Next
बेदर्दी बालमा तुझको...
BOI
Sunday, September 09 | 06:45 AM
15 0 0
Share this story

साधनाआपल्या गोड रूपाने आणि सुंदर अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवलेली अभिनेत्री म्हणजे साधना. दोन सप्टेंबर हा तिचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या तिच्यावर चित्रित झालेल्या ‘बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है’ या गीताचा...
........
सप्टेंबर महिन्यात ज्या काही महान कलावंतांचा जन्मदिन असतो, त्यांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री साधना. एखादा नवीन चित्रपटप्रेमी कदाचित ‘कोण ही साधना’ असा प्रश्न विचारू शकतो. 

साधनात काय वेगळेपण होते, ती कशी होती, हे जाणून घेण्यासाठी १९६०-७०च्या दशकापर्यंत मागे जावे लागेल. साधना शिवदासानी ही सिंधी तरुणी फिल्मालय कंपनीच्या अॅक्टिंग स्कूलमधून अभिनयाचे धडे घेऊन १९६०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह इन सिमला’ चित्रपटातून हिंदी चित्रपटप्रेमींसमोर आली. तसा तिचा ‘अबना’ हा सिंधी चित्रपट त्यापूर्वीच आला होता; पण ‘लव्ह इन सिमला’ चित्रपटाद्वारे ती हिंदी चित्रपटसृष्टीला परिचित झाली. 

हा चित्रपट त्या काळात चांगला चालला आणि लगेच १९६१मध्ये आला देव आनंदचा ‘हम दोनों!’ या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेत्री नंदाही होती. दोन नायकांच्या दोन नायिका! नंदाला मा. विनायकरावांचा वारसा होता, अन्य चित्रपटांचा अनुभव होता; पण साधना मात्र एका चित्रपटाच्या अनुभवाच्या आणि अॅक्टिंग स्कूलच्या धड्यांच्या आधारे ‘हम दोनों’मध्ये वावरली.

‘यहीं कहोगे तुम सदा के दिल अभी नहीं भरा’ अशी लटकी तक्रार करणारी साधना रसिकांना बेहद आवडली. तिची केसांची स्टाइल ‘साधना कट’ म्हणून तरुणींच्यात लोकप्रिय झाली. मग  नायक कधी तिच्यासाठी ‘एक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा...’ अशी आळवणी करू लागला, तर कधी ‘बहुत शुक्रिया, बडी मेहरबानी, मेरी जिंदगी में हुजूर आप आएँ’ अशा शब्दांत तिचा सन्मान करू लागला. ‘जरूरत है, जरूरत है, एक श्रीमती की, कलावती की...’ अशी मागणी नायकाने करावी आणि ती पूर्ण करणारी ‘साधना’ असावी, हा अनुभव ‘मनमौजी’मध्ये प्रेक्षकांनी घेतला. ‘हमने तुझको प्यार किया है इतना...’ अशा शब्दांत ‘दुल्हा दुल्हन’ चित्रपटात राज कपूर तिच्याकरिता पडद्यावर गाताना बघून १९६० ते १९६४ या चार वर्षांत साधनाने काय मिळविले होते, ते लक्षात येते. 

अभिनेत्री श्रीदेवीच्या भूमिकेबद्दल ज्या ‘सदमा’ चित्रपटाचा उल्लेख होतो, त्या ‘सदमा’चे मूळ ‘दुल्हा दुल्हन’ चित्रपटात होते. त्यातील ‘ती’ निरागस बालमनाच्या तरुणीची भूमिका साधनाने साकार केली होती. 

देव आनंद राज कपूरसारखे मातब्बर अभिनेते तिचे नायक म्हणून दिसले आणि ज्युबिली स्टार राजेंद्रकुमारही तिला ‘ए नर्गिसे मस्ताना’ अशी साद घालताना ‘आरजू’मध्ये दिसला! ‘अजी हमसे बचकर कहाँ जाईएगा?’ असा प्रश्न विचारताना तो दिसतो आणि तोच साधनाला ‘ए फूलों की रानी बहारों की मलिका’ अशा विशेषणांनी खूश करतो. १९६३च्या ‘मेरे मेहबूब’ चित्रपटात मुस्लिम खानदानाच्या कथानकातही साधना उपरी वाटली नव्हती. 

साधनाचे सौंदर्य आणि अभिनय हे चित्रपटसृष्टीत चर्चेचे विषय ठरले होते. तिच्या सुदैवाने तिच्यावर अगर तिच्याकरिता चित्रित झालेली गीतेही तिला साजेशी होती. सर्वणा फिल्म्सच्या ‘राजकुमार’ चित्रपटात शम्मी कपूर तर तिला सावध राहायला सांगून सूचित करतो, की ‘निकला न करो तुम सजधज के, इन्सान की नीयत ठीक नहीं...!’

शम्मी कपूरचे हे सांगणे बरोबर होते; पण साधनाची नियत ठीकच होती. त्यामुळे आपली कारकीर्द, आपला अभिनय या व्यतिरिक्त कसलीही वादग्रस्त विधाने अगर कृती असले काही न करता, ती सुनील दत्त, राजकुमार, संजय खान, मोतिलाल अशा नव्या-जुन्या नायकांबरोबर काम करत राहिली.

साधना दिसायला सुंदर नव्हती; पण गोड होती. महत्त्वाचे म्हणजे तिचा अभिनय मनमोकळा होता आणि त्यावर कोणत्याही बुजुर्ग अभिनेत्रीच्या अभिनयाची छाप नव्हती. कॅमेऱ्यासमोर तिचा वावर सहज व स्वाभाविक होता. तिच्या बोलण्यात माधुर्य होते. त्या आधारे ती प्रियकराला ‘आजा आई बहार दिल है...’ अशी साद घालताना दिसली आणि ‘चेहरे पे खुशी जब छा जाती है’ अशा शब्दांत संयत प्रेमाची भावना व्यक्त करणारी तरुणीही साकार करून गेली.

फक्त प्रेमभावनाच नाही, तर ‘जहाँ में ऐसा कौन हैं...’ अशा शब्दांत प्रियकराला धीर देणारी साधना आणि ‘कैसे रहूँ चूप की मैंने पी ही क्या है...’ असे गाणे गात क्लबनृत्य करणारी साधना... अशी साधनाची विविध रूपे मनाला लुभावून गेली होती. ‘तेरा मेरा प्यार अमर’ गीताच्या वेळचा तिचा गोड व सोज्वळ चेहरा आजही मनातून पुसला जात नाही. ‘मेरा साया,’ ‘वह कौन थी’, ‘अनिता’ या चित्रपटांतील गूढरम्य तरुणी म्हणून ती भावली होती. 

संघर्ष चित्रपटात दिलीपकुमारबरोबर काम करण्याची तिची संधी हुकली. नंतर तिला डोळ्यांच्या विकारांनी ग्रासले. तरीही ‘गीता मेरा नाम’ नावाचा सूडपट तिने निर्माण केला; पण ‘बात कुछ बनी नहीं’ तिचा पडद्यावरचा काळ संपुष्टात आला होता. ‘साजन की गलियाँ’ हा देव आनंदबरोबरचा तिचा चित्रपट पूर्ण झाला नाही. ‘ओ सजना बरखा बहार आयी...’ तसेच ‘तुम बिन सजन बरसे नयन’ यांसारख्या पाऊसगीतांतून दूरदर्शनवरून अधूनमधून दिसणारी साधना वृद्धापकाळात दिवस काढत राहिली. 

दोन सप्टेंबर १९४१ ते २५ डिसेंबर २०१५ या कालावधीत भूतलावर राहून हिंदी चित्रपटातील आपल्या सुंदर भूमिका मागे ठेवून ती महायात्रेला निघून गेली. 

तिच्यावर चित्रित झालेल्या अनेक ‘सुनहऱ्या’ गीतांपैकी एक गीत तिच्या नुकत्याच होऊन गेलेल्या जन्मदिनानिमित्ताने आपण आज पाहू या. चित्रपट १९६५चा रामानंद सागर यांचा ‘आरजू!’ संगीतकार शंकर-जयकिशन, गीतकार हसरत जयपुरी!

प्रियकरापासून दुरावलेली, त्याच्या आठवणीने दुःखी झालेली नायिका आपल्या भावना व्यक्त करून त्या प्रियकराला सांगते –
 
बरसता है जो आँखों से वो सावन याद करता है

(हे माझ्या) निष्ठुर प्रियकरा, माझे मन तुझी सतत आठवण काढत आहे. (तुझ्या विरहामुळे माझ्या) नयनांमधून हा जो अश्रूंचा श्रावण वर्षाव करत आहे (तो माझ्या अश्रूंचा थेंब अन् थेंब) तो तुझी आठवण काढत आहे. 

कभी हम साथ गुजरे जिन सजिली राह गुजारों से
खिजा के भेस में गिरते है अब पत्ते चिनारों से
ये राहें याद करती है, ये गुलशन याद करता है

(तुला आठवते का रे?) कधी या सुंदर सजलेल्या पाऊलवाटेवरून वाटचाल केली होती! (त्याच वाटांवरील) चिनार वृक्षांची पाने आता पानगळीच्या (खिजा) निमित्ताने गळून जाऊ लागली आहेत. (खरे तर तू समवेत नसल्यानेच पानगळ आली आहे) (आपण फिरलेल्या) या वाटा, हा बगीचा सारेच तुझी आठवण करून देतात. 

कोई झोंका हवा का जब मेरा आँचल उडाता है
गुमा होता है जैसे तू मेरा दामन हिलाता है
कभी चूमा था जो तूने वो दामन याद करता है

जेव्हा वाऱ्याने अगर हवेच्या झोताने माझ्या खांद्यावरचा पदर हलतो अगर उडतो, तेव्हा मला वाटते की तूच माझ्या पदराशी खेळत आहेस. कधी काळी माझ्या ज्या पदराचे तू चुंबन घेतले होतेस, तो पदर तुझी ही आठवण जागी करत आहे. 

येथे हिंडताना मला हे जाणवते, की 

वो ही है झील के मंजर वही किरणों की बरसातें
जहाँ हम तुम किया करते थे पहरों प्यार की बाते
तुझे इस झील का खामोश दर्पण याद करता है

(या, येथील) तलावाचे हे नयनरम्य ठिकाण तेच आहे आणि सूर्यकिरणांनी हे वातावरण प्रसन्न बनवले आहे. ज्या ठिकाणी तू आणि मी तास न् तास प्रेमाच्या गुजगोष्टी करत असू, ते ठिकाण आणि तलावाचा सुनसान, शांत आरसा... हे सारे तुझीच आठवण करून देत आहेत. 

प्रियकराच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या साधनाचा अभिनय, शंकर-जयकिशनचे मधुर व साजेसे संगीत, हसरत जयपुरी यांचे प्रभावी काव्य आणि लता मंगेशकर यांचा अप्रतिम स्वर! या सगळ्याला चार चाँद लावणारी आणखी एक गोष्ट म्हणजे या गीताच सादरीकरण, काश्मीरचे सौंदर्य, सुंदर फोटोग्राफी. एखादे ‘सुनहरे’ गीत किती बाजूंनी सुनहरे असते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

हे गीत ज्या कलावंतांशी निगडित आहे, त्यातील अनेक कलावंत सप्टेंबर महिन्याशी कसे निगडित आहेत पाहा. साधनाचा जन्मदिन तर सप्टेंबर महिन्यात असतोच; पण लता मंगेशकर यांचाही जन्मदिन सप्टेंबर महिन्यातच (२८ सप्टेंबर) असतो. संगीतकार शंकर-जयकिशनपैकी जयकिशन यांचा स्मृतिदिन १२ सप्टेंबर, तर गीतकार हसरत जयपुरी यांचा स्मृतिदिन १७ सप्टेंबर. हा एक वेगळा योगायोगच!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link