Next
दिवाळीची वाचनसंस्कृती - काळानुरूप बदललेला सण!
BOI
Monday, November 12, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे आव्हान उभे टाकलेले असताना मुद्रित माध्यमे नामशेष होतील अशी भीती अनेक जण व्यक्त करत आहेत. खरोखर तसे दृश्य दिसतही होते; मात्र गेल्या काही दिवसांत चित्र बदलले आहे. आता इलेक्ट्रॉनिक माध्यमेही दिवाळी अंक काढून या माध्यमाकडे वळत आहेत. यावरून दिवाळी अंकाची आणि छापील शब्दांची शक्ती आपण समजू शकतो. दिवाळी नुकतीच होऊन गेली आहे. त्या निमित्ताने दिवाळीच्या वाचनसंस्कृतीचा घेतलेला हा वेध...
..........
‘चार-पाच वर्षांपूर्वी वाटत होते, की वृत्तपत्रांची आता गरज उरलेली नाही. मोबाइल आणि टीव्हीमुळे सर्व साहित्य लोकांच्या हातात आले आहे आणि आता पुस्तके कोण वाचणार? मात्र मोबाइलवर बातम्या वाचल्या म्हणून घरातील वर्तमानपत्र कोणी बंद करत नाही. मुद्रित माध्यमांची गरज संपलेली नाही. मासिकांनी मराठी भाषेला समृद्धी दिली आहे....,’ भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी गेल्या आठवड्यात म्हणाले. ‘एकता’ या मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन भांडारी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी हे प्रतिपादन केले. भांडारी यांच्या म्हणण्याला महत्त्व यासाठी, की राजकारणात सोशल मीडिया आणि नवतंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर करण्याचे श्रेय त्यांच्या पक्षाला दिले जाते. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटर यांसारख्या माध्यमांवर भर देण्याचे भाजपचे धोरण सर्वश्रुत आहे. अन्य पक्षांनीही व संघटनांनीही या धोरणाची कास धरली आहे. अन् तेच भाजपचे नेते आज मुद्रित माध्यमांचे महत्त्व प्रतिपादन करत आहेत, हे लक्षणीय आहे. 

मुद्रित माध्यमांसमोर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे आव्हान उभे टाकलेले असताना मुद्रित माध्यमे, म्हणजे कागदावर छापलेली वृत्तपत्रे किंवा नियतकालिके, नामशेष होतील अशी भीती अनेक जण व्यक्त करत आहेत. खरोखर तसे दृश्य दिसतही होते; मात्र गेल्या काही दिवसांत चित्र बदलले आहे. आता इलेक्ट्रॉनिक माध्यमेही दिवाळी अंक काढून या माध्यमाकडे वळत आहेत. यावरून दिवाळी अंकाची आणि छापील शब्दांची शक्ती आपण समजू शकतो.

वाचनाच्या या सोहळ्याला अलगद आधार दिला आहे आपल्या सण-उत्सवांनी. फ्रान्समध्ये फेते-दी-लिरे नावाचा वाचनाचा एक स्वतंत्र उत्सव साजरा करण्यात येतो. पुढच्या वर्षी या उत्सवाला ३० वर्षे पूर्ण होतील. फ्रान्सचे संस्कृती मंत्रालय १९८९पासून दर वर्षी एक आठवडा हा वार्षिक कार्यक्रम आयोजित करते. सुदैवाने आपल्या देशातील लोकांनी या बाबतीत तरी सरकारवर अवलंबित्व ठेवले नाही. भारतीयांच्या दृष्टीने सण-समारंभ हेच खरे उत्सव! अन् याच सणाला जोडून देशातील वेगवेगळ्या भागातील लोकांनी एक नवीन वाचनसंस्कृती विकसित केली आहे, हा खरे तर अचंबा वाटायचा विषय.

आपल्या दिवाळी अंकांचेच घ्या. दिवाळी म्हटले, की पणत्या, आकाशकंदील, गोडधोड, फराळ, रोषणाई आणि फटाक्यांच्या बरोबरीनेच दिवाळी अंकही डोळ्यांपुढे येणारच. ‘मराठीत दिवाळी अंकाची परंपरा मोठी आहे,’ हे वाक्य किती पिढ्यांनी ऐकले असेल याला गणती नाही. दिवाळी अंक ही मराठी साहित्यिक विश्वाचे वैशिष्ट्यही आहे आणि परिमाणही. ज्या लेखकाची अधिक दिवाळी अंकांत उपस्थिती तो मोठा, इतके साधे-सरळ गणित मराठी साहित्याच्या विश्वात रूढ आहे. याचाच एक व्यत्यास असा, की जास्तीत जास्त प्रतिष्ठित लेखक ज्या अंकात तो दिवाळी अंक मोठा! आज जवळजवळ ३०० ते ४०० दिवाळी अंक निघत असून, त्यात घट होण्याऐवजी दर वर्षी भरच पडत असते. अनेक मासिके, साप्ताहिके बंद पडली. परंतु दिवाळी अंक पडल्याचे एकही उदाहरण नाही.

दिवाळी अंकाच्या परंपरेचे श्रेय काशिनाथ रघुनाथ मित्र यांना दिले जाते. त्यांच्या ‘मासिक मनोरंजन’चा पहिला दिवाळी अंक १९०९ साली प्रकाशित झाला. असे म्हणतात, की का. र. मित्र हे मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिसच्या बाहेर लेखनिकाचे काम करत असत. त्या वेळी एकदा त्यांच्या हातात एक ख्रिसमस विशेषांक आला. इंग्रजीत विविध प्रकाशने ख्रिसमस विशेषांक प्रकाशित करतात, हे त्यांच्या लक्षात आले. त्यावरून त्यांनी मासिक मनोरंजनचा दिवाळी अंक काढला.

आणखी एक गोष्ट अशी सांगितली जाते, की मित्र यांना दिवाळी अंकाची प्रेरणा बंगाली प्रकाशनांच्या दुर्गापूजा विशेषांकांवरून मिळाली; मात्र रविप्रकाश कुलकर्णी यांच्या मते, दुर्गापूजा विशेषांक निघण्याची परंपरा ही नंतरची. त्यामुळे ती शक्यता त्यांनी नाकारली आहे.

ते काही असो, महाराष्ट्रात जसे दिवाळी अंकांचे बस्तान बसले आहे, तसेच बंगालमधील सर्वांत मोठा सण म्हणजे दुर्गापूजेच्या निमित्ताने विशेषांक निघतात. आज तिथे १००च्या सुमारास दुर्गापूजा विशेषांक निघतात. पूजा आनंद बाजार पत्रिका या एका प्रकाशनाच्या देश, आनंद बाजार बार्षिक, आनंदमेळा आणि आनंदलोक या चार प्रकाशनांच्या मिळून साडेतीन लाख प्रती छापल्या जातात. यानंतर क्रमांक येतो तो अमृत बाजार समूहाचा. त्यांच्या दोन प्रकाशनांच्या मिळून साधारणपणे ६० हजार प्रती विकल्या जातात.

जी गोष्ट बंगालमध्ये तीच गुजरातमध्ये. तेथे दिवाळीऐवजी नवरात्र हा मोठा उत्सव. तेथे दसऱ्याच्या सुमारास विशेषांक प्रकाशित होतात आणि त्यातही साहित्याची उत्तम मेजवानी ठरलेलीच. तसेच तेलुगूभाषक दोन राज्यांमधील (आंध्र प्रदेश आणि तेलंगण) उगादि विशेषांक आणि कर्नाटकातील नियतकालिकांचे युगादि विशेषांक हीही साहित्याची पर्वणी.

या अंकांनी एक भली-मोठी वैचारिक सेना उभारली आहे. किमान महाराष्ट्रात तरी अनेक नवोदित लेखक, कवी आणि मुख्य म्हणजे व्यंगचित्रकारांचा मुख्य आधार हा दिवाळी अंक राहिलेला आहे. दिवाळी अंकांच्या जोरावर साहित्यिक गुजराण करणाऱ्या लेखकांवर जयवंत दळवींनी ‘ठणठणपाळ’ बनून केलेले खुसखुशीत प्रहार हे मुळातून वाचण्यासारखे आहेत. केवळ लेखक कशाला, अनेक रसिक वाचक घडविण्यातही दिवाळी अंकांनी हातभार लावला आहे.

ही परंपरा क्षीण होत असल्याचे, या अंकांचा दर्जा खालावत असल्याचे सांगणारेही आहेतच, नाहीत असे नाही. परंतु दिवाळी अंकांनी मराठी साहित्यसृष्टीला समृद्ध केले, मराठी भाषेला अनेक उत्तम लेखक दिले हे कोणीही नाकारू शकत नाही. ‘पुलं’च्या अजरामर अशा ‘बटाट्याच्या चाळी’ची एक-एक वीट दिवाळी अंकांतूनच रचली आहे. पूर्वी दिवाळी अंक विविध प्रकारचे साहित्य छापत असत. आता मात्र केवळ विशिष्ट विषयांना वाहिलेले दिवाळी अंक आले आहेत. केवळ ऑनलाइन अंकही निघत आहेत. सणांना कालानुरूप स्वरूप दिले पाहिजे, असे अनेक जण सांगतात. परंतु या वाचनसंस्कृतीच्या रूपाने समाजाने खरोखर आपल्या सणांना काळानुसार बदलले आहे- केवळ मराठीच नव्हे, तर बहुतांश भाषक समुदायांनी. सणांचा आनंद द्विगुणित करण्याकरिता यापेक्षा आणखी काय हवे?

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(दिवाळी अंकांच्या वैभवशाली परंपरेचा आढावा घेणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आठवणीतली दिवाळी या विशेष लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 201 Days ago
In numbers , how many Marathi Diwali anks are sold ?
0
0

Select Language
Share Link
 
Search