Next
स्नेहाची यशस्वी वाटचाल
टेनिसमधील सातत्यपूर्ण कामगिरीचा फायदा
BOI
Friday, September 07 | 06:45 AM
15 0 0
Share this story

स्नेहा रानडेनवोदित टेनिसपटू शरण्या गवारेच्या पाठोपाठ पुण्याची आणखी एक खेळाडू महिला टेनिसमध्ये नावारूपाला येत आहे.  स्नेहा रानडे. स्नेहाच्या सातत्यपूर्ण यशाचे कौतुक जाणकारही करत आहेत.... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या नवोदित टेनिसपटू ‘स्नेहा रानडे’बद्दल...
............................................ 
हरियाणातील सोनिपत येथे नुकत्याच झालेल्या ‘एआयटीए चँपियनशिप सिरीज टेनिस स्पर्धे’त पुण्याच्या स्नेहा रानडेने सोळा व अठरा वर्षांखालील मुलींच्या एकेरी स्पर्धेत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. या स्पर्धेत सोळा वर्षांखालील मुलींच्या गटातील एकेरीच्या अंतिम लढतीत बिगरमानांकित असलेल्या स्नेहाने दिल्लीच्या दुसऱ्या मानांकित लक्ष्मी गौडाला ६-१, ६-२ असे सरळ पराभूत करून विजेतेपद पटकावले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत स्नेहा रानडेने गाझियाबादच्या टियासिंगला ६-३, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले होते.

अठरा वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम लढतीतही बिगरमानांकित स्नेहा रानडेने हरियानाच्या तिसऱ्या मानांकित छवी राठीवर ६-४, ६-३ असा विजय प्राप्त करत विजेतेपद पटकावले. तत्पूर्वी उपांत्य फेरीत तिने मानसी शर्माला ६-१, ६-३ असे पराभूत केले होते. विजेत्या स्नेहाच्या खात्यात २५ एआयटीए गुण जमा झाले. 
 
स्नेहा रानडेने प्रथमच एआयटीएच्या (ऑल इंडिया टेनिस असोसिएशन) स्पर्धेत दुहेरी यश मिळवले आहे. सध्या ती फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावीत शिकत असून, केतन धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. एआयटीएच्या इतिहासात आजवर अनेक खेळाडूंनी चमक दाखविली आहे मात्र स्नेहाने दुहेरी यश संपादन करत इतर खेळाडूंसमोर आदर्श निर्माण करून दिला आहे.  

भारतीय टेनिस क्षेत्रात एक सानिया मिर्झा यशस्वी होते आणि तिच्यापासून प्रेरणा घेत अनेक मुली टेनिस कोर्टवर आपले नशिब आजमावण्यास सुरुवात करतात. आज देशात अशा हजारो मुली आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. स्नेहा रानडे देखील यापैकीच एक. एआयटीएचा स्पर्धा कालावधी व त्यातील सामने यात स्नेहाने कमालीचे सातत्य दाखवले आहे. आता तिच्यासमोर डब्ल्यूटीएचे आव्हान आहे. सानिया मिर्झासकट अनेक खेळाडूंनी सुरूवातीला एआयटीए, डब्ल्यूटीए या स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे आणि मग त्यांना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.  

आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी स्नेहाला अजून अनेक टप्पे पार करायचे आहेत. आता केवळ राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये ती यश मिळवत आहे. तिला प्रायोजक आणि अत्याधुनिक साहित्य व सुविधा तसेच सातत्याने परदेशातील सामने खेळण्याची संधी मिळाली, तर तिच्यातून एक दर्जेदार आंतरराष्ट्रीय टेनिसपटू निर्माण झालेली दिसेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी जो आत्मविश्वास आणि तयारी आवश्यक असते ती राष्ट्रीय स्पर्धांमधून निश्चितच मिळते मात्र परदेशी वातावरणात आणि नामांकित खेळाडूंविरुद्ध सातत्याने सामने खेळले, तर त्या स्तरावरचे दडपण दूर होते. सानिया मिर्झाने ती गुणवत्ता व तो आत्मविश्वास मोठ्या स्तरावर दाखवला म्हणूनच ती आज यशस्वी ठरली आहे. तिच्याकडून प्रेरणा घेणाऱ्या स्नेहासारख्या अनेक मुलींनी दडपण न घेता मोठ्या व्यासपीठावरही असेच सातत्य दाखवले तर पुढील कैक वर्षे भारतीय खेळाडू जागतिक टेनिसमध्ये आपला दबदबा निर्माण करतील. एकीकडे शिक्षण आणि त्याचबरोबर दुसरीकडे खेळातील सातत्य अशा दोन्ही दगडांवर पाय ठेवून स्नेहाला पुढील वाटचाल करायची आहे.  

आपल्याकडील शिक्षणपद्धतीमुळे दहावी किंवा बारावीच्या परीक्षेदरम्यान पालकांच्या दबावामुळे अनेक खेळाडू खेळातून अंग काढून घेतात. हेच ड्रॉपआऊट देशाच्या क्रीडा संस्कृतीला भविष्यात खूपच मारक ठरते. शिक्षण आणि खेळ यात सातत्याने यशस्वी कामगिरी करणारे अगदी थोडे खेळाडू असतात आणि तेच यशस्वी होतात. पुण्याच्या टेनिसबाबत बोलायचे झाल्यास, शरण्या गवारे आणि स्नेहा रानडे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांचा दर्जा आणि गुणवत्ता पाहता त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही यशस्वी होतील असा विश्वास वाटतो.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. 'क्रीडारत्ने' सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link