Next
चित्रपटसृष्टीसाठी अनमोल कार्य करणारे दाम्पत्य
पी. आदिनारायण राव आणि अंजलीदेवी
BOI
Sunday, August 05, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

पी. आदिनारायण राव आणि अंजलीदेवीतेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये निर्माता, गीतलेखक, संगीतकार आणि नाटककार अशा अनेक भूमिकांमध्ये गौरवास्पद काम करून एक काळ गाजवणारे कलावंत म्हणजे पी. आदिनारायण राव. त्यांनी तमीळ, तेलुगू, हिंदी आणि मराठीतही चित्रनिर्मिती केली होती. त्यांची पत्नी अंजलीदेवी यांनीही नायिका म्हणून कारकीर्द गाजवली. आदिनारायण यांचा जन्मदिन १२ जुलैला होऊन गेला, तर अंजलीदेवींचा जन्मदिन २४ ऑगस्टला आहे. त्या निमित्ताने, या दाम्पत्याने केलेल्या चित्रपटसृष्टीत केलेल्या किमयेविषयी लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
.........
बऱ्याच वर्षांपूर्वी एका सिनेनियतकालिकात ‘तुमचा आवडता हिंदी संगीतकार कोण?’ असा प्रश्न विचारला गेला होता. अनेकांनी आपापली आवडती नावे सांगितली. एकाने सांगितले- आदिनारायण राव. तोपर्यंत या व्यक्तीने ‘सुवर्णसुंदरी’ या केवळ एकाच चित्रपटाला संगीत दिले होते. एकापेक्षा एक दिग्गज संगीतकार असताना, केवळ गंमत म्हणून ते नाव घेतले होते का, असा प्रश्न मला त्या वेळी पडला होता. ‘सुवर्णसुंदरी’चे संगीत उत्कृष्ट होते, यात काहीच शंका नाही. परंतु वर्षानुवर्षे सातत्याने अप्रतिम संगीत देणारे पन्नास तरी संगीतकार होते. असो. सन १९५८मध्ये ‘सुवर्णसुंदरी’ प्रदर्शित झाला. त्याला सर्वोत्कृष्ट संगीतासाठी त्या वर्षीचे पारितोषिक मिळाले. चित्रपटाची निर्मिती आणि कथा आदिनारायण राव यांचीच होती. तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी गौरवास्पद काम केले. निर्माता, गीत लेखक, संगीतकार आणि नाटककार अशा अनेक भूमिका त्यांनी बजावल्या. त्यांच्या या कर्तृत्वाची ६०च्या दशकात पुरेशी माहिती नव्हती, हे मात्र खरे!

आदिनारायण राव यांचा जन्म १२ जुलै, १९१५ रोजी आंध्र प्रदेशातील काकिनाडा येथे झाला. सन १९५० ते ९० अशी ४० वर्षे त्यांनी चित्रपटसृष्टी गाजवली. संगीतकार म्हणून त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. निर्माता बनून त्यांनी १३-१४ ‘सुपरहिट’ चित्रपट काढले आणि २५ चित्रपटांना संगीत दिले. ए. नागेश्वर राव यांच्यासह ‘अश्विनी पिक्चर्स’ची स्थापना केली. त्या बॅनरखाली अनेक तेलुगू, तमीळ चित्रपट काढले. अंजली देवी या प्रसिद्ध अभिनेत्रीशी विवाह झाल्यानंतर त्यांनी ‘अंजली पिक्चर्स’ची १९५१मध्ये स्थापना केली. हिंदुस्तानी रागदारीचा उपयोग करून, गोड आणि सुगम चालींचे त्यांचे चित्रपटसंगीत विलक्षण लोकप्रिय ठरले. सर्वसामान्य व जाणकार रसिकांनाही त्या संगीताने वेड लावले. आज वर्षानुवर्षे ते टिकून राहिलेले आहे. तेलुगूतील ‘अनारकली’ आणि ‘सुवर्णसुंदरी’ला त्यांचेच संगीत लाभले होते. लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि दक्षिणेतील काही प्रसिद्ध संगीतकारांनी आदिनारायण राव यांचे सहायक म्हणून काम केले होते.

सहाव्या वर्षीच बालकलाकार म्हणून त्यांची नाट्य-चित्र कारकीर्द सुरू झाली. अनेक पौराणिक भूमिका त्यांनी केल्या. नंतर शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. बाराव्या वर्षी त्यांना अनेक वाद्ये  वाजवता येत होती, तर हार्मोनियममध्ये खास गती होती. संगीतकार, तसेच नाटककार म्हणून त्यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेचे दर्शन घडवले. त्यांची अनेक तेलुगू नाटके गाजली. त्याच काळात भावी पत्नी अंजली देवी हिच्याशी परिचय झाला. १९४६मध्ये ‘वरुधिनी’ नावाच्या चित्रपटाद्वारे त्यांची नवी कारकीर्द सुरू झाली. त्याची गीते आणि संगीत त्यांचेच होते. ‘गोलाभामा’ चित्रपटाने संगीतकार म्हणून त्यांनी अफाट लोकप्रियता मिळवली  आणि ते तेलुगू चित्रसृष्टीत सुस्थिर झाले. अंजलीदेवीने त्याच चित्रपटात नायिका म्हणून काम केले होते. त्यांच्या ओळखीचे प्रेमात रूपांतर होऊन १९४८मध्ये ते विवाहबद्ध झाले. त्यांना दोन मुले झाली. सैला राव ही त्यांची नात आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे. राव यांनी तमीळ, तेलुगू, हिंदी आणि मराठीत चित्रनिर्मिती केली. त्यांच्या बहुतेक चित्रपटांत अंजली देवी हीच नायिका आणि ए. नागेश्वर राव नायक होते.

सुवर्णसुंदरी चित्रपटातील दृश्य.हिंदीत त्यांनी दोन चित्रपट काढले. १९५८मध्ये ‘सुवर्णसुंदरी’ आणि १९६४मध्ये ‘फूलों की सेज.’ दोन्हींना त्यांचीच पटकथा होती. हा ‘हिंदी’ इतिहास बघण्यासारखा आहे. ‘सुवर्णसुंदरी’ प्रथम तमीळमध्ये प्रदर्शित झाला. त्यात जेमिनी गणेशनने प्रमुख भूमिका केली होती. स्वर्गातील एक परी मानवी राजकुमाराच्या प्रेमात पडते. इंद्र त्यांना शाप देतो आणि ती दोघे अलग होतात आणि अखेरीस त्यांचे पुनर्मीलन होते. तेलुगूत अंजलीदेवी आणि नागेश्वर यांच्याच भूमिका आहेत. संगीत अर्थातच आदिनारायण राव! त्याचे दिग्दर्शक होते वेदांतम राघवै (मे १९५७). त्याचे डबिंग करून हिंदी चित्रपट काढावा, असा त्यांचा विचार होता. परंतु लता मंगेशकर यांनी तेलुगू चित्रपट पाहून असा सल्ला दिला, की हिंदीतच त्याची निर्मिती करावी. त्यानुसार १९५८मध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. संगीतामुळे तो ‘सुपरहिट’ ठरला. ४८ ठिकाणी तो ५० दिवस, तर १८ ठिकाणी १०० दिवस चालला. काही ठिकाणी रौप्यमहोत्सवही झाला. लता आणि रफी हे प्रमुख पार्श्वगायक होते. ‘कुहू कुहू’, ‘मुझे ना बुला’, ‘राम नाम जपना’ आणि ‘एक तराना’ ही त्यातील अवीट गाणी आजही अत्यंत लोकप्रिय आहेत.

‘फूलों की सेज’ १९६४मध्ये हिंदीत निघाला. संगीत राव यांचेच होते. बहुतेक कलाकार मात्र हिंदीतील आघाडीचे होते. वैजयंतीमाला, मनोज, अशोककुमार, निरुपा रॉय, मेहमूद, ललिता पवार, कन्हैयालाल, शुभा खोटे आणि अंजलीसुद्धा त्यात होती. हा सुमारे अडीच तासांचा कृष्णधवल चित्रपट होता. बॉक्स ऑफिसवर एकूण ९० लाख रुपये उत्पन्न झाले. त्यातील ४५ लाख हा निव्वळ नफा होता. (रुपयाचे अवमूल्यन लक्षात घेता आज तो ७० कोटींच्या जवळपास जातो.) १९६५मध्ये, सती सखूबाई (अंजली देवी) हा तेलुगू चित्रपट निघाला. तोच डब करून ‘सखू आली पंढरपुरा’ हा मराठी चित्रपट १९६९मध्ये निघाला. त्यातली गीते ‘गदिमा’ व पी. सावळाराम यांची होती आणि संगीत दत्ता डावजेकर यांनी दिले होते. त्यातील ‘जय पांडुरंग प्रभो विठ्ठला, जगदाधारा हरी विठ्ठला’ हे भैरवीतले मधुर गाणे म्हणत संत सखू श्री विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये विलीन होते. आज ५० वर्षांनंतरही तो चित्रपट समोर संपूर्ण उभा राहतो.           
     
अंजलीदेवीअंजली देवींनी पत्नी आणि व्यवसायातील भागीदार म्हणून पतीला अखेरपर्यंत उत्तम साथ दिली. त्यांचा जन्म २४ ऑगस्ट १९२७ला पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या ‘पेद्दापुरम’ या गावी (पूर्वीचे मद्रास आणि आताचे आंध्र प्रदेश राज्य) झाला. चित्रपटांत येण्यापूर्वी त्यांनीही नाटकांत कामे केली होती. एल. व्ही. प्रसाद यांच्या ‘काष्टजीवी’ या चित्रपटात नायिका म्हणून त्यांनी पदार्पण केले; परंतु तो अर्धवटच सोडण्यात आला. १९४७च्या ‘गोलाभामा’ या चित्रपटातील ‘मोहिनी’च्या भूमिकेमुळे त्या रातोरात ‘स्टार’ झाल्या. त्यांनी एकूण ३५० तेलुगू आणि काही तमीळ, कन्नड चित्रपटांत भूमिका केल्या. शिवाय मराठीतली ‘सखू.’ १९५५मध्ये ‘अनारकली’ हा तेलुगू चित्रपट त्यांनीच निर्माण केला. प्रमुख भूमिकेत त्याच होत्या आणि ‘सलीम’ होते नागेश्वर राव. निर्मात्या म्हणून त्यांनी एकूण २७ चित्रपट केले. सत्यसाईबाबांच्या त्या निस्सीम भक्त होत्या. त्यांच्यावर दूरदर्शनसाठी त्यांनी एक खास मालिका बनवली.

पुढे ते चेन्नईमध्ये स्थायिक झाले. पती आदिनारायण यांचा मृत्यू १९९१मध्ये, ७६व्या वर्षी झाला. अभिनयासाठी अंजलीदेवींना चार ‘फिल्मफेअर’सह १० पारितोषिके मिळाली. आदिनारायण यांच्या नावे त्यांनी २०११मध्ये एक पुरस्कार सुरू केला. त्याचा पहिला मान प्रसिद्ध पार्श्वगायिका पी. सुशीला यांना मिळाला. १३ जानेवारी २०१४ रोजी ८६व्या वर्षी अंजलीदेवींचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे चेन्नईच्या ‘रामचंद्र मेडिकल कॉलेज’ला त्यांचे देहदान करण्यात आले.

अंजली आणि आदिनारायण यांनी एक आदर्श संसार करून, भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महान, अनमोल असे कार्य केले. त्यांना विनम्र अभिवादन!
रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search