Next
कोलकात्यातील स्वयंस्फूर्त ‘अग्निरक्षक’
BOI
Tuesday, July 25, 2017 | 02:42 PM
15 0 0
Share this article:

कोलकाता : कोठेही आग लागली, तर पहिल्यांदा अर्थातच अग्निशामक दलाला पाचारण केले जाते. त्या दलाचे जवान स्वतःच्या जिवाशी अक्षरशः खेळून नागरिकांचे प्राण वाचवतात. कोलकाता शहरातील अग्निशामक दलाच्या बचावकार्यात एक सामान्य माणूसही गेली तब्बल ४० वर्षे सहभागी होतो आहे. बिपिन गणात्रा असे त्यांचे नाव आणि सध्या ते ६० वर्षांचे आहेत. आतापर्यंत आगीच्या शंभरहून अधिक दुर्घटनांमध्ये त्यांनी बचावकार्य केले असून, यंदा त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. त्यांची गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आहे.

बिपिन बारा वर्षांचे असताना त्यांचा मोठा भाऊ नरेंद्र दिवाळीच्या वेळी लागलेल्या आगीमुळे मृत्युमुखी पडला. याचा मोठा धक्का किशोरवयीन बिपिनला बसला. त्याने शाळा सोडली. त्याच वेळी त्याने ठरविले, की तो आयुष्यभर आगीशी झुंजत राहणार; आगीपासून जितक्या जणांचे जीव वाचवता येतील तितक्या जणांचे जीव वाचवणार. हेच काम ते गेली ४० वर्षे कोलकात्यात करत आहेत. 

गणात्रा एका लहानशा घरात राहतात. शहरातील आगींबद्दलच्या बातम्यांवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. अपडेट्स मिळविण्यासाठी ते शहराच्या अग्निशामक दलाशी वेळोवेळी संपर्क साधतात. आगीची बातमी समजताच टॅक्सी करून ते घटनास्थळी पोहोचतात. बऱ्याच वेळा ते अग्निशामक दलाच्या आधी तेथे पोचलेले असतात. गणात्रा सफाईने स्थिती हाताळतात. आपद्ग्रस्तांशी बोलून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तजवीज करतात. त्यांची तळमळ आणि काम माहीत झाल्याने अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांचे सहकार्य घेतात. 

कोलकात्याच्या अग्निशामक दलाने २००९ साली बिपिन गणात्रा यांना ‘व्हॉलंटिअर्स मेटॅलिक कार्ड’ देऊन त्यांच्या सेवेचा गौरव केला. गणात्रा १९७८पासून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना मदत करीत आहेत. त्या वेळी एका बँकेला लागलेली आग विझविण्यास त्यांनी साह्य केले होते. आगी लागणे ही कोलकात्यात मोठी समस्या आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१६ साली आगीच्या १६०० दुर्घटना घडल्या आणि त्यात १४३ जण मृत्युमुखी पडले, तर ९७४ जण जखमी झाले. शहरातील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा सतत ताण असतो. गणात्रा हेही कामात गुंतलेले असतात. कधी कधी एका दिवसात आगीच्या तीन घटनांना ते सामोरे जातात. 

काही वर्षांपूर्वी शहरातील एका गोदामाला आग लागली. तेथे दोन गॅस सिलिंडर्स होते. त्यांचा स्फोट झाला असता, तर मोठी हानी झाली असती. ती दुर्घटना गणात्रा यांनी जीव धोक्यात घालून टाळली. एकदा एका चार मजली इमारतीला आग लागली. ते भिंतीवर चढून पहिल्या मजल्यावर पोहोचले. तेथे राहणारी एक महिला गर्भवती होती. घाबरल्यामुळे ती उडी मारण्याच्या तयारीत होती. गणात्रांनी तिला रोखले आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी येईपर्यंत थांबण्यासाठी तिचे मन वळविले. कर्मचारी पहिल्या मजल्यावर पोहोचल्यानंतर या महिलेसाठी स्ट्रेचर तयार करण्याकरिता त्यांनी मदत केली. नजीकच्या घराच्या छप्पराच्या आधारे या महिलेला सुरक्षित स्थळी नेण्यात आले. 

कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयाला २०११मध्ये लागलेल्या आगीत ८९ रुग्ण मृत्युमुखी पडले होते. धुराने परिसर व्यापलेला असताना गणात्रा या इमारतीत धाडसाने घुसले. त्यांनी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात अडकून पडलेल्या रुग्णांचे जीव वाचविले. आजपर्यंत गणात्रा यांनी आगीच्या शंभरहून अधिक दुर्घटनांमध्ये मदत व बचावकार्य केले आहे.

जिद्द, चिकाटी, उत्साह कायम
मदतकार्यावेळी भाजल्याने गणात्रा अनेकदा जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखालीही ते अनेकदा अडकले आहेत; पण तरीही त्यांची जिद्द, चिकाटी, उत्साह ४० वर्षांनंतरही कायम आहे. हृदयरोग असूनही, त्यांची ही धडपड आजही तितक्याच नेटाने सुरू आहे, हे विशेष. त्यांना एका अग्निशामक अधिकाऱ्याने २१ वर्षांपूर्वी दिलेला खाकी गणवेश व हेल्मेट घालून आणि टॉर्च स्वतःजवळ ठेवून ते आगीच्या ठिकाणी झपाट्याने मदतकार्य सुरू करतात. गणात्रा एकटेच आहेत आणि पेशाने इलेक्ट्रिशियन आहेत. त्यांना या कामातून महिन्याला अवघे हजार रुपये मिळतात. उदरनिर्वाहासाठी त्यांचे मित्र त्यांना प्रत्येक महिन्याला २५०० रुपये देतात. इतकी वर्षे सातत्याने केलेल्या त्यांच्या कामाची सरकारनेही दखल घेतली असून, त्यांना यंदा पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ‘बीबीसी’सारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमानेही त्यांच्या कार्याची दखल घेतली होती. त्यांच्या कार्याला सलाम... बजाज कंपनीने ‘दी इन्व्हिन्सिबल इंडियन्स’ या मालिकेत त्यांची दखल घेऊन त्यांच्या कार्यावरची शॉर्टफिल्म तयार केली होती. ती आपल्याला यू-ट्यूबवर पाहता येईल.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search