Next
बॉम्बे सॅपर्सच्या द्विशताब्दीनिमित्त राबवली द्रास ते पुणे मोटारसायकल मोहीम
२६ दिवसांत पार केले ३६८७ किलोमीटर अंतर
BOI
Thursday, August 22, 2019 | 02:17 PM
15 0 0
Share this article:

द्रास ते पुणे मोटारसायकल मोहीम पूर्ण करणाऱ्या बॉम्बे सॅपर्सच्या तुकडीचे स्वागत करताना लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी

पुणे : बॉम्बे इंजिनीअर्स ग्रुप अर्थात बॉम्बे सॅपर्सच्या द्विशाताब्दीनिमित्त बॉम्बे सॅपर्सच्या आठ जणांच्या तुकडीने द्रास ते पुणे ही मोटारसायकल मोहीम २६ दिवसांत पूर्ण केली. आठ राज्यांतून तब्बल तीन हजार ६८७ किलोमीटरचे अंतर पार करून बुधवारी, २१ ऑगस्ट रोजी या तुकडीचे पुण्यात आगमन झाले. 

द्रास येथून कारगिल विजयदिनी, २६ जुलै रोजी या मोहिमेला प्रारंभ झाला होता. कॅप्टन मोहनील सुनील यादव यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. पुण्यात लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी ‘फ्लॅग इन’ करून या तुकडीचे स्वागत केले. या वेळी बॉम्बे सॅपर्सचे लेफ्टनंट जनरल मायकेल मॅथ्यूज, दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्याचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल नवनीत कुमार, बॉम्बे सॅपर्सचे कमांडट ब्रिगेडियर एम. जे. कुमार उपस्थित होते. 


‘द्रासवरून आम्ही लेह, मनाली, जम्मू, राजौरी, जालंधर, नवी दिल्ली, जयपूर, अहमदाबादमार्गे पुण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. उणे तापमान, सतत बदलते हवामान अशा वातावरणात, अगदी १० हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवरील रस्त्यांवरूनही आम्ही प्रवास केला. मोहिमेच्या आधी सहा दिवस अती उंचीच्या ठिकाणी राहून विरळ हवेतील वातावरणाशी जुळवून घेण्याचा सराव केला होता. त्यामुळे अती उंचीवरील मार्गावरून प्रवास करताना फार त्रास झाला नाही. या मार्गाचाही आम्ही बारकाईने अभ्यास केला होता, त्यामुळे रोजचे ठरवलेले अंतर पूर्ण करणे आम्हाला शक्य झाले,’ असे या मोहिमेचे नेतृत्व करणारे कॅप्टन मोहनील यादव यांनी सांगितले. 

द्रास ते पुणे मोटारसायकल मोहीमेचे नेतृत्व करणारे कॅप्टन मोहनील यादव व अन्य सदस्यांची भेट घेताना लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी

‘सुरुवातीला आम्ही राजौरी सेक्टरमध्ये शत्रूशी मुकाबला करताना शहीद झालेले परमवीरचक्रप्राप्त मेजर आर. आर. राणे यांना राजौरी येथे जाऊन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर दिल्लीत इंडिया गेट आणि राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जाऊन वीर जवानांना आदरांजली वाहिली. ज्या ज्या ठिकाणी बॉम्बे सॅपर्सनी उत्तम कामगिरी बजावली होती, त्या ठिकाणांना, तसेच बॉम्बे सॅपर्सच्या केंद्रांना प्रवासादरम्यान भेट दिली. निवृत्त अधिकाऱ्यांशी संवाद साधला. वीरपत्नींची भेट घेतली. ठिकठिकाणी लोकांनी आमचे उत्साहात स्वागत केले. हा अनुभव अत्यंत अभिमानाचा आणि अविस्मरणीय होता,’ असेही यादव यांनी नमूद केले. 

या मोहिमेत सहभागी होता आले ही फार आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया हवालदार नानासाहेब गोरड यांनी व्यक्त केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search