Next
कलेच्या माध्यमातून सक्षमता
दिव्यांग आणि सर्वसामान्य व्यक्तींना एकत्र आणून अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
BOI
Saturday, October 27, 2018 | 05:00 PM
15 1 0
Share this article:रत्नागिरी :
रत्नागिरीतील अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्टच्या गोविंद व वत्सला रेगे हस्तकला केंद्रात आकाशकंदील, शोभेच्या वस्तू, पणत्या, तोरणे, कापडी पिशव्या, पणती स्टँड, वारली पेंटिंग्ज आदी कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. या वस्तू आकर्षक व सुबक आहेत. वस्तूंवर भरतकाम, रंगकाम करून मूल्यवर्धन करण्यात आले आहे. हा कोकणातील असा एकमेव प्रकल्प आहे, की ज्यात अपंगत्व असलेल्या आणि अपंगत्व नसलेल्या व्यक्ती एकजुटीने काम करून कला व हस्तकलेच्या माध्यमातून सक्षम बनतात. फोटोफ्रेम, शिवणकाम, भरतकाम, पेंटिंग्ज व सुतारकाम अशी विविध युनिट येथे कार्यरत आहेत.

या व्यक्तींनी केलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन २७ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत नाचणे रोडवरील बाळकृष्णनगरमधील जॉय आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आले.‘उपजीविकेसाठी आवश्यक विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा; पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल,’ हे साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे विचार. या विचाराने प्रेरित होऊन रत्नागिरीत अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली. जेव्हा कलेशी मैत्री हा आपला पोटापाण्याचा व्यवसाय होईल, तेव्हा आपले जगणेही सर्वार्थाने अर्थपूर्ण होईल, हे या ट्रस्टचे ध्येयवाक्य.

काही व्यक्तींच्या ऐकण्याच्या, पाहण्याच्या, चलनवलनाच्या किंवा बुद्धीच्या क्षमतांना काही मर्यादा असतात. अशा व्यक्तींना आपण आता दिव्यांग म्हणून ओळखतो. अशा व्यक्ती आयुष्यभर परावलंबी राहतात, असे मानले जात असे; पण मेंदूवरील अलीकडच्या संशोधनाने हा दृष्टिकोन आमूलाग्र बदलून टाकला आहे. आता असे लक्षात आले आहे, की विशेष शिक्षणाने आणि प्रशिक्षणाने यांच्यातील काही कौशल्ये विकसित करता येतात.

डॉ. शाश्वत शेरे व शमीन शेरे यांचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे त्यांना असे दिसून आले, की या व्यक्तींच्या कलेच्या अभिव्यक्तीला काहीच मर्यादा नसतात. त्यांच्यातील या विशेष कौशल्यांना मध्यवर्ती ठेवून त्यांचा विकास घडवून आणल्यास ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतात. त्यामुळेच पुनर्वसन प्रकल्पामध्ये उत्पादनाची प्रक्रिया या व्यक्तींच्या कौशल्याला अनुसरून अशा प्रकारे बदलली आहे, की त्यामुळे त्यांना उत्पादन प्रक्रियेच्या ठरलेल्या चाकोरीतील साखळीत अडकवावे लागत नाही. त्यांच्यातील सुप्त शक्ती त्यांची क्षमता बनते.

अशा उत्पादनांची विक्री त्यांच्या गुणवत्तेवरूनच होईल आणि दिव्यांगांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर होऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता येईल, असा शेरे दांपत्याला विश्वास आहे.या पुनर्वसन प्रकल्पात कर्णबधिर, बहुविकलांग, मतिमंद व ऑटिझमच्या व्यक्ती आणि सक्षम व्यक्ती असे एकूण १५ जण कार्यरत आहेत. सुतारकाम, शिवणकाम, पेंटिंग, भरतकाम, लाकडी फ्रेम्स, वारली पेंटिंगची कामे हे सर्व जण करतात. या व्यक्तींना कोणत्या गोष्टी आवडतात व येतात त्यांचा अभ्यास करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या कौशल्याचा उपयोग वस्तू बनवण्यासाठी होतो. उत्पादनांची विक्री त्यांच्या गुणवत्तेवरूनच होते. त्यामुळे दिव्यांगांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर होऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठरले आहे.

‘वस्तूंचे मूल्यवर्धन करून त्या अमेरिकेत निर्यात करण्याचा आमचा मानस आहे. जूनमध्ये मी अमेरिकेत गेले होते. तिथल्या बाजारपेठेचा अभ्यास केला, तेव्हा तिथे पन्नास टक्के वस्तू भारतीय बनावटीच्या आढळल्या. आंतरराष्ट्रीय निकष पाळून, त्या दर्जाच्या वस्तू बनवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे जगाच्या बाजारपेठेत आमच्या उत्पादनांची विक्री होईल,’ असे संस्थेच्या सचिव शमीन शेरे यांनी सांगितले. 

संस्थेचे अन्य प्रकल्प :
- विकासात्मक उपचार : विशेष गरजा असणाऱ्या मुलांना विविध उपचारांद्वारे त्यांचे अपंगत्व कमीत कमी राखण्यासाठी.
- बालक-पालक मार्गदर्शन व समुपदेशन : विशेष गरजा असणाऱ्या मुलांप्रति पालकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यासाठी व पालकांना अवघड प्रसंगांना तोंड देण्याबाबत मार्गदर्शनासाठी.
- व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण : मुलांच्या विशेष क्षमता, त्यांच्या मर्यादा आणि समाजाच्या गरजा या सर्वांचा विचार करून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यासाठी.
- पाळणाघर व आधारगृह : विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या पालकांना सामान्य सामाजिक जीवन जगता येण्यासाठी.
- गृह आधारित प्रशिक्षण : दूर आणि दुर्गम भागात राहणाऱ्या, विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या पालकांना आपल्या मुलाची काळजी घेणे व शिकविणे याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी.
- संशोधन आणि प्रकाशन : विशेष शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसन यांबाबतचे अद्ययावत संशोधन पुस्तके, मासिके, माहितीपत्रके इत्यादींद्वारे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी.
- संवर्धन कार्यक्रम : विशेष गरजा असणाऱ्या मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक अशा विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी.

संस्थेच्या कार्याला नागरिक अशा प्रकारे मदत करू शकतात. -
- शुभप्रसंगी भेट देण्यासाठी व स्वतःसाठी उत्पादने खरेदी करता येतील.
- उपक्रमांसाठी आर्थिक किंवा वस्तूंच्या रूपाने देणगी देऊन. दरमहा १०० रुपयांची बचत करून आपल्या वाढदिवसानिमित्त १२०० रुपयांची देणगी देऊन आणि वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करता येईल.
- जुनी वस्त्रे, मासिके, वर्तमानपत्रे, वस्तू पुनर्वसन प्रकल्पामध्ये पुनर्वापरासाठी दान करता येतील.

संपर्क :
अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्ट,
गोविंद आणि वत्सला रेगे हस्तकला केंद्र,
बाळकृष्णनगर, नाचणे रोड, रत्नागिरी
ई-मेल : awakeningtrust@gmail.com
मोबाइल : ९८२२१ २६६१३, ९६०४० ०२१००

(संस्थेच्या सचिव शमीन शेरे यांचे मनोगत आणि कलात्मक वस्तूंची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत.)


 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kanchan kamble,samaj sevika ( SEO). About 334 Days ago
G8 social work ,
0
0
seema Shrikhande About 350 Days ago
खुपच स्तुत्य उपक्रम आहे .आपण सगळेच यात सहभागी होऊ .
1
0
seema Shrikhande About 350 Days ago
खुपच स्तुत्य उपक्रम आहे .आपण सगळेच यात सहभागी होऊ .
0
0
Mahendra Dhavale About 350 Days ago
Dear Shashwat and Shamin, Your dream, passion,and ability has taken you both to the new hight of success. This great job is all because of your dedication and hard work. And yes confidence too. Many Congrats to you both..... All the best! With love... Mahendra...
1
0

Select Language
Share Link
 
Search