Next
दुखणं बऱ्याचदा मनाचं असतं..
BOI
Saturday, July 28, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this article:


सगळ्या चाचण्या करून घेतल्यानंतर असं समजलं, की तिच्या या त्रासामागे कोणतंच शारीरिक कारण नाही. कारण तिच्या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट्स अगदीच 'नॉर्मल' आहेत. तेव्हा डॉक्टरांनी तिला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. हे समजल्यावर मात्र सगळ्यांनाच टेंशन आलं.... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मानसिक आरोग्याच्या अस्वास्थ्याबद्दल...
..........................
३० वर्षांची शुभदा (नाव बदलले आहे) एकदा भेटायला आली. तिच्याबरोबर तिची आई आली होती. भेटीसाठी आली तेव्हा शुभदा खूप अस्वस्थ वाटत होती. काही वेळ गेला, तरी ती बोलायला तयार होईना, म्हणून मग तिच्या आईनेच पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात केली.

दोन वर्षांपूर्वी शुभदाचं लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या नवऱ्याची दुसऱ्या ठिकाणी बदली झाली आणि त्या दोघांना दुसऱ्या शहरात राहायला जावं लागलं. तिथे जाऊन काही महिने झाले. शुभदादेखिल उच्चशिक्षित असल्याने नवीन घराची घडी नीट बसल्यावर तीदेखिल नोकरी करू लागली. सुरुवातीचे एक-दोन महिने चांगले गेले, पण नंतर मात्र हळूहळू तिला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. धावपळीमुळे त्रास होत असावा, असे वाटून सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर हळूहळू तिचा हा त्रास वाढतच गेला. ही डोकेदुखी तिला असह्य होऊ लागली. अखेर ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी लक्षणं विचारून औषधे दिली, पण त्यांचा काहीच उपयोग होईना.

हळूहळू या डोकेदुखीबरोबर अंगावर सतत पुरळ उठण्याचा त्रासही तिला होऊ लागला. याहीकडे सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण डोकेदुखीप्रमाणेच तिचा हा त्रासही वाढतच गेला. त्यामुळे यावरही तिने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यायला सुरुवात केली. पुन्हा तेच, डोकेदुखीप्रमाणेच याही आजारावर कोणताच उपाय लागू होईना. त्यामुळे डॉक्टरांनी तिला बऱ्याच शारीरिक तपासण्या करून घेण्यास सांगितले. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या चाचण्या करून घेतल्यानंतर असं समजलं, की तिच्या या त्रासामागे कोणतंच शारीरिक कारण नाही. कारण तिच्या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट्स अगदीच 'नॉर्मल' आहेत. म्हणजेच तिच्या डोकेदुखी आणि शरीरावर पुरळ उठणे या त्रासांमागे वेगळंच काहीतरी कारण आहे. हे समजल्यावर मात्र सगळ्यांनाच टेंशन आलं. कारण त्रासाचं निदानच न झाल्याने काय उपाय करावेत, हे कोणालाच समजेना आणि सुरू असलेल्या उपायांचा आजारावर काहीच उपयोग होईना. तेव्हा डॉक्टरांनी तिला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
डॉक्टरांनी असं सांगितल्यामुळे शुभदा आणखीच घाबरली. आपल्याला काहीतरी मानसिक आजार झाला आहे, या विचाराने ती पार खचून गेली. या सगळ्यातून बदल म्हणून ती काही दिवस आईकडे राहायला आली आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर तिची आई तिला समुपदेशनासाठी घेऊन आली. 

तिची ही सगळी समस्या लक्षात आल्यावर सर्वप्रथम तिला हा विश्वास दिला, की ही कोणतीही गंभीर मानसिक समस्या नाही, पण यावर योग्य वेळी उपाय करणं आवश्यक आहे. यात कोणतीही गंभीर मानसिक समस्या नाही हे समजल्यावर शुभदाच्या आणि आईच्या मनावरचा ताण हलका झाला. ताण कमी झाल्याने शुभदा मोकळेपणाने बोलायला लागली. तिच्याबरोबर संवाद साधताना असं लक्षात आलं, की शुभदाला लग्नापुर्वी फारसं काम करण्याची सवय नव्हती. लग्नानंतरही ती एकत्र कुटुंबात राहत असल्याने तिच्यावर कामाचा फारसा ताण पडत नव्हता. नोकरीवरून घरी आल्यावर ती जमेल तसं काम करत होती. पण नवऱ्याची बदली झाल्याने आणि स्वतंत्र संसार उभा करावा लागल्याने, आता मात्र घरातल्या प्रत्येक लहान-मोठ्या कामांची जबाबदारी शुभदावर पडायला लागली. त्यातच स्वतंत्र संसार म्हणून आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी तिला नोकरीही करणे अनिवार्य होते. या दोन्ही बाजू सांभाळणं तिला जड जात होतं.

नवऱ्याला घरकामात मदत करायची सवय नसल्याने तिची खुपच धावपळ व्हायची. कामात गोंधळ व्हायचा. चुका व्हायच्या त्यामुळे घरी नवरा आणि कंपनीत बॉस यांच्या सततच्या रोषाला तिला लागायचा. त्यामुळे आपण घर सांभाळायला, परिस्थितीला तोंड द्यायला असमर्थ आहोत अशी अपराधी भावना सतत तिच्या मनाला टोचत रहायची. मी सर्व जबाबदाऱ्या पार पाडायला असमर्थ आहे हा एकच विचार तिच्या मनात पक्का बसला होता. या विचारामुळे तिच्यावर आलेल्या या अतिरिक्त ताणामुळेच तिला डोकेदुखी आणि पुरळ उठणे हे शारीरिक त्रास उद्भवले होते.

तिची ही समस्या लक्षात आल्यावर तिला आणि सोबत तिच्या नवऱ्यालाही हा ताण कमी करण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. हा अतिरिक्त ताण आणि त्याचे शारीरिक परिणाम कमी करण्यासाठी काही मानसशास्त्रीय उपचार पद्धती व तंत्रांचा यात समावेश करण्यात आला. याला दोघांनीही उत्तम प्रतिसाद दिल्याने शुभदाच्या तब्येतीत चांगली सुधारणा घडून आली आणि ती पुन्हा नव्या जोमाने दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम पद्धतीने पार पाडण्यास सज्ज झाली.

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search