Next
महिला सुरक्षेच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारा ‘बंदीशाळा’
मुक्ता बर्वे मध्यवर्ती भूमिकेत; सरकारच्या वतीने चित्रपटाची ‘कान्स’साठी निवड
BOI
Saturday, May 18, 2019 | 01:22 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : गुन्हेगारांचा कर्दनकाळ बनत, परिणामांची पर्वा न करता उसळत्या दंगलीला भिडणाऱ्या एका पोलिस अधिकारी महिलेची कथा म्हणजे ‘बंदीशाळा’. आपल्या सशक्त आणि खंबीर भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे मध्यवर्ती भूमिकेत असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

मुक्ता बर्वेदिग्दर्शक मिलिंद लेले या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळत असून, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘पांगिरा’, ‘जोगवा’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक संजय कृष्णाजी पाटील यांनी बंदीशाळाची कथा लिहिली आहे. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असून महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने या चित्रपटाची ‘कान्स’ महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. याशिवाय ५६व्या ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारां’मध्ये या चित्रपटाला सहा प्रकारांत नामांकने मिळाली आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवणारा असा आहे. 

भोंग्याच्या आवाजाने सुरक्षा रक्षक भानावर येतात, त्यांची तारांबळ उडते. या सगळ्या गोंधळात माधवी सावंत (मुक्त बर्वे) नावाची एक महिला पोलिस अधिकारी अगदी बिनधास्तपणे त्या उसळलेल्या दंगलीला भिडते. आपला करारीपणा दाखवत ती तिथल्या दंगलखोरांवर आपली एक जरब बसवते. गुन्हेगारीचा समूळ नायनाट करण्याच्या उद्देशाने काम करणारी ही माधवी सावंत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. मुक्ताचा कधीही दिसला नाही असा एक नवा अवतार या चित्रपटातून दिसतो. अशी दृश्ये चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. हा ट्रेलर जेवढा प्रेक्षकांच्या अंगावर येतो, तेवढाच तो भिडतोदेखील.

आपल्या संयमी आणि सशक्त अभिनयाने मुक्ताने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा असाच सशक्त, गंभीर आणि भिडणारा अभिनय या सिनेमातदेखील पाहायला मिळणार आहे. आजही बहुसंख्य ठिकाणी ऐरणीवर असलेला महिला सुरक्षेचा प्रश्न, त्याचे विविध पैलू आणि आजची वास्तव परिस्थिती यावर कठोरपणे भाष्य करणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या निर्मात्या स्वाती संजय पाटील यांनी हा एक अॅक्शनपट असल्याचे म्हटले आहे. 

विविध प्रकारच्या छटा असणाऱ्या भूमिका केलेल्या मुक्ताची ही बेधडक, कठोर आणि सशक्त भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक निश्चितच उत्सुक आहेत, परंतु तरीही या भूमिकेतील मुक्ता प्रेक्षकांना किती भावते हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search