Next
जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढण्याची अपेक्षा
‘काश्मीर हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स फेडरेशन’तर्फे पुणेकरांसाठी खास सवलत
BOI
Tuesday, January 22, 2019 | 04:34 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘काश्मीरचे पर्यटन आता सुरक्षित असून, यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढण्याची अपेक्षा आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील नागरिकांची आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही खास पुणेकरांना वीस ते तीस टक्के सवलत देऊ करणार आहोत’, अशी माहिती ‘काश्मीर हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स फेडरेशन’चे अध्यक्ष वाहिद मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

‘काश्मीर हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स फेडरेशन’तर्फे आयोजित  कार्यक्रमाप्रसंगी डॉ. विश्वास केळकर, संजय नहार, रियाज अहमद शाह, वाहिद मलिक व जावेद बशीर बुर्झा.

‘काश्मीर हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स फेडरेशन’च्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी,२१ जानेवारी रोजी शहरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी जम्मू-काश्मीर टुरिझमचे उपसंचालक रियाज अहमद शाह, इव्हेंट मॅनेजमेंट ऑर्गनायझिंग कमिटीचे अध्यक्ष जावेद बशीर बुर्झा, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष डॉ. विश्वास केळकर उपस्थित होते. 


मलिक पुढे म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत काश्मीरमधील पर्यटन सुरक्षित झाले असून, आता पर्यटकांसाठी काही नवी ठिकाणे विकसित केली आहेत. पर्यटकांचा या स्थळांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या उन्हाळी हंगामात देशभरातून एक कोटींहून अधिक पर्यटक काश्मीरमध्ये येतील, अशी अपेक्षा आहे. दर वर्षी महाराष्ट्रातून विशेषतः पुण्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. गेल्या वर्षी जम्मू काश्मीरला भेट दिलेल्या पर्यटकांपैकी वीस लाख पर्यटक महाराष्ट्रातून आले होते. त्यामुळे आम्ही पुण्यासह अहमदाबाद, मुंबई, नागपूर, रायपूर, इंदूरसह नऊ शहरांमध्ये, तसेच बांगलादेश, थायलंड आणि मलेशियामध्ये रोड शोचे आयोजन केले आहे.’

‘निसर्गाचा मनमुराद आनंद लुटताना पर्यटक विविध उपक्रमांना पसंती देत आहेत. त्यामध्ये साहसी उपक्रम, स्नो स्कूटर, ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, बायसिकल ट्रेल्स, रिव्हर राफ्टींग, गोल्फ यांचा समावेश आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरला सर्व ऋतूंमध्ये भेट देण्यासाठी पर्यटक येत आहेत. नेहमीच्या लोकप्रिय ठिकाणांशिवाय बंगस व्हॅली, तोसा मैदान, सीमथन टॉप, गुरेज व्हॅली, लोला व्हॅली, दूधपत्री ही नवीन ठिकाणे पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहेत,’ असेही मलिक यांनी सांगितले. 

‘काश्मीरमधील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात हिंदी चित्रपटांचाही मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांत अनेक चित्रपटांचे चित्रीकरण काश्मीरमध्ये झाले आहे. येथील चित्रीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंडळाने एक खिडकी योजना जाहीर केली आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना एकच अर्ज करून सर्व परवानग्या नाममात्र दरात प्राप्त होणार आहेत. दक्षिणेकडील चित्रपटांचेही चित्रीकरण वाढले आहे,’ असेही वाहिद मलिक यांनी नमूद केले. 


जम्मू-काश्मीर टुरिझम उपसंचालक रियाज अहमद शाह म्हणाले, ‘जम्मू-काश्मीरमधील भौगोलिक वैविध्यता केवळ भारतीय पर्यटकांनाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांनादेखील आकर्षित करत आहे. परदेशी पर्यटकांची संख्याही दुप्पट होईल आणि हा आकडा ७५ हजारांवरून दीड लाखांवर जाईल,असा आम्हाला विश्वाेस आहे. इटली, जर्मनी आणि फ्रान्स या युरोपीय देशांचा कल हा लडाखकडे अधिक दिसून येतो, तर मलेशिया,थायलंड आणि बांग्लादेश येथील पर्यटक जम्मू-काश्मीरची निवड करताना दिसतात.’

ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. विश्वास केळकर म्हणाले, ‘गेल्या एक ते दोन वर्षांत पर्यटक काश्मीरला जाण्याची आपली योजना काही अंशी पुढे ढकलत होते;परंतु आता परिस्थिती बदलत चालली आहे.पुणेकर नवनवीन पर्यायांचा अवलंब करून काश्मीरच्या निसर्गरम्य सृष्टीचा आस्वाद घेत आहेत. श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम यांसारख्या नेहमीच्या ठिकाणांशिवाय पर्यटक आता लोकांची वर्दळ कमी असलेल्या ठिकाणांना प्राधान्य देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटताना आढळतात. साहसी पर्यटन, गोल्फ, विंटर स्पोर्टस, रिव्हर राफ्टींग यासाठीही पर्यटकांची पसंती वाढत आहे.’  

सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार म्हणाले, ‘आम्ही काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष हेल्पलाईन स्थापित केली आहे. महाराष्ट्रातील लोकांचे काश्मीरशी एक भावनिक नाते जोडलेले आहे आणि त्यामुळेच काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांचा तेथील लोकांशी संवाद वाढतो. यामुळेच पर्यटकांची संख्या वाढत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search