Next
मूर्तिकलेतून ‘परमानंद’ घेणारे कुटुंब
रत्नागिरीतील भाट्ये येथील पिलणकर कुटुंबाची तिसरी पिढी मूर्तिकलेत
BOI
Friday, September 07 | 01:13 PM
15 0 0
Share this story

परमानंद पिलणकर

रत्नागिरी :
रत्नागिरी शहरापासून दोन किलोमीटरवर असलेल्या भाट्ये येथील किनाऱ्यावरील झरीविनायक मंदिरातील गणेशमूर्तीचे मूर्तिकार, दिवंगत जनार्दन भिकाजी पिलणकर व घनःश्याम भिकाजी भाटकर यांचा वारसा प्रख्यात मूर्तिकार परमानंद पिलणकर यांनी जपला आहे. तसेच त्यांचा मुलगा अक्षय पिलणकर व पुतण्या सिद्धराज मुरारी पिलणकर हे तिसऱ्या पिढीतही चित्रशाळेचा वारसा तितक्याच ताकदीने पुढे नेत आहेत. परमानंद पिलणकर यांना खऱ्या नारळावर कोरलेल्या गणपतीसाठी राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले आहे. एकंदरीतच गणपतीवर श्रद्धा ठेवून त्याच्या मूर्ती घडविण्याच्या कलेतून स्वतः परमानंद घेणे आणि त्या सुबक मूर्ती पाहणाऱ्याला परमानंद देणे हे या कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे.

दिवंगत जनार्दन पिलणकर

परमानंद पिलणकर यांचा जन्म १९६२ सालचा. त्यांच्या वडिलांची चित्रशाळा असल्याने मूर्तिकामाचे बाळकडू घरातूनच मिळाले. ते पाच वर्षांचे असल्यापासून वडिलांसोबत गणपती काढू लागले. लहान वयातच मुलांना एखाद्या गोष्टीची आवड लागली, तर ती चांगली आत्मसात होते, हे परमानंद पिलणकर यांच्याकडे पाहून आपल्या लक्षात येते. त्यांनी घडविलेल्या मूर्ती अत्यंत सुबक असतात.पावस येथील भाजीवाले शिंदे हे परमानंद पिलणकर यांच्याकडून दर वर्षी गणपती नेतात. यंदा त्यांच्या ओळखीचे इस्लामपूर येथील भाजीचे व्यापारी चंदन पाटील यांनीही पिलणकर यांच्याकडून अप्रतिम व समाधान देणारी गणेशमूर्ती घेतली. ती मूर्ती घेऊन ते नुकतेच गावी रवाना झाले. पार्वतीने २० मोदक करून ते ताटात ठेवले आहेत. २१वा मोदत ती करत आहे आणि तो मोदक कधी पूर्ण होतोय आणि त्याचा आस्वाद घेतोय, असे भाव चेहऱ्यावर असलेला बालगणेश आईच्या मागून पाहतोय, असे चित्र सोशल मीडियावर फिरत होते. मुंबईतील त्यांच्या भावाने हे चित्र पाटील यांना पाठवले होते. तशीच मूर्ती पाटील यांना हवी होती. तशीच मूर्ती परमानंद पिलणकर यांनी तयार करून दिली. ही मूर्ती पाटील नुकतीच इस्लामपूरला घेऊन गेले.

पिलणकर यांच्याकडचे गणपती देवरुख, नाणीज, चांदोर, हातखंबा, काजरघाटी अशा जिल्ह्यातील अनेक गावांसह बेंगळुरूलाही जातात. यंदा डमरूवर बसलेले गणेश, दत्तमूर्ती, पेशवाई गणपती, चिंतामणी, शंकर-पार्वतीसोबत गणेश, तात्या पंतोजी, पार्वतीच्या मांडीवर बसलेला बालगणेश, जास्वंदीच्या फुलातील गणपती, हंसावर बसलेला गणपती अशा वैविध्यपूर्ण मूर्ती पिलणकर यांच्या मूर्तिशाळेत तयार झाल्या आहेत. एक फूट ते साडेचार फूट उंचीच्या मूर्ती त्यांनी साकारल्या आहेत.
नारळावरचा गणपती गाजला

त्यांनी खऱ्या नारळावर कोरलेला गणपती गाजला. तसे गणपती तयार करून देण्यासाठी अनेक ठिकाणांहून मागणी येते. या कलेसाठी त्यांना २०१०मध्ये आसाममध्ये राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

अक्षय आणि सिद्धराज

तिसरी पिढीही वारसा चालवतेय..
परमानंद यांचा मुलगा अक्षय एमए (हिंदी) पदवीप्राप्त असून, त्याचाही मूर्तिकलेकडे ओढा आहे. त्याच्या लहानपणी वडील जसा मोठा गणपती बनवत, तसा लहान स्वरूपातील गणपती तो साकारायचा. यातूनच त्याला आवड निर्माण झाली. आज वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून तो चित्रशाळा सांभाळत आहे. त्याचा चुलत भाऊ सिद्धराज मुरारी पिलणकर हाही त्याच्यासोबत आहे.

मूर्तीसाठी साच्यांचा वापर नाही
पिलणकर यांच्या मूर्तिशाळेत गणपतीची मूर्ती पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून केली जाते. मातीकाम पूर्णपणे हाती केले जाते. साच्याचा अजिबात वापर केला जात नाही. यंदा १५ मेच्या सुमारास मातीकामाचा श्रीगणेशा करण्यात आला. एकेक करता करता ८० गणेशमूर्ती साकारल्या. रक्षाबंधनाच्या दिवशी रंगकामाचा प्रारंभ केला. परमानंद पिलणकर पहाटे पाच वाजता उठून भाट्ये समुद्रकिनारा व झरीविनायकाचे दर्शन घेऊन घरी परततात. त्यानंतर कामाला सुरुवात करतात. मातीकाम रात्री नऊ वाजेपर्यंतच केले जाते. रंगकामाचे काम रात्री जास्तीत जास्त ११ वाजेपर्यंतच केसे जाते. दिवसा जास्त काम केले जाते; मात्र रात्री जागरण करून ते मूर्तिकाम करत नाहीत. 

पिलणकरांनी घडविलेल्या सुबक गणेशमूर्ती

‘रेखणीकला ही दैवी देणगी’
सध्या पिलणकर यांच्याकडे रेखणीचे काम सुरू आहे. हे काम पाहण्यासाठी गावातील भाविक आणि अनेक जण येत असतात. गणपतीचे डोळे जिवंत वाटणारे रेखणीकाम करण्याची किमया पिलणकर यांच्या हातात आहे. ही सर्व दैवी देणगी असल्याचे ते सांगतात. 
दर वर्षीच्या तुलनेत यंदा हे काम खूप लवकर आटोपल्याचे एक समाधान पिलणकर यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. मुलगा व पुतण्याने कामात चांगली मदत केल्यानेच हे शक्य झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ‘गजाननाला कधी विसरू नका,’ असे ते या दोघांनाही सांगतात.

भाट्ये येथील झरीविनायक

‘प्लास्टर ऑफ पॅरिस नको, शाडू मातीच्या मूर्ती घ्या’
साच्यातील गणपती बनवत नसल्याने भाविक पाट घेऊन येतात तेव्हा कोणत्या प्रकारचा गणपती हवा ते सांगतात. त्यानुसार त्यांना गणपती बनवून दिला जातो. त्यामुळेच मूर्तीकडे पाहून खूष होणारे भाविक योग्य किंमत देतात. दर वर्षी महागाईचा सामना करावा लागतो. माती महागली, रंग महागले अशा बातम्या येत असतात; मात्र मूर्तीची किंमत पिलणकर स्वतः ठरवत नाहीत. ते लोकांना सांगतात, की महागाई तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे भाविक योग्य किंमत देतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पिलणकर यांचा विरोध आहे. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या अनेक गणेशमूर्तींचे विसर्जन पिलणकर अनेक वर्षे स्वतः करत आहेत. लोकांनी शाडू मातीच्या गणपतीकडे वळावे, असा आग्रह ते करतात. ते स्वतः फक्त शाडू मातीचेच गणपती साकारत आहेत.

(परमानंद पिलणकर आणि त्यांचा मुलगा अक्षय यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Giridhar Pilankar About 73 Days ago
Thank you ,mai and dada.
0
0
Dr Aparna Prabhu MD DGO About 75 Days ago
I'm very proud & happy of my brother Parmanand & my nephews .let lord Ganesha give them Sukh sampati arogh.
1
0
suryakant About 75 Days ago
all the best Ashay, u will definatly achive reward on international level. Gotya..
1
0

Select Language
Share Link