Next
‘ॐकाराचे जीवनव्यापित्व डॉ. करंदीकरांनी पटवून दिले’
मंजिरी गानू
Monday, April 09, 2018 | 03:16 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘ज्ञानेश्वरीतील ॐकाराचा वाणी, मन आणि शरीरावर वैज्ञानिक अंगाने, तसेच आध्यात्मिकदृष्ट्या होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करून डॉ. जयंत करंदीकर यांनी त्याचे जीवनव्यापित्व इतरांना पटवून दिले,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी रविवारी (आठ एप्रिल २०१८) पुण्यात झालेल्या समारंभात काढले. अहमदनगर येथील दिवंगत डॉक्टर जयंत करंदीकर यांनी लिहिलेल्या ‘ॐ शक्ती शब्द स्वरसाधना’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन कुवळेकर यांच्या हस्ते झाले. 

डॉ. करंदीकर यांनी ॐकारावर संशोधन करून विकसित केलेल्या उपचारपद्धतीचा, तसेच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा कुवळेकर यांनी या वेळी घेतला. ‘करंदीकर यांनी ज्ञानेश्वरीचा बारकाईने अभ्यास केला होता. त्या ग्रंथात ज्ञानेश्वर माऊलींनी एका ओवीमध्ये ‘दुःख, कष्टाने भागलेल्या व्यक्तींच्या हाकेला ओ देणारा तो ॐकार’ असा जो अर्थ सांगितला आहे, त्या अनुषंगाने आणि वैद्यकशास्त्राच्या व त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही डॉ. करंदीकर यांनी व्यक्तिगत समस्येचे निराकरण करण्यासाठी ॐकारावर संशोधन केले; मात्र त्या संशोधनाचा किंवा ॐकाराच्या साधनेतून आलेल्या परिणामकारक अनुभवाचा लाभ त्यांनी इतरांनाही करून दिला. ॐकाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. संगीत, नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांसह विविध वयोगटांतील कित्येक सामान्य लोकांची वाचा सुधारण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. एका अर्थी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील माऊलींचे मौलिक विचारच त्यांनी आपल्या कार्यातून, वागणुकीतून तरुणांपर्यंत पोहोचवले. ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने त्यांना उमगली होती,’ अशा शब्दांत कुवळेकर यांनी डॉ. करंदीकर यांचा गौरव केला. 

ज्येष्ठ लेखक भारत सासणेही या वेळी उपस्थित होते. ‘जगभरात सध्या ॐकारावर संशोधन सुरू आहे. डॉ. करंदीकरांनी ॐकारासंबंधी केलेल्या संशोधनाची माहिती जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी ‘ॐ शक्ती शब्द स्वरसाधना’ या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद केला जावा,’ अशी सूचना सासणे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात केली.

डॉ. करंदीकर यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांच्या ‘गीत आसावले तुझ्यासाठी’ या सीडीचे प्रकाशनही या वेळी ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी बोलताना मराठे यांनी डॉ. करंदीकर यांच्या ॐ कार शिबिराचा, वाणी सुधारण्यासाठी त्यांनी शब्दोच्चारांसंबंधी केलेल्या मार्गदर्शनाचा आपल्या आवाजासाठी, गाण्यासाठी कसा लाभ झाला, याबद्दलचे काही अनुभव कथन केले. 

या वेळी या सीडीतील काही गीतेही सादर करण्यात आली. कवी, गीतकार बाबासाहेब सौदागर यांचेही या वेळी भाषण झाले. डॉ. जयंत करंदीकर यांच्या कार्याची ओळख करून देणारी ध्वनीचित्रफीतही कार्यक्रमाच्या प्रारंभी दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करंदीकर यांचे पुत्र डॉ. नीरज करंदीकर यांनी केले. त्यांच्या आणि गीता करंदीकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती करंदीकर यांनी केले.

(या कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link