Next
बदलत्या नीतिमूल्यांचा थरारक आलेख : औरंगजेब
BOI
Tuesday, August 20, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

साध्या-सरळ विषयाची नावीन्यपूर्ण पद्धतीनं केलेली मांडणी, वैशिष्ट्यपूर्ण कथनशैली, नेमकं आणि नेटकेपणानं केलेलं दिग्दर्शन, अनेक पात्रं, अनेक घटना आणि त्यांचे परस्परसंबंध खुबीनं दर्शवणारी पटकथा, कथनातला थरार आणि सशक्त ‘सरप्राइज एलिमेंट’ ही ‘औरंगजेब’ची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. सत्ता, ताकद आणि पैशाला महत्त्व असणाऱ्या आजकालच्या काळात वेगळ्या स्वरूपात आपलं अधिष्ठान टिकवून ठेवणारी मूल्यं व निष्ठांचं महत्त्व हा चित्रपट अधोरेखित करतो. ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘औरंगजेब’ या चित्रपटाबद्दल....
...........
१७ मे २०१३ रोजी प्रदर्शित झालेला, अतुल सबरवाल लिखित आणि दिग्दर्शित, ‘औरंगजेब’ हा सिनेमा, ‘यशराज फिल्म्स’ या बॅनरखाली आजवर बनलेल्या इतर चित्रपटांच्या तुलनेत, अतिशय वेगळा असणारा, चाकोरी मोडणारा सिनेमा ठरतो. एसीपी आर्या फोगाटच्या (पृथ्वीराज सुकुमारन) निवेदनाच्या माध्यमातून या चित्रपटाची कथा उलगडत जाते. 

शेतजमिनी वगळता इतर काहीही नसणारं गुरगाव, हे शहर, एक अद्ययावत औद्योगिक शहर म्हणून पाहतापाहता नावारूपास आलं. मोठमोठ्या इमारती, कारखाने, चकचकीत ऑफिसेस, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स व रुंद महामार्ग, हे सर्व केवळ काही वर्षांच्या अवधीत तिथे साकारलं गेलं. राजकारणी आणि उद्योगपती या दोन शक्ती एकवटल्या आणि जुनं रूप आमूलाग्र पालटलेलं गुरगाव उभं राहिलं. जिथे पैसा किंवा ताकद यापैकी एक गोष्ट असते, तिथे स्वार्थ, राजकारण, शह, काटशह आणि गुन्हेगारी हे सगळं आपोआपच येतं. शहरीकरणाच्या या भयावह रेट्यात मनुष्याचा हव्यास दर दिवसागणिक वाढत चालला आहे. या सद्य परिस्थितीत, राजकारण आणि उद्योग या दोनच क्षेत्रांची ताकद टिकून राहील आणि दिवसेंदिवस वाढतच जाईल, हा विचार ‘औरंगजेब’ अतिशय प्रभावीपणे मांडतो. 

जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर

यशवर्धन सिंग (जॅकी श्रॉफ) हा गुरगावमधला प्रख्यात बिल्डर आहे. या व्यवसायाच्या आड चालणारे त्याचे काळे धंदेही अनेक आहेत; पण हे काळे धंदे नेमके कोणते आहेत? ते चालवण्याकरिता यशवर्धनला कोण मदत करतं, त्याचे साथीदार कोण, याबद्दलची नेमकी माहिती पोलिसांना मिळत नसते. पोलिसांना गुंगारा देऊन यशवर्धन त्याचे व्यवहार करत असतो. डीसीपी रविकांत फोगाट (ऋषी कपूर) हा वरिष्ठ पोलिस अधिकारी आपलं पद आणि ताकदीच्या जोरावर सरकारी नोकरीव्यतिरिक्त भरपूर पैसा कमावणं, आजूबाजूला चाललेल्या आर्थिक व्यवहारांवर करडी नजर ठेवणं आणि जिथे शक्य आहे तिथे आपली पोळी भाजून घेणं इत्यादी उद्योग करत असतो. यशवर्धन त्याच्या रडारवर येतो. एक दिवस त्याला अचानकपणे एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीचा शोध लागतो. या गोष्टीचा वापर करून घेऊन तो यशवर्धन आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवू लागतो. संधी मिळताच यशवर्धन आणि त्याचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची त्याची योजना असते. 

अर्जुन कपूर आणि पृथ्वीराज सुकुमारन

डीसीपी रविकांत फोगाटला त्याचा पुतण्या आणि मुलगा त्याच्या वैध-अवैध अशा प्रत्येकच कामात मदत करत असतात. वरवर पाहता पोलिसांची वाटणारी ही फॅमिली प्रत्यक्षात मात्र गुन्हेगारी कृत्यं करणं, त्यातून प्रचंड प्रमाणात आर्थिक फायदा कमावणं आणि आपला स्वार्थ साधणं ही उद्दिष्टं ठेवून आचरण करत असते. रविकांत फोगाट आणि त्याचा पुतण्या आर्या, यशवर्धनच्या मुलाचं - अजयचं (अर्जुन कपूर) अपहरण करतात आणि त्याला कैद करतात. अजयच्या जागी विशाल, या हुबेहूब अजयसारख्याच दिसणाऱ्या एका माणसाला पेरण्यात येतं. विशालकरवी रविकांतला हवी ती माहिती मिळू लागते. या माहितीचा वापर केल्यामुळे यशवर्धनच्या साम्राज्याला हळूहळू हादरे बसायला सुरुवात होते. 

अर्जुन कपूर

विशालचा वापर करून यशवर्धनचं साम्राज्य नष्ट करण्याच्या योजनेत रविकांत यशस्वी होतो का? विशाल आणि अजय इतके एकसारखे कसे दिसतात? यशवर्धनला संपवण्यामागे रविकांतचा नेमका हेतू काय असतो? विशाल पोलिसांचा हस्तक म्हणून काम पाहतो आहे, हे यशवर्धनला समजतं का? वरवर सोप्या दिसणाऱ्या या घटनाक्रमामागे काही वेगळं गूढ आहे का, इत्यादी प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकाला सिनेमा पुढे सरकत जातो तशी मिळत जातात. 

Deep in the cavern of the infant’s breast
The father’s nature lurks and lives anew

या होरसच्या ‘ओड्स’ नावाच्या पुस्तकामधल्या एका वाक्यानं या सिनेमाची सुरुवात होते. हे वाक्य ‘औरंगजेब’च्या कथेचा गाभा आहे. आर्या फोगाटचे वडील, विजयकांत (अनुपम खेर) यांची जगण्याची शैली साधी सोपी आहे. ‘अपनों की कीमत सपनों से ज्यादा होती है।’ ही त्यांची जीवनधारणा आहे, तर ‘खून पसीना नीचे की तरफ बहते है और पैसा ऊपर की तरफ। जो नीचे बैठा उसें ऊपर की तरफ बहाता है, वो लायक माना जाता है’ ही रविकांत आणि आर्याची धारणा आहे. सत्तेसाठी औरंगजेब बादशहानं अनुसरलेली कपटनीती रविकांतला आजच्या या परिस्थितीत जगण्याकरिता आदर्श वाटते. आपल्या मार्गात जो कुणी आडवा येईल त्याला या-ना-त्या प्रकारे शह देऊन बाजूला करणं, काटा काढणं यात त्याला काहीही चुकीचं वाटत नाही, तर अनेक वर्षांपूर्वी एकदा हातून चुकून एन्काउंटर झाल्याबद्दल आर्याचे वडील स्वत:ला आयुष्यभर माफ करू शकलेले नाहीत. या चुकीमुळे त्यांनी स्वत:चा आत्मविश्वास गमावलेला आहे. 

पृथ्वीराज सुकुमारन

आत्मविश्वास गमावलेले पश्चात्तापदग्ध वडील, बालपणापासून त्यांच्यात आणि आर्यात असलेला अबोला, असह्य ताण, या सगळ्या पार्श्वभूमीवर, आर्याला त्याचा काका रविकांत अधिक जवळचा वाटतो. रविकांतनं केलेली बेकायदेशीर कृत्यंही आर्याला योग्यच वाटतात. 

पूर्वी चुकीनं घडलेल्या एका एन्काउंटरमुळे विजयकांतचं करिअर एक काळा डाग लागून संपुष्टात आलेलं असतं. नुकत्याच हाती लागलेल्या विशाल या तरुणामार्फत यशवर्धनच्या साम्राज्याला सुरुंग लावायची महत्त्वाकांक्षी योजना रविकांत आखतो. वडिलांच्या (म्हणजे विजयकांतच्या) करिअरवर लागलेला अपमानजनक डाग पुसला जावा याकरिता आर्या रविकांतच्या या योजनेत सामील होतो. काही वेळानं आर्याला कळून चुकतं, की या योजनेमागचा रविकांतचा सुप्त उद्देश अतिशय वेगळा आहे. या उद्देशाआड येणाऱ्या कुणालाही रविकांत माफ करत नाही. वाट अडवणाऱ्या प्रत्येकाचा तो काटा काढतो. सिनेमाची कथा जसजशी पुढे सरकते, तसतसा हा खेळ अधिकाधिक गडद होत जातो. 

अतिशय ताकदवान कथा, या कथेस अधिकच रंजक बनवणारी आणि अतिशय तपशीलवार रीतीनं लिहिलेली पटकथा, प्रमुख कलाकारांचा जबरदस्त अभिनय आणि नेटक्या, नेमक्या दिग्दर्शनामुळे ‘औरंगजेब’ इतर व्यावसायिक चित्रपटांच्या तुलनेत खूपच वेगळा आणि उजवा ठरतो. 

अनेक पात्रं, अनेक घडामोडी, पात्रांचे आपसांतले व्यवहार, त्यांनी खेळलेल्या चाली, त्यामुळे होणारे परिणाम, गुंतागुंतीचा घटनाक्रम आणि तपशीलवार उलगडत जाणारे मानवी परस्परसंबंध इत्यादी गोष्टींमुळे हा चित्रपट उत्कंठा सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकवून ठेवतो. ही मुख्यत्वे निष्ठांची आणि तत्त्वांची गोष्ट आहे. सत्ता, त्यासोबत येणारी ताकद, ताकद टिकून राहण्याकरिता लोकांवर भीतीचं सावट टिकवून ठेवणं, क्लृप्त्या वापरून, हिकमती लढवून आपलं वर्चस्व कायम ठेवणं, परस्परालंबित्व असणं, सत्ता, ताकद आणि वर्चस्व टिकवून ठेवण्याच्या या लढाईमध्ये तत्त्व आणि निष्ठा गुंडाळल्या जाणं, त्याकरिता आप्तस्वकीयांचे बळी द्यावे लागणं, मानसिक व शारीरिक क्लेशाला सामोरं जाणं, मानसिक द्वंद्वांमध्ये अडकणं, कर्तव्याची पूर्ती करणं महत्त्वाचं की आतला आवाज ऐकणं महत्त्वाचं हे यातल्या पात्रांना पडलेलं कोडं, ते कोडं सोडवण्याकरिता त्यांनी केलेली धडपड, त्यातून सामोरे येणारे नवे प्रश्न, काही गूढ गोष्टी इत्यादी गोष्टींची रंजक मांडणी म्हणजे हा चित्रपट आहे. 

साध्या-सरळ विषयाची नावीन्यपूर्ण पद्धतीनं केलेली मांडणी, वैशिष्ट्यपूर्ण कथनशैली, नेमकं आणि नेटकेपणानं केलेलं दिग्दर्शन, अनेक पात्रं, अनेक घटना आणि त्यांचे परस्परसंबंध खुबीनं दर्शवणारी पटकथा, कथनातला थरार आणि सशक्त ‘सरप्राइज एलिमेंट’ ही ‘औरंगजेब’ची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. विविध टप्प्यांवर विविध रहस्यांची होत जाणारी उकल, यातल्या पात्रांसमोर असलेला डिलेमा, त्यांची काळानुसार बदलत जाणारी व्यक्तिमत्त्वं, त्या व्यक्तिमत्त्वांना असलेले अनेक पदर, भावभावनांचं समर्थ दर्शन, सशक्त कथाबीज, त्याभोवती असलेलं अनेक पदरी आवरण, शेवटपर्यंत टिकून राहणारी उत्कंठा, पटकथा आणि सादरीकरणात असणारं नावीन्य, दमदार कलाकारांची फळी हे सर्व घटक मिळून ‘औरंगजेब’ हा एक अतिशय वेगळा चित्रपट ठरतो. मूळ कथा आणि कथाबीजाशी इमान राखत, प्रसंग व घटनांची सशक्त गुंफण दाखवत प्रेक्षकाला दृष्यमालिकेत गुंतवतो आणि धक्क्यांवर धक्के देत राहतो. 

सत्ता, ताकद आणि पैशाला महत्त्व असणाऱ्या आजकालच्या काळात वेगळ्या स्वरूपात आपलं अधिष्ठान टिकवून ठेवणारी मूल्यं व निष्ठांचं महत्त्व हा चित्रपट अधोरेखित करतो. होरसनं फार पूर्वी लिहिलेलं वाक्य किती खरं आहे याची जाणीव करून देतो. ‘शहर से दूर घर लिया था। अब ये शहर बढते बढते घर में घुस आया है’ या संवादातून शहरीकरण आणि मानवी हव्यासाचा भेडसावणारा वेग दाखवतो, गुंतागुंतीचे मानवी संबंध मोठ्या समर्थपणे उलगडतो. ऋषी कपूर, पृथ्वीराज सुकुमारन, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, अमृता सिंग आणि अर्जुन कपूर यांसारखी कलावंतांची तगडी फळी ‘औरंगजेब’मध्ये आहे. 

ऋषी कपूर (सर्व फोटो : यशराज फिल्म्स)

सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम झाला असला, तरी ऋषी कपूर आणि पृथ्वीराज यांच्या भूमिका विशेष लक्षात राहण्याजोग्या आहेत. ऋषी कपूरने त्याच्या कारकिर्दीतल्या सेकंड इनिंगमध्ये ज्या अफलातून भूमिका साकारल्या, त्यापैकी ‘डीसीपी रविकांत फोगाट’ ही त्याची या चित्रपटातील भूमिका त्याच्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांतल्या वेगळ्या आणि सशक्त व्यावसायिक हिंदी चित्रपटांची यादी केली, तर ‘औरंगजेब’चं नाव त्यामध्ये बऱ्याच वरच्या स्थानावर असेल. शेवटाकडे येताना हा चित्रपट एका टिपिकल व्यावसायिक चित्रपटाच्या वाटेने जातो. ही गोष्ट किंचित प्रमाणात या सिनेमाकरिता मारकही ठरते; पण म्हणून या सिनेमाने निर्मिलेला एकूण परिणाम आणि त्याचं महत्त्व कमी होत नाही. काही मोजके प्रसंग वगळता हा सिनेमा व्यावसायिक आणि समांतर अशा दोन्ही मुख्य प्रवाहांचा सुयोग्य मेळ ठरावा.

मनुष्य प्राण्याच्या वाढत्या हव्यासाचा, बदलणाऱ्या नीतिमूल्यांचा, शहरीकरणाच्या रेट्यात भरडल्या जाणाऱ्या जीवनमूल्यांचा आणि राजकारणी, उद्योजक व संबंधित इतर बाबींचा हा उत्कंठावर्धक आणि थरारक आलेख एकदा जरूर अनुभवण्यासारखा आहे. 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search