Next
दादा कोंडके, अरुण सरनाईक, डस्टिन हॉफमन
BOI
Wednesday, August 08, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

मराठी रंगभूमी आणि चित्रपटक्षेत्रामधले हजरजबाबी विनोदी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, गीतकार आणि संवादलेखक दादा कोंडके, रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते अरुण सरनाईक आणि दोन वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा अभिनेता डस्टिन हॉफमन यांचा आठ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....... 
दादा कोंडके 

आठ ऑगस्ट १९३२ रोजी लालबागमध्ये जन्मलेले कृष्णा खंडेराव उर्फ दादा कोंडके हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटक्षेत्रामधले हजरजबाबी विनोदी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, गीतकार, संवादलेखक आणि वगनाट्यकार अशा बहुढंगी पैलूंनी प्रसिद्ध आहेत. सत्तरच्या दशकामध्ये मराठी चित्रपट उद्योगाला नवसंजीवनी देणाऱ्या त्यांच्या एकापाठोपाठ एक नऊ सिनेमांनी रौप्यमहोत्सवी यश साजरं केलं होतं. सुरुवातीला सेवा दलाच्या मेळाव्यांतून कामं करता करता त्यांनी वसंत सबनीसांबरोबर ‘छपरी पलंगाचा वग’ हे वगनाट्य (याचंच नाव पुढे ‘विच्छा माझी पुरी करा’ असं झालं.) ‘न भूतो’ असं अफाट गाजवलं. त्यातूनच पुढे त्यांची मराठी सिनेमांत एंट्री झाली. भालजी पेंढारकर यांनी त्यांना ‘तांबडी माती’ या सिनेमातून ब्रेक दिला. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पुढे दादांनी वसंत सबनीस यांच्याच कथेवर ‘सोंगाड्या’ चित्रपटाची निर्मिती केली आणि त्या सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवली, दिमाखात रौप्यमहोत्सव साजरा केला. एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, मुका घ्या मुका, मला घेऊन चला – हे चित्रपट पाठोपाठ येत गेले आणि सर्वच चित्रपटांनी जबरदस्त धंदा करत रौप्यमहोत्सवी यश संपादन केलं. त्यामुळे दादा कोंडके हे नाव मराठी चित्रपटांच्या इतिहासात अमर झालं. दादांची लेखणीवरची हुकुमत त्यांच्या सिनेमातल्या तुफान हशे वसूल करणाऱ्या द्व्यर्थी संवादांतून जशी जाणवते, तशीच त्यांनी रचलेल्या काय गं सखू, माळ्याच्या मळ्यामंदी, हिल हिल पोरी हिला, माणसापरास मेंढरं बरी, लबाड लांडगं ढ्वांग करतंय यांसारख्या गीतांमधूनही जाणवते. १४ मार्च १९९८ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
......

अरुण सरनाईक 

आठ ऑगस्ट १९३२ रोजी जन्मलेले अरुण सरनाईक हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटक्षेत्रातले अत्यंत उमदे आणि देखणे अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते. भटाला दिली ओसरी, अपराध मीच केला, तरुण तुर्क म्हातारे अर्क, गोष्ट जन्मांतरीची, गुडबाय डॉक्टर, लवंगी मिरची कोल्हापूरची अशा व्यावसायिक नाटकांमधल्या भूमिका आपल्या सहजसुंदर आणि तडफदार अभिनयाने गाजवणारे अरुण सरनाईक हे मराठी चित्रपटसृष्टीमध्येही आपल्या देखण्या आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने पडदा गाजवत होते. रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, सवाल माझा ऐका, डोंगरची मैना, घरचा भेदी, मुंबईचा जावई, खंडोबाची आण, पाहू रे किती वाट, पाठराखीण, संथ वाहते कृष्णामाई, केला इशारा जाता जाता, घरकुल, सिंहासन यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी जबरदस्त छाप पाडली. त्यांना गायनाचंही उत्तम अंग होतं आणि त्यांनी गायलेली ‘पप्पा सांगा कुणाचे’ आणि ‘एक लाजरा न् साजरा मुखडा’ सारखी गाणी तुफान लोकप्रिय ठरली आहेत. त्याव्यतिरिक्त ते स्वतः उत्तम तबलावादन आणि पेटीवादन करत होते. १४ मार्च १९९८ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
.....

डस्टिन हॉफमन
 
आठ ऑगस्ट १९३७ रोजी कॅलिफोर्नियात जन्मलेला डस्टिन हॉफमन हा दोन वेळा ऑस्कर मिळवणारा गुणी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. १९६७ सालच्या ‘ग्रॅज्युएट’ सिनेमातली प्रौढ वयातल्या विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडणाऱ्या विशीतल्या तरुणाची त्याची भूमिका तुफान गाजली आणि तो प्रसिद्धीच्या झोतात आला. मिडनाइट काउबॉय सिनेमातली त्याची हटके भूमिकाही लोकप्रिय ठरली. लिटल बिग मॅन, लेनी, स्रॉची डॉग्ज, अमेरिकेत खळबळ उडवणाऱ्या वॉटरगेट प्रकरणावर आधारित ‘ऑल दी प्रेसिडेंट्स मेन’ या फिल्ममधली त्याची शोधपत्रकाराची भूमिकाही चांगलीच गाजली. १९७९ सालच्या ‘क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर’ने त्याला पहिलं ऑस्कर मिळवून दिलं. दुसरीकडे तो रंगभूमीवर डेथ ऑफ ए सेल्समन आणि दी मर्चंट ऑफ व्हेनिस यांसारख्या नाटकांमधून आपल्या सशक्त अभिनयाची चुणूक देत होताच. ‘रेनमॅन’ सिनेमातल्या त्याच्या ऑटिस्टिक माणसाच्या भूमिकेनं त्याला दुसरं ऑस्कर मिळवून दिलं. पॅपिलॉन, हूक, हिरो, आउटब्रेक, स्फिअर, टूट्सी अशा सर्वच भूमिकांमधून त्याच्यातल्या कलासक्त अभिनेत्याचं दर्शन लोकांना घडलं आहे. 

यांचाही आज जन्मदिन :
ग्रामीण बाजाच्या खुसखुशीत आणि धमाल कथांनी लोकप्रिय झालेले लेखक शंकर पाटील (जन्म : आठ ऑगस्ट १९२६, मृत्यू : १८ ऑक्टोबर १९९८)
पुलित्झर पारितोषिक विजेती, ‘यी(अ)र्लिंग’ कादंबरीची लेखिका मारजॉरी किनन रॉलिंग्ज (जन्म : आठ ऑगस्ट १८९६, मृत्यू : १४ डिसेंबर १९५३)
यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

‘तमस’मुळे गाजलेले प्रसिद्ध हिंदी साहित्यिक भीष्म साहनी (जन्म : आठ ऑगस्ट १९१५, मृत्यू : ११ जुलै २००३) 
साठच्या दशकातला भारताचा उत्कृष्ट फलंदाज दिलीप सरदेसाई (जन्म : आठ ऑगस्ट १९४०, मृत्यू : दोन जुलै २००७) 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search