Next
वैभवशाली साताऱ्याची सफर - १०
BOI
Wednesday, May 08, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या नऊ भागांत आपण वैभवशाली साताऱ्याची सफर केली. त्या मालिकेतील आजच्या शेवटच्या -दहाव्या भागात माहिती घेऊ या महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन निसर्गरम्य अशा थंड हवेच्या ठिकाणांची. 
.............
महाबळेश्वर बाजार व गाव समुद्रसपाटीपासून साधारण ४३०० ते ४५०० फूट उंचीवर आहे, तर विल्सन पॉइंट हे सगळ्यात उंच ठिकाण ४७१० फूट उंचीवर आहे. महाबळेश्वरच्या ज्ञात इतिहासाप्रमाणे १२१५मध्ये देवगिरीचे राजे सिंधण यांनी जुन्या महाबळेश्वरला (क्षेत्र महाबळेश्वर) भेट दिली, तेव्हा त्यांनी कृष्णा उगमस्थानी नदीच्या झऱ्याच्या ठिकाणी एक लहानसे मंदिर बांधले. १६व्या शतकात महाबळेश्वर जावळीचे सरदार चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात आले. त्या काळात या मंदिराची पुनर्बांधणी झाली. अफझलखानाच्या वधानंतर त्याच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते. त्यानंतर सन १८१८पर्यंत हा भाग मराठ्यांच्या आधिपत्याखाली होता. माल्कम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि शिंदोला गावाचा भाग या तीन गावांचे एकत्रीकरण करून सध्याचे महाबळेश्वर तयार झाले आहे. 

कृष्णामाई मंदिरापुढील कृष्णा खोऱ्याचे विहंगम दृश्य

सध्या जेथे महाबळेश्वरची बाजारपेठ व गावभाग आहे तो माल्कम पेठ या नावाने ओळखला जात असे. १८२९च्या सुमारास ब्रिटिशांनी येथे काही चिनी व मलेशियन कैद्यांना आणून ठेवले होते. त्यांच्याकडून रस्ते, बगीचा इत्यादी कामे करून घेण्यात आली. त्यातील काही कैदी सुटका झाल्यावर येथेच राहिले व त्यांनी लाल बटाटे, स्ट्रॉबेरी यांचे उत्पादन सुरू केले. १८२८पासून सर जॉन माल्कम, सर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, आर्थर मॅलेट, कर्नाक, फ्रेरे आणि अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली होती. १८८४मध्ये राजभवन बांधण्यात आले. मुंबई इलाख्याची उन्हाळी राजधानी म्हणून येथून कारभार चालत असे. पूर्वी पर्यटक पावसाळा सोडून यायचे. उन्हाळी व हिवाळी असे पर्यटनाचे दोनच हंगाम होते; मात्र आता पावसाळ्यातही (अतिवृष्टीचा काळ सोडून) पर्यटक गर्दी करतात. 

मूळ कृष्णामाई मंदिर

कृष्णामाई मंदिर :
महाबळेश्वर येथील पंचगंगा उगम व महाबळेश्वर मंदिराला भेट देणाऱ्यांची संख्या भरपूर; पण या दोन देवळांया अगोदर बांधलेल्या मूळ कृष्णामाई मंदिराची ओळख करून घेऊ. कार पार्किंगच्या पूर्वेस साधारण पाच ते १० मिनिटांत चालत येथे पोहोचता येते. हे देऊळ फारसे परिचित नाही. अलीकडे आठ-दहा वर्षांत पुरातत्त्व विभागाने उत्खनन करून साफसफाई करून हे मंदिर उजेडात आणले आहे. हे देऊळ कोणी बांधले याची निश्चित माहिती नाही; पण साधारण ११व्या शतकातील किंवा त्यापूर्वीचे बांधकाम असावे. या मंदिराची शैली परिचित नाही. येथे स्मशानभूमी होती. त्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले होते. आता येथून स्मशानभूमी हलविली आहे. या मंदिराच्या बाहेरील बाजूला विष्णू, तसेच गरुडध्वज दिसून येतात. वास्तविक विष्णूची प्रतिमा स्मशानाजवळ आढळत नाही. देऊळ वापरात नसल्यामुळे येथे स्मशान झाले असावे. आतील गोमुखातून पाणी पडत असते. 

कृष्णामाई मंदिर - गरुडध्वजसमोरील नंदीच्या मूर्तीची शैली खूपच वेगळी आहे. त्याला कोणतेही अलंकार दिसत नाहीत. आतील बाजूस असलेले शिवलिंग एका चौकोनी स्तंभावर आहे. याच्या खालील बाजूस १०८ नाग दिसून येतात. मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील भाग खुला आहे. साधारण १७ मार्च ते २३ मार्च व १७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत येथे संपूर्ण गाभाऱ्यात सूर्यकिरणे पडतात. समोरच कृष्णा खोऱ्याचे दूरपर्यंतचे विंहंगम दृश्य दिसते. मंदिराची शिखरबांधणी पावसाचा मारा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. लांबून मंदिराची कल्पनाही येत नाही. कृष्णा नदी येथूनच आपला प्रवास सुरू करते. 

पंचगंगा मंदिर : कृष्णा, कोयना, गायत्री नदी, सावित्री, वेण्णा, सरस्वती आणि भागीरथी या सात नद्यांचे उगमस्थान येथे आहे. सरस्वती लुप्त होते व साठ वर्षांनी येते.  आता ती २०३४मध्ये दिसेल, तर भागीरथी १२ वर्षांनी श्रावण महिन्यात येते. ती आता २०२८मध्ये प्रकट होईल. कृष्णा, कोयना आणि वेण्णा पूर्ववाहिनी नद्या आहेत. सरस्वती पश्चिमवाहिनी आहे. या नद्यांचे एकत्रित मंदिर बांधलेले आहे. यापैकी पहिल्या पाच नद्यांचा ओहोळ सतत बाराही महिने वाहत असतो. 

आर्थर सीट पॉइंटवरून दिसणारे दृश्य

आर्थर सीट पॉइंट :
पंचगंगा मंदिराच्या मागेच आर्थर सीट पॉइंट आहे. येथून चालतही जाता येते, तसेच गाडीमार्गही आहे. आर्थर मॅलेट हा ब्रिटिश ऑफिसर होता. सरस्वती नदी अरबी समुद्राला जेथे मिळते, तेथे बाणकोट बंदरात त्याची पत्नी व लहान मूल नौकेच्या अपघातात मरण पावले. त्यांचे थडगे तेथील किल्ल्यावर आहे. हाच आर्थर सरस्वतीच्या उगमस्थानाच्या वर बसून पश्चिमेकडे आपल्या प्रिय पत्नीची आठवण काढत बसे. त्यामुळे या जागेला आर्थर सीट पॉइंट म्हणतात. जवळच एको पॉइंट आहे. येथून आवाजाचा प्रतिध्वनी येतो. तसेच मंकी पॉइंटही येथे आहे. हा महाबळेश्वरातील सर्वांत आकर्षक पॉइंट म्हणून ओळखला जातो. या पॉइंटच्या डावीकडे खोल दरीतून कोकणात जाणारी सावित्री नदी आहे, तर उजवीकडे घनदाट जंगले आहेत. यालाच ब्रह्मारण्य असेही म्हणतात. ही सर्व मनमोहक आणि आकर्षक दृश्ये इतर गोष्टींचा विसर पाडायला भाग पाडतात. हवामान जर स्वच्छ असेल तर या पॉइंटवरून रायगड किल्ला, तोरणा किल्ला स्पष्ट दिसतात. याच मार्गावर टायगर स्प्रिंग, इको पॉइंट, एलफिन्स्टन पॉइंट आहेत. 

वेण्णा लेकचे पावसाळ्यातील दृश्य

वेण्णा लेक :
१८४२ साली सातारचे राजे श्रीमंत छत्रपती अप्पासाहेब महाराज यांनी ‘वेण्णा लेक’ची निर्मिती केली. वेण्णा लेकचा विस्तार सुमारे २८ एकर क्षेत्रात होता. त्यानंतर दोन वेळा त्याची पुनर्बांधणी झाली. नुकतीच धरणाची उंची वाढवून त्याची क्षमता वाढविली आहे. आता पाचगणीलाही या ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो. महाबळेश्वरला पाणीपुरवठा करण्यासाठी याची निर्मिती झाली. महाबळेश्वरचा प्रसिद्ध बोट क्लब येथेच आहे. पर्यटकांनी कायम गजबजलेले हे ठिकाण वाई-महाबळेश्वर मार्गावरच आहे. दाट जंगलाच्या सान्निध्यातील नौकानयन ही पर्यटकांसाठी एक पर्वणी आहे. 

केट्स पॉइंट (नीडल होल)

केट्स पॉइंट (नीडल होल/एलिफंट पॉइंट) :
वेण्णा लेकच्या पुढे पाचगणी रस्त्याच्या बाजूला थोडे अंतर गेल्यावर डावीकडे या ठिकाणाकडे जाण्याचा रस्ता आहे आहे. दाट झाडीतून हा रस्ता जातो. या रस्त्यावरून क्षेत्र महाबळेश्वरलाही जाता येते. पुढे आल्यावर दिसते ते कृष्णा नदीचे लांबवर पसरलेले खोरे. त्यात धोम धरणाचा व बलकवडी धरणाचा निळाशार जलाशय. समोर दिसतो झाडीतून डोकावणारा कमळगड. त्याच्या पायथ्याशी आहे जिवा महालाचे कोंडविली गाव. बाजूने हा पॉइंट हत्तीच्या मस्तकासारखा दिसतो, तर नैसर्गिक आरपार दिसणारे ‘नीडल होल’ही दिसतो. 

लिंगमळा धबधबा

लिंगमळा फॉल :
हे सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे. तसेच हा पॉइंट पाचगणी रस्त्याला वेण्णा लेकपासून अत्यंत जवळ आहे. वेण्णा नदीवर हा धबधबा आहे.
 
विल्सन पॉइंट

विल्सन पॉइंट :
महाबळेश्वर-सातारा रस्त्यावर डावीकडे विल्सन पॉइंटकडे रस्ता जातो. हा सनराइझ पॉइंट म्हणून ओळखला जातो. हे महाबळेश्वरमधील सर्वांत उंच ठिकाण आहे. पुढे सातारा रस्त्यावर बगदाद पॉइंट आहे. नगरपालिकेच्या नाक्यापासून उजवीकडे कोयना शिवसागराकडे रस्ता जातो. तापोळा येथे बोट क्लब आहे. 

बॉम्बे पॉइंट

बॉम्बे पॉइंट :
महाबळेश्वरमधील सूर्यास्ताची मजा बघण्यासाठी येथे पर्यटक गर्दी करतात. महाबळेश्वरचे काबुली फुटाणे, चिक्की, हंगामाप्रमाणे तुती, जांभळे, करवंदे खात सूर्यास्त होईपर्यंत मजा करण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. 

मधुसागर : मधुसागर ही महाबळेश्वरमधील मध उत्पादक सहकारी संस्था आहे. महाबळेश्वरच्या आसपासच्या गावातील शेतकरी मध गोळा करून येथे जमा करतात. येथे मधमाश्यापालनाचे शिक्षणही दिले जाते. 

प्रतापगड

प्रतापगड :
हा किल्ला महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सुमारे २३ किलोमीटरवर आहे. किल्ल्यावरून सर्वत्र सह्याद्रीच्या दुर्गम पर्वतरांगा दिसतात. अत्यंत विलोभनीय असे हे पर्वतराजीचे दर्शन खूप सुखावह वाटते. त्याची समुद्रसपाटीपासून उंची ३५४५ फूट आहे. १६५६मध्ये शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची स्थापना केली. मुख्य किल्ला व बालेकिल्ला असे या किल्ल्याचे दोन भाग असून, दोन्ही ठिकाणी तलाव आहेत. किल्ल्याला सर्व बाजूंनी भक्कम तटबंदी आहे. ३० ते ५० फूट उंचीचे बुरुज आहेत. त्यांपैकी अफझल, रेडका, राजपहारा, केदार इत्यादी बुरुजांचे अवशेष अद्यापही दिसून येतात, टिकून आहेत. किल्ल्यावर तुळजाभवानीचे मंदिर आहे. १० नोव्हेंबर १६५९ रोजी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वांत मोठी लढाई झाली होती. त्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. येथे महाराजांनी अफजलखानाला गनिमी काव्याने संपविले. (अफझलखान वधावर आधारित नाट्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

येथे अफझलखानाचा दर्गा आहे. वर दिसणाऱ्या बुरुजाला अफजल बुरुज असे नाव आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३५४३ फूट उंचीवर हा किल्ला आहे. तुळजाभवानीचे मंदिर शिवाजी महाराजांनी १६६१मध्ये मोरो त्रिंबक पिंगळे यांच्याकडून बांधून घेतले. मंदिरातील भवानीमातेची मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे. छत्रपती राजाराम महाराज जिंजीस जात असताना प्रथम प्रतापगडावर आले. पेशवाईत नाना फडणवीसांनी येथे सखाराम बापूला काही दिवस नजरकैदेत ठेवले होते. त्याच नानांना दौलतराव शिंदे त्यांच्या मागे लागले त्या वेळी १७९६मध्ये काही दिवस या किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला होता. १८१८च्या ब्रिटिश-मराठे युद्धानंतर किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. शिवकालीन रीतीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. ६० वर्षांपूर्वी प्रतापगडाच्या पायथ्यापासून चालत वर जावे लागे. आता गाडी वरपर्यंत जाते. तरीही थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात. 

मधुशिखर व मकरंदगड

मधु-मकरंद गड :
मधुशिखर व मकरंदगड असे दोन्ही मिळून मधु-मकरंदगड किंवा मकरंदगड अशी याची ओळख आहे. याचा आकार तट्टूच्या पाठीसारखा दिसतो. म्हणून याला सॅडल बॅक असेही म्हणतात. महाबळेश्वरमधून येथे एका दिवसाचा ट्रेक करणे शक्य आहे. महाबळेश्वरवरून प्रतापगडाच्या पायथ्यामध्ये वाडा कुंभरोशीच्या अलीकडे पार गावातून हातलोट रस्त्याने घोणसपूर गावापर्यंत जाऊन तेथून हा ट्रेक करावा. गावातील देवळात राहण्याची व्यवस्था होऊ शकते. ट्रेकर्ससाठी हे नंदनवन आहे. महाबळेश्वरहून सकाळी लवकर निघाल्यास ट्रेक करून संध्याकाळपर्यंत परत महाबळेश्वरला मुक्कामाला येता येते. शिवाजी महाराजांनी प्रतापगडाबरोबरच याची १६५६मध्ये निर्मिती केली. गडावर आता फक्त भग्नावशेष उरले आहेत; पण येथील निसर्गसौंदर्य बघण्यासारखे आहे पूर्वेला सह्याद्रीच्या रांगा व शिवसागर, पश्चिमेला कोकण असे निसर्गाचे सुरेख दर्शन येथून होते. शक्य असेल तर मधुमकरंदगड-कोंडनाळ-बिरमणी हा ट्रेकही करावा. घोणसपूर गावातून मार्गदर्शक घ्यावा. 

मधु-मकरंद गड

चायनामन फॉल :
पूर्वी चिनी लोकांसाठी असलेल्या तुरुंग परिसरातच हा धबधबा आहे. 

धोबी वॉटरफॉल : महाबळेश्वरपासून तीन किलोमीटरवर हा धबधबा आहे. लॉडविक पॉइंट, एल्फिन्स्टन पॉइंटच्या पेटिट रोडवर हा धबधबा दिसून येतो. 

भिलार - पुस्तकांचे गाव

पुस्तकांचे गाव भिलार :
पुस्तकाचे गाव ही संकल्पना राबविणारे भिलार हे देशातील पहिले, तर जगातील दुसरे ठिकाण आहे, या गावात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार भि. दा. भिलारे यांचे हे गाव. थंड हवेच्या ठिकाणी वसलेले भिलार हे गाव यापूर्वी स्ट्रॉबेरीच्या नावाने ओळखले जायचे. महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावरच हे निसर्गरम्य ठिकाण आहे. स्ट्रॉबेरी हंगामात या गावात, तसेच आसपासच्या गुऱ्हेघर, भोसे व कासवंड गावात स्ट्रॉबेरी महोत्सव साजरा केला जातो. पर्यटकांना प्रत्यक्ष शेतात जाऊन स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेता येतो. तसेच या गावातून पर्यटकांसाठी होम-स्टे (निवासी व्यवस्था) सुविधा राबविली जाते. गुऱ्हेघर येथे शासनाची शेती व वनसंशोधन संस्था आहे. (पुस्तकांच्या गावाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

पाचगणी

पाचगणी :
महाबळेश्वरजवळील हे दुसरे महत्त्वाचे गिरिस्थान. हिलस्टेशनबरोबर हे एक शैक्षणिक ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे इंग्रजी माध्यमाची बोर्डिंग स्कल्स आहेत. महाबळेश्वरला अतिवृष्टीच्या काळात पर्याय म्हणून १८६०च्या दशकात जॉन चेसन नावाच्या अधिकाऱ्याने या ठिकाणाची निर्मिती केली. त्यांनी येथे पाश्चात्य देशांतील अनेक वनस्पती लावल्या. सिल्व्हर ओक आणि पॉइसेटिया आदींचा त्यात समावेश होता. येथील हवा वर्षभरासाठी सुखद असल्याने ब्रिटिशांनी विश्रांतीसाठी हे ठिकाण विकसित केले. रुस्तुजी दाबाश यांच्या मदतीने जॉन चेसनने या परिसरातल्या भागाचे सर्वेक्षण केले आणि जवळच्या दांडेघर, गोडवली, आमरळ, खिंगर व तायघाट या पाच गावांमधील जागेची निवड केली. येथे बाजार विकसित करण्यात आला व सर्व प्रकारच्या व्यावसायिकांसाठी जागा देण्यात अली. पाचगणीचे ज्वालामुखीतून निर्माण झालेले पठार (टेबल लँड) हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे पठार आहे. टेबललँड हे पर्यटकांचे व सिनेसृष्टीतील निर्मात्यांचे आवडते ठिकाण आहे. टेबललँडच्या पश्चिम बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगा, धोम जलाशय, कमळगड, केंजळगड यांचे विलोभनीय दृश्य दिसते. उत्तरेला पांडवगड, मांढरदेवी ही ठिकाणे दिसतात. पाचगणी व महाबळेश्वरचे काबुली फुटाणे खाल्ल्याशिवाय ट्रिप पूर्ण होत नाही. इथून जाताना पर्यटकांच्या बॅगमध्ये निरनिराळ्या प्रकारची चिक्की असतेच. पारशी पॉइंट, सिडनी पॉइंट ही प्रेक्षकांची आवडती ठिकाणे. पाचगणीमध्ये आता पॅरासेलिंगसारखे धाडसी खेळ उपलब्ध आहेत. 

टेबललँड

दांडेघर :
पाचगणीला वाई रस्त्यावर दांडेघर म्हणून ठिकाण आहे. येथे केदारेश्वर मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे भेट दिली होती. दर वर्षी दसऱ्याला दांडेघरचे श्री केदारेश्वर व पसरणीचे काळभैरवनाथ यांचा भेट सोहळा अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. 

गोडवली : हे तानाजी मालुसरे यांचे मूळ गाव, त्यांचा जन्म उमरठ येथे आजोळी झाला. त्यांचे लहानपण येथेच गेले. या गावात स्मारकही उभारण्यात आले आहे. येथील वाटाणा उत्पादकांसाठी कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत प्रशिक्षणासह सुधारित तंत्रज्ञान पुरवण्यात आले आहे. 

राजापुरी गुंफा : या पुरातन वैष्णव गुंफा आहेत. येथे एकूण सात गुंफा आहेत. त्यापैकी चार पूर्ण व तीन अर्धवट आहेत. तेथे पाण्याची कुंडे आहेत. प्रत्येक गुंफेतून झोपून दुसऱ्या गुंफेत जाता येईल अशी व्यवस्था आहे. गुंफांमध्ये काही भित्तिशिल्पे पूजेसाठी ठेवलेली दिसतात. पावसाळ्यात पाझरून येणारे पाणी गुंफेच्या तोंडावर पडत असते. 

कसे जाल, कोठे राहाल महाबळेश्वर, पाचगणीला?
महाबळेश्वर व पाचगणीला मुंबईहून महाड, पोलादपूरमार्गे, तसेच पुण्याहून वाईमार्गे जाता येते. तसेच कोल्हापूरकडून सातारा, मेढामार्गे जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन सातारा व वाठार - ६० किलोमीटर. जवळचा विमानतळ पुणे - १३० किलोमीटर. जास्त पावसाचा जुलै महिना सोडून येथे जाता येते. दोन्ही ठिकाणी राहण्यासाठी मध्यम आणि उत्तम दर्जाची हॉटेल्स आहेत. 

(या भागातील माहितीसाठी गोडवली येथील अमृता क्षीरसागर-पोरे, तसेच मधु-मकरंदगडाजवळील घोणसपूर येथील वाटाडे पांडुरंग बर्गे यांचे सहकार्य झाले.)

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 163 Days ago
Knowledge / curiosity adds to the pleasure of travelling / trecking . Hope , you continue the practice. Tourism authorities in Satara will do well to use these articles .
1
0
BDGramopadhye About 163 Days ago
knowledge / curiosity adds t0 the pleasure of travelling / tracking . Hope, you continue the practice . The tourism authorities in Satara , will do well to use these articles .
1
0

Select Language
Share Link
 
Search