Next
चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी
मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
प्रेस रिलीज
Wednesday, May 29, 2019 | 03:42 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. चारा छावण्यांची बिले देण्यास विलंब न करण्याचा, तसेच चारा छावण्यांच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वच्छतागृह सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

मंत्रालयात दुष्काळावरील उपाय योजनांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पदुम मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विविध विभागांचे अपर मुख्य, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

या संदर्भात माहिती देण्यासाठी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, ‘राज्यात सध्या सहा हजार २०९ टॅंकर्सच्या माध्यमातून चार हजार ९२० गावे आणि १० हजार ५०६ पाड्यांवर पाणी पुरवठा केला जात आहे. राज्यात नाशिक, पुणे, औरंगाबाद विभागात एकूण एक हजार ५०१ चारा छावण्या सुरू आहेत. त्यामध्ये सुमारे १० लाख चार हजार ६८४ जनावरे आहेत. आतापर्यंत चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तांना १११ कोटी, पुणे चार आणि नाशिक विभागीय आयुक्तांना ४७ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

छावण्यांमधील जनावरांच्या सोयीसाठी शासनामार्फत टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जनावरांच्या देखरेखीसाठी शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील महिला मोठ्या प्रमाणावर छावण्यांमध्ये उपस्थित असतात. अशावेळी महिलांसाठी त्याठिकाणी तात्पुरती स्वच्छता गृहे उभारावीत, अशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. चारा छावण्यांची बिले जिल्हा प्रशासनाने तांत्रिक बाबी तपासून तातडीने अदा करावीत. त्यात विलंब करू नये. ज्यांना शेतीच्या कामासाठी बैल दिवसभरासाठी न्यायचा आहे, त्यांना ते घेऊन जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.

राज्यात लहान व मोठ्या जनावरांसाठी छावण्या आहेत; मात्र शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात प्रथमच छावण्या सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत ३४ लाख शेतकऱ्यांना दोन हजार २०० कोटींचे वाटप करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search