Next
दी ब्रिज ऑन दी रिव्हर क्वाय
प्रसन्न पेठे (Prasanna.Pethe@myvishwa.com)
Tuesday, October 10 | 02:30 PM
15 1 0
Share this story

ब्रह्मदेशावर जपानचा कब्जा असतानाची १९४३ सालची ही कथा. रंगून आणि बँकॉकमध्ये रेल्वेचं दळणवळण सुरू होण्यासाठी आता केवळ क्वाय नदीवरच्या रेल्वेब्रिजचं काम राहिलंय आणि ते करण्यासाठी तिथल्या क्रूर जॅपनीज कर्नल साईटोने ब्रिटिश युद्धकैद्यांना कामाला जुंपायची योजना आखली आहे. एक अमेरिकन नेव्ही कमांडर तो ब्रिज उडवायची कामगिरी शिरावर घेतो. त्यातून पुढे काय घडतं त्याची खिळवून ठेवणारी कथा म्हणजे दी ब्रिज ऑन दी रिव्हर क्वाय. आजच्या ‘सिनेसफर’मध्ये पाहू या त्या सिनेमाबद्दल...
..........................
फ्रेंच लेखक पिअर बुलने एका सत्यघटनेचा आधार घेऊन लिहिलेल्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा दिग्दर्शित केला दी ग्रेट ‘डेव्हिड लीन’ने! त्याआधी त्याने ग्रेट एक्स्पेक्टेशन्स, ऑलिव्हर ट्विस्ट, हॉब्सन्स चॉइस असे उत्तम सिनेमे देऊन आपल्याविषयीच्या अपेक्षा वाढवल्या होत्याच आणि या जबरदस्त सिनेमाद्वारे त्याने आपल्या दिग्दर्शकीय कौशल्यावर शिक्कामोर्तबच केलं. या सिनेमाने सात ऑस्कर मिळवत इतिहास घडवला. 

या सिनेमाच्या पडद्याआडच्या गोष्टीसुद्धा मजेशीर आहेत. मुळात अमेरिकन निर्माता आणि पटकथालेखक कार्ल फोरमनला ही फ्रेंच लेखकाने लिहिलेली कथा आवडली होती. त्या वेळी त्याला हॉलीवूडने कम्युनिस्टबद्दल सहानुभूती असल्याच्या संशयावरून ब्लॅकलिस्ट केल्यामुळे तो इंग्लंडमध्ये राहत होता. त्याने निर्माता सॅम स्पिगलला ही कथा ऐकवली आणि वेगळ्या नावाने पटकथा लिहून दिली; पण दिग्दर्शक डेव्हिड लीनला ती पटकथा आवडली नाही आणि त्याने स्वतःच या सिनेमाच्या बारीकसारीक दृश्यांचा विचार करून पूर्ण ब्ल्यूप्रिंट तयार केली. मुळातल्या कथेत अमेरिकन कमांडरचा उल्लेख नव्हता तोही नव्याने पटकथेत घातला गेला. गंमत म्हणजे त्यासाठी लीनने ज्या मायकेल विल्सनची निवड केली, तोही हॉलीवूडमध्ये ब्लॅकलिस्टेड होता. त्यामुळे पटकथाकाराचं नाव गुलदस्त्यात ठेवलं गेलं आणि प्रत्यक्षात ऑस्कर जाहीर झालं ते इंग्लिशचा गंधही नसणाऱ्या मूळ फ्रेंच लेखकाला - पिअर बुलला. डेव्हिड लीनला कर्नल निकल्सनच्या भूमिकेसाठी लॉरेन्स ओलिव्हिए हवा होता; पण त्याने हा रोल नाकारला. मग कॅरी ग्रँटला विचारण्यात आलं; पण त्यानेही ही भूमिका नाकारली आणि शेवटी माळ गळ्यात पडली अलेक गीनेसच्या, ज्याने त्या भूमिकेचं सोनं करत ऑस्कर पटकावलं.
 
या सिनेमात जॅपनीज कर्नल साईटोच्या भूमिकेत सेस्सू हायाकावाने कमाल केली आणि अमेरिकन कमांडर शिअर्सच्या भूमिकेतल्या विल्यम होल्डनने त्याला उत्तम साथ दिली. ब्रिटिश कर्नल निकल्सन आणि जॅपनीज कर्नल साईटो एकमेकांचे शत्रू सेनानी; पण तरीही त्यांच्या स्वभावात काही समान धागे असतात – आपापल्या रँकचा गर्व, हट्टीपणा, आडमुठेपणा, लष्करी शिस्तीप्रति टोकाचं डेडिकेशन आणि हातात घेतलेल्या कामाप्रति कडवी निष्ठा. एकीकडे ठराविक काळात ब्रिज बांधून न घेतल्यास कर्नल साईटोला जॅपनीज परंपरेप्रमाणे आत्महत्या करावी लागणार असते, तर कर्नल निकल्सनचा – (ब्रिटिश प्रतिष्ठा आणि अभिनिवेशापायी) जरी तो ब्रिज शत्रूच्या उपयोगी पडणार असला - तरी उत्तमच बांधून द्यायचा निर्धार असतो! दोघांची मानसिकता आणि देहबोली फार चांगली चित्रित केली गेली आहे.
 
सिनेमाची सुरुवात होते ती विहंगम दृश्याने. कॅमेरा उंचावरून खाली येत त्या गर्द रानातून दोस्तांच्या युद्धकैद्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनवर. ट्रेनच्या डब्यावर मशीनगनधारी सैनिक बसलाय. ब्रह्मदेशच्या जंगलातून ट्रेन जात एका युद्धकैद्यांच्या कॅम्पवर येते. दुतर्फा जमिनीत पुरलेले क्रॉस तिथे मरणाऱ्या सैनिकांची दफनभूमी दाखवतायत. रंगून-बँकॉक रेल्वेचं काम युद्धकैद्यांकडून करून घेतलं जाताना दिसतंय. ट्रेन थांबल्यावर सर्व युद्धकैदी जपान्यांच्या कॅम्पवर येतात. कैदेत असलेला अमेरिकन नेव्ही कमांडर शिअर्स मृत सैनिकांसाठी कबरी खोदतोय. शिअर्सचं ध्येय आहे येनकेन प्रकारेण तिथून निसटून जायचं. कॅम्पचा जॅपनीज कर्नल साईटो कैद्यांना त्यांच्या रेल्वे ब्रिज बांधण्याच्या कामाची कल्पना देतो. ‘काम केलं तर चांगले राहाल अन्यथा शिक्षा भोगाल’ असा दम देत ‘Be happy in your work’ हे सांगायला तो विसरत नाही. 

रात्री युद्धकैद्यांची मीटिंग होते, तेव्हा कमांडर शिअर्स त्याची पलायनाची योजना सांगतो; पण कर्नल निकल्सन त्याला लष्करी शिस्तीचं कारण पुढे करत नकार देतो. दुसऱ्या दिवशी कर्नल निकल्सन जॅपनीज कर्नल साईटोला ‘जीनिव्हा कन्व्हेन्शन’ची प्रत देतो आणि त्या नियमानुसार युद्धकैदी ऑफिसर्सना कामातून वगळण्यासंबंधी सांगतो. कर्नल साईटो ते अर्थातच धुडकावून लावतो त्यावर कर्नल निकल्सन आणि सर्व ऑफिसर्स कामावर न जाता तळपत्या उन्हात जागीच उभे राहून निषेध व्यक्त करतात. त्याची शिक्षा म्हणून कर्नल निकल्सनला ‘स्वेट बॉक्स’मध्ये टाकलं जातं. बाकी कैदी मोठमोठ्याने ओरडत, शिट्या वाजवत त्याचं धैर्य वाढवतात. गोंधळाचा फायदा घेऊन शिअर्स कॅम्पमधून पळण्यात यशस्वी होतो. कॅम्पवरचा मेडिकल ऑफिसर, कर्नल साईटोशी निकल्सनच्या वतीने रदबदली करतो. तो निकल्सनशीसुद्धा बोलून बघतो; पण दोन्ही कर्नल्स आपापल्या भूमिकांवर ठाम असतात. 

रात्री आश्चर्यच घडतं. कर्नल साईटो, कर्नल निकल्सनला ‘स्वेट बॉक्स’मधून सोडवून आपल्या कॉटेजमध्ये चक्क जेवणासाठी बोलावतो. निकल्सन समोर बसलाय... भुकेलेला आहे... तरीही काहीही खायला नकार देतो. बोलता बोलता कर्नल साईटो त्याला आपली अगतिकता सांगतो, की ब्रिज ठरल्या वेळेत पूर्ण न झाल्यास त्याला जॅपनीज परंपरेप्रमाणे आत्महत्या करावी लागेल.त्या वेळचे त्यांचे डायलॉग्ज हळूहळू साईटोची अगतिकता, नाईलाज आणि निकल्सनचा नैतिक विजय होताना दर्शवणारे......  

साईटो : When I said  'All officers must work,' naturally I never meant you - the commanding officer. My orders were only intended for officers below...
निकल्सन : None of my officers will do manual labor!
साईटो : Please. I was about to say, I've been thinking the matter over and have decided to put majors and above in administrative duties, leaving only the duty officers to lend a hand.
निकल्सन : I'm afraid not. The convention's quite clear on that point.
साईटो : Do you know what will happen to me if the bridge is not built on time?
निकल्सन : I haven't the foggiest.
साईटो : I'll have to kill myself. What would you do if you were me?
निकल्सन : I suppose if I were you, I'd have to kill myself. Cheers! (हातातला व्हिस्कीचा ग्लास उंचावतो).
साईटो : I warn you, colonel. If I am to die, others will die before me. Do you understand that?
निकल्सन : Major Clipton did mention something to that effect... That won't solve your problem. I'm sure we can arrive at the proper solution. (हे बोलताना तो साईटोला त्याच्याच डायनिंग टेबलवर बसायची खूण करतो). Please sit down. Now, tell me, uh, colonel. Do you or do you not agree that the first job of an officer is command?

त्यांचं त्या वेळी एकमत होत नाही; पण पुढे साईटोला निकल्सनचं म्हणणं ऐकावं लागतं. या दोघांची जुगलबंदी बघण्यासारखी. आपलं मागणं मान्य झाल्यावर मात्र निकल्सन ती कामगिरी स्वीकारून स्वतःला त्या कामात निष्ठेनं झोकून देतो. 

पलायन करून पुन्हा सुरक्षित आपल्या कॅम्पवर परतलेल्या कमांडर शिअर्सला पुन्हा त्याच जंगलातल्या कॅम्पवर परतून तो क्वाय नदीवर बांधण्यात येणारा ब्रिज उडवून लावण्याची कामगिरी सोपवली जाते. अनिच्छेनेच तो कमांडो टीमबरोबर त्या ठिकाणी परततो.
 
शत्रूसाठी आपण ब्रिज बांधतोय तरी आपली ब्रिटिश प्रतिष्ठा, कसब आणि अभिमान पणाला असल्यामुळे निकल्सन तो ब्रिज उत्तमच कसा बांधला जाईल याची काळजी घेत ब्रिज पूर्ण करतो. जपानी सैनिकांना घेऊन जाणारी ट्रेन त्या ब्रिजचं उद्घाटन करण्यासाठी येत असताना शिअर्स आणि त्याची टोळी तो ब्रिज उद्ध्वस्त करायला पोहोचते. 

त्यांनी रात्री पेरलेले सुरुंग आणि त्याच्या वायर्स, पाणी वाहून गेल्यावर उघड्यावर येतात आणि निकल्सन ते पाहून चक्क साईटोच्या निदर्शनाला आणतो. ब्रिज उद्ध्वस्त करायला आलेले कमांडोज आणि शिअर्स ते बघून हैराण होतात. कमांडो टीममधला जॉइस डिटोनेटर उडवायला जाताना निकल्सन त्याला हटकतो. पुढे काय होतं? शिअर्स आणि टीम ब्रिज उडवतात की निकल्सन तो वाचवतो, हे प्रत्यक्ष पडद्यावर बघणं चित्तथरारक!!

ब्रिटिश कर्नल निकल्सनची कामाप्रति असलेली टोकाची निष्ठा त्याच्याच राजकीय धोरणांपेक्षा आणि सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाची बनल्यामुळे उद्भवलेली समस्या..... जॅपनीज कर्नल साईटोसमोर वेळेत काम पूर्ण करून आपलं जीव वाचवण्याचं एकमेव ध्येय...... अमेरिकन कमांडर शिअर्सला कैदेतून पळून जाऊन नंतर तो ब्रिज उडवून देण्याची जबाबदारी अशा कथानकावर डेव्हिड लीनने बनवलेली ही चांगली अडीच तासांची भव्य वॉरफिल्म. ....

वॉरफिल्म आवडणाऱ्यांना आणि एकूणच फिल्म्सच्या अभ्यासकांनी कॅमेरा, टेकिंग, अभिनय, पार्श्वसंगीत सर्वच दृष्टीनं जरूर बघावी अशीच!

(‘सिनेसफर’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरात आजपर्यंत आपण दहा ‘वॉरफिल्म्स’बद्दल चर्चा केली. पुढच्या मंगळवारपासून बोलू रोमँटिक फिल्म्सवर!)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
किरण गोखले About
ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय या classic युद्धपटाचा प्रसन्न पेठे यांनी उत्तम परिचय करून दिला आहे. या पूर्वीचे नऊ परिचय शक्य असल्यास पाठवावेत (किंवा link)पाठवावी. धन्यवाद. किरण गोखले , पुणे
0
0

Select Language
Share Link