Next
भीती दुराव्याची...
BOI
Saturday, June 23, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

बाबांपासून लांब गेल्याचं दु:ख तर राघवला होतंच, पण आईसुद्धा फारशी भेटत नसल्याने, तिचा सहवास पूर्वीपेक्षा खूपच कमी मिळत असल्याने आपण तिच्यापासूनही दुरावले जातोय, अशी भीती त्याच्या मनात निर्माण होऊ लागली होती... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मुलांमधील ‘सेपरेशन अँक्झायटी’ अर्थात दुराव्याच्या भीतीबद्दल...
.................
सहा-सात वर्षांच्या राघवला घेऊन त्याचे आजी-आजोबा भेटायला आले. सुरुवातीला त्यांनी स्वतःची व राघवची ओळख करून दिली. ओळख करून दिल्यावर आजी त्याला घेऊन बाहेर गेली. ते दोघे बाहेर गेल्यावर आजोबांनी समस्या सांगायला सुरुवात केली. ‘राघव आमचा नातू, म्हणजे आमच्या मुलाचा मुलगा. मुलाचं लग्न झालं आणि त्याला लगेच एक चांगली नोकरी मिळाली. म्हणून दोघे नवरा-बायको मुंबईला राहायला गेले. त्यानंतर एक-दोन वर्षांतच राघवचा जन्म झाला. तो पाच वर्षांचा होईपर्यंत ते मुंबईतच राहत होते, पण सहा-सात महिन्यांपूर्वी एका अपघातात माझा मुलगा वारला आणि आमच्यावर आभाळच कोसळलं. त्याला वाचवण्याचा डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही,’ हे सांगताना आजोबांना रडू आवरलं नाही. 

थोडंसं शांत झाल्यावर ते पुन्हा बोलायला लागले, ‘मुलगा गेल्यावर सुनेला व नातवाला आम्ही इकडे परत घेऊन आलो. आता घराची आर्थिक बाजू सावरण्यासाठी माझी सून नोकरी करत आहे. नातवाकडे आता आम्हीच पूर्ण वेळ लक्ष देतो. त्याचं खाणं-पिणं, अभ्यास, शाळा कसलंच दडपण तिच्यावर येऊ देत नाही. ती हळूहळू या धक्क्यातून सावरतेय, पण माझा नातू मात्र यातून अजूनही सावरला नाही असं आम्हांला वाटतंय. घरी तो अगदी एकटा  एकटा आणि शांत असतो फारसं काही बोलत नाही, खेळत नाही, नीट पोटभर खात नाही. सारखा उदास असतो. त्याच्या मनात सतत कसली तरी भीती असते. कित्येकदा रात्रीसुद्धा रडत-रडत उठतो. कधी कधी अंथरूण ओलं करतो. काय करावं काही कळत नाही. त्याचं बालपणच हरवून गेलंय. आम्हाला खूप काळजी वाटते त्याची. परवा आम्ही यांच्या मैत्रिणीकडे गेलो होतो, तेव्हा हा विषय निघाला. तेव्हा त्याच्या सुनेने त्याला समुपदेशकांकडे घेऊन जा सांगितलं, म्हणून आम्ही त्याला घेऊन आलो आहोत. त्याच्या आईलाही खूप काळजी वाटते. ती बिचारी नोकरीमुळे त्याला वेळच देऊ शकत नाही,’ एवढं बोलून आजोबा थांबले. त्यांना पुन्हा रडू आलं. ते थोडे शांत झाल्यावर आणखी आवश्यक माहिती घेऊन पुढील सत्र निश्चित केले. 

ठरल्याप्रमाणे आजोबा पुढील सत्रासाठी राघवला घेऊन भेटायला आले. त्यांच्याशी थोडा संवाद साधल्यानंतर राघवशी संवाद साधायला सुरुवात केली. आधी तो फारसा बोलला नाही, नंतर मात्र त्याच्याबरोबर छान ओळख झाल्यावर तो खूप मोकळा झाला. त्याला बाबा खूप आवडत होते. त्यांची आठवण आली, की खूप रडू येतं, हेसुद्धा त्यानं अगदी मोकळेपणाने सांगितलं; पण ही सगळी केवळ एवढीच समस्या नव्हती, हे त्याच्याशी बोलताना वारंवार लक्षात येत होतं.

त्याची समस्या जाणून घेण्यासाठी नंतरच्या काही सत्रात ‘प्ले थेरपी’ या थेरपीप्रकारामधील काही तंत्रांचा वापर केला. या सत्रांमधील निरीक्षणांतून आणि त्याच्याशी साधलेल्या संवादातून त्याची समस्या स्पष्ट झाली. बाबांपासून लांब गेल्याचं दु:ख तर त्याच्या मनाला होतंच; पण आईसुद्धा फारशी भेटत नसल्याने, तिचा सहवास पूर्वीपेक्षा खूपच कमी मिळत असल्याने आपण तिच्यापासूनही दुरावले जातोय, अशी भीती त्याच्या मनात निर्माण होऊ लागली होती. आजी-आजोबा त्याची खूप काळजी घेत असले, तरी आधी वडील आणि नंतर आई या दोघांचा सहवास परिस्थितीमुळे मिळत नव्हता. हीच त्याची समस्या होती. 

वडिलांचा सहवास मिळणं शक्य नसलं, तरी आईच्या काही प्रयत्नांतून, छोट्या-छोट्या बदलांतून त्याची समस्या हळूहळू कमी होणार होती. तसेच ही परिस्थिती स्वीकारणंही त्याला सोपं जाणार होतं. त्यामुळे पुढील काही सत्रांत आई, आजी - आजोबा यांनाही समुपदेशन करण्यात आलं. त्यांना सुचवलेले सर्व प्रयत्न सर्वांनी मनापासून केले. त्यामुळे राघवच्या मनातली दुरावा होण्याची भीती किंवा ‘सेपरेशन अँक्झायटी’ कमी होत गेली. आणि इतर समस्याही आपोआपच कमी झाल्या. तो पूर्वीसारखा छान वागायला लागल्यामुळे आजी-आजोबांच्या मनावरचा ताणही कमी झाला.

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search