Next
बंदीश : तालबद्ध रचना
BOI
Tuesday, November 06, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


आम्हांला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही, असं म्हणणाऱ्या रसिकांना, संगीतातील निरनिराळ्या गोष्टींबद्दल कुतूहल असतं. अशा विषयांची रसिकांना अत्यंत सोप्या भाषेत माहिती देण्याचं काम या सदरातून केलं जात आहे. गायक कलाकार एखाद्या रागातून आपल्या बुद्धिकौशल्यानं श्रोत्यांसमोर सौंदर्यपूर्ण स्वरमहाल उभा करतात. त्या प्रक्रियेत ‘बंदीश’ हा महत्त्वाचा घटक असतो. या बंदिशीच्या आधारे रागाचं सादरीकरण केलं जातं.... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी पाहू या ‘बंदीश’ या संकल्पनेबद्दल...
.....................
रंजकता हा संगीताचा मूळ हेतू लक्षात घेतला, तर रागाच्या सादरीकरणात स्वरांची ताकद जितकी श्रेष्ठ, तितकीच त्यांना लाभणारी शब्दांची साथही महत्त्वाची असते. सर्वसामान्यांना जशी निर्गुण भक्तीपेक्षा सगुण भक्ती अधिक भावते, त्याचप्रमाणे निर्गुण स्वरांना सगुण शब्दांची साथ लाभली, की ते अधिक परिणाम साधतात.

भारतीय संगीतात ख्यालगायन हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार मानला जातो. गायक कलाकार एखाद्या रागातून आपल्या बुद्धिकौशल्यानं श्रोत्यांसमोर सौंदर्यपूर्ण स्वरमहाल उभा करतात, त्या प्रक्रियेत ‘बंदीश’ हा महत्त्वाचा घटक मानला जातो. या बंदिशीच्या आधारे रागाचं सादरीकरण केलं जातं. बंदीश या शब्दाचा साधा-सोपा अर्थ, रागातील स्वर वापरून केलेली गीतरचना असा करता येईल. स्थाई आणि अंतरा असे दोन भाग असलेली तालबद्ध रचना. एकूणच रागाचा मूड (रस) ओळखून, त्याला शोभेल अशा विषयाला धरून केलेली अर्थपूर्ण गीतरचना म्हणजे बंदीश.

सुगम संगीतात कवींच्या शब्दांना स्वरांच्या सहाय्यानं नटवून अपेक्षित भाव व्यक्त केला जातो, तर बंदिशीत रागाच्या स्वर-भावाला, स्वभावाला साजेशी शब्दरचना साधायची असते. त्यामुळे बंदिशकाराला कवी आणि संगीतकार या दोन्हीही भूमिका पार पाडायच्या असतात. बंदीश या शब्दातच एक बंधन, बंदिस्तपणा, आखीव-रेखीवपणा सामावलेला आहे. रागाचं स्वरूप, त्याची वैशिष्ट्यपूर्ण स्वरावली साकार करण्याचं काम बंदीश करते. बंदिशीतून रागाचं स्वरूप कळतं, म्हणून ती त्या रागाची प्रतिमा बनते. अशा अनेक पारंपरिक बंदिशी त्या त्या रागाची ओळख बनल्या आहेत. 

‘बिरजमें धूम मचायो श्याम..’ – भीमपलास
‘पायल बाजे मोरी झांजर प्यारे...’ – बागेश्री
‘येरी आली पियाबिन..’ – यमन
‘पायलिया झनकार मोरी..’ – पुरियाधनश्री
‘पियाबिन जियरा निकलो जात है..’ – मारवा
‘कोयलिया बोले, अंबुवा डाल पर...’ - मालकंस

याही पुढे जाऊन असं म्हणता येईल, की एकाच बंदिशीत रागाचं पूर्ण स्वरूप सामावलं जात नाही. म्हणूनच एकाच रागात विविध तालांमधील, विविध लयीच्या अनेक बंदिशी असतात आणि त्यातून निरनिराळ्या अंगांनी रागस्वरूपाचं दर्शन होत असतं. म्हणजे असं पहा, ताजमहालसारखी ऐतिहासिक कलात्मक वास्तू बघायला गेल्यानंतर, केवळ समोरून एकच फोटो काढून समाधान होतं कां? तर नाही. वेगवेगळ्या कोनांतून वेगवेगळी वैशिष्ट्यं टिपत, आपण अनेक फोटो काढतो. ते सर्व फोटो पुन्हा पुन्हा पाहिल्यावर, ताजमहाल या वास्तूच्या सौंदर्याची कल्पना येते. तसंच एकाच रागाची परिपूर्ण कल्पना मनात ठसण्यासाठी, कलाकाराला अनेक बंदिशींचा अभ्यास करावा लागतो. एका रागात जितक्या जास्त बंदिशी माहिती होतील, तितका त्या रागाचा सर्वांगाने परिचय होत जातो आणि त्या रागाचं परिपूर्ण रूप मनात पक्कं होतं.

रागाचे स्वर, ताल, लय, शब्द, भाव असे बंदिशींचे मुख्य घटक मानता येतील. बंदिशीतले शब्द हे गेय असावे लागतात. ते गेय होण्यासाठी ते अधिक मृदू, सांगितिक करून वापरावे लागतात. म्हणजे रतिया, बतिया, सजनवा, सुखवा असे नादमधुर शब्द बंदिशीत वापरलेले दिसतात. रागाच्या भावाशी एकरूप होणारे, अर्थवाही, नादमधूर शब्द असलेली बंदीश रसिकांना अधिक भावते. शब्द-सुरांच्या योग्य मिलाफातून जन्माला आलेली बंदीश अधिक रंजक असते. 

सकाळच्या भैरव रागाच्या स्वरांतून, ‘भोर भई कैसी सुहानी..’  किंवा ‘जागिये रघुनाथ कुंवर, पंछी बन बोले..’, अशी वर्णनं परिणाम साधतात. संध्याकाळच्या हुरहुर लावणाऱ्या मारव्याच्या स्वरांमधून, ‘हो गई सांज, अब नही आये पिया..’, अशी विरह व्याकुळता अनुभवता येते. तर रात्री गायल्या जाणाऱ्या शृंगार रसाच्या बागेश्रीमध्ये, ‘पायल बाजे मोरी झांजर प्यारे, कैसे आऊं तोरे मिलना रे...’ किंवा ‘मोहे मनावन आये हो, सगरी रतिया किन सोतन घर जागे..’, असा सवाल विरहिणी करते. त्यानंतर आणखी उशीरा गायल्या जाणाऱ्या तडफदार सोहनीमध्ये, ‘काहे अब तुम आये हो, मेरे द्वारे..’, असा त्याला उशिरा आल्याबद्दल जाबही विचारते. पहाटे गायल्या जाणाऱ्या ललतसारख्या रागांमध्ये, ‘रैन का सपना, मैं कासे कहूँ..’, असा सवालही नायिका करते. अशा अर्थपूर्ण बंदिशी आणि त्यांचं भावपूर्ण सादरीकरण रसिकांना खूपच आवडतं. 

या रागांच्या निरनिराळ्या भावांचं (स्वरभाव) आणि तो राग गायल्या जाणाऱ्या गानसमयाचं एक अतूट नातं आहे. या विषयावर पुढे विस्तारानं बोलू. सदारंग, अदारंग, मनरंग, प्राणपिया, प्रेमपिया अशा अनेक आद्य बंदिशकारांच्या बंदिशी अजूनही गायल्या जातात. गुरू-शिष्य परंपरेतून या बंदिशी आज आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्याचबरोबर पुढे अनेक नवीन बंदिशकारांनी नवनवीन बंदिशींची भर घातली आहे. कारण बंदीश ही त्यांना त्यांच्या मनातील त्या त्या रागाचा विचार प्रकट करण्याचं माध्यम वाटत असतं. एका रागातील अनेक बंदिशी गाऊनही, त्यात जे सापडत नाही, असं जर काही त्या कलाकाराच्या मनात असेल, तर ते त्याला स्वत:च्या नवीन बंदिशीतून व्यक्त करावंसं वाटतं. या प्रक्रियेत कधी नवीन सुचलेला मुखडा असतो, तर कधी वेगळा ताल खुणावतो तर कधी एखादा नवीन विषयही बंदिशीच्या रचनेची प्रेरणा देऊन जातो.

याबाबतीत माझं स्वत:चंच उदाहरण देते, पूर्वीच्या सामाजिक, कौटुंबिक रितीरिवाजाप्रमाणे, सास-ननंद, मोठं कुटुंब, मोठी घरं, पायल-झांझर (मेखला) अशा पारंपरिक दागिन्यांमुळे पियाच्या भेटीमध्ये अनेक अडथळे यायचे. याचीच वर्णनं पूर्वीच्या बंदिशींमध्ये वारंवार दिसून येतात. आता एकविसाव्या शतकातील नायिका काय म्हणेल...? मग माझ्या बंदिशीत शब्द येतात, ‘छोडूंगी साथ, जा झांजनुवा। तोरे कारन बिगडी मिलनकी रतिया मियामल्हार, बसंत, बहार..’, अशा ऋतुकालीन रागांतील बंदिशींमधून, निरनिराळ्या ऋतूंमधले निसर्गातील बदल आणि त्यानुसार बदलणाऱ्या मानवी भावभावनांचं सुरेख चित्रण केलेलं दिसून येतं. विशेषत: मल्हार रागाच्या सर्व प्रकारांतील बंदिशींतून वर्षा ऋतूचं वर्णन दिसून येतं आणि त्या रम्य वातावरणात अचानक पियाची साथ मिळाली, तर मग काय विचारता?

‘बरखा ऋत आई री। मन ही मन याद पियाकी आई। बरस बरस रहा मेघा रिमझिम।
और अचानक दर्शन पाई पियाके। मनही मन बरखाके गुण गाई।।’ 
एखाद्या राजा-महाराजाच्या दरबारातील विशेष प्रसंगासाठी, त्या राजाचं गुणवर्णन करणाऱ्या बंदिशी आढळतात.

राजनके राजा महाराजा। गरीबनवाजा देत दान। गुनियनमें सब मिल गावो। चरन तक आए, मन भाए फल पाए। तुमबिन कौन खबर ले सिरताजा।।
आपल्या गुरूंबद्दल असलेली भक्ती, निष्ठा, आदरभावही अनेक बंदिशींमधून व्यक्त झालेला दिसतो. ‘न कर अभिमान, जान गुनियनको। गुनकी सेवा, करो ना अवमान।।’ तर या अशा विविध विषयांवरील शास्त्रीय बंदिशी गायकाला मैफिलीत रंग भरायला मदतच करतात. पूर्वीच्या काळी आपल्या खास अशा बंदिशी इतरांना कळू नयेत, मिळू नयेत म्हणूनही जाणीवपूर्वक प्रयत्न होत असत. बंदिशींच्या शब्दांची गरजच काय, रागाचे स्वर पुरेसे आहेत, असंही मत असलेले कलाकार होते, पण आता काळ बदललाय. 

आताच्या पिढीच्या कलाकारांमध्ये, बंदिशीतील शब्दांना योग्य न्याय देऊन सादर करण्याची दृष्टी दिसून येते. याचा प्रत्यय घ्यायचा असेल, तर पं. संजीव अभ्यंकरांनी गायलेला कोणताही राग यू-ट्यूबवर ऐकावा. शास्त्रीय संगीत न कळणाऱ्या रसिकांनाही रागसंगीताचा आस्वाद आवडीनं घेता येईल. सदराच्या पुढच्या भागात पाहू या काही कलाकारांच्या आठवणी....

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होईल. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Prasanna About 348 Days ago
Mast 👍
0
0

Select Language
Share Link
 
Search