Next
चार्ल्स डिकिन्स
BOI
Wednesday, February 07 | 03:45 AM
15 1 0
Share this story

ऑलिव्हर ट्विस्ट, निकलस निकल्बी, दी पिकविक पेपर्स, डेव्हिड कॉपरफिल्ड, ए टेल ऑफ टू सिटीज, ग्रेट एक्स्पेक्टेशन्स, ए क्रिसमस कॅरोल, दी ओल्ड क्युरिऑसिटी शॉप अशा एकाहून एक अविस्मरणीय अजरामर कादंबऱ्या लिहिणाऱ्या चार्ल्स डिकिन्सचा सात फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा परिचय...
.....
सात फेब्रुवारी १८१२ रोजी हॅम्पशरमध्ये जन्मलेला चार्ल्स डिकिन्स हा व्हिक्टोरिअन काळातला सर्वश्रेष्ठ ब्रिटिश कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहे. गरीब-श्रीमंत, लहानथोर, साध्यासुध्या माणसांपासून ते प्रतिष्ठित माणसांपर्यंत सर्वच थरांतल्या लोकांना त्याच्या लिखाणाची भुरळ पडली होती. 

त्याच्या सर्वच कादंबऱ्या तुफान गाजल्या आणि लोकप्रिय झाल्या. सुरुवात झाली होती १८३६ सालच्या ‘दी पिकविक पेपर्स ऊर्फ दी पॉस्च्युमस पेपर्स ऑफ दी पिकविक क्लब’पासून! पिकविक क्लबचे सॅम्युअल पिकविक हे आपल्या काही दोस्तांबरोबर लंडनबाहेरच्या जगाची सफर करून येतात आणि तिथल्या त्यांच्या अनुभवांचं हे पुस्तक. मजेशीर. धमाल. या पुस्तकातून आपल्याला १९व्या शतकाच्या मध्यावर असलेली इंग्लिश जीवनशैली कळते. 

पुढच्याच वर्षी, १८३७ साली त्याची ‘ऑलिव्हर ट्विस्ट’ ही एका अनाथ आणि पोरक्या मुलाची हृदयद्रावक कहाणी सांगणारी कादंबरी प्रसिद्ध झाली. तिचंसुद्धा वाचकांनी जोरदार स्वागत केलं होतं. त्यानंतची ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’ ही कादंबरी तर डिकिन्सची स्वतःचीसुद्धा लाडकी कादंबरी. गरिबी आणि हलाखीच्या परिस्थितीतून वर येऊन पुढे यशस्वी लेखक बनणाऱ्या आणि सुखी आयुष्य जगणाऱ्या मुलाची कहाणी. डिकिन्सच्या बहुतेक कादंबऱ्यांवर सिनेमे बनले आणि गाजले. ‘ए क्रिसमस कॅरोल’ ही त्याची १८४३ सालची एब्नेझर स्क्रूज या कंजूष माणसाची कथा. त्याच्याच मेलेल्या बिझिनेस पार्टनरचं भूत येऊन त्याला भेटतं आणि पुढे क्रिसमस काल, आज आणि उद्या अशी तीन भुतं येऊन भेटतात. त्यांच्या भेटीनंतर स्क्रूज कसा सुधारतो, त्याची कथा. 

‘ए टेल ऑफ टू सिटीज’ ही त्याची कादंबरी फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातली. लंडन आणि पॅरिसमध्ये घडणारी कथा. फ्रेंच डॉक्टर मॅनेट आणि त्याची मुलगी, ल्युसीची कथा. ‘ग्रेट एक्स्पेक्टेशन्स’ ही कादंबरी त्याच्या कल्पनाशक्तीची करामत दाखवणारी म्हणून गाजली. या कादंबरीचंही जगभर उत्साहाने स्वागत झालं होतं. ‘दी ओल्ड क्युरिऑसिटी शॉप’ ही कादंबरी म्हणजे पुन्हा एका अनाथ मुलीची, नेल ट्रेंटची कथा. ती आपल्या आजोबांबरोबर एका दुकानातच राहते. नातीसाठी पैसे हवेत म्हणून आजोबा जुगार खेळू पाहतात; पण सर्वस्व हरतात आणि त्यांना तिथनं परागंदा व्हावं लागतं. दुसऱ्या प्रांतात गेल्यावरही त्यांची स्थिती सुधारत नाही आणि शेवटी दोघांचा दुर्दैवी मृत्यू होतो, त्याची ही करुण कथा. 

डिकिन्सचं लेखन हे काहीसं उपरोधाने भरलेलं असायचं; पण त्या काळातल्या गरिबीचं अत्यंत प्रत्ययकारी वर्णन त्याच्या कादंबऱ्यांमधून दिसून येतं. त्याच्या सर्वच कादंबऱ्यांमधल्या एकूणेक व्यक्तिरेखा इंग्लिश साहित्यात अजरामर झाल्या आहेत. नऊ जून १८७० रोजी त्याचा केंटमध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link