Next
सूररंगी रंगले...
BOI
Tuesday, September 11 | 06:45 AM
15 0 0
Share this story


दैनंदिन जीवनातल्या ताणतणावातून, विरंगुळ्याचे क्षण उपभोगताना, थकलेल्या मनाला प्रसन्नता मिळवून देण्याची किमया सुरांमध्ये आहे. केवळ चित्तवृत्ती उत्तेजित न करता, मन:शांती देण्याची ताकद सुरांमध्ये आहे. दिवसेंदिवस आपल्या भारतीय संगीताची लोकप्रियता जगभर वाढतेय. ही लोकप्रियता, त्याचं वैशिष्ट्य, संगीतातले प्रचलित गीतप्रकार, या क्षेत्रातले कलाकार, त्यांच्याशी निगडित असलेल्या आठवणी अशा विविध विषयांबद्दल सांगणारे ‘सूररंगी रंगले’ हे नवे पाक्षिक सदर आजपासून सुरू करतो आहोत. गायिका, संगीतकार आणि संगीत नाटकाच्या लेखिका अशी वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकार मधुवंती पेठे हे सदर लिहिणार आहेत. या सदराचा हा पहिला लेख...
.............
नव्या सहस्रकाची सुरवात झाली. एकविसावं शतक सुरू होऊनही १८ वर्षं झाली. आपण रोज पाहतोय आधुनिक संगणकयुगाची प्रगती, मानवाची अवकाशात भरारी मारण्याची स्वप्नं... इंटरनेटच्या जमान्यातील संपूर्ण जग जवळ आणण्याची - ‘ग्लोबल व्हिलेज’ची - स्वप्नं... तोच सूर्य, तेच आकाश, तीच पृथ्वी.... अन् तरीही प्रत्येकाला खुणावणारी नवनवीन क्षितिजं... सप्तकातले सूर तेच; पण त्यांतून तयार होणारी नित्य नवी सुरावट... कधी उत्तेजक, तर कधी शांतवणारी... कधी आक्रोश मांडणारी, तर कधी भावुक... प्रेम व्यक्त करणारी... कधी निराशेच्या गर्तेत लोटणारी, तर कधी त्या आश्वासक सुरांनी मनाला उभारी देणारी...

जगाच्या पाठीवर, मनातल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी संगीताची अभिव्यक्ती निरनिराळ्या प्रकारे होत राहिली; पण सगळ्यात वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरलं ते आपलं भारतीय संगीत. कारण दैनंदिन जीवनातल्या ताणतणावातून, विरंगुळ्याचे क्षण उपभोगताना, थकलेल्या मनाला प्रसन्नता मिळवून देण्याची किमया या सुरांमध्ये आहे. केवळ चित्तवृत्ती उत्तेजित न करता, मन:शांती देण्याची ताकद या सुरांमध्ये आहे. या सुरावटींनी सर्वांना सारखंच मोहवलंय. दिवसेंदिवस भारतीय संगीताची लोकप्रियता जगभर वाढतेय. जगातले विविध देश, विविध भाषा यांची कुंपणं ओलांडून ते सर्वांपर्यंत पोहोचलंय. भारतीय संगीतातल्या या सुरांच्या ‘सूरनेट’नं सगळं जग कधीच जवळ आणलंय...

‘गीतं वाद्यं च नृत्यं च। त्रयं संगीतम् उच्यते’ या उक्तीप्रमाणे, गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही शाखांमध्ये समृद्ध असलेलं आपलं भारतीय संगीत, आपणा भारतीयांना तर मोहून टाकतंच; पण आपल्यापेक्षा अगदी भिन्न संस्कृतीच्या परदेशवासीयांनाही ते तितकंच मोहवतं. जगभर प्रभाव टाकून असलेलं आपलं भारतीय संगीत, हे जणू विश्वबंधुत्वाचा एक दुवा बनून राहिलं आहे.

भारतीय संगीत हे आपल्या भारतीय संस्कृतीचं एक अविभाज्य अंग आहे. मनोरंजन करण्यापासून ते अगदी आध्यात्मिक चिंतनाचा आनंद देणारं आहे. कष्टकऱ्याला आपले कष्ट विसरायला लावणारं आहे. हे संगीत सर्व प्रकारच्या रसिकांना आनंद देणारं असल्यानं, ते आपल्या जीवनाशी एकरूप होऊन गेलं आहे. 

भारतीय संस्कृतीमध्ये ॐकार-साधनेला फार महत्त्व आहे. आध्यात्मिक क्षेत्रातल्या साधकांना जशी या ॐकार साधनेची ओढ असते, तशीच संगीत क्षेत्रातल्या कलाकारालाही असते. कलाकाराच्या दृष्टीनं ही ॐकार साधना म्हणजे आयुष्यभर चालणारी एक तपश्चर्याच असते.

सुप्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया म्हणतात, ‘तुम्हाला संगीतात काही मिळवायचं असेल, तर संगीताच्या सुरांना शरण जा.’

सुप्रसिद्ध सरोदवादक पं. अमजद अली म्हणतात, ‘तुम्ही एकाग्रतेनं संगीत ऐकत असाल, तर साक्षात् परमेश्वराचं अस्तित्व तुम्हाला जाणवेल.’

सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ म्हणतात, ‘संगीताचे सूर हे थेट आत्म्याशी संवाद साधतात. म्हणूनच सच्चे सूर हे भाषेपलीकडे जाऊन सर्वांच्या हृदयाला जाऊन भिडतात.’

सुप्रसिद्ध गायिका गंगूबाई हनगल म्हणतात, ‘आपल्याला जसं जगण्यासाठी रोज अन्न लागतं, तसंच मला जगण्यासाठी संगीत लागतं.’

भारतीय संगीताला जगभर लोकप्रियता मिळवून देणाऱ्या या कलाकारांनी आपलं संपूर्ण आयुष्य संगीतासाठी वाहून घेतलं. भारतीय संगीताच्या लोकप्रियतेमागे या कलाकारांची फार मोठी तपश्चर्या आहे. आपल्या अद्वितीय अशा, उच्च कोटीला पोहोचलेल्या संगीत साधनेतून ते जगभरातल्या संगीत रसिकांना तृप्त करतात. स्वत:बरोबरच रसिकांनाही परमानंदाची अनुभूती देतात. प्राचीन काळापासूनच, चित्र, शिल्प, वास्तुकला, संगीत यांचं ज्ञान भारतीयांना होतं. या कलांप्रमाणेच संगीत कलेलाही अनेक वर्षांची समृद्ध परंपरा आहे. काळानुरूप होणारे बदल सामावून घेऊन, अनेक कलाकारांनी संगीत कलेला जिवंत ठेवलंय, समृद्ध केलंय आणि सर्वदूर पोहोचवलंय.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्या संगीताला देशाबाहेर सादर करण्याचे प्रयत्न सर्वप्रथम कोणी केले असतील, तर ते सुप्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर आणि त्यांचे मेहुणे सुप्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खाँ यांनी. त्याचबरोबर रविशंकरांचे बंधू उदयशंकर यांच्या ग्रुपने भारतीय नृत्यकला परदेशी सादर केली. या कलाकारांच्या उच्च कोटीच्या सादरीकरणानं पाश्चात्य देशांना भारतीय संगीताचा परिचय झाला आणि त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर हळूहळू आपलं संगीत त्यांना आवडू लागलं.

पं. रविशंकरभिन्न भाषांच्या युरोपीय आणि अमेरिकी देशांमध्ये, साहजिकच प्रथम नि:शब्द अशा वाद्यवादनानं परदेशवासीयांची मनं जिंकली. १०-१५ मिनिटांच्या ‘कंपोझिशन्स’ ऐकण्याची सवय असलेल्यांना, भारतीय संगीतातला एकेक तास एकच राग ऐकवण्याची कल्पनासुद्धा कुणी करू शकलं नसतं; पण पं. रविशंकरांच्या जादुई सतारवादनानं ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. एवढंच नाही, तर अमेरिकनांना वेड लावणारा पॉप सिंगर जॉर्ज हॅरिसन यालाही रविशंकरांच्या सतारीच्या जादूनं भारून टाकलं आणि तो चक्क पंडितजींचा शिष्य झाला. ‘भारतीय संगीतातले राग शिकून घेऊन, तोही या रागांवर आधारित गाणी त्याच्या ‘बीटल्स ग्रुप’च्या कार्यक्रमात सादर करू लागला. भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल जॉर्ज हॅरिसन म्हणतो, ‘Indian Classical Music helps us, as a balance towards peaceful daily life.’

लॉस एंजलिसच्या ग्रॅमी म्युझियममध्ये पं. रविशंकरांच्या पायाशी बसून शिकतानाचे हॅरिसनचे फोटो पाहायला मिळतात. तिथेच पं. रविशंकर आणि पं. अली अकबर खाँ यांच्या जुगलबंदीच्या कार्यक्रमाचे फोटो पाहायला मिळतात. ग्रॅमी ॲवॉर्ड मिळालेले पं. विश्वमोहन भट (मोहनवीणेचे निर्माते व वादक) यांचे फोटोही पाहायला मिळतात. खरोखर अभिमानानं आणि आनंदानं मन भरून येतं.

पं. शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकीर हुसेनया कलाकारांनी तयार केलेल्या या पायवाटेचा पुढे राजमार्ग झाला. त्यांच्या पाठोपाठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचंही योगदान आहेच. कंठसंगीताला (गायनाला) भारताबाहेर लोकप्रिय करण्याचं पुढचं काम केलं ते पं. भीमसेन जोशींनी. या प्रतिभावान गायकाच्या ओजस्वी स्वरांनी समस्त पाश्चात्यांना भारून टाकलं. आपल्या भारदस्त आवाजातल्या सादरीकरणानं पंडितजींनी भारतीय शास्त्रीय रागसंगीत परदेशी रुजवलं, लोकप्रिय केलं. त्यानंतर हा सिलसिला आजतागायत असाच चालू राहिलाय. 

भारतीय संगीताचा प्राण असलेलं राग संगीत. काय आहे त्यात असं खास, ज्यामुळे शास्त्र कळत नसतानाही रसिकांना आकृष्ट करण्याची जादू त्यात आहे? जाणून घेऊ या पुढच्या भागात... तोवर.... संगीतमय सुरेल शुभेच्छा....!!!

मधुवंती पेठे- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होईल. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध असतील.)

(मधुवंती पेठे यांची ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने घेतलेली विशेष मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Surendra S kelkar About 130 Days ago
Sunder Apritam
1
0

Select Language
Share Link