Next
‘किशोर’च्या दुर्मीळ अंकांचा खजिना आता ऑनलाइन..
BOI
Monday, November 27 | 01:13 PM
15 1 0
Share this story


पुणे : मागील ४६ वर्षांपासून ‘बालभारती’तर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ मासिकाच्या दुर्मीळ अंकांचा खजिना आता सर्व बालमित्रांसाठी ‘बालभारती’च्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला आहे. ‘बुकगंगा डॉट कॉम’च्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून हा प्रकल्प कोणताही मोबदला न घेता पूर्ण करण्यात आला आहे.

नाशिक येथील सोहळ्यात 'किशोर' मासिकाच्या दस्तऐवजाचे लोकार्पण करताना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेनाशिक येथे नुकत्याच झालेल्या भव्य सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते ३० हजार पानांच्या या दस्तऐवजाचे लोकार्पण करण्यात आले. यानुसार किशोर मासिकाच्या आजवर प्रकाशित करण्यात आलेल्या ५५१ अंकांच्या ३० हजार पानांचे साहित्य डिजिटायझेशन करून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या निमित्ताने बालसाहित्याचा मोठा खजिना किशोरप्रेमी वाचकांसाठी खुला झाला आहे.

‘बालभारती’ची पाठ्यपुस्तके वाचत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या आहेत. पहिली ते १२ वी पर्यंतची शालेय पुस्तके तयार करणे व छपाई करून ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून ‘बालभारती’कडून केले जाते. यादरम्यान १९७१ मध्ये आठ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘किशोर’ मासिक सुरू करण्यात आले होते. ४६ वर्षांपासून मुलांचे आवडते मासिक, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान देण्याबरोबरच मुलांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावे ही भूमिका असलेले मासिक, दिवाळी अंक, सुटी विशेषांक, वाचकप्रिय मासिक अशी काही ‘किशोर’ मासिकाची वैशिष्ट्ये सांगता येतील. या मासिकातील निवडक साहित्याचे १४ खंडही प्रकाशित झाले आहेत. 

किरण केंद्रे‘किशोर’चे कार्यकारी संपादक किरण केंद्रे म्हणाले, ‘किशोर ही मराठी वाचकांची ठेव आहे. डिजिटायझेशनच्या माध्यमातून ती त्यांच्यापर्यंत पोहोचल्याचा आनंद आहे. गेल्या ४६  वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे, ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक नामवंत लेखक, कवी, चित्रकार यांनी किशोरसाठी योगदान दिले आहे. जुन्या अंकांची वाचकांकडून सातत्याने मागणी होत होती. डिजिटायझेशनच्या निमित्ताने हा सर्व दुर्मीळ खजिना ऑनलाइन आणि मोफत उपलब्ध झाला आहे. दर्जेदार बालसाहित्य आणि अनेक दिग्गज चित्रकारांच्या कलाकृतीचा आनंद या माध्यमातून घेता येणार आहे,’ अशा भावना व्यक्त केल्या. 

मंदार जोगळेकर‘किशोर हे मासिक लहानपणापासून माझ्या आवडीचे आहे. आजच्या पिढीतल्या लहान मुलांनाही ते वैभव उपलब्ध व्हायला हवे, असे मला वाटायचे. म्हणूनच त्या अंकांच्या डिजिटायझेशनचे काम विनामोबदला करण्याचा प्रस्ताव मी ‘बालभारती’समोर ठेवला होता. त्यांनी तो मान्य केल्यामुळे हे काम झाले. या अंकांच्या डिजिटायझेशनचे काम रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा या गावी असलेल्या ‘बुकगंगा’च्या युनिटमधील मुलींनी केले आहे,’ या शब्दांत ‘बुकगंगा डॉट कॉम’चे सीईओ मंदार जोगळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

‘किशोर’ मासिकाचे सर्व अंक आता kishor.ebalbharati.in या लिंकवर उपलब्ध आहेत.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ajit mungi About 358 Days ago
माझ्यावर आणि माझ्या पिढीतल्या बर्‍याच मुलामुलींवर आईवडीलांनंतर किशोर मासिकाचे भाषा संस्कार झाले आहेत.
0
0

Select Language
Share Link