Next
..आणि सामान्य माणूसही होतो जिगरबाज सैनिक..
BOI
Saturday, December 23 | 09:45 AM
15 0 0
Share this story

पहलगाम बेस कॅंप, काश्मीर

अमरनाथ यात्रा पुढे धार्मिक न राहता ती हळूहळू राष्ट्रीय यात्रा होऊ लागते आणि शेवटी ती फक्त सर्वसामान्य भारतीय माणसाची देशविघातक प्रवृत्तींविरोधी असलेली राष्ट्रीय यात्रा होते. सैनिक शस्त्रानिशी तिथे झुंजत असतातच, पण दरवर्षी आतंकवादी कारवायांना न जुमानता तिथे जाणारा सामान्य माणूसही एक जिगरबाज निःशस्त्र सैनिक होऊन जातो... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा नववा भाग...
...............................................................
बालताल, काश्मीरबसने जवाहर (बनिहाल) बोगदा पार केला आणि आम्ही काश्मीर खोऱ्यात प्रवेशते झालो. सहा तासांपासून असलेला घाटरस्ता संपून सरळ रस्ता सुरू झाला. पोटातील स्नायूंचा वळणदार व्यायाम संपला एकदाचा.! या व्यायामामुळे अनेक यात्रेकरूंनी प्रवासात उलट उत्सर्जनकर्म केले होते. पुढे एक गाव लागलं. त्या गावापासून बसेसचे रस्ते वेगळे झाले. आमची बस ‘पहलगाम’ला जाणार होती तर बाकी काही बसेस ‘बालताल’ला जाणार होत्या. 

अनंतनाग, काश्मीर‘बालताल’ला जाताना श्रीनगरहून जावं लागतं, तर ‘पहलगाम’ला जाताना अनंतनाग पार करावं लागतं. आमच्या बसबरोबर इतर काही बसेसनी उजवीकडे वळण घेतलं आणि आमचा छोटा ताफा अनंतनागकडे धावू लागला. सामान्य ज्ञानात अगदीच सर्वसामान्य असलेल्या व्यक्तीलाही अनंतनागबद्दल, तेथील आतंकवादी चकमकींबद्दल माहिती असेलच, कारण वर्तमानपत्रात काश्मीरमधील नकारात्मक बातम्या काही असतील तर त्या बऱ्याचदा अनंतनागच्याच असतात. अनंतनाग हे दक्षिण काश्मीरातील एक स्फोटक, विघटनवाद्यांचा खूप जास्त प्रभाव असलेलं शहर आहे. 

यावर्षी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर जो हल्ला झाला, ज्यात काही यात्रेकरू शहीद झाले. तो हल्ला अनंतनागजवळ याच फाट्यावर झाला होता. मी यात्रेकरूंना ‘शहीद झाले’ म्हटलं कारण अमरनाथ ही यात्रा धार्मिक न राहता ती पुढे हळूहळू राष्ट्रीय यात्रा व्हायला लागते आणि शेवटी ती फक्त सर्वसामान्य भारतीय माणसाची देशविघातक प्रवृत्तींविरोधी असलेली राष्ट्रीय यात्रा होते. सैनिक शस्त्रानिशी तिथे झुंजत असतातच, पण दरवर्षी आतंकवादी कारवायांना न जुमानता, धमक्यांना न घाबरता त्याठिकाणी जाऊन शंकराच्या पिंडीचे दर्शन घेणारा सामान्य माणूस, भारतीयही एक जिगरबाज निःशस्त्र सैनिक होऊन जातो.

या अमरनाथ यात्रेमुळे दरवर्षी हजारो लोक त्या विघटनवादी भागात जाऊन ‘बम बम भोले’ची आरोळी देतात. यामुळे भावनिकरीत्या नकळतपणे तो भाग देशाशी पक्का जोडला जातो. कारण फक्त भारतीय सैन्य आणि तिरंगा फडकत ठेऊन तो भाग कागदावर जरी भारताचा असला, तरी जोपर्यंत कन्याकुमारी, कांचीपुरम, म्हैसूर ते मुंबईपासून देशभरातील सर्वसामान्य भारतीय नागरिक काश्मिरात जात नाही, तोवर तो शेवटचा भाग भारतात असल्याचे मनाला भासणार नाही. म्हणून ही यात्रा नकारात्मकतेविरुद्ध, हिंसेविरुद्ध, द्वेषाविरुद्ध आहे आणि प्रत्येक यात्रेकरू हा त्यातील एक सैनिक असतो. म्हणून आजवर अमरनाथ यात्रेकरूंवर अनेक हल्ले झाले आणि म्हणून  त्यात मृत्यमुखी पडलेले सर्व यात्रेकरू हे सैनिकांप्रमाणे ‘शहीद’ ठरतात.

बस अनंतनागमध्ये शिरली. शहरातून बाहेर पडत पहलगामच्या दिशेने धावू लागली. अनंतनाग शहर मोठं आणि स्वच्छ दिसत होतं. मी तिसऱ्यांदा इथे आलो होतो. पण यावेळी मला जे दिसलं ते भयप्रद होतं, धक्कादायक होतं. बसमधील प्रत्येक यात्रेकरूंसाठीच..! जवळपास पाच एक ठिकाणीच्या घरांवर, चौकातील भिंतीवर लिहिलेलं होतं, ‘बुऱ्हान वाणी इज अवर नॅशनल हिरो..’, ‘इंडिया गो बॅक’, ‘हिंदुस्तान मुरदाबाद..’ ज्या ज्या यात्रेकरूंनी बसच्या खिडकीतून हे पाहिलं त्यांनी इतरांना ते दाखवलं. कुजबुज सुरू झाली. 

८ जुलै २०१६ साली, म्हणजे मागच्याच वर्षी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख बुऱ्हाण वाणीचा खातमा भारतीय लष्कराने केला होता. त्यावेळीही अमरनाथ यात्रा सुरू होती. त्या क्षणापासून काश्मीर खोऱ्यात संचारबंदी, चकमकी झाल्या होत्या. जवळपास दोन महिने तिथे संचारबंदी लागू होती. हिंसा सुरू होती. त्यावेळी अमरनाथ यात्रा रद्द झाली होती, पण त्यानंतर खोऱ्यातून बाहेर पडेपर्यंत यात्रेकरूंचे जे हाल झाले, ते ऐकून थरकाप उडतो. हजारो यात्रेकरू बालतालच्या छोट्या कॅम्पमध्ये अडकले होते. सर्व सुविधा, परिवहन ठप्प झालं होतं. असो.. तो वेगळा विषय.. त्यावर पुढे कधीतरी. पण तरीही यावर्षीही यात्रेकरू न डगमगता, आतंकवादी धमक्यांना न घाबरता यात्रेला आले होतेच. म्हणूनच ते ‘सैनिक’ वाटतात.

लिडर नदी, पहलगाम, काश्मीर८ जुलैला बुऱ्हाण वाणीच्या मृत्यूला एक वर्ष होणार होतं. त्यामुळे पुन्हा काहीतरी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण ते भारताविरुद्धच्या जाहिरातबाजीचे फलक बघून अमरनाथ यात्रेची दुसरी बाजू लक्षात आली. सगळेजण तोवर प्रवासाची मजा घेत होते. पण आपण नक्की कुठे आलो आहोत, येथील धोके काय आहेत, हे आता सगळ्यांच्या लक्षात आले होते. अनंतनागच्या बाहेर पहलगामच्या रस्त्यांवर येताच निसर्गाचे रूप पालटले. सुंदर हिरवा निसर्ग, मोठमोठे पर्वत दिसू लागले. दोन्ही बाजूंना अत्यंत सुंदर शेती होती. लाकडी बांधकाम जास्त असलेली घरं होती. धिप्पाड चिनार वृक्ष उभे होते आणि इथून दिसू लागली, एक उनाड अवखळ, चैतन्याने भारलेली एक सखी, लिडर नदी. अत्यंत वेगवान प्रवाहात ती वाहत होती. पाणी शुभ्र, निळसर आणि फेसाळतं  होतं. कारण वेग प्रचंड होता. ही लिडर नदी मैत्रीण संपूर्ण यात्रेमध्ये सोबत असणार होती. 

पहलगाम, काश्मीरआमची बस पहलगाम बेस कॅंपला थांबली. आजूबाजूला प्रचंड सैनिकी संरक्षण. अमरनाथ यात्रेचा सगळ्यात मोठा बेस कॅंप हा पहलगाम बेस कॅंप असतो. आता आम्ही जम्मू बेस कॅंपमधून महत्त्वाचा टप्पा असलेल्या पहलगाम बेस कॅंपमध्ये आलो होतो. आजूबाजूला खूप तंबू होते. दुसऱ्या दिवसापासून खरी पायी यात्रा सुरू होणार होती. फक्त एक रात्र या बेस कॅंपमध्ये तंबूत घालवायची होती आणि एक सुंदर अनुभव घ्यायचा होता.

(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link