Next
मल्लखांब खेळाडूंच्या कसरतींनी ठाणेकरांची मने जिंकली
मल्लखांब संघटना व निरंजन डावखरेंतर्फे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा
प्रशांत सिनकर
Saturday, February 23, 2019 | 05:26 PM
15 0 0
Share this article:



ठाणे : सात वर्षांच्या चिमुरड्यापासून ते पंचविशीपर्यंतच्या तरुणांनी मल्लखांबावर सादर केलेली लवचिकता, चपळाई आणि पदन्यासाबरोबरच चित्तथरारक कसरतींनी ठाणेकर प्रेक्षकांची मने जिंकली. ठाणे जिल्हा मल्लखांब संघटना व समन्वय प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित शिवाजी मैदान येथे २२ फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित केलेली स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली. आगामी काळात दर वर्षी कोकणातील एका जिल्ह्यात मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा घेण्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी जाहीर केले.

पुलवामात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहून मल्लखांब स्पर्धा जवानांना समर्पित करण्यात आली. त्यानंतर रंगलेल्या चुरशीच्या स्पर्धेत जिल्ह्यातील १३० खेळाडूंनी हजेरी लावली होती. शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कारप्राप्त उदय देशपांडे यांच्याबरोबरच खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. मुलांनी लाकडी मल्लखांब व मुलींनी दोरीच्या मल्लखांबावर विविध कसरती सादर केल्या. अर्चिता मोकल, दिव्या भोईर, स्वयंम ठाणेकर, ओंकार अणसूरकर, किशोर म्हात्रे आदी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या कसरतींना प्रेक्षकांची वाहवा मिळाली.



ठाणे जिल्ह्यातील मल्लखांब खेळाडूंच्या मेहनतीची मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी प्रशंसा केली. हाताच्या बोटापासून शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत व्यायाम देणारा हा एकमेव क्रीडा प्रकार आहे, असे नमूद करीत देशपांडे यांनी एका तपासणीत मल्लखांब खेळणाऱ्या व मल्लखांब न खेळणाऱ्या मुलांच्या प्रकृतीत फरक आढळल्याचे स्पष्ट केले. विश्वचषक मल्लखांब स्पर्धेवर भारताने मोहोर लगावली असली, तरी आगामी काळात भारताला मल्लखांबमध्ये आव्हानाला सामोरे जावे लागेल, असे भाकीत देशपांडे यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अद्यापी मल्लखांबचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यासाठी आमदार डावखरे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘मल्लखांब लोकप्रिय करण्यासाठी ठाण्यात स्पर्धा भरविण्यात आली होती. मराठमोळ्या मल्लखांबाकडे अधिकाधिक तरुण-तरुणींनी वळावे, हा उद्देश त्यामागे आहे. त्यादृष्टीने यापुढे कोकणात एका जिल्ह्यात मल्लखांब स्पर्धा भरविण्यात येईल. त्यानंतर ठाण्यात कोकण विभागीय स्पर्धा आयोजित करू,’ असे आमदार डावखरे यांनी जाहीर केले.



या स्पर्धेत पीइसो द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या ‘अ’ संघाने सांघिक विजेतेपद, तर येऊरच्या एकलव्य अकादमीने द्वितीय आणि द्रोणाचार्य अकादमीच्याच ‘ब’ संघाला तृतीय पुरस्कार मिळाला. या स्पर्धेला भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, ‘भाजप’चे शहराध्यक्ष व नगरसेवक संदीप लेले, मिलिंद पाटणकर, संजय वाघुले, मनोहर डुंबरे, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, नगरसेविका मृणाल पेंडसे, अर्चना मणेरा, दिपा गावंड, प्रतिभा मढवी, कमल चौधरी, नंदा पाटील, ‘भाजप’चे पदाधिकारी राजेश मढवी, मनोहर सुखदरे, ‘भाजयुमो’चे नीलेश पाटील, किरण मणेरा आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search