखा असतो. ‘प्रिय जी. ए.’ या पुस्तकात सुनीताबाई दाखला देतात तसं, ईडीपस आणि सटवाईच्या गोष्टीमध्ये जसा समान धागा आहे, तसाच एका कानडी लोककथेतही आहे. देश, धर्म, वर्ण, पंथ, प्रांत ओलांडून येणारे हे धागे असतात. असेच काही समान धागे आहेत एमिनेम, डिव्हाईन आणि नेईजीच्या आयुष्यात. ‘गली बॉय’ या प्रदर्शनापूर्वीच चर्चेत असणाऱ्या चित्रपटाविषयी बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता होती. ‘गलीबॉय’ची कथा ‘८माईल’ या प्रसिद्ध चित्रपटासारखी आहे, अशा चर्चेनं जोर धरला होता. दिग्दर्शिका झोया अख्तरनं या आरोपांचं खंडन करत, आधी चित्रपट पाहा आणि मग मत व्यक्त करा अशी भूमिका घेतली होती. 

‘८माईल’ हा एमिनेम या प्रसिद्ध अमेरिकन रॅपर, कवी, चित्रपट निर्माता आणि अभिनेत्याच्या आयुष्यातील घटनांवर आधारलेला आहे. तर ‘गलीबॉय’ची कथा ही डिव्हाइन (विविअन फर्नांडिस) आणि नेइजी (नावेद शेख) या मुंबईतल्या स्ट्रीट रॅपर्सच्या आयुष्यातील घटनांवर बेतलेली आहे. हे दोन्हींही प्रवास वेगवेगळ्या धाटणीचे असले, तरी त्यातल्या काही वळणांवर आश्चर्य वाटण्याजोगी समानता आहे. गरीब परिस्थिती असूनही, रॅपर बनण्याचे अशक्य वाटणारे स्वप्न पाहणे, ही स्वप्नपूर्ती होईपर्यंत, आवश्यक ती कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना समोर येणाऱ्या अडी-अडचणी, राहत्या जागेचा प्रश्न, कार-गॅरेजसारखी कामाची स्थळे, मित्रांनी दिलेलं प्रोत्साहन, रॅप-बॅटल इत्यादी अनेक साम्यस्थळे या दोन्हीं कहाण्यांमधे आहेत. ही साम्यस्थळे, अगदी सारख्या भासणाऱ्या भावना, धारणा, एका न उलगडणाऱ्या कोड्यासमान भासतात. एकसारखे दिसणारे सात चेहरे असतात जगात, तसंच काहीसं असावं का हे सगळं? हो बहुदा.

रणवीर सिंग‘गलीबॉय’चा नायक मुराद (रणवीर सिंग) हा इतर सिनेमांच्या नायकासारखा नाही. तो मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत राहणारा. परिस्थितीशी दोन हात करत एकीकडे शिक्षण घेणारा, तर दुसरीकडे आपलं जगणं आणि त्यातल्या समस्या, कवितेच्या रूपाने शब्दबद्ध करणारा. परदेशी रॅपर्सची गाणी ऐकायचा छंद असलेल्या त्याला बरीचशी गाणी तोंडपाठ. बालमैत्रीण सफीनाशी (आलिया भट) असलेलं त्याचं नातं फार वेगळ्या प्रकारचं आहे. बाप आणि मुलाच्या नात्यात बऱ्याचदा एक प्रकारचा ताण असतो. त्याहून कितीतरी अधिक ताण मुराद आणि त्याच्या वडिलांमध्ये आहे. वडील दुसरं लग्न करून नवी आई घरात आणतात. त्यानंतर त्यांच्या नात्यातला तणाव अधिकच वाढू लागतो. नशिबाशी दोन हात करता करता, मुरादचे वडील मेटाकुटीला आलेले असतात. मुलानं लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करून हाताशी यावं, अशी त्यांची इच्छा असते. मुरादची बालमैत्रीण सफीना, सर्जन होण्याची महत्वाकांक्षा बाळगून असते. एक दिवस कॉलेजमध्ये, एका बऱ्यापैकी प्रसिद्ध रॅपरचं गाणं ऐकून मुरादची तार कुठेतरी छेडली जाते. 

‘रॅप’ या प्रकाराला ‘साउंड ऑफ दी स्ट्रीट्स’ असं म्हटलं जातं. एक प्रकारचा विद्रोह या स्वरूपाच्या गाण्यांमध्ये असतो. एका विशिष्ट तालावर, एकामागून एक येणारे शब्द असतात. रोजच्या जगण्यातल्या समस्या अधोरेखित करणारं आणि रस्त्यावरची भाषा असणारं असं हे ‘रॅप’ असतं. आपल्याकडच्या रिजनल अथवा हिंदी सिनेमांमधे ‘रॅप’ हा प्रकार फारच कमी असतो. रेमो फर्नांडीस, बाबा सहगल, यो यो हनी सिंग, रफ्तार आणि बादशाह वगळता आपण फारसे रॅपर्स आठवूही शकत नाही. असं असताना, रीमा कागतीसारखी हुशार लेखिका आणि झोया अख्तरसारख्या हुशार दिग्दर्शिकेला अशा फारशा ज्ञात नसलेल्या रॅपिंग नावाच्या प्रदेशाला स्पर्श करावासा का वाटतो? हा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. 

‘रॅप’ या प्रकारात संगीत कमी आणि साउंड जास्त आहे. साउंड डिझाइन, मिक्सिंगच्या साथीने पोटात असणारी शब्दरूपी आग, रॅपर बाहेर काढू पाहतो. त्यातून जन्माला येतं ते म्हणजे ‘रॅप’. ‘रॅप’ हा प्रकार यो यो हनी सिंग, रफ्तार, बाबा सहगल आणि बादशाह यांनी जसा फक्त स्टाईल म्हणून वापरला, त्यात आणि ‘गली बॉय’च्या रॅप मधे मूलभूत फरक आहे. ‘गली बॉय’चं ‘रॅप’ हे ‘साउंड ऑफ दी स्ट्रीट्स’ प्रकारात मोडणारं आहे. गरीब वस्त्या आणि थेट रस्त्यांवरून आलेलं हे ‘रॅप’ आहे. यात बंड आहे, विद्रोह आहे, आग आहे, भूक आहे. हे गाणं समोरच्याला आव्हान देतं. बादशाह आणि हनी सिंग यांच्यासारखं ते सर्वांसाठी असलेलं स्टायलिश रॅप नाही. डिव्हाइन, नेइजी, ब्रोधा व्ही, डब शर्मा, इश्क़ बेक्टर, कर्श काळे सारख्या अनेक वेगवेगळ्या रॅपर्सनी आणि संगीतकार, गायकांनी एकत्र येऊन ‘गली बॉय’चा अल्बम निर्माण केला आहे. 

‘गली बॉय’ पाहताना‘रॅप’ या काहीशा अनोळखी प्रकाराची जवळून ओळख होते. आजच्या तरुणाईचा लाडका असणारा हा प्रकार आहे. डिव्हाइन, नेइजी, ब्रोधा व्ही यांच्या व्हिडियो योजना आहेत. कित्येक मिलियन्समध्ये असणाऱ्या लाईक्स पाहून त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते. रिजनल आणि बॉलीवूड संगीत फॉलो करणाऱ्यांना फारसा माहित नसणारा हा प्रकार आहे. एक वेगळं विश्व आहे. झोया अख्तरचे सिनेमे, हे केवळ गर्भश्रीमंत माणसं आणि त्यांची सुखदु:खं अशा प्रकारच्या विषयांवर आधारलेले असतात, या समजुतीवर ‘गली बॉय’ हे एक अॅबसोल्यूट उत्तर आहे. झोयाचे आधीचे सिनेमे आणि तिची एकूण कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता, ‘गली बॉय’सारखा सिनेमा तिच्याकडून येणं, हे अतिशय सुखावणारं आहे. ‘गली बॉय’मध्ये कॅमेरा कायम अरुंद बोळ, झोपडपट्ट्या, कचरा आणि घाणीच्या साम्राज्यात फिरतो. परंतु तो तिथली विपरीत परिस्थिती आणि लोकांची पराकोटीची दु:खं दाखवत नव्हे, तर त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवत हिंडतो. 

आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या आकाराच्या या झोपडपट्टीमध्ये अनेक सुख-दु:खं, आशा-आकांक्षा एकत्र नांदतात. इथली माणसं ही इतर माणसांसारखीच आहेत, पण त्यांच्यापुढची आव्हानं फार मोठी आहेत. काही माणसं, ही गरिबीच्या चक्रात हिंडत, पिचून जाणारी आहेत, तर काही आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मुसंडी मारणारी आहेत. काही मनानं मुर्दाड आहेत, तर काही उमद्या कवीमनाची देखील आहेत. ‘दिल धडकने दो’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटांमध्ये, झोया ज्या खुबीने विविध पात्रं आणि त्यांचे परस्परसंबंध उलगडते, तितक्याच खुबीने आणि हुशारीने ती ‘गली बॉय’मधल्या मुरादचा ध्येयाकडे होणारा प्रवास रेखाटते. रणवीर सिंग आणि आलिया भटचं यातलं काम पाहण्याजोगं आहे. रणवीरच्या प्रत्यक्ष जीवनातल्या भूमिकेच्या एकदम उलट स्वभाव असणारी मुराद ही व्यक्तिरेखा त्याने अतिशय सफाईने व मेहनतीने उभी केली आहे. 

अलीकडच्या काळातला सर्वोत्कृष्ट ‘अंडरप्ले’ म्हणून या भूमिकेचं नाव घ्यावं लागेल. बापाच्या दहशतीखाली मन मारून जगणारा, पण संधी मिळताच आपल्या रॅपर बनायच्या स्वप्नांच्या दिशेने भरारी घेणारा स्वप्नाळू, मितभाषी मुराद त्याने उत्तमरीत्या साकारला आहे. मुरादची बालमैत्रीण सफीनाची भूमिका आलियाने केली आहे. आपलं काम अत्यंत समरसून करणारी ही अभिनेत्री, प्रत्येक चित्रपटागणिक अधिकाधिक मॅच्युअर होताना दिसते, तेवढीच सर्वांना आवडते. मुराद आणि सफीनामधलं नातं फार वेगळं आणि तरल आहे. त्यांची बालपणापासून असलेली मैत्री, त्यांच्यातलं ट्युनिंग, स्काय (कल्की) आणि मुरादची ओळख वाढू लागल्यानंतर काही काळ त्यांच्या नात्यात येणारा स्प्लिट, त्यांचं एकमेकांप्रती असणारं प्रेम, त्यातला पझेसिव्हनेस, एकमेकांना सांभाळून घ्यायची पद्धत हे सगळं प्रत्यक्ष पडद्यावर पाहण्यासारखं आहे. 

अमृता सुभाषने साकारलेली मुरादची आई आणि विजय राझने साकारलेले मुरादचे वडील या व्यक्तिरेखाही विशेष उल्लेखनीय. सिद्धांत चतुर्वेदीचा ‘शेर’ही लक्षात राहण्याजोगा. सर्वच कलाकारांचे उत्कृष्ट अभिनय, अप्रतिम दिग्दर्शन व छायांकन, विचारपूर्वक लिहिलेली कथा-पटकथा, संगीत-पार्श्वसंगीत, मुरादच्या तोंडी असणाऱ्या जावेद अख्तर साहेबांनी लिहिलेल्या आशयघन कविता आणि पटकथेत अतिशय चपखल बसणारे महत्वपूर्ण संवाद अशा सर्वच पातळ्यांवर ‘गली बॉय’ श्रेष्ठ ठरतो. 

‘रॅप’ हा प्रकार तुम्हाला नवा असला, फारसा ओळखीचा नसला, तरीही ‘गली बॉय’ आणि त्याचा स्वप्नपूर्तीकडे होणारा प्रवास तुम्हाला आपला वाटेल. ‘गली बॉय’ हा व्यवस्थितपणे उभी केलेली पात्रं, त्यांच्या मनोभूमिका, परस्परसंबंध, पटकथेची रचना, संवाद, कविता आणि गाण्यांचा सुयोग्य मिलाफ या सर्व घटकांचा सुरेख असा कोलाज आहे. प्रत्येकाच्या मनात एक अंडरडॉग असतो. प्रत्येकाच्या मनात काही सुप्त आशा-आकांक्षा असतात. काही अपूर्ण स्वप्नं असतात. या सगळ्याची पूर्ती नेमकी होणार तरी कधी, असे प्रश्नही असतात. या सगळ्या संमिश्र भावभावनांना करून दिलेली वाट, म्हणजे हा सिनेमा आहे. कुठे न-कुठे आपल्या सर्वांचीच असलेली अशी ही कहाणी आहे. मनात घर करणारी. एका स्वप्नाचा हा प्रवास झोया अख्तरने मोठ्या नजाकतीने खुलवला आहे. फुलवला आहे. ‘अपना टाईम आयेगा’ पासून सुरू होणारा मुरादचा प्रवास ‘अपना टाईम आ गया’वर जेव्हा संपतो, तेव्हा चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या आपल्यापैकी बहुतांश जणांच्या मनात मात्र, जावेद अख्तर साहेबांच्या ओळी वारंवार उमटत राहतात –
अब वो सारे जनम चलते है,
सर झुकाए हुए,
बंद आंखे किए
और ये दुख लिये,
मोड जो देखा था,
उसपे मुड जाते हम
तो न जाने कहा तक,
पहुच पाते हम 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Deepak About 152 Days ago
Very interesting review of one of its kind movie! Khan s should take some inspiration from this movie. They’re most successful actors with great potential but they are lacking inspiring scripts!! After Rhitik, Ranveer-acting as Murad, acting under ‘Zoya Akhtar’, could be ‘our Answer to khan s’, for some religious fanatics!!! As you have written, it’s a movie of ‘hope’ in ‘hopeless’!!!
0
0
Megha Deshpande About 222 Days ago
अतिशय प्रभावी आणि संयमी रिव्यू! रणवीरचा अंडरप्ले आणि झोया अख्तर बद्दलचे निरीक्षण आणि मत अगदी पटले!
2
0

Select Language
Share Link
 
Search