Next
‘कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून शाश्वत विकास शक्य’
पुणे जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राच्या पवार यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, July 16, 2019 | 03:36 PM
15 0 0
Share this article:

‘यशस्वी’ संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी वस्तूंचे प्रदर्शन पाहताना पुणे जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राच्या सहायक संचालिका अनुपमा पवार. शेजारी ‘यशस्वी’च्या संचालिका स्मिता धुमाळ, संस्थेच्या शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. सुनिता पाटील आदी

पुणे : ‘कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून देशाचा शाश्वत विकास शक्य आहे. विद्यार्थी व पालकांनी क्रमिक शिक्षणाप्रमाणेच कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे,’ असे मत पुणे जिल्हा  कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राच्या सहायक संचालिका अनुपमा पवार यांनी व्यक्त केले. 

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त यशस्वी अॅकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी व हस्तकौशल्य वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांनी खूप नावीन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून बनविलेले प्रकल्प नक्कीच वास्तवात येण्यायोग्य आहेत. आपल्या भवताली असणाऱ्या प्रदूषण, वीजेचा  तुटवडा, वाहतूक समस्या यांचा विचार करून आग विझवण्यासाठी, आगीतून लोकांची सुटका करण्यासाठी रोबोचा वापर, वर्दळीच्या ठिकाणच्या जिन्यावरील पायऱ्यांच्या  माध्यमातून वीज निर्मिती, टाकाऊ पाणीप्रवाहाच्या मार्गाद्वारे वीज निर्मिती, घरात कोणीही नसताना सेन्सरद्वारे वीज बंद करून वीजबचत, सौरऊर्जेच्या वापराद्वारे गाडी धुणे, सौरऊर्जेवर चालणारे कीटकनाशक फवारणी यंत्र, टाकाऊ प्लस्टिक बाटल्यातून पेन स्टॅंड अशा विविध वस्तूंची विद्यार्थ्यानी केलेली निर्मिती ही निश्चितच कौतुकास्पद आहे.’


हे सर्व प्रकल्प महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या जिल्हा व्यवसाय कल्पना स्पर्धेतही विद्यार्थ्यानी सहभागी होण्याचे आवाहन पवार यांनी केले. या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या समारोप सत्रात भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या (बीवायटीएस) मेंटॉरिंग इंडिया प्रकल्पाचे संचालक सचिन अडसरे म्हणाले, ‘तुमच्याकडे कौशल्य असल्यावर केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे होण्यासाठी स्वयंरोजगाराचा मार्ग कसा निवडता येईल यादृष्टीने प्रयत्न करा. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य, मार्गदर्शन ‘बीवायएसटी’तर्फे केले जाईल.’ उद्दिष्ट म्हणजेच ध्येय निश्चिती, ज्ञान किंवा कौशल्य आणि कष्ट करण्याची मानसिकता या तीन गोष्टींमुळेच यशस्वी बनता येते, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्याना दिला. 

या वेळी ‘बीवायएसटीचे समन्वयक मोहनीश वाघ, ‘यशस्वी’च्या संचालिका स्मिता धुमाळ, यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. सुनिता  पाटील, ‘यशस्वी’च्या ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष कृष्णा सावंत, मार्केटिंग विभागप्रमुख अमृता तेंडुलकर यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनिता पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी राजेंद्र शेळके, ईशा पाठक, निसार शेख, श्रीकांत तिकोने, शाम वायचळ, प्राची राऊत, शमिका तांबे, सचिन कुंभारकर, हर्षा पटेल, श्वेता साळी, अश्विनी घनवट, रश्मी शिंदे, गंगाधर डुकरे, निखील चव्हाण व अजिंक्य गायकवाड आदींनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search