Next
एसटीच्या महिला चालक प्रशिक्षणार्थींचा आत्मविश्वास सर्वांसाठी प्रेरक
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे प्रतिपादन; महिला बसचालकांचे प्रशिक्षण सुरू
BOI
Saturday, August 24, 2019 | 05:35 PM
15 0 0
Share this article:पुणे :
‘कोणत्याही क्षेत्रात संधी मिळाल्यास महिला आपले कर्तृत्व सिद्ध करतात. महिलांना एसटी चालक म्हणून प्रशिक्षण देऊन महामंडळाने सामाजिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल टाकले असून, त्यांचा आत्मविश्वास आणि धाडस सर्वांना प्रेरक ठरेल,’ असा विश्वास माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी शुक्रवारी (२३ ऑगस्ट) पुण्यात व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने महिला चालक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ त्यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिरात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन मंत्री दिवाकर रावते होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेचे संचालक कॅप्टन राजेंद्र सनेल-पाटील, महामंडळाचे सरव्यवस्थापक माधव काळे उपस्थित होते.प्रतिभा पाटील म्हणाल्या, ‘अनेक खडतर आव्हानांचा सामना करत एसटी महामंडळाचे काम यशस्वीपणे सुरू आहे. महामंडळाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या विविध योजना समाजासाठी उपयुक्त आहेत. महिलांना एसटी चालक म्हणून प्रशिक्षण देऊन महामंडळाने त्यांना जगण्याचा नवा मार्ग दाखवला आहे. हे पाऊल अत्यंत धाडसी असून, ते यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. महामंडळाचा हा उपक्रम देशासमोर नवा आदर्श निर्माण करेल.’

परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले, ‘मी एसटी महामंडळात सकारात्मकता निर्माण करण्याचे काम केले. महिला टॅक्सीचालक आणि महिलांसाठी अबोली रिक्षा हे प्रयोग केले. महिला सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम परिवहन विभागाच्या माध्यमातून केले. १६३ महिला चालक प्रशिक्षणाचा हा प्रयोग राज्यातील महिला-मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. रोजगार निर्माण करणे हेच परिवहन खात्याचे धोरण आहे. त्यातूनच रिक्षाचालक परवाने देण्याचे काम केले.’ 

‘सध्या महामंडळात ३६ हजार बसचालक असून, पुढील काही वर्षांत किमान १० हजार महिला बसचालक एसटीत असतील,’ असा विश्वास रावते यांनी व्यक्त केला.

‘एसटी कर्मचाऱ्यांसाठी पुण्यातील जागतिक दर्जाचे ‘व्हिजन नेक्स्ट’ रुग्णालय डोळे तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ५५ वर्षांनंतर स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे सर्व लाभ देण्याबरोबरच १० लाख रुपये देण्यात येतील. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना पती-पत्नीसाठी ६५ वर्षांपर्यंत मोफत प्रवासाची सवलत देण्यात येणार आहे,’ असेही रावते यांनी सांगितले.

डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘आजचा दिवस महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहसिक दिवस आहे. महिला सशक्तीकरणाच्या धोरणाचे कृतिशील पाऊल परिवहन महामंडळाने टाकले आहे.’

प्रतिभा पाटील यांच्या हस्ते १५ महिला एसटी चालकांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. प्रतीक्षा सूर्यकांत सांगवे (पुणे), सरोज महिपती हांडे (कोल्हापूर), मीना भीमराव व्हनमाने (सांगली), पूनम अशोक डांगे (सोलापूर), माधवी संतोष साळवे (नाशिक), ज्योती तनखू आखाडे (जळगाव), मंजुळा बिभीषण धोत्रे (धुळे), रेश्मा सलीम शेख (परभणी), भाग्यश्री शालिकराम परानाटे (अमरावती), भावना दिगंबर जाधव (बुलढाणा), अंकिता अंकुशराव आगलावे (यवतमाळ), गीता संजय गिरी (नागपूर), रब्बना हयात खान पठाण (वर्धा), राखी विजय भोतमांगे (भंडारा), पौर्णिमा बाळकृष्ण कुमरे (गडचिरोली) या १५ जणींचा त्यात समावेश होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन या वेळी करण्यात आले. एसटी महामंडळाचे कर्मचारी दत्तात्रय गायकवाड यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. २०१७ व २०१८ साली विशेष कामगिरी केलेल्या एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजितसिंह देओल यांनी केले. या कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला चालाकांसाठी नियम शिथिल...
एसटी महामंडळात चालक पदासाठी अवजड वाहन चालक परवाना व त्यानंतर तीन वर्षांचा अनुभव या अटी असतात. त्या शिथिल करून एक वर्ष हलके वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या महिलांना संधी देण्यात येते. तसेच महिलांसाठी किमान उंचीची अट १६० सेंटिमीटरवरून १५३ सेंटिमीटरपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. ही योजना राज्यातील २१ जिल्ह्यांत राबविण्यात आली असून, राज्यातील ९३२ महिला उमेदवारांनी या पदाकरिता अर्ज केला होता. त्यापैकी ७४३ महिला उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्या व १५१ जणी अंतिम प्रशिक्षणासाठी पात्र ठरल्या आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search