Next
भावी खेळाडूंना सक्षम बनवणारी ‘अनुथम’
BOI
Friday, January 12 | 03:45 PM
15 0 0
Share this story

बाबा आमटे संस्थेतील मुलांना खेळाचे साहित्य वाटप करताना कमल सावंत

सुरुवातीपासूनच समाजसेवेचं व्रत घेतलेल्या आणि आपल्याला अवगत असलेल्या कलेचा आणि आपल्या कामाचा या समाजकार्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेणाऱ्या कमल सावंत हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. ‘अनुथम’ ही त्यांची संस्था खेळ आणि समाजकार्य या विषयांत काम करते. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज प्राची साळुंखे यांनी घेतलेली कमल सावंत यांची मुलाखत...
...................
कमल सावंतमाझ्यासाठी कोणी काय करून ठेवलं याचा विचार करण्यात आणि इतरांना दोष देण्यात बऱ्याच जणांचं  अवघं आयुष्य निघून जातं, मात्र आयुष्याचा खरा अर्थ ज्याला कळला, त्याने हे जग जिंकलंच म्हणून समजा. असाच जग जिंकण्याचा वसा घेतलेल्या आणि खऱ्या अर्थाने प्रेरणेचा स्रोत असलेल्या कमल सावंत देशातील भावी खेळाडूंसाठी आपलं आयुष्य वेचत आहेत. त्या भारतीय क्रिकेट संघाच्या माजी गोलंदाज आणि समाजसेविका आहेत. खरं तर त्यांना समाज सुधारक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या ‘अनुथम स्पोर्ट्स अँड सोशल ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून कमलताई खेळाडूंना त्यांच्या स्वप्नातले नवे विश्व साकार करण्यात मदत करत आहेत.  

खेळाच्या साहित्यांची उणीव आणि त्यातूनच निर्माण झालेला कुटुंबियांचा विरोध पत्करून आपल्या खेळाची आवड जोपासणाऱ्या कमल सावंत यांनी शालेय विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देण्यासाठी सुरुवातीला ‘अनुथम’ संस्थेची स्थापना केली. कमलताईंच्या आणि या संस्थेच्या वाटचालीबद्दल त्यांच्याशी चर्चा करताना त्यांच्या या कामाचा नेमका आवाका लक्षात आला. 

प्रातिनिधिक फोटोक्रिकेट या खेळाबद्दल आकर्षण कसे व कधी निर्माण झाले?
- अहमदनगर मधील श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी या छोट्याशा गावात राहणारी मी शालेय वयापासूनच खेळाकडे आकर्षित झाले. तेव्हा मुलांच्या खांद्याला खांदा लावून खेळणारी मी तिथली एकमेव मुलगी होते. आट्यापाट्या, कबड्डी या खेळांमधूनच माझ्यातील खेळाडू जागा झाला होता. साधारण १९७५ चा तो काळ, तेव्हा क्रिकेट या खेळाबद्दल फारशी माहिती नव्हती. घरापासून शाळेचं अंतर खूप असल्यामुळे मोठ्या बहिणीने शिक्षणासाठी मला पुण्यात बोलावून घेतलं. गावाप्रमाणेच तिथेदेखील आम्हा मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप तयार झाला. आम्ही सर्व मिळून वाड्यात क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी रबरी चेंडू आणि टायरच्या ट्युबने गुंडाळलेल्या फळीचा वापर करून आम्ही क्रिकेट खेळायचो. 

माझी क्रिकेटची आवड पाहून माझ्या एका मित्राने मला नेहरू स्टेडियम ला जाऊन क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आणि मी पोहोचले नेहरू स्टेडियमला. आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यातच तेव्हा अर्थात क्रिकेट हा मुलांचा खेळ समजला जायचा. त्यामुळे कुटुंबियांचा क्रिकेट खेळायला विरोध. अशातच कबड्डी खेळण्याचा सल्ला मला दिला गेला, मात्र मला ते रुचलं नाही. मी क्रिकेटच खेळायचं ठरवलं. दररोज स्टेडियमवर जाऊन सरावाला मी सुरुवात केली आणि तेव्हापासूनच मी क्रिकेटची होऊन बसले. 

खेळ आणि सामाजिक कार्य यांची सांगड कशी घातलीत.. आजही कशी घालता..?
- ‘अनुथम सोशल अँड स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन’ ही आमची संस्था मुळातच खेळ व सामाजिक कार्य या दोन्हींसाठी काम करते. १९७५च्या तुलनेत आत्ताचा हा काळ खूप चांगला आहे. मात्र आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांना खेळायला पुरेसे खेळाचे साहित्य उपलब्ध नसते. त्यातही बऱ्याच ठिकाणी आजही मुलींना खेळण्याची मुभा दिली जात नाही. म्हणूनच ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांची शारीरिक वाढ यामध्ये खेळाचे कसे महत्त्व आहे, याबाबत जागृती करण्याची गरज असल्याचे जाणवले. यासाठी जास्तीत जास्त मुला-मुलींनी खेळाकडे वळावं हा ‘अनुथम’चा मानस आहे. यात कोणाच्या वैयक्तिक जीवनात जर काही समस्या असतील तर तेही सोडवण्याचं काम आम्ही करतो. 

तुम्ही म्हणालात, की क्रिकेट ची आवड जोपासताना आर्थिक दृष्ट्या बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं.. असा एखादा प्रसंग सांगाल?
- जमशेदपूर नॅशनलला माझी ओपनिंग बॉलर म्हणून निवड झाली होती. त्यावेळी पांढऱ्या रंगाचे स्पाईक शूज अनिवार्य होते. मात्र साधारण ६०० ते ७०० रुपये किंमत असलेले ते शूज तेव्हा मला घेणं शक्य नव्हतं. मी शिरूरला गेले आणि तिथल्या माझ्या नेहमीच्या चप्पल शिवणाऱ्याला तसे शूज तयार करून देण्यास सांगितले. पांढऱ्या रंगाचं लेदर आणून त्यांनी अक्षरशः खिळे लावून ते शूज तयार करून दिले. शूज तर मला मिळाले होते, पण एका शूजचं वजन साधारण दोन किलो होतं... तेव्हा चार किलोंचे ते शूज घालून मी गोलंदाजी केली होती. साहजिकच पुढे त्याचा परिणाम खेळावर होणार होता. योग्य साहित्य न मिळाल्यास त्याचा खेळावर किती परिणाम होऊ शकतो हे तेव्हा मला कळलं.

‘अनुथम’ ही संस्था कशा पद्धतीने काम करते? 
- मुलांचा बौद्धिक विकास होणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकाच त्यांचा शारीरिक विकासदेखील महत्त्वाचा आहे. अनुथम संस्थेमार्फत चालणारे काम हे विशेषतः ग्रामीण भागात केले जाते. यामध्ये आम्ही ग्रामीण भागातील शाळांना व लहान मुलांच्या आश्रमांना भेटी देतो. त्यांना खेळाचे महत्त्व पटवून देणे, त्यासाठीचे आवश्यक साहित्य सांगणे, ते उपलब्ध होऊ शकत नसल्यास त्यासाठीची मदत करणे, ते साहित्य पुरवणे हे काम सध्या अनुथम करत आहे. यापुढेही कायम करत राहील.

समाजातील जाणत्या व दानशूर लोकांनीदेखील या उपक्रमात सहभाग घ्यावा असं आवाहन आमच्या वतीने मी करेन. शेवटी आपली एक छोटी मदत आपल्या देशाला भविष्यात योग्य खेळाडू मिळवून देऊ शकते.

संपर्क : 
अनुथम सोशल अँड स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन
मोबाइल : ९९६०४ ७४७१४ / ९३७२० ७००८३ 
ई-मेल : info@anutham.in / anuthamngo@gmail.com

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

(कमल सावंत यांनी संस्थेबद्दल दिलेल्या माहितीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link