Next
आधुनिक माध्यमे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी पूरक
‘बुकगंगा’च्या संचालिका सुप्रिया लिमये यांचे प्रतिपादन
BOI
Thursday, April 25, 2019 | 04:41 PM
15 0 0
Share this article:

साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे आयोजित ‘अभिव्यक्तीची नवी माध्यमे - ई कार्यक्षम लेखन’ या विषयावरील व्याख्यानात बोलताना ‘बुकगंगा डॉट कॉम’च्या संचालिका सुप्रिया लिमये

पुणे : ‘माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याला आपल्या भावना, मते समाजातील अन्य घटकांपर्यंत पोहोचवायला आवडते. आधुनिक काळात इंटरनेटच्या साह्याने चालणाऱ्या विविध माध्यमांद्वारे कोणत्याही अभिव्यक्ती संकोचाविना आपल्या भावना, मते, विचार एका क्षणात जगभरात पोहोचवणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाचा हा आविष्कार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विकासासाठी महत्त्वाचे साधन ठरले आहे,’ असे मत ‘बुकगंगा डॉट कॉम’च्या संचालिका सुप्रिया लिमये यांनी व्यक्त केले. 

पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे शीला घाटपांडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिव्यक्तीची नवी माध्यमे - ई कार्यक्षम लेखन’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब, ट्विटर, लिंक्ड इन, तसेच ब्लॉग, ई-बुक, ऑडीओ बुक या सर्व माध्यमांची माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली. 


‘कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला सहजपणे हाताळता येण्यासारखी ही माध्यमे प्रत्येकाला आपली मते, लेखन अगदी सहजपणे, अत्यंत कमी खर्चात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची संधी देतात. त्यामुळे प्रत्येकाने त्यांचा वापर केला पाहिजे,’ असेही त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, ‘तरुण पिढी अगदी सहजपणे या माध्यमांचा प्रभावी वापर करते. यू-ट्यूबसारख्या माध्यमातून अगदी सुई-दोरा ओवण्यापासून ते वेगवेगळ्या पाककृतीपर्यंत विविध प्रकारचे साहित्य व्हिडिओ, फोटो यांच्या साह्याने लोकांपर्यंत पोहोचवता येते. फेसबुकमध्ये असलेल्या काही सुविधांचा वापर करून आपल्याला आपले लेखन ठरविक वयोगट किंवा ठराविक विभागातील लोकांपर्यंत पोहोचवायचीही सोय आहे. व्यावसायिक माहिती ठराविक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. इन्स्टाग्रामसारख्या माध्यमातून आकर्षक फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत अगदी काही क्षणांत पोहोचता येते. ‘लिंक्ड इन’सारख्या व्यावसायिक माहिती देणाऱ्या माध्यमावर दर दोन सेकंदाला शेकडो व्यावसायिक व्यक्तींची माहिती उपलब्ध होते. ट्विटरसारख्या माध्यमात अगदी कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त माहिती देता येते. या माध्यमांचा वापर कसा केला जातो, कोणते शब्द वापरले जातात, याचा अभ्यास करून त्यांचा प्रभावीपणे वापर कसा करायचा हे प्रत्येकाने शिकले पाहिजे.’

‘साहित्य क्षेत्रात फेसबुकबरोबर ब्लॉगच्या उपलब्धतेमुळे लाखो लेखकांना आपले विचार जगभरात पोहोचवण्याची संधी मिळाली आहे. पूर्वीच्या काळात, आपले लेखन हाताने लिहून किंवा टाइप करून ते प्रकाशकांकडे घेऊन जावे लागत असे. त्यांना आवडले तर त्याचे पुस्तक काढले जाण्याची संधी मिळत असे. आता ब्लॉगच्या माध्यमामुळे केवळ इंटरनेटच्या आधाराने अगदी मोबाइलवरदेखील आपण आपले लेखन करून ते लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्याला शब्द, जागा, वेळ याची मर्यादा नाही. लोकांना लेखन आवडले तर ते लगेच त्यांची प्रतिक्रिया देऊ शकतात. त्याचप्रमाणे ब्लॉगला मिळणाऱ्या पसंतीवरून जाहिरातींद्वारे आर्थिक उत्पन्नही मिळवता येते. त्यामुळे आजकाल ब्लॉग हे लिहायला आवडणाऱ्यांमध्ये लोकप्रिय माध्यम आहे,’ असेही लिमये म्हणाल्या.

मुद्रित माध्यमानंतर आता साहित्य क्षेत्रात ई-बुक आणि ऑडिओ बुक ही दोन माध्यमेदेखील लोकप्रिय झाली आहेत, असे त्यांनी सांगितले. ‘कागदावर लिहिलेले लेखन कालांतराने कदाचित नष्ट होऊ शकते; पण डिजिटल माध्यमामुळे ते कालातीत करणे शक्य झाले आहे. मुद्रित माध्यमातील पुस्तक काही वर्षांनी उपलब्ध होत नाही. त्यावर उत्तम उपाय म्हणजे ई-बुक. यामध्ये पुस्तक तयार असेल, तर त्याची पाने स्कॅन करून डिजिटल स्वरूपात ते पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध केले जाते. त्याची किंमत मुद्रित पुस्तकाच्या किमतीपेक्षा कमी असते. आज हजारो पुस्तके ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. ‘बुकगंगा’ने याची सुरुवात केली, तेव्हा त्याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती; पण आज हजारो पुस्तके ई-बुकच्या स्वरूपात ‘बुकगंगा’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इंटरनेटच्या साह्याने आपल्या आवडीचे पुस्तक डाउनलोड केले की, मोबाइल, संगणक, किंडल अशा माध्यमातून कुठेही, केव्हाही वाचता येते. यात अक्षराचा आकार कमी जास्त करता येतो, तसेच हजारो पानांचे पुस्तकही वजनाला हलक्या असलेल्या किंडल, टॅब, मोबाइलमध्ये सामावू शकते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी हे माध्यम अत्यंत सोयीचे आहे. तरुणाईलाही याचा वापर करणे आवडते. ई-बुकबरोबर लोकांना ऑडिओ बुक्सही आवडू लागली आहेत. यामध्ये पुस्तकातील साहित्य ध्वनिमुद्रित केले जाते. त्यामुळे मोबाइल, संगणकाद्वारे ध्वनीमुद्रित लेखन संकेतस्थळ, अॅपच्या माध्यमातून उपलब्ध होते. कुठेही, कधीही आणि केव्हाही आपण हे लेखन ऐकू शकतो. तरुण पिढीमध्ये हे माध्यम लोकप्रिय आहे. तरुणाईला वाचनाकडे वळवण्यात या माध्यमाचा मोठा वाटा आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही ते सोयीचे पडते. लेखकांना अगदी अल्प खर्चात आपले लेखन जगभरात पोहचवणे शक्य होते. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनेही हे माध्यम फायद्याचे आहे,’ असे त्यांनी सांगितले. 

या संदर्भात महिला सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सुप्रिया लिमये यांनी सविस्तर उत्तरे दिली आणि शंकानिरसन केले. 

या वेळी मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला गोखले, कार्यवाह शलाका माटे, कार्यकारी विश्वस्त मंदा खांडगे, कार्यकारिणी सदस्य अंजली कुलकर्णी, लीना दामले, आरती देवगावकर, यामिनी रानडे यांच्यासह अन्य सदस्य, शीला घाटपांडे यांच्या कन्या आणि जावई उपस्थित होते. वंदना लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. शलाका माटे यांनी आभार मानले. 


(व्याख्यानाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 150 Days ago
Knowledge is no longer a monopoly , privilege of the few . That is what Internet has done . If you do not make use of it , It is your own fault .
0
0

Select Language
Share Link
 
Search