Next
देणाऱ्या हातांना घेणाऱ्या हातांपर्यंत पोहोचवणारा ‘दिशा परिवार’
BOI
Tuesday, October 31, 2017 | 03:45 PM
15 0 0
Share this story

‘आम्ही फक्त दोन हातांमधलं अंतर कमी करतो’ असं नेमकं आणि अर्थपूर्ण घोषवाक्य ‘दिशा परिवार’ या पुण्यातल्या धर्मादाय संस्थेचं कार्य स्पष्ट करतं. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज पाहू या ‘दिशा परिवार’चे संस्थापक राजाभाऊ चव्हाण यांच्याशी ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न पेठे यांनी साधलेला संवाद...
.........................
- आपल्या संस्थेची सुरुवात नेमकी कोणत्या उद्दिष्टानं झाली?
- आपल्या राज्यघटनेनं प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिला आहे आणि आजच्या जगात शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे; पण चांगलं शिक्षण घेणं अत्यंत महाग झालं आहे. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, बुद्धी आहे, पण पैसा नाही अशा गुणवंत विद्यार्थ्यांना त्यामुळे आपल्या आवडीच्या विषयातलं किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण घेण्यापासून वंचित राहावं लागतं. त्यामुळे अशा गुणी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी, त्यांची आर्थिक निकड पूर्ण करण्यासाठी आम्ही २००७ साली ‘दिशा परिवार’ या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. या संस्थेतर्फे आम्ही महाराष्ट्रातल्या गरीब, गरजू आणि मुख्यत्वे हुशार मुलांना मदत करतो.  

- या ट्रस्टचं काम कसं चालतं?
- आम्ही ट्रस्टसाठी देणग्या स्वीकारत नाही आणि देतही नाही. आम्ही फक्त मध्यस्थाचं काम करतो. 

- म्हणजे देणाऱ्या हातांना घेणाऱ्या हातांपर्यंत पोहोचवता? 
- बरोबर. आमचे व्यवहार अत्यंत पारदर्शक आहेत. देणगी अथवा मदत देणाऱ्या व्यक्तीला आम्ही गरजू विद्यार्थ्याचं नाव कळवतो. असे देणगीदार मग त्या विद्यार्थ्याच्या नावे किंवा जिथे अॅडमिशन घायची आहे त्या कॉलेजच्या नावे त्याच्या वतीने चेक देतात. क्वचित काही मंडळींना टॅक्स बेनिफिटसाठी आमच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या नावे चेक द्यायचा असतो. अशा वेळी तो चेक स्वीकारून लगोलग त्याच रकमेचा चेक ट्रस्टतर्फे गरजू विद्यार्थ्याच्या नावे दिला जातो.  

- २००७पासून आजपर्यंत किती विद्यार्थ्यांना या माध्यमातून मदत मिळाली?
- गेल्या दहा-अकरा वर्षांत आम्ही महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांतल्या मिळून तीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मदत पुरवली आहे.  

- एखाद्या विद्यार्थ्याला मदतीसाठीचे निकष सर्वसाधारपणे काय असतात? 
- आम्ही साधारणपणे चार-पाच गोष्टींचा विचार करतो. सर्वप्रथम जो विद्यार्थी अनाथ आहे त्याला प्राधान्य देतो. तसंच अल्पभूधारक, शेतकरी, मजूर यांच्या मुलांना आम्ही मदत करतो. याशिवाय रिक्षाचालक, वॉचमन, झोपडपट्टीमध्ये राहणारे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे अशांच्या मुलांना आम्ही मदत पुरवतो. साधारपणे पाच हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाते.  

- याशिवाय ट्रस्टचे इतर काही उपक्रम, वैशिष्ट्ये याबद्दल सांगा...
- ट्रस्टच्या माध्यमातून शिकणाऱ्या आणि शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी डिसेंबर महिन्यात व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आयोजित केलं जातं. ज्यांना घरी अभ्यासासाठी जागा नाही, अशांसाठी सदाशिव पेठेमध्ये अण्णा भाऊ साठे प्रशालेमध्ये अभ्यासिका सुरू केली आहे. आणि त्याचा लाभ घेऊन बरेच विद्यार्थी कृषी अधिकारी, आरोग्य सेवक, पोलीस उपनिरीक्षक, मंत्रालय असिस्टंट अशा विविध पदांवर नियुक्त झाले आहेत. देणगीदारांकडून मिळालेल्या पैशांसंदर्भात पूर्ण पारदर्शकता हे आमचं वैशिष्ट्य आहे. देणगीमधला एकही पैसा ट्रस्टच्या प्रशासकीय, प्रिंटिंग, इतर कार्यक्रम किंवा शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरला जात नाही. आमच्या शिष्यवृत्ती वितरण समारंभातसुद्धा ‘दिशा परिवार’चे माजी विद्यार्थी संयोजन करतात आणि सर्व जण विनामूल्य काम करतात. 

- लोकांना काय आवाहन कराल?
- दिवसेंदिवस शिक्षणासाठी लागणारा खर्च झपाट्यानं वाढतो आहे. गरजू विद्यार्थ्यांची संख्याही वाढते आहे. दिशा परिवाराने जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत आजपर्यंत मदत केली आहे. ती अशीच चालू राहण्यासाठी समाजातल्या दानशूर मंडळींनी पुढे येऊन ‘दोन हातांमधलं अंतर कमी करण्याच्या’ आमच्या या कार्याला आर्थिक पाठबळ द्यावं, असं नम्र आवाहन.   

संस्थेच्या पुढच्या वाटचालीसाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ परिवारातर्फे शुभेच्छा.

संपर्क : दिशा परिवार, पुणे
मोबाइल : ९१५८३ ८३८५२
ईमेल : dishapariwar.pune@gmail.com
वेबसाइट : http://dishapariwar.org

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

(संस्थेची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link