Next
एका ‘इको-फ्रेंडली’ लग्नाची गोष्ट...
मांडेकर-साखरे यांनी लग्नात वाटली चंदनाची दोन हजार झाडे
BOI
Tuesday, April 09, 2019 | 11:09 AM
15 0 0
Share this article:

(सायली मांडेकर आणि प्रतीक साखरे यांनी आपल्या विवाह समारंभात पाहुण्यांना चंदनाची  रोपे वाटली)पुणे : आजकाल लग्नसोहळ्यासाठी ‘होऊ दे खर्च’ म्हणत अमाप पैसा खर्च केला जातो. यात आहेर, मानपानाचा खर्च हा मोठा असतो. ग्रामीण भागात लग्नात येणाऱ्या पुरुष पाहुण्यांना टॉवेल-टोपी देण्याची प्रथा आहे; पण या प्रथेला फाटा देऊन, पुण्याच्या मुळशी तालुक्यातील माण गावातील मांडेकर आणि साखरे परिवारांनी आलेल्या पाहुण्यांना चंदनाची रोपे भेट दिली. या शेतकरी कुटुंबांनी मातीशी, निसर्गाशी जुळलेली आपली नाळ किती घट्ट आहे, हे याद्वारे अधोरेखित केले आहे. या ‘इको-फ्रेंडली’ लग्नाची गोष्ट सध्या सगळीकडे चर्चिली जात आहे. 

माण गावातील सायली मांडेकर आणि प्रतीक साखरे यांचा विवाह नुकताच झाला. लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींचे मानपान, स्वागत हार-तुरे, श्रीफळ, टॉवेल-टोपी, फेटे देऊन करण्याऐवजी मांडेकर-साखरे कुटुंबीयांनी चंदनाची रोपे देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. चंदनाची तब्बल दोन हजार रोपे या वेळी वाटण्यात आली. इतकेच नव्हे तर,  मुलीला सासरी जाताना भेट म्हणूनही आंबा, चिकू, सीताफळ, डाळिंब आणि पेरू अशी विविध प्रकारच्या फळझाडांची पाचशेहून अधिक रोपे भेट देण्यात आली आहेत. विवाहानंतर नवदाम्पत्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, तसेच लग्नातील अनावश्यक खर्च कमी करून पर्यावरणरक्षणासाठी कार्य करण्याची शपथही या वेळी घेण्यात आली. 


‘झाडांची बेसुमार कत्तल करून माणसानेच निसर्गाचे संतुलन बिघडवले आहे. तापमानवाढ, बदललेले ऋतुचक्र, प्रदूषण यामुळे अस्वच्छ हवा, पाणीटंचाई यांचे संकट भीषण होत आहे. आपण सगळे आणू शकतो; पण पाणी कसे आणणार, हा विचार केला पाहिजे. या जाणिवेतून दोन्ही कुटुबांनी लोकांना संदेश देण्यासाठी झाडे वाटण्याचा निर्णय घेतला,’ असे मुलीचे वडील दादाराम मनोहर मांडेकर यांनी सांगितले.

नववधू सायली मांडेकर म्हणाली, ‘‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही संत तुकाराम महाराजांची शिकवण आता फक्त पुस्तकात राहिली आहे, असे सध्याचे चित्र आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे दुष्काळ, पाणीटंचाई याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे झाडे लावणे, वाचवणे अत्यंत आवश्यक आहे, हा संदेश देण्यासाठी आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला. चंदनाच्या झाडाशेजारी दुसरे एखादे झाड लावले तरच ते झाड टिकते. शिवाय ते आपला सुगंध दुसऱ्यांना देते. या कारणांमुळे चंदनाची झाडे देण्याचे ठरवले. लोक लग्नसमारंभात डीजे, सजावट यावर पैसा खर्च करतात; पण अशा सकारात्मक उपक्रमांचीदेखील स्पर्धा झाली तर ती सर्वांनाच लाभदायी ठरेल.’

प्रतीक साखरे म्हणाले, ‘आजकाल औद्योगिक वसाहती, रस्ते, घरे बांधण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते; पण झाडे लावण्याचे प्रमाण मात्र खूप कमी आहे. त्यामुळे आम्ही लग्नात भेट म्हणून झाडे वाटण्याचा निर्णय घेतला. इतर कोणत्या प्रकारची रोपे दिली तर लोक ती फेकून देतात किंवा काळजीपूर्वक त्यांचे जतन करत नाहीत. चंदनाचे झाड सुगंध देतेच; पण आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर आहे, त्यामुळे आम्ही चंदनाची रोपे वाटण्याचा निर्णय घेतला.’

लोक काय म्हणतील याची पर्वा न करता, लग्नसमारंभात मानपानावर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी मांडेकर आणि साखरे कुटुंबीयांनी एकमताने तो पैसा चंदनाची रोपे घेण्यावर खर्च केला. त्यांच्या या कृतीने त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे हे लग्न अविस्मरणीय ठरले आहे.  

समाजाने यातून काही धडा घेतला आणि सर्व लग्नसमारंभात असे चित्र दिसले, तर प्रत्येक लग्नाची गोष्ट लोकांच्या कायम लक्षात राहील आणि पर्यावरणाचे चित्र काही प्रमाणात सुधारण्यास मदत होईल.

(या अनोख्या सोहळ्याची झलक दर्शविणारा व्हिडिओही सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 105 Days ago
Excellent idea . I hope, there will be more .
0
0
चैतन्य घाटे About 105 Days ago
आदर्श घेण्याजोगी बाब आहे जी आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे
0
0

Select Language
Share Link
 
Search