Next
आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो...
BOI
Thursday, July 05, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूलभूत तत्त्व  असलं, तरी ते रुजविण्यासाठी गावपातळीवर मुद्दामहून केले जाणारे प्रयत्न अगदी अल्प असतात. या पार्श्वभूमीवर, एमएस्सी झालेल्या एका युवकानं आपलं गावच विज्ञानगाव म्हणून नावारूपाला यावं, गावातल्या प्रत्येकाला वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा, यासाठी मित्रमंडळींसह धडपड केली आणि जळगावमधलं कल्याणेहोळ हे खरंच विज्ञानगाव म्हणून प्रसिद्धीला आलं. ही किमया घडवून आणणाऱ्या जयदीप पाटीलची प्रेरक गोष्ट पाहू या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात...
....
आपल्याला आपापल्या मामाचं गाव माहीत आहे, नुकतंच वसवलेलं पुस्तकांचं गाव ‘भिलार’देखील माहीत आहे; पण आज आपण सैर करणार आहोत ती देशातल्या पहिल्या विज्ञानगावाची! या विज्ञानगावाचं नाव आहे कल्याणेहोळ! खानदेशातल्या जळगाव शहरात धरणगाव नावाचं गाव आहे. या धरणगावाजवळ दोन-अडीच हजार लोकवस्ती असलेलं कल्याणेहोळ हे गाव आहे. नोबेल फाउंडेशन या संस्थेनं आपल्या गावाला विज्ञानगाव म्हणून ओळखलं जावं असा निश्चय केला आणि त्याप्रमाणे काम सुरू केलं. हे सगळं घडलं कसं त्याचीच ही गोष्ट!

जयदीप पाटीलकल्याणेहोळ या गावातल्या एका शेतकऱ्याचा जयदीप हा मुलगा! शिकायची खूप आवड... अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही कुठेही न थांबता त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं. अगदी वर्तमानपत्रं घरोघरी टाकण्याचंही काम केलं. प्रयत्नपूर्वक विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. रसायनशास्त्र विषय घेऊन त्यानं एमएस्सी केलं आणि त्याचबरोबर पत्रकारितेचाही कोर्स पूर्ण केला. आपला खडतर मार्ग, आपल्यासारखीच अनेक मुलं त्याला सतत दिसत राहायची. शिक्षणामुळे जयदीपचं विज्ञाननिष्ठ मन त्याला ‘काहीतरी करायला हवं’ या भावनेनं अस्वस्थ करत होतं.


२०१४ साली कैलाश सत्यार्थी यांना नोबेल पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलं. जयदीपला या बातमीनं खूप आनंद झाला. मग त्याचं मन नोबेल विजेत्यांकडे धाव घेऊ लागलं. या सगळ्या नोबेल विजेत्यांचा अभ्यास करताना त्याच्या लक्षात आलं, की यातली बहुतांश मंडळी जर्मनी, अमेरिका वगैरे बाहेरच्याच देशांतली आहेत. त्याचं मन खट्टू झालं. भारतात असे शेकडो नोबेलविजेते होऊ शकतील का, या विचारानं त्याची झोप उडवली; पण त्याच वेळी त्याला आपल्यावर असलेल्या काही चुकीच्या रूढी-परंपरांचा पगडा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, गरिबी, अशा अनेक गोष्टी दिसू लागल्या; पण हे सगळं आहे म्हणून आपण गप्प बसून चालणार नाही, हेही त्याला कळत होतं. अशा वेळी कोणीतरी विज्ञानप्रसाराचं काम केलं पाहिजे असं तो मनाशी म्हणू लागला. त्याची अस्वस्थता त्याची पत्नी जयश्री बघत होती. जयश्री एमकॉम झालेली होती. ती जयदीपला म्हणाली, ‘हे काम अन्य कोणी तरी का करावं?, तूच कर ना.’ तिच्या या एका वाक्यानं जयदीपचे डोळे खाडकन उघडले. खरंच, प्रत्येक गोष्ट दुसराच कोणीतरी करेल, अशी अपेक्षा आपण का करतो? मीच ती जबाबदारी उचलण्यासाठी पुढे का होत नाही? अनेक विचार त्याच्या मनात फेर धरून नाचू लागले आणि त्या क्षणी जयदीपनं जयश्रीचं बोलणं मनावर घेऊन आपणच काहीतरी करायचं, असा निश्चय केला. त्या क्षणी त्याची अस्वस्थता कमी झाली, मनावरची मरगळ दूर झाली. एका नव्या उत्साहानं तो कामाला लागला. 

जयदीपनं ‘मिशन नोबेल प्राइझ’ नावानं एक माहितीपत्रक बनवलं. शाळाशाळांत, गावोगावी जाऊन त्यानं विज्ञान विषयावर जवळजवळ ४५० ते ५०० सेमिनार्स घेतले. या काळात त्यानं चार ते पाच लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अतिशय सोप्या, रंजक आणि रसाळ पद्धतीनं जयदीपनं या सगळ्या मुलांपर्यंत नोबेलविजेत्यांची माहिती पोहोचवली. 

शहरांमधल्या मुलांना अनेक सुविधा उपलब्ध असतात. त्यांच्यापर्यंत ज्ञान पोहोचण्यासाठी फारसे अडथळे नसतात; पण आपलं काम मुख्यतः खेड्याखेड्यात पोहोचलं पाहिजे, असं जयदीपच्या लक्षात आलं. त्याच दरम्यान त्यानं पुस्तकांचं गाव भिलार कसं तयार होतंय, याची बातमी वर्तमानपत्रात वाचली. जयदीपला ही संकल्पना खूपच आवडली. त्याच धर्तीवर आपण विज्ञानाचं गाव उभारायचं, असं त्यानं ठरवलं. आपली संकल्पना त्यानं आपल्या मित्रांजवळ बोलून दाखवली. जयदीपच्या मित्रांचा सावली ग्रुप नावाचा गट होताच. त्या सगळ्यांना ही कल्पना खूपच आवडली. त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ‘नोबेल फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली. 

जयदीप आणि त्याच्या मित्रांच्या अंगात उत्साहाचं वारं संचारलं होतं. प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना आकाराला येत होत्या. सगळ्यांनी मिळून आपलं गाव वैज्ञानिकांच्या अस्तित्वानं सजवायचं ठरवलं. मग काय, न्यूटनपासून सी. व्ही. रामनपर्यंत सगळे वैज्ञानिक फोटोफोटोंमधून गावाचा एक हिस्सा झाले. सगळ्या सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यारस्त्यात, चौकाचौकात ते आपली ओळख दाखवत उभे राहिले. कुठल्याही शहरात किंवा गावात राजकीय नेत्यांचे किंवा गावातल्या पुढाऱ्यांचे फ्लेक्स बघायला मिळतात; पण कल्याणेहोळ या गावात मात्र अल्बर्ट आइन्स्टाइन हसतमुखानं गावकऱ्यांकडे बघतो, तर रिचर्ड फाइनमन ‘गणित शिकवू का,’ असं मुलांना विचारतो. 

या एका उपक्रमानं गावात खूप गमतीजमती घडू लागल्या. जयदीप आणि त्याच्या मित्रांनी या फोटोखाली तो शास्त्रज्ञ आणि त्याचा शोध याविषयी एका ओळीत माहिती लिहिली होती. गावातल्या लोकांना ही वैज्ञानिक मंडळी ठाऊकच नव्हती. ते कुतूहलानं या फोटोंकडे बघत असत. एके दिवशी जयदीपला सी. व्ही. रामन यांचा फोटो लावताना बघून एकानं त्याला विचारलं, ‘बेटा जयदीप, हे तुझे आजोबा आहेत का?’ ते गृहस्थ खूप सहजपणे प्रश्न विचारत होते; पण त्या क्षणी जयदीपला मात्र खूप वाईट वाटलं. हे सगळं अज्ञान दूर झालंच पाहिजे आणि यासाठी आणखी काम करायला पाहिजे, त्यासाठी नियोजन करायला पाहिजे ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्या वेळी आपल्या मनातले विचार, आपलं स्वप्न अशा उदासीन वातावरणात साकार होईल का, हेही जयदीपला ठाऊक नव्हतं.

...पण हळूहळू लोकांना न्यूटनचा चौक कळू लागला. आइन्स्टाइनचा रस्ता लक्षात राहू लागला. होमी भाभा कुठल्या दुकानाजवळ आहेत हे समजू लागलं आणि मग एकच धमाल उडाली. एखादा परका माणूस गावात आला, की तो विचारायचा, ‘अहो, सरपंचांचं घर कुठे आहे?’ त्या वेळी त्याला उत्तर देणारा माणूस सांगायचा, ‘हे बघा, पाव्हणं, तुम्ही इथून थेट सरळ जा, तिथं वडाचं झाड दिसेल. तिथून उजवीकडे वळलात की डॉ. जयंत नारळीकरांचा फोटो दिसेल. बस्स त्या फोटोच्या समोर असलेलं घर सरपंचाचं आहे बघा!’

हळूहळू शाळेमधून, गावातून जयदीपच्या विज्ञान उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. ही मुलं चांगलं काहीतरी करताहेत हे बघून सरपंचांनी ग्रामपंचायतीचा हॉल या तरुणांना उपक्रमासाठी उपलब्ध करून दिला. सगळ्यांनी मिळून या हॉलला सजवलं. प्रत्येक गुरुवारी इथं विज्ञान उपासना होईल असं जाहीर केलं. तसंच इथं ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बालविज्ञान संस्कार केंद्र’ही सुरू झालं. पाचवी ते दहावी या वयोगटातली मुलं या विज्ञान संस्कार केंद्रात येऊ लागली. सुरुवातीला आठ ते दहा एवढीच मुलं या केंद्रात यायची. ती संख्या नंतर १०० ते १२५ इतकी झाली. मुलांच्या चिवचिवाटानं हॉल गजबजून गेला. मुलं इथं विज्ञानावरच्या, वैज्ञानिकांवरच्या गोष्टी ऐकू लागली, विज्ञानाचे प्रयोग करून बघू लागली. इतकंच नाही, तर यू-ट्यूबवरच्या विज्ञानावरच्या अनेक फिल्म बघून प्रश्नही विचारू लागली. गावातलं वातावरण बदलायला लागलं. गावात चैतन्याचे वारे वाहू लागले. 

गावातले लोक ‘आपल्या मुलांसाठी छान काहीतरी घडतंय’ या कल्पनेनं सुखावले; पण त्याच वेळी त्यांनी जयदीप आणि त्याच्या मित्रांना प्रश्न करायला सुरुवात केली, ‘बाबांनो, मुलांसाठी तुम्ही करताहात; पण गावातल्या स्त्रियांसाठीही काहीतरी करायला पाहिजे.’ यातूनच गावात ‘महिला आरोग्य विज्ञान केंद्र’ सुरू झालं. सुशिक्षित असो वा अशिक्षित - बहुतांशी स्त्रियांना आपल्याला कुठला विकार झालाय, हेही ठाऊक नसायचं. आजार लपवण्याकडे, अंगावर काढण्याकडेच त्यांचा कल असायचा. त्यातच बोलणार कोणाजवळ, हाही प्रश्न त्यांना पडायचा. अशा वेळी जयदीप आणि त्याच्या मित्रांनी महिन्यातून एकदा शहरातल्या आपल्या मित्रांना म्हणजेच त्या त्या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांना गावात बोलवायला सुरुवात केली. या वेळी या केंद्रात फक्त मुली, तरुणी आणि प्रौढ स्त्रिया असत. त्यामुळे स्त्रिया आपल्या मनातल्या गोष्टी मनमोकळेपणानं बोलू लागल्या. डॉक्टरांच्या माहितीनं त्यांना आपल्या मनातल्या अनेक शंकाकुशंकांची उत्तरं मिळायला लागली. महिलांचा सहभाग वाढला आणि त्या प्रत्येक महिन्यातल्या एकत्र येण्याच्या दिवसाची आतुरतेनं वाट बघू लागल्या. नुकताच त्यांनी अक्षयकुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट बघितला आणि त्यांच्या मनातले अनेक गैरसमज दूर झाले. हा विषय आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे, हे त्यांना समजलं आणि या विषयावर लाजणाऱ्या स्त्रिया खुलेपणानं बोलू लागल्या. कल्याणेहोळ गावात आता किराणा दुकानातही सॅनिटरी पॅड्स मिळायला सुरुवात झाली आणि त्यांची खरेदी करताना आता स्त्रियांना संकोच वाटेनासा झाला, हे विशेष! महिनाभर आरोग्याबाबत इतर उपक्रम राबवण्यासाठी गावातल्या तरुण मुलींनीही एकत्र येऊन पुढाकार घ्यायला सुरुवात केली. 

यानंतर जयदीप आणि कंपनी यांनी शेती आणि शेतकरी यांच्याकडे आपलं लक्ष वळवलं. यातूनच कल्याणेहोळ गावात कृषी विज्ञान केंद्र स्थापन झालं. गावात ३०० वृक्षांची लागवड झाली आणि त्यांच्या वाढीची आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक गावकऱ्यानं वाटून घेतली. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करायला सुरुवात केली. माती आणि पाणी परीक्षणाचं महत्त्व त्यांना उमजलं. कुठल्या ना कुठल्या उपक्रमात अख्खं कल्याणेहोळ गाव सहभागी होऊन कामाला लागलं. यातूनच जळगावमधली दीपस्तंभ संस्था, ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्र (यजुर्वेंद्र महाजन) यांच्या साह्यानं गावात एक समृद्ध असं ग्रंथालय उभं राहिलं. 

याच दरम्यान आणखी एक गोष्ट घडली. जयदीप स्वतः शाळेत असल्यापासून तो अच्युत गोडबोले यांचा चाहता होता. त्यांच्या ‘किमयागार’ या पुस्तकाची त्यानं असंख्य वेळा पारायणं केली होती. त्यांना भेटणं हे त्याचं स्वप्न होतं. २००८ साली अच्युत गोडबोले जळगावला एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यानं अच्युत गोडबोले यांची भेट घेतली. अच्युत गोडबोले यांच्यापासून मिळालेल्या प्रेरणेतून जयदीपनं स्वतः विज्ञानावर एक पुस्तक लिहिलं, जे आज स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी अतिशय आवडीनं वाचतात. या पुस्तकाच्या ६० हजार प्रतींची विक्रमी विक्री झाली. प्रत्येक वेळी अच्युत गोडबोले यांचं नवं पुस्तक कधी येतं आणि आपण ते कधी वाचतो, असं त्याला होऊ लागलं.

एके दिवशी जयदीपला अच्युत गोडबोले आणि मी (दीपा देशमुख) लिहिलेली ‘जीनियस’नावाची पुस्तकांची मालिका बाजारात आल्याचं समजलं आणि त्यानं धाव घेऊन ‘जीनियस’चे बारा वैज्ञानिक घरी आणले, त्यानंतर लगेचच सहाच महिन्यांत १२ भारतीय जीनियस’देखील त्याच्या संग्रहात समाविष्ट झाले. त्याला या सगळ्या ‘जीनियस’नी झपाटून टाकलं. शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या हाती त्यानं ‘जीनियस’ दिलं. मुलं ‘जीनियस’ वाचून त्यातल्या गोष्टी सगळ्यांसमोर धीटपणे सांगू लागली, प्रयोग करू लागली.

एके दिवशी जयदीपनं आपल्या घरात आपल्या आईला मुलांना गोष्ट सांगताना बघितलं आणि त्यानं तिच्या हातात ‘जीनियस’ ठेवलं. (जयदीपची आई आठवीपर्यंत शिकलेली आहे!) तिला त्यातलं न्यूटन नाव काही केल्या उच्चारता येईना. मग तिनं न्यूटनला तात्पुरतं बाजूला ठेवलं आणि होमी भाभा वाचायला घेतलं. या ‘भारतीय जीनियस’नं ती इतकी वेडावून गेली, की रोज संध्याकाळी आसपासच्या मुलांना गोळा करून ती त्यांना वैज्ञानिकांच्या गोष्टी सांगू लागली. ‘भारतीय जीनियस’मुळे तिला गॅलिलिओ, न्यूटन हे सगळेही जवळचे वाटू लागले. जयदीपला आपल्या कामातलं हे खूपच मोठं यश वाटलं. 

या सगळ्यांमध्ये जयदीपची पत्नी जयश्री हिची भरभक्कम साथ त्याला लाभलीय. जयश्री पूर्णपणे विज्ञानाला मानणारी असून वडाभोवतीचे फेरे असोत, वा घरात वर्षश्राद्ध घालणं असो, अशा गोष्टी तिनं कधीच केल्या नाहीत. सुरुवातीला या गोष्टींवरून जयदीपची आई आणि तिच्यात मतभेदही झाले; पण आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून तिनं आपल्या सासूचंही मन प्रेमानं बदलवलं!

‘जीनियस’ वाचून आपल्या व्याख्यानाच्या दर्जात वाढ झाली ही गोष्ट जयदीपच्या लक्षात आली. याचं कारण जिथे जिथे तो व्याख्यानाला जायला लागला, तिथे तिथे त्याच्या पोतडीत नवनव्या वैज्ञानिक गोष्टींचा खजिना असायचा. आज कल्याणेहोळ हे आदर्श गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध झालंय. या गावात जातीपातीचं राजकारण होत नाही. विशेष म्हणजे कल्याणेहोळ या गावातल्या ग्रामपंचायतीचं कार्यालय वातानुकुलित असून, संपूर्ण कारभार संगणकावर चालतो. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ सतीश राव यांनी नुकतीच कल्याणेहोळ या गावाला भेट दिली आणि वैज्ञानिक उपक्रमात ‘इस्रो’तर्फे सर्व साह्य केलं जाईल, याची खात्रीही दिली. आज ग्रामीण, आदिवासी आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘आयआयटी’च्या प्रवेश परीक्षांबाबतचं मार्गदर्शनही ‘नोबेल फाउंडेशन’तर्फे केलं जात आहे. जयदीपच्या कार्यामुळे प्रभावित होऊन मराठी विज्ञान परिषदेनं ‘विज्ञान सेवक’ या पुरस्कारानं त्याला सन्मानित केलं आहे. जयदीपनं काम सुरू केलं, तेव्हा त्याला त्याची फळं काय मिळणार हे ठाऊक नव्हतं. फक्त ‘करून तर बघू’ हीच भावना त्याच्या मनात होती. आज कल्याणेहोळ गाव बघायला, तिथली शाळा बघायला, तिथल्या मुलांचे उपक्रम बघायला, तिथल्या स्त्रियांमधली जागरूकता बघायला, तिथल्या शेतकऱ्यांचे शेतीमधले प्रयोग बघायला इतर गावांतले शिक्षक, पालक आणि शेतकरी येतात. आसपासची गावंदेखील आता कल्याणेहोळमधलं वातावरण बघून ‘आमचंही गाव विज्ञानगाव झालं पाहिजे,’ या निश्चयानं कामाला लागली आहेत. 

अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) लोक रंगमंचाने असं म्हटलंय, ‘देशातल्या तरुणांच्या ओठांवर कुठली गाणी आहेत त्यावरून त्या देशाचं भवितव्य ठरतं.’ त्याप्रमाणे आज जयदीप आणि त्याची टीम यांच्या ओठांवर रेंगाळत असलेलं गाणं त्यांनी प्रत्यक्षात साकारलं आहे. आपल्याही ओठांवर ते गाणं रेंगाळतं का, ते बघू या...

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो, 
वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो...

काट्यावरून जाता मागे न पाय घेऊ
हसऱ्या कळ्याफुलांची स्वप्ने विणून घेऊ
ओसाड माळ आम्ही फुलवीत चाललो.....

आमची सुखे निराळी विश्वात बिंबलेली
दुःखात निर्मितीची स्फूर्ती उफाळलेली
आमचे भविष्य आम्ही घडवीत चाललो....

आले अपयश घाले पाया नव्या यशाचा
इतिहास साक्ष आहे आमच्या पराक्रमाचा
प्रासाद सज्जनांचे सजवीत चाललो.....

बदलार्थ वेचिती जे सर्वस्वही स्वतःचे
ते शिल्पकार सारे येत्या नव्या युगाचे
त्यांची स्मृती मनाशी जागवीत चाललो....

तुम्हालाही विज्ञानगावात जायचंय? जयदीप पाटीलला भेटायचंय? मग त्याच्याशी जरूर संपर्क साधा.

संपर्क : जयदीप पाटील 
ई-मेल : jayrajput7612@gmail.com
मोबाइल : ९९२२० ०४१९३

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 96 Days ago
Is he still active? Hope , he is. Hope, he is NOT the only one . May others follow his example .
0
0
नितीन रानडे About 306 Days ago
फारच सुंदर लेख आहे .
0
0
Madhura phatak About
Far chan
0
0
Shirin Kulkarni About
खरोखर ध्येयवेड्या तरुणाला खूप खूप शुभेच्छा! धन्यवाद दीपा ताई!
0
0

Select Language
Share Link
 
Search