Next
उडत्या तबकड्या (पूर्वार्ध)
BOI
Sunday, January 06, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

विज्ञानाने अनेक विषयांत आश्चर्यकारक प्रगती केली असली, तरी विश्वाची अनेक रहस्ये अद्याप उलगडलेली नाहीत. ‘बिग बँग थिअरी’ (शून्यातून सृष्टीची निर्मिती), कृष्णमेघ, आइन्स्टाइनचा सापेक्षता सिद्धांत, यांचा अभ्यास शास्त्रज्ञ अद्यापही करत आहेत. त्याचप्रमाणे, अद्याप न उलगडलेले एक गूढ म्हणजे ‘उडत्या तबकड्या!’ ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर या तबकड्यांबद्दल विस्ताराने लिहीत आहेत. त्यांच्या लेखाचा हा पूर्वार्ध...
 .............
संपूर्ण विश्वाचा पसारा कल्पनातीत असून, एका छोट्या सूर्यमालिकेच्या पृथ्वी नामक ग्रहावर आपण राहतो. विज्ञानाने अनेक विषयांत आश्चर्यकारक प्रगती केली असली, तरी विश्वाची अनेक रहस्ये अद्याप उलगडलेली नाहीत. ‘बिग बँग थिअरी’ (शून्यातून सृष्टीची निर्मिती), कृष्णमेघ, आइन्स्टाइनचा सापेक्षता सिद्धांत, यांचा अभ्यास शास्त्रज्ञ अद्यापही करत आहेत. नव्या संशोधनाबरोबर जुन्या उपपत्ती मागे पडतात. ही प्रक्रिया अखंड चालू राहते. ‘हेच अंतिम सत्य’ असे ठामपणे कधीच सांगता येत नाही. धूमकेतूंवरही बरेच काम चालू आहे. त्याचप्रमाणे, अद्याप न उलगडलेले एक गूढ म्हणजे ‘उडत्या तबकड्या!’ साऱ्या जगाला त्यांच्याबद्दल प्रचंड कुतूहल आहे. गेली तीन-साडेतीन हजार वर्षे वेळोवेळी लोकांना त्यांचे ‘दर्शन’ झालेले आहे. त्यांचे उल्लेख वाङ्मयात आढळतात. इजिप्तपासून अनेक देशांत त्यांची चित्रे दिसून येतात. परग्रहावरील ‘मानवां’चे रेखाटनही त्यात आहे. छायाचित्रणाची सोय झाल्यापासून उडत्या तबकड्यांचे हजारो फोटो आज उपलब्ध आहेत. त्यांच्यावर संशोधन करणाऱ्या अनेक संस्था ठिकठिकाणी कार्यरत आहेत. हे ‘प्रकरण’ आहे तरी काय?

‘यूएफओ’ अर्थात ‘अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट’ म्हणजेच ‘उडती तबकडी.’ अमेरिकेच्या हवाई दलाने १९५३ साली हे नाव दिले. त्याची व्याख्या (वर्णन) अशी केली होती - ‘माहितीतल्या कुठल्याही वाहनापेक्षा (विमान, क्षेपणास्त्र इत्यादी) वेगळे असे हवेत उडणारे यान - जे आकार, कार्य आणि अन्य ज्ञात वैशिष्ट्यांपेक्षा अगदी भिन्न असते.’ राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली, काही तबकड्यांवर मर्यादित संशोधन केल्यानंतर त्याबाबतची सर्व माहिती गुप्त ठेवण्यात आली. जुन्या काळापासून अगदी चालू २०१८पर्यंत, चित्रविचित्र आकाराची असंख्य याने जगभर दिसत आली आहेत आणि वृत्तपत्रांतून छायाचित्रांसह त्या त्या वेळी बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत. परग्रहावरील प्रगत सृष्टीकडून (मनुष्य) प्राणीरहित आणि ‘सहित’ त्यांची अज्ञात वाहने पृथ्वीला भेट देत असतील, ही शक्यता आपण नाकारू शकत नाही. तसे करणे अवैज्ञानिक ठरेल. त्यावर संशोधन चालू ठेवणे आणि ठोस पुरावे मिळवणे, हाच योग्य मार्ग आहे. या विषयावर अनेक भाषांमध्ये चित्रपटही निर्माण झाले आहेत. त्यातून विचित्र अवयव असलेले प्राणीही दिसले आहेत. (त्यातला एक आमीर खानसारखा दिसतो!) परग्रहावरून आलेल्या लोकांनी पृथ्वीवर येऊन वास्तव्य केले, तेच आपण सर्व मानव असाही एक लोकप्रिय सिद्धांत आहे. पृथ्वीवर राहणे काही कारणाने अशक्य झाले, तर मंगळावर स्थलांतर (ग्रहांतर) करता येईल का, याचा शास्त्रज्ञ विचार करत आहेत. तशाच काही कारणांमुळे पृथ्वीवर लोक येऊन राहिले असतील! आता, अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला आहे, की ‘त्या अज्ञात गोष्टींमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका नाही, आणि त्यावर अधिक संशोधनाचीही गरज नाही.’ यातील उत्तरार्ध विवादास्पद आहे.सन १९४७च्या उन्हाळ्यानंतर ‘उडती तबकडी’ (बशी)’ हा वाक्प्रचार लोकप्रिय झाला. केनेथ अरनॉल्ड नावाचा एक वैमानिक विमान चालवत असताना त्याला ‘रेनियर’ पर्वतावरून नऊ याने वक्राकार ओळीत जाताना दिसली. त्यांचा वेग ताशी सुमारे दोन हजार किलोमीटर असावा, असा त्याने अंदाज काढला. बशी हवेत भिरकावल्यावर जशी जाईल, तशी ती याने उडत होती; म्हणून ‘उडत्या तबकड्या’ असे वर्णन त्याने केले आणि ती बातमी छापून आली. पुढे तेच नाव रूढ झाले. नंतर, अधिक काटेकोर व शास्त्रीय परिभाषेत त्यांना ‘यूएफओ’ हे नाव देण्यात आले. ‘परग्रहावरील मानवाचे हवाई जहाज’ असेही वर्णन त्यानंतर सुरू झाले.

त्यानंतरच्या अभ्यासानंतर असा निष्कर्ष पुढे आला, की आपल्या माहितीतल्या गोष्टींनाच चुकीने ‘तबकड्या’ समजले जात होते. उदा. छोटी विमाने, बलून, ढगांच्या आकृत्या किंवा अभ्यासकरिता सोडलेली हवाई उपकरणे. उल्का किंवा चमकणाऱ्या ग्रहांमुळेसुद्धा तसे भास होत असतील, असे संशोधकांचे म्हणणे होते. दिसणाऱ्या आकृत्यांचे अपुरे वर्णन, हेसुद्धा त्याचे कारण होते. ती सगळी ‘परग्रहांवरील यानेच होत’ अशीसुद्धा अनेकांना खात्री वाटत होती. कोणत्याही विज्ञानविषयक नियतकालिकांत मात्र ‘तबकड्यां’वर एकही गंभीर निबंध प्रसिद्ध झाला नाही. अमेरिका सोडून अन्य काही देशांनी त्यावर संशोधन चालू ठेवले. परंतु त्यात फारसे तथ्य नाही, असे त्यांनी काही काळाने ठरवून टाकले. सरकारी किंवा संस्थात्मक संशोधन थांबल्यावर काही हौशी खासगी समित्या/संस्था स्थापन झाल्या. ‘म्युच्युअल यूएफओ नेटवर्क (MUFON)’, ‘सेंटर फॉर यूएफओ स्टडीज (CUFOS)’ या त्यात आघाडीवर होत्या. लोकांना झालेली ‘दर्शने’, त्यांचा केलेला अभ्यास आणि अन्य काही पुरावे या गोष्टी गंभीरपणे विचारात घेणे सुरू झाले. ‘युफॉलॉजी’ असे नाव त्या शाखेला पडले. आधुनिक समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्यामधेही ‘एक सांस्कृतिक संदर्भ’ म्हणून उडत्या तबकड्यांचा समावेश झाला आहे.

ठराविक काळाने उगवणारे धूमकेतू आणि मानवनिर्मित विविध यानांखेरीज, शेकडो वर्षांच्या इतिहासात अज्ञात ‘हवाई वाहनां’ची नोंद झालेली आहे. त्यातील काही निवडक ‘तबकड्यां’ची माहिती पुढे येईलच. त्यांच्यामुळे अनेक देशांमध्ये काही काळ घबराटही निर्माण झाली. ‘त्या’ वाहनांनी माणसे व प्राणी उचलून नेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. अलीकडे काही वाहिन्यांवर तसे व्हिडिओही बघायला मिळाले. मध्ययुगातील काही चित्रे आणि लोकांना दिसलेल्या काही उडत्या तबकड्यांमध्ये साम्य असल्याचे संशोधकांना आढळून आले. वेळोवेळी प्रकट होणाऱ्या, निरनिराळ्या प्रकारच्या आणि आकारांच्या तबकड्यांची हजारो लोकांनी केलेली निरीक्षणे नियतकालिकांमधून नोंदली जात. अनेक देशांमध्ये त्यावर अभ्यास सुरू झाला. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जपान, फ्रान्स, स्वीडन, ब्राझील, मेक्सिको, स्पेन आणि रशिया हे त्यात आघाडीवर होते. ‘परग्रहांवरून ही वाहने येत असण्याची दाट शक्यता आहे,’ यावर अनेक संशोधकांचे एकमत झाले; परंतु एकाही देशाने अधिकृतपणे त्याला प्रसिद्धी दिली नाही. १९४७पासून अनेक वर्षे गंभीरपणे हे काम होत राहिले. अनेक संस्था त्या विषयाचा पाठपुरावा करत आहेत. त्याच्या तपशीलवार नोंदी आहेत.

शास्त्रीय नियतकालिकांमध्ये ‘तबकड्यां’वरील संशोधनाला कधीच स्थान मिळाले नाही. डिसेंबर १९६९मधे अमेरिकेतील अधिकृत संशोधन बंद करण्यात आले. ठरावीक निष्कर्षांच्या पलीकडे त्यात शास्त्रीयदृष्ट्या काही प्रगती होत नाही, हे त्याचे कारण होते. ‘यूएफओ’ ही खरोखर अस्तित्वात असलेली याने आहेत; ती परग्रहांवरून येत असणार हे त्या सरकारने कधीच मान्य आणि जाहीर केले नाही. त्यांनी केलेले हजारो पानांचे सर्व संशोधन ‘अत्यंत गोपनीय’ ठेवण्यात आले आहे.

‘अमेरिकन सरकारने परग्रहावरील ‘विमाने’ आणि तिथल्या ‘प्राण्यांनी’ पृथ्वीला भेट दिल्याची दडवून ठेवलेली माहिती जाहीर करावी,’ अशा दोन याचिका सादर झाल्यानंतर जानेवारी २०११मध्ये ‘व्हाइट हाउस’ने त्यावर खुलासा केला, की - ‘आपला ग्रह सोडून अन्यत्र कुठे ‘जीवन’ अस्तित्वात आहे, असा कुठलाही पुरावा सरकारकडे उपलब्ध नाही. ‘बाहेरून’ आजवर कोणीही पृथ्वीवरच्या माणसांशी संपर्क साधलेला नाही. जनतेपासून कोणताही महत्त्वाचा पुरावा दडवून ठेवल्याची माहिती आमच्याकडे नाही.’ त्यात पुढे असे म्हटले आहे, की – ‘नासा आणि अन्य संस्थांमार्फत दुर्बिणींद्वारे, बाहेर कुठे ‘प्राणिजीवन’ आढळून येते का, याचा शोध सुरू आहे. तथापि, तशी शक्यता जवळजवळ नाहीच. आपल्यापेक्षा बुद्धिमान ‘मानव’ अन्य ग्रहांवर असल्याचे चिन्ह नाही. संबंधित अंतरेही अतिप्रचंड आहेत.’

ते काहीही असो, सन १९४७मध्ये असंख्य लोकांना उडत्या तबकड्या दिसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर, अमेरिकन हवाई दलाच्या गुप्तचर यंत्रणेने ‘एफबीआय’च्या सहयोगाने त्यातल्या काही निवडक ‘दर्शनां’चा तपास सुरू केला. ज्येष्ठ शास्त्रज्ञांची मदत त्या वेळी घेण्यात आली. ज्ञात हवाई विमाने आणि अन्य उपकरणे किंवा बाहेरून येणाऱ्या उल्का, लघुग्रहाचे अंश आणि प्रत्यक्ष दिसलेल्या ‘तबकड्या’ यांचा तौलनिक अभ्यास/विचार झाला. त्यातून असा निष्कर्ष निघाला, की ‘उडत्या तबकड्यांची उपस्थिती काल्पनिक म्हणता येणार नाही. अवकाशात प्रत्यक्ष काहीतरी ‘उडत’ होते आणि त्याचा आपल्या ज्ञात वस्तूंशी संबंध जोडणे अयोग्य ठरेल. धातूसारखी दिसणारी बशीच्या आकाराची, मानवाने बनवलेल्या विमानांएवढी मोठी अज्ञात याने दिसलेली होती. त्यांचा आवाज होत नव्हता, धुरासारखा मागमूस त्यांनी ठेवला नव्हता. काही ठिकाणी अनेक तबकड्यांनी वक्राकार किंवा अन्य आकृत्या हवेत निर्माण केल्या. याचा अर्थ त्यांचे नियंत्रण कोणीतरी करत होते. या अभूतपूर्व गोष्टींवर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.’

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search