Next
दिशादर्शक न्यायमूर्ती आणि सच्चा, समन्वयी कार्यकर्ता
BOI
Thursday, January 03, 2019 | 03:39 PM
15 0 0
Share this story


अत्यंत महत्त्वपूर्ण निकालांनी भारतीय न्यायव्यवस्थेला दिशा देणारे, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, लेखक चंद्रशेखर धर्माधिकारी (९१) यांचे तीन जानेवारी २०१९ रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास नागपुरातील एका खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. सर्वसामान्यांच्या कल्याणाची आस बाळगणारा एक सच्चा, सर्वोदयी, समन्वयी कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या कारकिर्दीचा हा अल्पसा आढावा...
...........

चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२७ रोजी मध्य प्रदेशातील रायपूर येथे झाला होता. त्यांचे वडील आचार्य दादा धर्माधिकारी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होते. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनीही विद्यार्थिदशेत असताना स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता.
 
त्यांच्या आई दमयंती धर्माधिकारी यादेखील गांधीवादी होत्या. त्यामुळे बालपणापासूनच चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावर गांधीविचारांचा पगडा होता. नागपूरच्या चिटणीस पार्कजवळील प्राथमिक महापालिका शाळेत त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. त्यानंतर वर्धा येथील नवभारत विद्यालयात प्राथमिक शिक्षण झाले, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून त्यांनी एमए आणि एलएलबीची पदवी प्राप्त केली. २५ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांना वकिलीची सनद मिळाली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. 

१९७२च्या सुमारास मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर १९८९मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी न्यायदानाचे कार्य केले. काही दिवस प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणूनदेखील त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. 

न्यायदानात त्यांनी मोलाचे योगदान दिले. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी दिलेले निकाल दिशादर्शक ठरले होते. आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांबाबत त्यांनी दिलेला निकाल खूप गाजला. त्यांच्या त्या निकालामुळे भक्कम पुरावे नसलेल्या स्थानबद्ध आंदोलकांना सरकारला मुक्त करावे लागले. महिला, आदिवासी, मनोरुग्ण, कैदी, लहान मुले यांच्या मूलभूत अधिकारांबाबतचे त्यांचे निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. बारबालांवर बंदी आणण्याची शिफारस त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २०१४मध्ये राज्य सरकारला केली होती. 

ते स्वतः उत्तम लेखक होते. हिंदी, मराठी आणि गुजराती भाषेत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या कार्याची दाखल घेऊन २००३ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सर्वोदयी कार्यकर्ते असलेल्या चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आयुष्यभर गांधीवादी विचारांचा वारसा जपला. विधायक राजकारणासह सभा, संमेलने, व्याख्याने यातही ते सक्रिय होते. कायद्याचा क्लिष्ट अभ्यास असो, की साहित्यिक साधना, दोन्हींमध्ये ते रममाण होत. निःस्पृह, सौम्य व्यक्तिमत्त्व असलेल्या न्या. धर्माधिकारी यांनी जनमानसात आपले अढळ स्थान निर्माण केले होते.

(न्या. धर्माधिकारी यांची पुस्तके आणि ई-बुक्स ‘बुकगंगा डॉट कॉम’वर उपलब्ध आहेत. ती पाहण्यासाठी, खरेदीसाठी येथे क्लिक करा.) 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link