Next
खासदार डॉ. अमोल कोल्हे घेऊन येत आहेत ‘स्वराज्यजननी जिजामाता’
येत्या १९ ऑगस्टपासून ‘सोनी मराठी’वर सुरू होणार नवी मालिका; अभिनेत्री अमृता पवार दिसणार जिजाऊंच्या भूमिकेत
BOI
Tuesday, July 09, 2019 | 05:16 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘झी मराठी’ वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले खासदार डॉ. अमोल कोल्हे आता जीजाबाई यांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही नवीन मराठी मालिका घेऊन येत आहेत. अमोल कोल्हेंची निर्मिती असलेली ही मालिका येत्या १९ ऑगस्टपासून सोनी मराठी वाहिनीवर सुरू होत असून अभिनेत्री अमृता पवार ही स्वराज्यजननीच्या भूमिकेत दिसणार आहे.  

यापूर्वीही आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील मालिकेतील शिवाजी महाराजांची भूमिका साकारून अमोल कोल्हे यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत त्यांनी साकारलेले संभाजी राजेही प्रेक्षकांच्या मनात चांगलेच घर करून गेले. या दोन्हीही मालिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडींवर प्रकाश टाकत या मालिकांच्या माध्यमातून त्यांचा इतिहास उलगडण्याचा उमदा प्रयत्न केला गेला आहे. 

आता ‘सोनी मराठी’वर सुरू होत असलेल्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून शहाजी राजांची स्वराज्य संकल्पना जोपासणाऱ्या आणि स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजामाता यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. शहाजी महाराजांची स्वराज्य संकल्पना, त्याला जिजाऊंनी दिलेली साथ, चिमुकल्या शिवाजीवर केलेले स्वराज्यप्रेमाचे संस्कार या सगळ्या घडामोडी या मालिकेतून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहेत. 

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेनंतर ‘जगदंब क्रिएशन’ची ही दुसरी निर्मिती आहे. संभाजीनंतर महाराष्ट्रातील हे दुसरे महान व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर आणण्याचे शिवधनुष्य पेलणे हे खूप मोठे आव्हान आहे. आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमधून अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर यांनी जिजामाता साकारल्या आहेत. त्यांनी त्या भूमिका उत्तमरीत्या निभावल्या आहेत. या मालिकेतून अभिनेत्री अमृता पवार जिजामाता साकारणार असून, ती हे आव्हान कशा प्रकारे पेलणार, ते पाहणे औत्सुक्याचे असेल. 

या मालिकेबाबतची पोस्ट डॉ. अमोल कोल्हे यांनी खुद्द फेसबुकवरून शेअर केली आहे. ‘जीजाई मासाहेबांचे चरित्र प्रेक्षकांसमोर आणणे ‘सोनी मराठी’च्या माध्यमातून शक्य होत आहे, ही खूप आनंदाची बाब आहे आणि तेवढीच मोठी जबाबदारीदेखील आहे. ही मालिका केवळ मनोरंजन नाही, तर संस्कार असेल, तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाचा हुंकार असेल’, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search