Next
देव देव्हाऱ्यात नाही...
प्रसन्न पेठे
Saturday, July 29, 2017 | 07:00 AM
15 0 0
Share this article:

मराठी सिनेसृष्टीला एकाहून एक अप्रतिम गाण्यांची भेट देणारे गोड गळ्याचे गायक आणि प्रतिभावान संगीतकार म्हणजे बाबूजी उर्फ सुधीर फडके. २५ जुलै (१९०९) हा त्यांचा जन्मदिन, तर २९ जुलै (२००२) हा त्यांचा मृत्युदिन. त्या निमित्ताने बाबुजींबद्दलचं हे स्मरणरंजन...
...............

काही काही माणसं आपल्या आयुष्याचा इतका महत्त्वाचा हिस्सा बनून जातात, की त्यांचं नुसतं नाव घेतलं तरी अंगातून एक विलक्षण शिरशिरी जाते. त्यांच्याप्रति मन आदरानं उचंबळून येतं आणि गळ्यात आवंढा दाटून येतो. बोरीवली-दहिसरच्या मध्ये मिठी नदीवर एक पूल आहे ‘बोरीवली-पश्चिम’ला ‘बोरीवली-पूर्व’शी जोडणारा, त्यावरून जेव्हा जेव्हा जाणं होतं, तेव्हा तेव्हा मला हा अनुभव येतो. येतोच! त्याचं कारण तो पूल आपल्या सर्वांच्या आवडत्या उत्तुंग, प्रतिभावान कलाकाराच्या नावाने ओळखला जातो! जगाच्या इतिहासात असे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके उत्तम गायक असतील, जे स्वतः उत्कृष्ट संगीतकारही होते. अगदीच अपवादात्मक ग्रेट संगीतकार असतील, जे स्वतः उत्कृष्ट गायकसुद्धा होते आणि दोन्ही क्षेत्रांत त्यांनी वर्षानुवर्षं सातत्यपूर्ण उच्च दर्जाची कामगिरी करून १००हून अधिक सिनेमांना सातत्याने उच्च दर्जाचं संगीत दिलंय आणि गायन केलंय!...आणि मला खात्री आहे ‘सुधीर फडके’ हे नाव अशा संगीतकार-गायक कलावंतांमध्ये नक्कीच अग्रभागी असेल!

‘लोकप्रिय मराठी गाणी’ आणि ‘सुधीर फडके’ या जोडीनेच उच्चारायच्या बाबी! कारण गाजलेल्या, कर्णमधुर गाण्यांची यादी करायला बसलो, तर हटकून या नावाभोवती फिरणारी गाणीच संख्येने सर्वांत जास्त आढळतात. एक तर बहुसंख्य लोकप्रिय गाण्यांच्या चाली त्यांच्याच असतात आणि दुसरं म्हणजे अशीही बहुसंख्य लोकप्रिय गाणी आहेत, की ज्यांच्या चाली दुसऱ्या संगीतकारांच्या आहेत, पण ती गाणारा आवाज यांचाच आहे.
 
१९४८ ते १९७३ अशी २५ वर्षं हा हिंदी सिनेसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो आणि नेमक्या त्याच काळात सुधीर फडके यांनी मराठी सिनेसृष्टीत आपल्या सुमधुर चालींनी आणि भावपूर्ण गायकीने सुवर्णयुग निर्माण केलं.

गीतरामायण हा मराठी भावगीतांमधला एक अद्भुत आविष्कार! ग. दि. माडगूळकरांच्या दैवी प्रतिभेने निर्मिलेल्या ५६ अलौकिक गीतांना मंत्रमुग्ध करणाऱ्या चालींमध्ये बांधून सुधीर फडके यांनी अवघ्या महाराष्ट्रावर गारूड केलं. कसा कुणास ठाऊक, पण एक एप्रिल हा दिवस जगाच्या इतिहासात लोकांनी लोकांना ‘वेडं किंवा खुळं’ ठरवण्याचा दिवस! गंमत म्हणजे शुक्रवार, एक एप्रिल १९५५ची सकाळ उजाडली ती महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला एका वेगळ्या अर्थाने वेडं करण्यासाठी!

त्या दिवशी ‘गदिमां’च्या लेखणीतून पुढले ५६ आठवडे अवघं रामायण एकेका गीतामधून उभं करणाऱ्या गीतरामायणाचं पहिलं गीत अवतरलं होतं ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती कुश-लव रामायण गाती’ आणि त्या गीताचे संगीतकार-गायक होते महाराष्ट्राचे लाडके रामचंद्र उर्फ सुधीर फडके उर्फ बाबूजी!! महाराष्ट्रात टीव्ही येण्याआधीचा घरोघरी रेडिओ असण्याचा तो सुंदर काळ! माडगूळकर-फडके जोडीनं त्याआधी काही वर्षांपासून ‘पुढचं पाऊल’, ‘जशास तसे’, ‘लाखाची गोष्ट’, ‘इन मीन साडेतीन’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘गंगेत घोडं न्हालं’, ‘ऊन पाऊस’, ‘पोस्टातील मुलगी’सारख्या अनेक सिनेमांतून कर्णमधुर गाणी देऊन लोकांची पसंती मिळवली होतीच; पण गीतरामायणाची लोकप्रियता अद्भुत होती. असं म्हणतात, की अनेक ठिकाणी गीतरामायण सुरू होण्याआधी श्रोते रेडिओची पूजा करत असत आणि मग अख्खं कुटुंब, मित्रपरिवार, शेजारीपाजारी रेडिओसमोर एकत्र बसून भक्तिभावाने गीतरामायण ऐकत असत. त्यामागे गदिमांच्या दैवी लेखणीची जादू जितकी होती, तितकीच फडक्यांच्या स्वर्गीय चालींची किमयाही होतीच!

बाबूजींनी स्वतः गायलेली गाणी ऐकताना एक मात्र सतत जाणवतं, ते म्हणजे गाताना कवींच्या शब्दांमागच्या भावना पराकोटीच्या स्पष्ट शब्दोच्चारणाने आपल्यापर्यंत पोहोचवत गाणं ‘जिवंत करणं!’ असं गायन केवळ अलौकिच म्हणावं लागेल! इतके सुस्पष्ट, स्वच्छ आणि निर्दोष शब्दोच्चार दुर्मीळच!! मला असं वाटतं, की ज्यांना मराठी शब्दांचे करेक्ट उच्चार शिकायचे असतील त्यांनी बाबुजींनी गायलेली गाणी ऐकावीत. त्यांचा ‘श’ आणि ‘ष’चा उच्चार किंवा ‘क्ष’चा उच्चार (चंद्र आहे साक्षीला..) केवळ अप्रतिम!!

‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीप्रमाणे घराण्यात कधीच संगीताचा वारसा नसतानाही बाबुजींच्या बाबतीत मात्र गायन उपजत असावं. ‘जगाच्या पाठीवर’ या आत्मचरित्रात त्यांनी म्हटलंय,‘मी अगदी लहान म्हणजे दोन-अडीच वर्षांचा असल्यापासून घराबाहेर कोणी बैरागी, गोसावी, भिकारी गाणं म्हणू लागला, की त्याची हुबेहूब नक्कल करीत असे. माझा गळाही चांगला होता...संगीतप्रेमी मामांनी आणि वडिलांनी माझ्यातला हा ‘कुठून कुणास ठाऊक’ आलेला गुण हेरून मला अगदी लहानपणापासून गाणं शिकायला पाठवायचं ठरवलं.’

अशा तऱ्हेने कोल्हापूरच्या पंडित वामनराव पाध्ये यांच्याकडे राम फडके यांचं गायनाचं प्रारंभीचं शिक्षण झालं. पुढे शाळकरी वयात श्रीकृष्ण संगीत मेळ्यात गात असताना त्या मेळ्याचे कवी आणि संवादलेखक न. ना. देशपांडे यांनी १९३४च्या गणेशोत्सवाच्या आसपास मेळ्याच्या जाहिरातीत राम फडके हे नाव आकर्षक आणि नवीन वाटत नाही या सबबीवर ते बदलून ‘सुधीर फडके’ असं केलं आणि त्याच नावाने त्यांनी अखेरपर्यंत काम केलं. त्याचीही एक गंमत त्यांच्या आत्मचरित्रात आहे. त्यांनी लिहिलंय, ‘कार्यक्रमाच्या वेळी माझी गाण्याची पाळी आली की घोषणा व्हायची, ‘आता सुधीर फडके गातील.’ मला पहिल्यापहिल्यांदा काही कळायचं नाही. मी तसाच बसून राही. मग पाठीमागून ‘नन्ना’ ढोसत आणि म्हणत ‘अहो उठा ना, तुमचं नाव जाहीर झालंय.’ मग ध्यानात येई, की मीच तो सुधीर!’’

भा. रा. तांबे, पी. सावळाराम, शांताबाई शेळके, मंगेश पाडगांवकर, जगदीश खेबुडकर, सुधीर मोघे अशा वेगवेगळ्या पिढीतल्या अनेक गीतकारांबरोबर बाबुजींनी काम केलं असलं, तरी गदिमांसारख्या कविश्रेष्ठाबरोबरची त्यांची जी जोडी जमली त्याला तोड नाही. (आताच्या इंग्रजाळलेल्या पिढीला मराठीची गोडी जाणवून घ्यायची असेल, तर गदिमा-सुधीर फडके यांच्या स्वर्गीय खजिन्यातली एकेक अनमोल रत्नं त्यांना ऐकवावीत!).

सतत काम करून बाबुजींची गदिमांशी इतकी घट्ट मैत्री झाली होती, की क्वचित गाणी लिहिताना गदिमा कधी अडले किंवा त्यांनी आळस केला तर बाबूजी त्यांना दम द्यायचे. बाबुजींच्याच शब्दांत - ‘तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा. मी फटाफट गाणी लिहून टाकीन; पण मग मात्र आपल्या पोटावर पाय आला अशी ओरड माझ्या नावानं करू नका.’ यातला गमतीचा भाग सोडला, तरी हे मात्र खरं होतं, की बाबुजींना काव्याचं किंचित अंग होतं. पूर्वी रेडिओवर एकदा आयत्या वेळी कवी गिरीशांच्या ‘तूच केलीस जीविताची’ या कवितेचा कागद हरवल्यानंतर पुष्कळ शोधूनही तो कागद सापडेना, शेवटी बाबुजींनी स्वतःच त्या वाक्यावरून एक चारोळी करून टाकली होती. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी ती चारोळी दिली आहे -

तूच केलीस जीविताची राखरांगोळी अशी।
राखरांगोळीमध्ये मी खाऊ आंबोळी कशी।।
खात ना आंबोळी कधी मी स्वच्छ आंघोळीविना।
जात ना आंघोळीला मी, आज रंकाळा सुना।।

पुढे त्यांनी म्हटलंय –‘बारा-तेरा वर्षांपूर्वी मी अशाच दोन दीर्घ कविता केल्या होत्या. त्यांचे विषयसुद्धा अभिनव होते. एकाचा विषय होता काढा (औषधी) आणि दुसऱ्याचा होता कढी (पिण्याची). त्या दोन्ही काव्यांत जीवनाचं आणि जेवण्याचं सारं तत्त्वज्ञान मी व्यवस्थित मांडलं होतं. दुर्दैवाने ती दोन्ही काव्यं – खरं तर महाकाव्यंच- प्रवासात हरवली...मराठी साहित्याची झालेली ही हानी कशानंही भरून येणार नाही.’

खरंच! आणि बाबूजींच्या जाण्याने झालेली संगीताची हानीसुद्धा कशानंही भरून येणार नाही हेही खरं. असे संगीतकार गायक पुन्हा होणे नाही!

बाबुजींचा एखाद्या गीताकडे बघण्याचा दृष्टिकोन किती वेगळा असायचा, याचं उदाहरण द्यायचं तर त्यांनीच अथक परिश्रमांनी अनेक वर्षं खपून त्यांच्या लाडक्या दैवतावर, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बनवलेल्या सिनेमाचं देता येईल. त्या सिनेमात ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावरचा प्रसंग आहे - जेव्हा सावरकरांना त्या अथांग समुद्राकडे पाहताना भारतमातेची आठवण होते आणि व्याकूळ होऊन त्यांना काव्य स्फुरतं आणि ते गुणगुणू लागतात. ती कविता आहे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला...’ आणि हा सिनेमा येण्याच्या कित्येक वर्षांपूर्वीपासून आपण मंगेशकर कुटुंबाच्या आवाजात कोरसमध्ये हे गाणं ऐकत आलोय; पण बाबूजींच्या मते सावरकर एकटे असताना विरहाने व्याकूळ होऊन ही कविता गुणगुणतील तर ती ‘सोलो’ आवाजातच हवी ‘कोरस’ नको...आणि त्यांनी त्याला ‘पाळणा’ या गीतप्रकारची चाल लावली आणि ती चालसुद्धा किती परिणामकारक ठरली ते सिनेमा बघताना आणि गाणं ऐकताना आपल्याला जाणवतंच!!

खरंच, सुधीर फडके हे साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद लाभलेले थोर संगीतकार-गायक होते. आपण भाग्यवान, की आपण त्यांना ‘याचि देही याचि डोळा’ पाहू-ऐकू शकलो. त्यांच्या स्मृतींना वंदन!

(‘एक धागा सुखाचा’ हा बाबूजींचा गीतकोश ई-बुक स्वरूपात ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. बाबूजींबद्दलचा विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vrunda Desai About
खूप सुंदर लेख.. देव देव्हाऱ्यात नसू दे, हृदयात आहे तो पर्यंत काळजी नाही. बाबूजींच्या गाण्या प्रमाणे..तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम.. लेख वाचून खूप मस्त वाटले ..
0
0

Select Language
Share Link
 
Search