Next
स्त्री-प्रबोधनासाठी झटणारी संस्था
BOI
Monday, October 23, 2017 | 04:00 PM
15 0 0
Share this story

स्त्रियांच्या विविध प्रश्नांचं अध्ययन करून त्याद्वारे काढलेल्या अनुमानाद्वारे आणि त्या प्रश्नांवर शोधलेल्या उपायांद्वारे स्त्रियांमध्ये प्रबोधन घडवून आणण्याचं महत्त्वाचं काम करणारी पुण्यातली संस्था म्हणजे ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र.’ ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज पाहू या ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न पेठे यांनी या संस्थेच्या नीलाक्षी गोडबोले यांची घेतलेली मुलाखत...
.........................
   आपल्या संस्थेची सुरुवात नेमकी कोणत्या उद्दिष्टाने झाली?
-    स्त्री ही आपल्या अंगभूत कौशल्याने एकाच वेळी तिहेरी भूमिका पार पाडत असते. ती समाजाचा एक घटक असते, गृहिणी असते आणि त्याचवेळी माताही असते. आणि या तीन भूमिका निभावताना तिला त्या संदर्भात एक स्वतंत्र व्यक्ती आणि समष्टीचा भाग म्हणून काही समस्यांना, प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. आणि बऱ्याच वेळेला कोणत्याही बाह्य मदतीशिवाय आपली आपणच त्यावर मात करावी लागते. उत्तरं शोधावी लागतात. म्हणून आपण म्हणतो, की समाजातली प्रत्येक महिला सक्षम झाली, तिची योग्य प्रगती झाली, तर संपूर्ण समाजाचीही आपोआप प्रगती होईल आणि हे निर्विवाद सत्यच आहे. यावर विचार करताना स्त्रीविषयक विविध अंगाने विविध ठिकाणी येणाऱ्या, प्रकाशित होणाऱ्या बातम्या, माहिती संकलित करून त्याचा एक डेटाबेस असावा आणि त्याच्या वर्गवारीतून आणि विश्लेषणातून स्त्रियांचं प्रबोधन करावं आणि शक्य असेल तिथे या संस्थेच्या माध्यमातून मदत पोहोचावी, या उद्दिष्टाने १३ जणींनी मिळून ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र’ या ट्रस्टची स्थापना केली.  

- या ट्रस्टचं काम कोण पाहतं?
- सध्या डॉ. अंजली देशपांडे या ट्रस्टच्या सचिव आहेत, गीताताई गोखले या अध्यक्षा आहेत आणि सुनीला सोहोनी या कोषाध्यक्षा आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही नऊ जणी नऊ ते पाच वेळेत ऑफिसमध्ये काम करतो.

- तुम्ही गोळा केलेल्या डेटाबेसचा फायदा कुणाकुणाला होतो?
- ज्या ज्या संस्था महिलांच्या सबलीकरणासाठी काम करत आहेत अशांना त्याचाचा फायदा होतोच. त्याशिवाय या माहितीचा उपयोग एमएसडब्ल्यू (मास्टर्स इन सोशल वर्क) आणि एमफिल (मास्टर ऑफ फिलॉसॉफी) करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा होत असतो.  

- साधारणपणे अॅक्टिव्हिटीजचं स्वरूप कसं असतं?
- विविध वृत्तपत्रं आणि नियतकालिकं यातून महिलांविषयक येणाऱ्या बातम्या, माहिती आणि आकडेवारी यांचं संकलन आम्ही करतो. त्यानंतर शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौटुंबिक, सामाजिक अशा जवळपास १७ ‘हेडिंग्ज’खाली आम्ही त्या बातम्यांचं, माहितीचं वर्गीकरण करतो. याव्यतिरिक्त आमचे काही ट्रस्टीज विविध प्रांतांत जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने काही विशिष्ट विषयांवर सर्व्हे घेतात. अशा प्रकारे आमचा डेटाबेस तयार होत जातो. आम्ही काही अभ्यास-वर्गही घेत असतो. त्यामधून काही निष्कर्ष प्राप्त होतात. अशा प्रकारे आमच्याकडे गेल्या सात-आठ वर्षांपासूनची सर्व माहिती स्कॅन केलेल्या स्वरूपात उपलब्ध आहे.

- अपेक्षित महिला गटांपर्यंत ती माहिती कशी पुरवली जाते?
- आम्ही आमच्या ट्रस्टतर्फे ‘महिलाविश्व’ हे मासिक मराठी, हिंदी, इंग्लिश तीन भाषांमध्ये काढतो. ज्यांमध्ये त्या वर्गवारी केलेल्या संपूर्ण माहितीचं ‘सार’ आम्ही देतो. त्यामुळे ‘महिलाविश्व’ वाचणाऱ्यांना ‘थोडक्यात पण महत्त्वाचं’ असं सगळंच प्रबोधनपर वाचायला मिळतं. याशिवाय दर वर्षी एक विशिष्ट विषय घेऊन त्याला वाहिलेला असा एक ‘महिलाविश्व’चा वार्षिक विशेषांकही आम्ही काढतो. उदाहरण द्यायचं तर गेल्या वर्षी आम्ही ‘वूमन इन डिसिजन मेकिंग’ या विषयाला वाहिलेला अंक काढला होता. त्याआधी ‘रोजगार’ किंवा ‘भारतामधलं पुरुष-स्त्री संख्येचं व्यस्त प्रमाण’ असेही अंक काढले होते.

- याशिवाय ट्रस्टचे इतर काही उपक्रम?
- महिलांच्या सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर काही टीम्स पाठवून सर्वेक्षण करतो. तिथल्याही आमच्या काही कार्यकर्त्यांची यात मदत होते. ओडिशा, झारखंड, छत्तीसगड अशा ठिकाणांहून काही आदिवासी स्त्रिया, महाराष्ट्रात घरकाम, मोलमजुरी करण्यासाठी आपलं घरदार सोडून येतात – त्यामागची कारणं शोधण्यासाठी संशोधन प्रकल्प ट्रस्टने हातात घेतला होता. हरियाणात मुलगा-मुली जन्मांचं व्यस्त प्रमाण, तसंच ईशान्य भारतातल्या स्त्रियांची सामाजिक स्थिती यावर या वर्षी संशोधन प्रकल्प केला होता.

- तुम्ही काही प्रशिक्षण शिबिरंही आयोजित केली होतीत. त्याविषयी काय सांगाल?
- हो. पुणे महागरपालिका आणि आमचा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला नगरसेविकांसाठी ‘जेंडर बजेट’ या विषयावर एक प्रशिक्षणवर्ग आयोजित केला होता. त्यामुळे ‘पीएमसी’च्या आर्थिक नियोजनात स्त्री-पुरुष समानता कशी राखली जावी आणि महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या खर्चाचा फायदा पुरुषांइतकाच स्त्रियांनाही कसं होऊ शकेल याविषयीची माहिती देण्यात आली. भारतीय स्त्री शक्ती जागरण यांच्याबरोबर आमच्या ट्रस्टने नगरसेविका पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांसाठी ‘मला नगरसेविका व्हायचंय’ असा एक प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता.

- लोकांना काय आवाहन कराल?
- आमच्यासारख्या अधिकाधिक सामाजिक संस्थांचं कार्य लोकांसमोर आलं, तर लोकांची जास्तीत जास्त मदत या संस्थांना मिळेल आणि आम्हाला अधिक चांगलं कार्य करता येईल.

(संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती देणारा नीलाक्षी गोडबोले यांचा व्हिडिओ सोबत दिला आहे.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
राजेश कोरडे About
खूप उपयुक्त माहिती मिळाली खरोखर सूंदर फक्त संस्थेचे नाव माहित होते अधिक माहिती मिळाली Proud of you निलाक्षी
0
0
सुनिता पेंढारकर About
आतिशय उपयुक्त माहीती मिळाली संस्थेचे काम विस्ताराने समजले
0
0
Seema kale About
Good work and information
0
0
Pankaj Balkrishna Paranjape About
Good work we all proud of you
0
0

Select Language
Share Link