Next
चांगले नागरिक घडवणे ही शिक्षणसंस्थांची जबाबदारी : श्रीपाद नाईक
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे योगकक्ष, ध्यानधारणा केंद्राचे भूमिपूजन; सौर पॅनेल युनिटची पायाभरणी
BOI
Tuesday, July 09, 2019 | 11:55 AM
15 0 0
Share this article:

मनोगत व्यक्त करताना श्रीपाद नाईक.

रत्नागिरी :
‘चांगले नागरिक घडवणे ही शिक्षणसंस्थांची जबाबदारी असून, त्यातूनच देशाचा उत्कर्ष होतो. बुद्धिमत्तेसोबत संस्कारांची जोड असावी लागते. सुजाण विद्यार्थी घडण्यासाठी संस्कारांची पेरणी महत्त्वाची आहे. यातील उल्लेखनीय कार्यामुळेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे,’ असे उद्गार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, आयुषमंत्री तथा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी काढले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जिमखान्याजवळ येथे योगकक्ष व ध्यानधारणा केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन नुकतेच नाईक यांच्या हस्ते झाले. कै. पार्वतीबाई शंकर केळकर विद्यार्थिनी वसतिगृहात सौर पॅनेल युनिटच्या कामाची पायाभरणीही त्यांनी केली. त्यानंतर झालेल्या राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नाईक बोलत होते.

या विकासकामांकरिता एलआयसीने २५ लाख रुपये, उद्योजक दीपक गद्रे यांनी २० लाख आणि सारस्वत सहकारी बँकेने १५ लाख रुपये दिले आहेत. सौर ऊर्जा निर्मितीमुळे विजेच्या बिलात मोठी घट होणार आहे.

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या पायाभरणी सोहळ्यात श्रीपाद नाईक यांच्यासमवेत एलआयसीचे अधिकारी.

श्रीपाद नाईक म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा रत्नागिरी एजयुकेशन सोसायटी उपलब्ध करून देत आहे. शुद्ध हेतूने संस्था चालू झाल्याने देणगीदारांची मदत मिळते आहे. प्रामाणिक, जागरूक नागरिक घडवणे हे शिक्षण संस्थेचे काम असून, देशाची मदार शिक्षणावरच आहे. शिक्षण ही विकासाची चावी आहे. त्यातूनच कोणत्याही आव्हानांना तोंड देणारी पिढी निर्माण होणार आहे. ध्येयपूर्तीसाठी झोकून देणारे कार्यकर्ते आहेत व शुद्ध हेतुमुळेच अनेक दाते मदत करत आहेत. केवळ आर्थिकच नव्हे, तर कार्यकर्ते लागेल ती सर्व मदत करत आहेत. जनतेचा सहभाग असतो तेव्हा कोणताही प्रकल्प यशस्वी होतो. या संस्थेत काम करताना मला सकारात्मक ऊर्जा मिळाली.’

योगकक्ष इमारतीची पायाभरणी (छायाचित्रे : माउली फोटोज्, रत्नागिरी)

संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, ‘रत्नागिरी एज्युकेशन सोसासटीचे नाव देशभरात आहे. बाबूराव व मालतीबाई जोशी यांनी कष्टाने उभी केलेली ही संस्था त्यांच्या आदर्शांवर पुढे नेत आहोत. गोगटे-जोगळेकर कॉलेजला ७५ वर्षे, शिर्के प्रशालेला ६० वर्षे, विधी महाविद्यालय व पदव्युत्तर शिक्षण विभागाला २५ वर्षे होत आहेत. सौर प्रकल्प आणि योगकक्ष इमारतीच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देणार आहोत. रणगाडा, तोफा आदी युद्धाच्या स्मृती रत्नागिरीत जतन करण्याचा मानस आहे. त्याकरिता अध्यक्ष नाईक यांचे सहकार्य लाभणार आहे.’

दीपक गद्रे यांचा बबनराव पटवर्धन यांच्या हस्ते सत्कार

या वेळी संस्था पदाधिकाऱ्यांनी देणगीदारांचे सत्कार केले. व्यासपीठावर एलआयसीचे वरिष्ठ अधिकारी श्री. जगदीश्वर, शाखाधिकारी ह. धो. मासाळ, बांधकाम व्यावसायिक घनःश्याम फडके, उद्योजक दीपक गद्रे, सारस्वत बँकेचे शाखा व्यवस्थापक सतीश कदम, कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, उपाध्यक्ष बबनराव पटवर्धन, अॅड. अशोक कदम, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर उपस्थित होते.

घनःश्याम फडके यांचा अॅड. अशोक कदम यांच्या हस्ते सत्कार

श्री. जगदीश्वर व श्री. मासाळ यांनी एलआयसीच्या सामाजिक बांधिलकीबाबत माहिती दिली. ‘यासाठीचा प्रस्ताव दोन महिन्यांत मंजूर झाला. संस्थेची प्रामाणिकता व शिल्पाताईंचे कार्य यामुळेच हे शक्य झाले,’ असे त्यांनी सांगितले. 

श्री. जगदीश्वर यांचा विजय साखळकर यांच्या हस्ते सत्कार
उद्योजक दीपक गद्रे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा क्षेत्रात पुढे यावे. सौर पॅनेलद्वारेच नव्हे, तर खिडकीला लावलेल्या काचांमधूनही वीजनिर्मिती होऊ शकते. अमेरिकेत चाळीस वर्षे संशोधन करणारे दोन भारतीय संशोधक आता भारतात या गोष्टीचा प्रसार करत आहेत. त्यामुळे याची माहिती विद्यार्थ्यांनी घेऊन नवनवे संशोधन करावे.’

‘जीजीपीएस’च्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या ‘हम करे राष्ट्रआराधन’ या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सोनाली पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह सतीश शेवडे यांनी आभार मानले. 

शिल्पाताई पटवर्धन अमेरिका दौऱ्यावर जात असून, त्या वेळी संस्थेसाठी देणग्या मिळवण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. त्याकरिता मंत्री नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, विश्वस्त, नियामक मंडळाचे सदस्य, घटक संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.  

सतीश कदम यांचा सतीश शेवडे यांच्या हस्ते सत्कार.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search