Next
काविळीवर मोफत औषध; प्रमिलाताईंचे ५० वर्षांचे व्रत
BOI
Tuesday, August 14, 2018 | 02:02 PM
15 0 0
Share this article:

संगमेश्वर : श्रावण महिना आला, की व्रतवैकल्यांची सुरुवात होते. ही धार्मिक व्रतवैकल्ये ठरावीक कालावधीपुरतीच केली जातात; पण रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील तेऱ्ये बुरंबी गावातील ८० प्रमिलाताई म्हैसकर यांनी स्वीकारलेले रुग्णसेवेचे व्रत मात्र गेली ५० वर्षे निरलसपणे सुरू आहे. काविळीवर रामबाण उपाय ठरेल अशा वनौषधींचे ज्ञान त्यांना असून, त्यांच्या औषधांनी काविळीच्या रुग्णांना हमखास बरे वाटते. एकही पैसा न घेता त्यांनी दिलेल्या औषधांनी अक्षरशः हजारो रुग्णांना बरे वाटले आहे. 

कोकणात ग्रामीण भागात अनेक वनौषधी सापडतात. आयुर्वेदातील ग्रंथोक्त ज्ञानानुसार व्यावसायिक औषधे बनविण्यासाठी कोकणातून वनौषधी नेण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे; मात्र घरगुती पातळीवर वनौषधींचा उपयोग माहिती असलेल्या मंडळींची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळेच ‘आजीबाईचा बटवा’ या संकल्पनेचा वापरही काही वर्षांच्या तुलनेत अलीकडे कमी झाला आहे; मात्र हे ज्ञान असलेली जी काही मोजकी मंडळी आहेत, त्यामध्ये प्रमिलाताई म्हैसकर याही एक आहेत. या आजीबाईंच्या बटव्यातील औषधांनी अनेक जण काविळीतून बरे झाले आहेत. गेली ५० वर्षे करत असलेले हे व्रत या आजीबाई आज त्यांच्या वयाच्या ८०व्या वर्षीही करत आहेत. 

प्रमिलाताई म्हैसकरतेऱ्ये बुरंबी गावातील हायस्कूलमध्ये प्रमिलाताईंचे पती मुख्याध्यापक होते. आपल्या हाताशी असलेल्या वेळेमध्ये विधायक कार्य करावे, या हेतूने त्यांनी स्वतःला माहिती असलेल्या वनौषधींपासून काविळीवर खात्रीशीर औषध द्यायला सुरुवात केली. ते औषध घेऊन रुग्णांना बरे वाटू लागल्याने प्रमिलाताईंचे औषध केवळ तालुका किंवा जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता मुंबई, पुण्यासारख्या शहरांतही त्याची कीर्ती पोहोचली. रुग्णाची आर्थिक स्थिती कशीही असली, तरी कोणाकडूनच औषधाचे पैसे घ्यायचे नाहीत, असे प्रमिलाताईंनी सुरुवातीलाच ठामपणे ठरवले होते. स्वतःचा कोणताच लाभ न पाहता त्यांनी केलेल्या या रुग्णसेवेला म्हणूनच अधिक मोल आहे. बऱ्या झालेल्या असंख्य रुग्णांना त्यांच्याकडे पैसे घेण्याचा आग्रह केला; मात्र त्यांनी आजपर्यंत कोणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत. 

औषधी वनस्पतींची लागवड आणि प्रक्रिया 
औषध देण्यासाठी वनस्पती किंवा मुळे खात्रीशीरपणे उपलब्ध व्हावी लागतात. अलीकडे जंगलतोड किंवा विकासकामांसाठी झाडे तोडली जाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन प्रमिलाताईंनी काही औषधी वनस्पतींची लागवड स्वतःच्या आवारात केली आहे. आजही त्या स्वतः या झाडांची काळजी घेतात. तसेच त्या वनस्पतींपासून पाट्यावर वाटून औषध तयार करण्याचे कामही त्या स्वतःच करतात. एवढेच कशाला, देवपुजेसाठी लागणारी चाफ्याची फुलेही त्या स्वतः झाडावर चढून काढतात. त्यांच्या उत्साहाचा आणि फिटनेसचा अंदाज यावरून येतो. अन्य सामाजिक सेवा
प्रमिलाताईंचे व्रत रुग्णसेवेपुरतेच मर्यादित नाही. अत्यंत गरीब मुला-मुलींना स्वतःच्या घरी ठेवून त्यांच्या शिक्षणासाठीचा खर्च त्या करतात. या मुलांना दहावी-बारावीपर्यंत शिकवून त्यांना दिशा देण्याचे काम प्रमिलाताई आणि त्यांचे पुत्र दिलीप, दीपक, प्रसाद, तसेच त्यांच्या सुनादेखील प्रेमाने करत आहेत.

संपर्क : दिलीप म्हैसकर : ९४०३८ ००६७६
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shekhar Joshi About 121 Days ago
I have taken this medicine from Pramilatai in my childhood.
0
0
Arun D. Padhye About
Excellent work with dedicated social cause! Keep it up.
0
0
मोहन, सोलापूर About
प्रमिलाताईंच्या कामाला सलाम !
0
0

Select Language
Share Link
 
Search