Next
अपनी कहानी छोड जा...
BOI
Sunday, January 13, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

बिमल रॉय (Image Courtesy : Cinestaan)चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन या क्षेत्रांत आपले वेगळेपण सिद्ध करणारे प्रतिभावान कलावंत बिमल रॉय यांचा स्मृतिदिन आठ जानेवारी रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ या सदरात आज आस्वाद घेऊ या, रॉय यांच्या ‘दो बीघा जमीन’ या गाजलेल्या चित्रपटातील गाण्याचा...
.........
१९३० साली जेव्हा मूकपट बनत असत, त्या जमान्यात कोलकत्याच्या चित्रपट उद्योगात छायाचित्रण शिकणारा एक तरुण चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसावे म्हणून धडपडत होता. त्याला चित्रपटांचे छायाचित्रकार व्हायचे होते; पण माणसाला बनायचे असते एक आणि नियती दुसरेच बनवते. चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट छायाचित्रकार बनू इच्छिणारा हा तरुण म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय!

त्या वेळी अशी काही परिस्थिती निर्माण झाली, की बिमल रॉय यांना सुप्रसिद्ध दिग्दर्शक नितीन बोस यांच्या हाताखाली सहायक म्हणून काम करावे लागले. खरे तर त्यांना लहानपणापासून निसर्गाची ओढ होती व निसर्गसौंदर्य कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा नाद होता. कॅमेऱ्याच्या प्रत्येक अंगाचा त्यांनी अभ्यास केला; पण नितीन बोस यांच्याकडे काम करताना त्यांनी दिग्दर्शनकलेचे शिक्षण घेतले. बंगालमधील सत्येन बोस, देवकी बोस यांचेही सहायक म्हणून काम केले. अर्थात त्यांना काही काळाने हे लक्षात आले, की इतरांकडे काम करत असताना आपल्या कल्पनांना स्वातंत्र्य मिळत नाही. किंबहुना दबावाखाली काम करावे लागते. म्हणूनच मग त्यांनी स्वतःचीच निर्मिती संस्था स्थापन केली. 

तत्पूर्वी त्यांनी १९४५मध्ये ‘हमराही’, १९५०मध्ये ‘पहला आदमी’, १९५२मध्ये ‘माँ’ असे चित्रपट दिग्दर्शित केले होते. आणि स्वतःची चित्रसंस्था स्थापन केल्यानंतर त्यांनी वास्तवादी कथा निवडून भारतीय शेतकरी जमीनदारांच्या अन्यायाखाली दबला जातो याचे वास्तववादी चित्रीकरण करण्याचे ठरवले. त्यामधून होणाऱ्या चित्रपटासाठी भारतीय खेडुतांच्या यथार्थ जीवनाचे समग्र दर्शन या चित्रपटातून घडवण्याचे ठरवले आणि त्यासाठी बलराज सहानी आणि निरुपा रॉय हे कलावंत निवडले. कथानकाशी निगडित असे चित्रपटाचे नाव निश्चित केले, ते म्हणजे ‘दो बीघा जमीन!’ १९५३मध्ये तो चित्रपट प्रदर्शित झाला. 

या चित्रपटाला राष्ट्रीय सन्मान मिळालाच आणि त्याबरोबर विविध प्रांतांत बिमल रॉय यांच्या कामाची वाहवा झाली. त्यानंतर त्यांनी नायिकाप्रधान असा ‘परिणिता’ हा चित्रपट निर्माण केला. त्यानंतरचा ‘बिराजबहू’ हा चित्रपटही नायिकाप्रधानच होता. नंतर त्यांनी बाप-बेटी, देवदास, मधुमती, नंदिनी, यहुदी, परख, सुजाता असे एकापेक्षा एक सरस चित्रपट निर्माण केले. ‘फिल्मफेअर’चा पुरस्कार चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जातो. १९५४पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. २१ मार्च १९५४ रोजी दिल्या गेलेल्या पुरस्कारांत बिमल रॉय यांच्या ‘दो बीघा जमीन’ या चित्रपटास उत्कृष्ट चित्रपट आणि उत्कृष्ट दिग्दर्शक यासाठीचे दोन पुरस्कार देण्यात आले होते. 

म्हणजे बिमल रॉय यांचे कर्तृत्व फक्त दिग्दर्शनापुरतेच मर्यादित न राहता चित्रपट निर्मिती या क्षेत्रातही ते फुलू लागले होते. निर्माता, दिग्दर्शक या नात्याने त्यांनी निर्माण केलेला हा पहिला चित्रपट होता; पण त्या काळात टाइम्स ऑफ इंडिया आणि अन्य वृत्तपत्रांत या चित्रपटाबद्दल फारसे काही चांगले लिहून आले नव्हते. तथापि या चित्रपटाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे पुरस्कार मिळवले होते. तसेच या ‘दो बीघा जमीन’ चित्रपटाला हिंदी विभागासाठी राष्ट्रपतींचे प्रशस्तिपत्र मिळाले होते. तसेच सातव्या आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाला पारितोषिक मिळाले होते. रशियात आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवला गेला होता. 

अशा तऱ्हेने आपल्या पहिल्याच चित्रपटाने बिमल रॉय यांनी निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रातील आपले वेगळेपण सिद्ध केले होते. १९५५च्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बिमल रॉय यांना त्यांनी निर्माण केलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ‘परिणिता’ चित्रपटाकरिता उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला होता. आणि १९५६चा उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘बिराजबहू’ चित्रपटासाठी मिळवून फिल्मफेअरच्या पुरस्काराची हॅटट्रिक बिमल रॉय यांनी साधली होती. बंगालच्या मातीतील हा कलावंत दिग्दर्शन म्हणजे काय असते यासाठीचा मार्गदर्शक बनून राहिला होता. त्यांचे चित्रपट म्हणजे दिग्दर्शनाचे वस्तुपाठ आहेत. 

बिमल रॉय यांच्या ‘मधुमती’ या चित्रपटाने बिमल रॉय हे नाव केवळ विशिष्ट प्रेक्षकवर्गापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत येऊन पोहोचले. द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्तम चित्रपट म्हणून ‘मधुमती’ला राष्ट्रपतींचे रौप्यपदक मिळाले होते. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’तर्फे ‘मधुमती’ची ऑस्करसाठी शिफारस करण्यात आली होती. फिल्मफेअरचे नऊ पुरस्कार (छायांकन, संकलन, संवाद इत्यादी) मधुमती चित्रपटाने मिळवले होते. 

सलील चौधरी आणि एस. डी. बर्मन या संगीतकारांचा बिमल रॉय यांनी आपल्या चित्रपटांकरिता जास्तीत जास्त उपयोग करून घेतला. सर्वसामान्य रसिकांना आवडतील अशीच सोपी गाणी देण्याकडे बिमल रॉय यांचा आग्रह असायचा! दो बीघा जमीन, परिणिता, देवदास, मधुमती, सुजाता, बंदिनी या त्यांच्या चित्रपटातील गीते आजही श्रवणीय आहेत. ‘यहुदी’ चित्रपटाचे फक्त दिग्दर्शन बिमल रॉय यांनी केले होते; पण त्याला फारसे यश मिळाले नव्हते, तरी त्यातील गीते मधुर होती. 
बिमल रॉय यांच्या चित्रपटांतून कलावंतांच्या जिवंत अभिनयाचे दर्शन होत असे! दिलीपकुमार, मोतीलाल, बलराज सहानी, मीनाकुमारी, सुचित्रा सेन, वैजयंतीमाला यांचे उत्कृष्ट अभिनय आपल्याला बिमल रॉय यांच्या चित्रपटांतून बघायला मिळतात. ‘नूतन’ या अभिनेत्रीच्या समर्थ अभिनयासाठी ओळखले जाणारे ‘सुजाता’, ‘बंदिनी’ हे चित्रपट बिमल रॉय यांचेच होते. तसेच निरुपा रॉयसारख्या अभिनेत्रीला पौराणिक साच्याच्या चित्रपटांतून बाहेर काढून तिची अभिनयक्षमता दर्शविण्याचे काम बिमल रॉय यांनी ‘दो बीघा जमीन’ चित्रपटाद्वारे केले होते. 

सामाजिक समस्यांना जिवंतपणा आणून ते विषय पडद्यावर धिटाईने मांडण्याचे काम बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन, सुजाता, बंदिनी, परख यांसारख्या चित्रपटांनी केले. पुढेही त्यांनी ते केले असते. परंतु वयाच्या ५६व्या वर्षी आठ जानेवारी १९६५ रोजी त्यांचे निधन झाले. 

नुकत्याच होऊन गेलेल्या त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने १९५३च्या ‘दो बीघा जमीन’ या चित्रपटातील एक ‘सुनहरे गीत’ आपण येथे बघू या! बलराज सहानी आणि निरुपा रॉय यांच्या वास्तववादी अभिनयाने नटलेला हा चित्रपट संगीतकार सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केला होता. त्यामध्ये चारच गीते होती; पण ती कथेच्या अनुषंगाने होती आणि ती गीतकार शैलेंद्र यांनी लिहिली होती. 

त्यापैकी लता मंगेशकर व मन्ना डे यांनी गायलेले सुप्रसिद्ध गीत आज आपण येथे बघणार आहोत. हे गीत तुम्ही अनेक वेळा ऐकले असेल! सलील चौधरींनी रवींद्र संगीताच्या आधारे तयार केलेली चाल, दिलेले संगीत, कोरसचा वापर, एकच ओळ तीन-चार वेळा घेऊनही हे गीत किती श्रवणीय व मधुर बनवले आहे, हे जाणून घेण्यासाठी हे गीत काळजीपूर्वक ऐकायला हवे! यामध्ये केवळ संगीतकाराचेच वैशिष्ट्य दिसत नाही, तर मन्ना डे यांच्या पहाडी स्वराचा विलोभनीय आविष्कार येथे श्रवणाचा आनंद देऊन जातो. जोडीला मधुर आवाजासह स्वरसम्राज्ञी आहेतच. 

महत्त्वाचा भाग हाही आहे, की संगीत व गायन या अंगांनी उत्कृष्ट असलेल्या या गीतातील शब्द मानवतेचा उदात्त विचार आपल्याला देऊन जातात. आपण सारे जन्माला येतो आणि पुढे काही काळाने एक दिवस आपल्याला मरून जावेच लागते. या जन्म व मृत्यूचे वास्तव आहेच; पण त्यामधील आपले जीवन आपण कसे जगायला हवे, याचे सुंदर तत्त्व सांगून जीवनासाठी मार्गदर्शन शैलेंद्र यांनी या गीतात केले आहे. ते आपणा सर्वांना लागू पडणारे आहे.

सलीलदा या गीताची सुरुवात करताना मन्ना डे यांच्या स्वरातून एक साद घालतात. मन्ना डे गातात -

गंगा और जमुना की गहरी धा ऽऽऽ र 
आगे या पीछे सबको जाना है पार

बंधूंनो, हा काळाचा ओघ म्हणजे एक प्रकारे गंगा, यमुना नदींची वाहती धार आहे आणि त्या पलीकडे आपणा सर्वांना आज ना उद्या जायचे आहे. (हे विसरू नका आणि म्हणूनच जन्माला आल्यानंतर काही काळाने मरून जाणार असू, तर)

धरती कहे पुकार के, बीज बिछाले प्यार के 
मौसम बीता जाय, मौसम बीता जाय

ही धरतीमाता आपणाला संबोधून सांगत आहे, की, प्रेम, स्नेह, माया यांचे बी पेरत जा, हा मोसम, हा काळ क्षणाक्षणाने पुढे चालला आहे बघा!

ही धरतीमाता आणखी हेही सांगते, की -

अपनी कहानी छोड जा, कुछ तो निशानी छोड जा 
कौन कहे इस ओर, तू फिर आए न आए

आपली गोष्ट, आपली कथा (जी स्नेह, माया, प्रेम यांनी व सत्कृत्यांनी परिपूर्ण असेल, अशी कथा) मागे ठेवून जा! काही तरी खुणा ठेवून जा! (त्या सत्कृत्याच्या असाव्यात) अरे कोणी सांगावे, तुझे येथे परत येणे होईल ना होईल! (म्हणूनच एकदा मिळालेले हे मानवी जीवन चांगल्या कामासाठी व्यतीत कर) बघ हा मोसम, हा काळ पुढे चालला आहे. 

जीवन कसे जगावे, हे सांगताना शैलेंद्र पुढे लिहितात - आता लता मंगेशकर गातात -

तेरी राह में कलियोंने नैन बिछाए 
डाली डाली कोयल काली तेरे गीत गाए

तुझ्या जीवनाच्या वाटचालीत कळ्या पसरलेल्या आहेत. झाडांच्या फांद्यांवर कोकिळा मधुर स्वरात गात आहेत. (थोडक्यात काय, तर या जीवनात सुखद गोष्टीही आहेत, आनंदही आहे. तू तो शोधून जीवनाची वाटचाल आनंदमय करावीस. सतत शोक, चिंता, दु:ख मानून जगू नये! या उपदेशाकरिता शैलेंद्र यांनी कळ्या, कोकिळा या उपमा वापरून हे काव्य सजवले आहे.) 

‘मौसम बीता जाए’चा इशारा गीत प्रभावी होण्यासाठी या दोन ओळींच्या छोट्या कडव्यानंतर संगीतकार वापरतोच आणि ‘ओ ऽऽ ओ ऽऽ’चा आलापही प्रकट होतो. 

‘भाई रे’ची साद देत पुन्हा मन्ना डे पुकारतात व सांगतात - 

नीला अंबर मुस्काए, हर सास तराने गाए
हाय तेरा दिल क्यूँ मुरझाए 
हो - मन की बन्सी पे तू भी कोई धून बजा ले भाई 
तू भी मुस्कुराले...

हे निळे आकाश हास्यवदनाने तुझ्याकडे बघत आहे, या चराचरातील श्वास सुखद गीते गात आहेत आणि अशा वातावरणात तू उदास का? आपल्या मनाच्या बासरीवर तूही एखाद्या स्वराची निर्मिती करून गीत वाजव! थोडे हास्य तुझ्याही चेहऱ्यावर येऊ दे! 

या कडव्याची ही अशी रचना शैलेंद्र यांनी चित्रपटाच्या कथानकानुसार येणाऱ्या प्रसंगाच्या अनुषंगाने केलेली असावी. कथेत ‘तो’ गरीब शेतकरी जमीन कर्जमुक्त करण्यासाठी शहरात काही कामधंदा मिळेल म्हणून गाव सोडून निघाला आहे. तो काळजीत आहे. गाव सोडायला लागते म्हणून तो दु:खातही आहे आणि म्हणूनच त्याने निराशेत राहू नये, या दृष्टिकोनातून या कडव्याची रचना केली आहे. 

पुन्हा ‘मौसम बीता जाए’चा इशारा व ‘अपनी कहानी छोड जा’चा संदेश आळवून सलीलदा गीत पूर्ण करतात. तो निराश शेतकरी दु:खी माणसाचे प्रतिनिधित्व करणारा आहे; पण शैलेंद्र या गीतातून केवळ त्या शेतकऱ्यालाच नाही, तर जीवनात कसे जगा हे या गीतातून सर्वांनाच सांगतो. पडद्यावर हे गीत प्रत्यक्ष कोण गाते, तर ती नियतीच गाते. ती या गीतातून मार्गदर्शक बनते. 

बिमल रॉय अशीच आपली कहाणी मागे ठेवून गेले. सलीलदा, शैलेंद्र, मन्ना डे अशीच ‘सुनहरी गीते’ मागे ठेवून गेले. त्यांना विनम्र अभिवादन! 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Rajiv Lawanghare About 251 Days ago
Thank you pathakji sir. Sweet song🎶. Realistic picturisation. All time favorite song.
0
0
उद्धवकुलकर्णी About 251 Days ago
अप्रतिमपाठवल्याबद्दलधन्यवाद
0
0

Select Language
Share Link
 
Search